प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

सुत्तांच्या काळाच्या पौर्वापर्याचा विचार.- कालाच्या दृष्टीनें हीं निरनिराळीं सुत्तें एकमेकांहून फार भिन्न आहेत. मज्झिम निकाय यांतील कांहीं सुत्तांमध्यें महापरिनिब्बान सुत्तांतील प्राचीन भागांतल्याप्रमाणें बुद्ध हा केवळ मनुष्य व उपदेशक असा दृष्टीस पडतो. तो स्वतःबद्दल एखाद्या मनुष्यकोटींतल्याच व्यक्तीप्रमाणें बोलतो. मात्र त्याला विशेष ज्ञान झाल्यामुळें पुढें पूर्ण निर्वाणाप्रत जाण्याच्या सुखाचा तो अनुभव घेत असतांना दृष्टीस पडतो. सुत्त नं. २६ व ३६ यांमध्यें तो साध्या भाषेंत आपल्या आत्मचरित्राचा कांहीं भाग कथन करतो. त्यामध्यें त्यानें एकहि चमत्कार केलेला आढळत नाहीं. परंतु इतर सुत्तांमध्यें (उदाहरणार्थ नं. १२) बुद्धाच्या ठायीयं सर्व दैवी गुणांचें व चमत्कारांचें सामर्थ्य असल्याबद्दलचें वर्णन आढळतें. 'चमत्कार सुत्त' (नं. १२३) यामध्यें बुद्धाची गर्भावस्था व जन्म यांबद्दलच्या चमत्कारांचें वर्णन पुष्कळ अलीकडील लौकिक वाङ्‌मयांमध्यें (उ. निदानकथा किंवा ललितविस्तर यांमध्यें) आढळून येणा-या दंतकथांप्रमाणें व दीघ निकाय यांतील महापदानसुत्त यामध्यें आपणांस आढळून आल्याप्रमाणेंच दृष्टीस पडतें. या सुत्तामध्यें बुद्ध अथवा मोग्गपालन यांचें अदृश्य होणें, व एखाद्या सशक्त मनुष्यानें आपला हात लांब किंवा आंखूड करावा त्याप्रमाणें एकदम देवलोकामध्यें अथवा ब्रह्मलोकामध्यें प्रगट होणें इत्यादि चमत्कार ठिकठिकाणीं वर्णन केलेले आढळतात. एका सुत्तामध्यें (नं. ४९) बुद्ध हा ब्रह्मदेवासुद्धां सर्व देवांपेक्षां श्रेष्ठ आहे असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी बहुतेक भाषणें बुद्धाच्या तोंडीं घातलीं आहेत तरी कांहीं भाषणें बुद्धाच्या कांहीं शिष्यांच्या तोंडीहि घातलेलीं आढळतात. कांहीं ठिकाणीं विचारलेल्या प्रश्नास एखादा शिष्य उत्तर देतो, व ते बरोबर असल्याबद्दल बुद्धाची संमति घेतो (नं. १२६). तथापि, सर्व सुत्तें बुद्ध हयात असतांना रचलीं गेली ही कल्पनाहि सर्वत्र कायम राखलेली दिसत नाहीं. उदाहरणार्थ नं. ८४ व ९४ यांमध्यें एका शिष्यानें सध्यां बुद्ध कोठें आहे असा प्रश्न विचारिला असतां, तो पूर्णनिर्वाणाप्रत गेला आहे असें त्यास उत्तर मिळालेलें आढळतें. सूत्र नं. १०८ याचा बुद्धाच्या मरणाशीं निकट संबंध दिसतो. यामध्यें, बुद्धानें निर्वाणापूर्वीं भिक्षुसंघावर एखाद्या मुख्याची नेमणूक केली नाहीं का, असा आनंदास प्रश्न केलेला आढळतो. या प्रश्नास आनंदानें नकारार्थी उत्तर दिलें; पण केवळ तेवढ्याच गोष्टीवरून भिक्षुसंघास कोणाचाहि आश्रय नाहीं असें नाहीं, कारण धम्म हा त्यांचा आश्रय असून बुद्धानें घालून दिलेल्या पातिमोक्ख विधीमुळें त्यांच्यामध्यें सुव्यवस्था राहील असें सांगितलें. या सुत्ताचा धम्मापेक्षां विनयाशीं (भिक्षुवर्गाच्या आचारांशीं) जास्त संबंध दिसतो. अशीं दुसरींहि कांहीं सुत्तें आहेत (नं. १०३, १०४ व १४२).

निरनिराळ्या सुत्तांमध्यें ज्या निरनिराळ्या पद्धतींनीं बौद्धसंप्रदायिक तत्त्वांचें विवेचन केलें आहे, त्या पद्धतींवरून त्या सुत्तांच्या रचनेचा काल निश्चित करतां येईल किंवा नाहीं हा प्रश्नच आहे. सुत्त नं. १२९ F व १३५ F यांमध्यें कर्मवादाचें बीभत्स रीतीनें विवेचन केलें आहे व यमलोकांतील यातनांचें इतकें सुक्ष्म वर्णन केलें आहे कीं, तसेंच वर्णन आपणांला पुराणांमध्यें आढळतें. यावरून हीं सुत्तें बरींच अलीकडील असावींत असें वाटतें; परंतु प्राचीन काळींहि निव्वळ तात्त्विक कर्मवादाप्रमाणेंच परंतु त्यापेक्षां निराळी एखादी कर्मवादाची सुलभ कल्पना लोकांमध्यें रूढ असावी. मज्झिम निकाय रचला जाण्यापूर्वीचा बौद्ध संघाचा कांहीं तरी इतिहास असला पाहिजे ही गोष्ट नं. ६५ या सुत्तावरून व्यक्त होते. यामध्यें, पूर्वी शास्त्रवचनें थोडीं असून भिक्षूंची संख्या मोठी असे, परंतु सध्यां शास्त्रवचनांची संख्या मोठी असून भिक्षूंची संख्या थोडी आहे असें म्हटलें आहे. अस्सलायन सुत्तामध्यें (नं. ९३) यवनांचा व कांबोजांचा उल्लेख आला आहे; त्यावरून त्या वेळीं ग्रीकोबॅक्ट्रियन साम्राज्य अस्तित्वांत असून तो काल अशोकाच्या थोडा पूर्वींचा असावा असें दिसतें.

नं. ४१ व ४२ या सुत्तांवरून या संग्रहाचा आरंभ असा झाला हें ध्वनित होतें. नं. ४२ हें सुत्त थोड्या प्रास्ताविक भागांखेरीज शब्दशः नं. ४१ या सुत्ताप्रमाणेंच आहे. इतर ठिकाणींहि तींच प्रवचनें व तेच संवाद फक्त निरनिराळ्या परिस्थितींमध्यें पुन्हां आलेले आढळतात. उदाहरणार्थ, नं. १३२ ते १३४ हीं सुत्तें एकाच प्रवचनाचीं दोन रूपें आहेत. हीं प्रवचनें बहुधा भिक्षूंनीं प्रत्यक्ष केलेलीं असावींत. जेव्हां एखाद्या भिक्षूस कांहीं नवीन आठवत नसेल तेव्हां तो एखादें जुनेंच प्रवचन कांहीं किरकोळ फेरफार करून सांगत असावा. पुढें संग्रहकारांनीं हीं सर्व प्रवचनें-मग तीं कोणत्याहि उपदेशकाच्या तोंडचीं असोत-जशीं उपलब्ध झालीं तशीं एकत्र केलीं असावींत.