प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.
आजीविक नांवाचा भिक्षूंचा पंथ - त्या वेळेस जैन, बौद्ध आणि भागवत संप्रदायांशिवाय आणि श्रौत धर्माच्या अनुयायांशिवाय दुसरा एखादा संप्रदाय प्रचलित होता किंवा काय हा एक प्रश्न आहे. असें शक्य आहे कीं, कांहीं प्रचलित संप्रदायांचीं मुळें त्या काळांतलीं असतील. तंत्र ग्रंथांचें मूळहि वैदित कालांत किंवा उपनिषत्कालांत सांपडेल. बौद्ध व इतर ग्रंथांत आजीविक म्हणून एक संप्रदाय दृष्टीस पडतो. तो संप्रदाय नारायणीय होता कीं नव्हता याविषयीं मतभेत आहे. या विषयांवरील भिन्न मतें येथें मांडलीं असतां काम भागण्यासारखें आहे.
याविषयीं प्रो. काशीनाथ बाळकृष्ण पाठक इंडियन अँटिक्वरि पु. ४१ मध्यें येणेंप्रमाणें लिहितात:-
आजीविक हा शब्द अजीव ह्यापासून झालेला आहे. आत्म्यास अस्तित्व नाहीं असें या पंथाचे अनुयायी मानतात. बौद्ध सम्राट अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यानें ह्या पंथाला कांहीं लेणीं अर्पण केलीं होतीं. व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो कीं (अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. १५६), ह्या पंथाचे लोक नग्न फिरत असत व त्यांचे पंथविषयक आचार फार कडक असत. स्मिथच्या मतें आजीविकांचा संबंध बौद्धांशीं नसून जैनांशीं होता.
प्रख्यात दिगंबर जैन ग्रंथकर्ता वीरनन्दि यानें शके १०७६ त श्रीमुख संवत्सरीं ''आचारसार'' नांवाचा ग्रंथ रचला [मूळ ग्रंथ पद्यांत असून त्याची कन्नड टीका गद्यांत आहे]. ज्या काळीं दक्षिण हिंदुस्थानांत बौद्ध पंथ प्रचलित होता त्या काळीं वीरनन्दि होऊन गेला. आचारसारांत बौद्ध पंथाचा पुष्कळ ठिकाणीं उल्लेख आलेला आहे (३.४६; ५९). ह्यावरून स्पष्ट दिसतें कीं, शके १०७६ त कानडी देशांत बुद्धाचे पुष्कळ अनुयायी होते. आचारसारांत एके ठिकाणीं आजीविकांचा उल्लेख केलेला आहे (परिव्राड् ब्रह्मकल्पान्तं यात्युग्राचारवानपि आजीवकःसहस्त्रार (?) कल्पान्तं दर्शनोज्झितः ॥११.१२७] तेथील लिहिण्यावरून असें दिसतें कीं, त्याच्या काळीं आजीवक [याचें शुद्ध रूप आजीविक असें आहे] नांवाच्या बौद्ध भिक्षूंचा एक वजनदार पंथ होता; हे लोक कांजीवर रहात असत व आपल्या पंथाच्या कडक आचारांचें अनुसरण करून समकालीन जैनांनां आश्चर्य वाटावयाला लावीत.
आचारसाराच्या कागदावरील हस्तलिखित प्रती दोन आहेत. एक कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन मठाची आहे. तिच्या वरील काल शके १६९२ हा आहे. दुसरी प्रत कोल्हापूर संस्थानांतील शिरोळ येथील जैन समाजाच्या ताब्यांत असून शके १६६६ त अनन्तमति नांवाच्या प्रसिद्ध जोणिगीनें ती नक्कल केलेली आहे. दोन्ही हस्तलिखित प्रती जुन्या कानडी लिपींत लिहिलेल्या असून त्यांत 'आजीवक' हें रूप आढळतें. कांजिकादि भोजनाला माधवचंद्राचा आधार आहे [त्रिलोकसाराच्या ५४५ व्या गाथेवरील माधवचंद्राची टीका पहा].
'माघनान्द्रिश्रावकाचार' हा ग्रंथ १३ व्या शतकाच्या मध्यकालीं रचलेला आहे. त्यांत असें म्हटलें आहे कीं, बौद्ध मांसभक्षक आहेत व 'पात्रे पतितं पवित्रम्' या न्यायानें ते आपला आचार निर्दोष आहे असें ठरवितात (प्रकरण ६, शिरोळ हस्तलिखित, पृ. ७१४ व). त्याच ग्रंथांत आजीविकांविषयीं असें म्हटलें आहे कीं, अच्युतकल्प नामक स्वर्गांत कनिष्ठ प्रतीचे देव म्हणून ह्यांचा जन्म होईल. पद्मप्रभाचेंहि मत असेंच आहे (विशंति प्ररूपणि शेवटचें प्रकरण पहा). पद्मप्रभ त्रैविद्यानें माघनन्दि श्रावकाचारांतील उतारे वारंवार दिले असल्यामुळें तो १३ व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला असावा.
सारांश उत्तरकालीन चालुक्य व यादव यांच्या काळच्या जैन ग्रंथकारांनां आजीविक लोक हा मुख्यत्वेंकरून कांजीवर राहणारा बौद्ध भिक्षूंचा पंथ म्हणून माहीत होता.
यावर संपादक प्रो. देवदत्त भांडारकर लिहितात:-
''ह्या पंथावरील माझ्या एका लेखांत (जर्नल बाँबे एशियाटिक सोसायटी, पु. २१, पृ. ४०३-५) मी आजीविकांचे सर्व उल्लेख एकत्र केलेले आहेत. प्रो. पाठकांनीं दाखविल्याप्रमाणें जैनांनीं त्यांनां बौद्ध भिक्षूंचा पंथ म्हटलेलें आहे, परंतु बौद्धांनीं देखील त्यांनां 'निर्ग्रन्थ' म्हणून म्हटलें आहे असें दिसतें. कारण, 'दिव्यावदानांत' एकदां 'निर्ग्रन्थां' चा प्रत्यक्ष आजीवक असा उल्लेख केलेला आहे (कॉवेल अँड नील, पृ. ४२७). वस्तुस्थिति अशी आहे कीं, ब-याच उत्तरकालीं देखील ते बौद्ध किंवा जैन यांपैकीं कोणांतच मोडत नसून त्यांचा एक वेगळाच पंथ होता. प्रो. हुल्टशनें 'दक्षिण हिंदुस्थानांतील अंकित लेखां' पैकीं कांहीं लेखांत उल्लेख केलेल्या आजीविकांनां जैन असें मानिलें आहे (साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स, पुस्तक १, पृ. ८८, ८९, ९२ व १०८) तें बरोबर नाहीं.''