प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

यज्ञसंस्थेविरुद्ध बंड करण्यांत प्रमुख स्थान कोणाला - उपनिषदांतील विचार ही विशिष्ट विचारपद्धति नसून निरनिराळ्या प्रसंगीं निरनिराळ्या कवींनीं व्यक्त केलेले विचार आहेत हें मागें सांगितलेंच आहे. औपनिषद विचारांचा भर यज्ञसंस्थेच्या सामान्यतः विरुद्ध आहे.

जैनमत आणि बौद्धमत यांत ब्राह्मणी विचारांस किंवा विचारपरंपरेस विरुद्ध असें कांहीं नाहीं. ज्या प्रकारचे विचार उपनिषदांनीं व्यक्त केले त्या प्रकारचेच जैनांनीं आणि गौतमानें व्यक्त केले आहेत. तथापि जैनमत आणि बौद्धमत यांस ब्राह्मणी यज्ञसंस्थेच्या विरुद्ध बंड करणा-यांत प्रामुख्यानें स्थान देतां येणार नाहीं. यज्ञसंस्थेविरुद्ध बुद्धजन्मकाळीं बंड करण्यांत तात्पर्यच नव्हतें. कारण त्या काळीं आजच्या काळापेक्षां अधिक यज्ञ होत असावेत असें वाटत नाहीं. संहितीकरणाचा काळ तोच यज्ञसंस्थाविनाशाचा काळ होता. यज्ञसंस्थेपासून परावृत्त करून लोकांस ज्ञानमार्गानें नेण्याचें श्रेय आरण्यकीय ब्रह्मवेत्त्यांस दिलें पाहिजे. महावीर व बुद्ध यांस जर कांहीं श्रेय द्यावयाचेंच असेल, तर तें शत्रूचें डोकें अगोदरच कोणीं कापून नेल्यानंतर त्याचे हातपाय कापून काढणा-या वीराचें श्रेय देतां येईल. जैन व बौद्ध संप्रदायांची किंमत त्यांच्या यज्ञविरोधित्वामुळें नव्हती. आरण्यकीय विचारानेंच यज्ञ अनवश्यक मानले गेले. यज्ञ खर्चाचे असल्यामुळें लोकांनां ते नकोसे झाले होते. यज्ञ करणा-या ॠत्विग्वर्गांतच भांडणे होऊन व त्यामुळें विधींत बारीकसारीक फरक उत्पन्न करणारीं शाखांतरें उपस्थित होऊन, सामान्य जनांस जुगुप्सा उत्पन्न होण्याइतकी परिस्थिति त्यांनीं उत्पन्न केली होती; आणि यज्ञावर भिक्षुकी चालेना तेव्हां आपआपल्या शाखेला निराळें गृह्य उत्पन्न करून त्या शाखेंतील अन्य धंद्यांत पडलेल्या गृहस्थवर्गावर आपली भिक्षुकी ॠत्विग्वर्गाच्या वेदपठन करणा-या वंशजांस चालवावी लागली होती. सारांश, यज्ञसंस्थेचा निःपात अगोदरच झाला होता.

उपनिषदांतील कर्तव्यात्मक विचाराचें स्वरूप काय ? मनुष्यानें ब्रह्मज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा या प्रकारचें ध्येय डोळ्यापुढें ठेवलें, तर त्यामुळें एक पंचाईत उपस्थित होते. प्रत्येकानें ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न जर करावयाचा, तर तेथें दैनिक नित्यकर्मे मनुष्यानें कोणतीं करावयाचीं ? शिवाय, जो ज्ञानाच्या मागेंच लागेल त्याचें पोट कसें चालावयाचें ?   ब्रह्मज्ञान जर अवश्य तर वेदज्ञानाची वाट काय ? वेदज्ञान असलेल्यांनीं काय करावें ?  अशा प्रकारच्या परिस्थितींत लोकप्रवृत्ति अनेक त-हेची उत्पन्न झाली. कांहीं लोक ज्ञानमार्ग खरा पण जुनें कर्म चालू ठेवावें असें म्हणणारे झाले; आणि कर्में हीं परमार्थकारण न राहतां लोकांच्या चातुर्वण्यांतील सामाजिक स्थानांचीं निदर्शक होऊन त्यामुळें तीं समाजांतील कांहीं वर्गांपुरतीं चालू राहिलीं. तथापि, ज्या लोकांनां कर्मेंच नाहींत त्या लोकांनां कांहींतरी कर्में लावून आणि प्रचलित मतांपैकीं एखाद्या विचारपरंपरेस तीं कर्में चिकटवून संप्रदायस्थापना करावी, या त-हेची सवड या धंद्यांत चळवळ करणारांनां होती. बौद्ध आणि जैन या दोन संप्रदायांच्या अस्तित्वांत पोषक अशी परिस्थिति येणेंप्रमाणें सांगता येईल.