प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.
जैन संप्रदाय - या पंथाचा प्रवर्तक महावीर याचा जन्म उच्च कुलांत झाला होता. त्याच्या पित्यास राजा म्हटलें आहे; पण तो बहुधा कोणत्याहि देशचा राजा नसून विदेह नगराच्या उपान्त भागांत असणा-या एखाद्या प्रांताचा मुख्य असावा. तथापि विवाहसंबंधानें तो विदेहाच्या राजाचा आप्त असून मागध राजकुलाशींहि त्याचा संबंध जोडलेला होता. त्याचें कुलनाम ज्ञातृपुत्र (अर्धमागधी-नातपुत्त) असें होतें. पण त्याच्या सांप्रदायिकांनीं महावीर, जिन, वर्धमान इत्यादि उपपदें त्याच्या नांवास जोडलीं. त्याच्या संप्रदायाचें सर्वांत जुनें नांव निर्ग्रंथ (नीगंठ) असें होतें; नंतर या संप्रदायाचे निरनिराळ्या नांवांचे कमींत कमी सात पंथ आढळतात, व यांतच पुढें दिगंबर या पंथाची भर पडली. पहिले सात पंथ सर्व श्वेतांबर या सदराखालीं येतात. सध्यां श्वेतांबर व दिगंबर या दोन मुख्य सदरांत यांचे सर्व पोटभेद येतात. श्वेतांबरांची वस्ती उत्तर व पश्चिम हिंदुस्थानांत असून दिगंबरांची दक्षिण हिंदुस्थानांत आहे. दिगंबर पंथ हा श्वेतांबर पंथापासून फुटून निघण्याचें कारण, यतींनीं नग्न स्थितींत राहण्याचें व्रत पालन करण्याचें श्वेतांबरांनीं अग्राह्य ठरविलें हें होय. या पंथाच्या प्राचीन ग्रंथांवरून असें दिसतें कीं नग्न स्थितींत राहणें हें जरी चांगलें मानलेलें होतें तरी ती गोष्ट प्रत्येक यतीस आवश्यक अशी सांगितली नव्हती. जैनांच्या इतरहि पंथांचीं अनेक नांवें आढळतात. उदाहरणार्थ, केशलुंचनाच्या विधीपासून लुंचितकेश असें एका पंथास नांव पडलें. ग्रीक लोकांनीं 'जिम्नोसोफिस्ट' या नांवानें ज्यांचा उल्लेख केला आहे ते बहुधा दिगंबर जैन असावेत. पण या गोष्टीबद्दल तितकें निश्चित मत देतां येत नाहीं: कारण, नग्न स्थितींत राहणारे साधू हिंदूंमध्येंहि अद्यापि अनेक आढळतात.
जैन व बौद्ध मतांविषयीं येथें विवेचन करण्यांत फारसा मतलब नाहीं. बौद्ध व जैन वाङ्मयांच्या निरीक्षणाबरोबर त्यांच्या मतांचाहि विचार होईल. बौद्ध व जैन वाङ्मयासंबंधानें एक मात्र फरक लक्षांत घेतला पाहिजे. तो हा कीं, जितक्या प्राचीन काळचें बौद्ध वाङ्मय आपणांस उपलब्ध आहे तितकें प्राचीन जैन वाङ्मय उपलब्ध नाहीं.
बौद्ध आणि जैन संप्रदायासंबंधानें अशी एक शंका उत्पन्न होते कीं, दोघांचीहि बुद्धपूर्व आणि महावीरपूर्व परंपरा एकच असणें शक्य आहे. बुद्ध आपल्या पूर्वी अनेक बुद्ध होऊन गेले असें म्हणतो. जैनांचेहि महावीरापूर्वीं अनेक तीर्थंकर होऊन गेले असें म्हणणें आहेच. कदाचित, सूतसंस्कृतींतून उपनिषदांचा जन्म आहे तसाच बुद्ध आणि महावीर यांच्याहि वैचारिक पूर्वजांचा जन्म असावा, आणि मखली गोशालाहि आजीविकांची ओढाताण त्यामुळेंच झाली असावी.
अर्हत वगैरे विशेषणें बुद्ध व महावीर या दोघांनांहि लावलीं गेली आहेत व तीं प्राचीन असावींत. ॠषि व आचार्य यांखेरीज पवित्र मानला जाणारा असा वर्ग समाजांत असावा आणि त्यापासून या दोन संप्रदायांचा उगम झाला असावा. विद्याधरांचें जैन ग्रंथांत व आपल्या पुराणांत असलेलें महत्त्व आणि वेदांत विद्याधरांचा अनुल्लेख यांवरूनहि सूतसंस्कृति आणि जैन संप्रदाय यांचा निकट संबंध दिसून येतो.