प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

आजीविकांविषयीं कांहीं अधिक माहिती - ह्या पंथाविषयीं कांहीं अधिक माहितीं रा. दे. रा. भांडारकर यांनीं दिली आहे ती अशीं:-

ह्या मठाश्रयी पंथाचे संस्थापक नंद-वच्छ, किससंकिच्छ व मखली गोशाल हे होते. मखली गोशाल हा बौद्ध संप्रदायग्रंथांत दिलेल्या सहा आचार्यांपैकीं एक होता. बुद्धघोष सांगतो कीं [रॉयल एशियाटिक सोसायटीचें १८९८ सालचें नियतकालिक पृ. १९७], आजीविक हा 'नग्गपब्बजितो' आहे. आजीविकांचें 'अचेल' म्हणजे वस्त्ररहित असें वर्णन केलेलें आहे (जातक १.३९०). विनयपिटकावरून असेंच दिसून येतें (एतद्विषयक एक गोष्ट महावग्ग ८.१५, २-६ मध्यें व दुसरी निसग्गिय ६.२ मध्यें आहे).

आजीविक आपलीं शरीरें धुळीनें माखीत व गोवत्साची विष्टा खात असत (जातक १.३९०). त्यांचे धार्मिक आचार फार कष्टदायक व कडक असत (जातक १.४९३ व र्‍हीस डेव्हिड्सचे बुद्धसंवाद, पु. १, पृ. २२७ व पुढील पानें आणि जातक ३.५४२ पहा). न-अत्थि कम्मम् न-अत्थि किरियम, न अत्थि विरियन-ति हें त्यांचे मत होतें (अंगुत्तर-निकाय, पु. १, पृ. २८६ व त्याचप्रमाणें र्‍हीस डेव्हिड्सचे बुद्धसंवाद पु. १, पृ. ७१ व पुढील पानें पहा), व ते पूर्ण दैववादी होते.

बुद्धसंप्रदायाचा उदय होण्यापूर्वीं बराच काळ आजीविक अस्तित्वांत होते. बुद्धाच्या काळीं मक्खली गोशाल हा त्यांचा प्रसिद्ध मतवादी होता. पहिले दोन आचार्य नन्दवच्छ व किस-संकिच्छ हे होते, व मक्खली गोशाल हा तिसरा आचार्य होता. मौर्य कालांत त्यांनां महत्त्व आलें असावें असें दिसतें. बराबर व नागार्जुनी लेण्यांतील शिलालेखांवरून असें दिसतें कीं, अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनीं हीं लेणी कोरून ह्यांनां तीं अर्पण केलीं. धर्ममहामात्रांनां ज्यांच्याशीं संबंध ठेवण्याला त्यानें आज्ञा केली होती त्या पंथासंबंधात आजीविकांचाहि उल्लेख केलेला आढळून येतो (एपिग्राफिआ इंडिका, पु. २, पृ. २७२). नंतर वराहमिहिराच्या काळापर्यंत (अजमासें इ. स. ५२५) आपणांला यांची कांहीं माहिती कळत नाहीं. वराहमिहिरानें त्यांचा बृहज्जातकांत उल्लेख केलेला आहे. कुमारदासाच्या (इ. स. ७२५) 'जानकीहरणांतहि ह्यांचा उल्लेख आढळून येतो. मद्रास इलाख्यांतील व १३ व्या शतकाच्या प्रथमार्धांतील कांहीं शिलालेखांत आजीविकांवर बसविलेल्या एका विशिष्ट कराचा उल्लेख आहे (साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स, पु. १, पृ. ८८,८९,९२ व १०८). १३ व्या शतकापर्यंत त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा सांपडत नाहीं या समजुतीनें कदाचित् प्रो. हुल्ट्श त्यांनां जैन समजला असेल. परंतु हें मत निराधार आहे असें प्रो. पाठकांनीं दाखविलें आहे (इं. अँ. पु. ४१, पृ. ८९).

अमरकोशांत पांच प्रकारचें संन्याशी सांगितले आहेत. त्यांत 'मस्करिन' यांचा उल्लेख केलेला आहे. पाणिनीच्या सूत्रांत (६.१, १५४) 'मस्करिन' चा एक अर्थ परिव्राजक असा दिलेली आहे. ह्या सूत्रावरची पतञ्जलीची टीका, काशिका टीका व पतञ्जलीच्या महाभाष्यावरील कैयटाचा प्रदीप यांत 'मस्करिन्' असें कांहीं लोकांनां म्हणण्याचें कारण असें दिलें आहे कीं, ते लोक सर्व कर्मांच्या विरुद्ध होते. व शांति हेंच त्यांचें इष्ट ध्येय होतें. ह्या प्रकारचें मत धारण करणारा पंथ आजीविकांचाच होता (दीघ निकायांतील सामञ्ञ फलसुत्त). गोशाल याला बौद्ध ग्रंथांत मखली असें म्हटलें आहे. मखली (मक्खली) हें 'मस्करिन्' चें पाली रूप होय. शिवाय जानकी-हरणांत व भट्टिकाव्यांत (सर्ग ५, श्लोक ६१-६३) मस्करिन् शब्दाचा उपयोग आजीविक ह्या अर्थी प्रत्यक्ष केलेला आहे.

भट्टिकाव्यांत याच ठिकाणीं शेंडी अथवा जटा वाढविणें हेंहि आजीविकाचें एक चिन्ह दिलेलें आहे. म्हणून मल्लीनाथ त्यांनां त्रिदंडी म्हणतो. हें वर्णन जानकीहरणांतील 'उत्तुंगजटा' शीं जुळतें असल्यामुळें आजीविक हा त्रिदंडी असला पाहिजे, उत्पल म्हणतो तसा एकदंडी नसावा.

यासंबंधीं गोविंदाचार्यस्वामी यांनीं दोन मुद्दे पुढें आणले आहेत. ते येणेंप्रमाणें (इं. अँ. पु. २३, पृ. २४).

(१) वैखानसाच्या धर्मसूत्रावरून, प्रो. कर्ननें (अथवा कालकाचार्य आणि उत्पल यांनीं) आजीविक व भागवत हे एक आहेत असें जें म्हटलेलें आहे तें बरोबर आहे.

(२) भागवतांची उत्पत्ति फार प्राचीन काळीं झाली, ह्याविषयीं बौद्ध ग्रंथांत पुरावे आढळून येतात (सद्धर्म पुंडरिक, एच. कर्नभाषांतरित पृ. ३९७ पहा). ब्राह्मणांच्या ग्रंथांतील सूचक उल्लेखांवरूनहि या पुराव्यांनांच दुजोरा मिळतो. याप्रमाणें आजीविकांबद्दल निरनिराळीं मतें व्यक्त झालीं आहेत. असो.