पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास
अकबर - बाप मेला तेव्हां अकबर तेरा वर्षाचा होता व त्याच्यावर बैरामखान याची देखरेख होती, हे दोघे शिकंदर सूरचा पाठलाग करीत असतां त्यांना हुमायूनची बातमी समजली आणि कलानौर येथें अकबराचें नांवाचे तक्तारोहण झालें (फेब्रु. १५५६) सूरवंशांतील दोन पुरुष व त्यांचा मुख्य हिंदु प्रधान हेमू आणि अकबर हे तिघे या वेळा दिल्लीच्या गादीसाठी हक्क सांगू लागले. एका दृष्टीनें अकबर हा जास्त परका होता. हेमूनें तर अकबरापासून दिल्ली हिसकावून स्वतःस राजा विक्रमजित म्हणवून जाहीरहि केलें. त्याच्यावर अकबर चालून आला व त्यांच्यांत पानपत येथें लढाई झाली. पहिल्यानें हेमूचाच जय झाला होता, पण त्याच्या डोळयांत बाण घुसून तो घेरी येऊन पडला व तो दिसेना तेव्हां नेहमींच्या पध्दतीप्रमाणें त्याचें हिंदी सैन्य मागें हटलें. पुढें हेमूहा अकबराचे हातीं सांपडला व त्यानें त्याचें क्रूरपणें स्वहस्तें डोकें उडवून मेलेल्या माणसांची डोकीं कापून त्याचा एक स्तंभ उभारला (नोव्हेंबर १५५६). पुढें शिकंदर सूर शरण आला आणि दिल्ली व आग्रा अकबराच्या हातीं पडलीं. उत्तर हिंदुस्थानांत या सुमारास भयंकर दुष्काळ पडून माणसों परस्परांनां खाऊं लागलीं असें म्हणतात. नंतर ग्वाल्हेर, अजमेर, जौनपूर वगैरे ठिकाणें व किल्ले अकबरानें घेऊन माळवा व राजपुतान्यावर स्वार्या केल्या पण त्या फुकट गेल्या (१५५८-६०) या वेळींच अकबरानें आईच्या व इतर कांही मंडळींच्या सांगण्यावून बैरामखानावर उध्दटपणाचा व आज्ञाभंगाचा आरोप ठेवून कामावरून दूर केलें; त्यामुळें त्यानें बंड केलें पण तें मोडलें जाऊन तो मक्केस जात असतां वाटेंत त्याचा खून झाला (१५६१). यापुढें कांही काळ अकबरानें चैनीत दिवस घालविले. त्याच्या एका सेनापतीनें माळवा काबीज करून तेथें त्यानें बराच रानटी अत्याचार केला परंतु अकबरानें त्यास अडथळा केला नाहीं. यावेळीं अकबराला कळून आलें कीं; हिंदुस्थानचा राजा ज्याला व्हावयाचें असेल त्यानें हिंदु व मुसुलमान या दोन्ही समाजांच्या राजनिष्ठेस पात्र झालें पाहिजे. या प्रमाणें विचार ठरवून त्यानें आपली पुढली दिशा ठरविली. त्यानें आपलें पहिलेंच लग्न जयपूरच्या बिहारीमल राजाच्या मुलीशीं लावलें, त्यामुळें हिंदूंचा विशेषतः जयपूर घराण्याचा पाठिंबा त्याला शेवटपर्यंत मिळाला. हिच्याच पोटीं जहांगीर जन्मला. यानंतर रजपूत मुसुलमान लग्नें बरीच झालीं. अकबरानें हिंदु यात्रेकरूंवरील कर कमी केला, त्यांच्यावरील जिझिया अजिबात बंद केला, युध्दकैद्यांनां गुलाम करण्याचें बंद केलें इत्यादि सुधारणा (अबुल फजलची भेट होण्यापूर्वी बरीच वर्षे) स्वतःच्या मनानें केल्या. हें त्याचें राज्यधोरण पुढें ४१ वर्षे चाललें. तो सत्तेचा व संपत्तीचा फार महत्त्वाकांक्षी असल्यानें यापुढें त्यानें न्यायान्याय न पाहतां शेजारच्या स्वतंत्र राजांवर कारणांशिवाय चढाई करून त्यांची राज्यें बळकावली. हा त्याचा क्रम १६०१ पर्यंत म्हणजे साधारण शेवटपर्यंत चालू होता. गोंडवनची प्रसिध्द शूर राणी दुर्गावतां ही विधवा असतां व तिचा कांहीहि दोष नसतां अकबरानें तिच्यावर चालून जाऊन तिचें राज्य उपटलें. दुर्गावतीनें मरेपर्यंत मोठ्या शौर्यानें आपलें रक्षण करून कीर्ति मिळविली. अकबरानें या लढाईत क्रूरपणाची वागणूक केली व जाळपोळ, लुटालूट करण्यास सोडलें नाहीं. अकबराचें इराणी राज्यकारभाराचें धोरण कांही मुसुलमान सरदारांनां न आवडून त्यांनीं त्याच्या चुलतभावास गादीवर बसविण्याचा कट करून बंड केलें, पण अकबरानें तें मोडून क्रूरपणें त्या भावास फांशी दिलें (१५६५). त्यानंतर मेवाडचा महाराणा आपल्याला मुलगी देत नाही व आपल्याशी वांकून वातो म्हणून अकबरानें त्याच्यावर विनाअपराध चढाई केली आणि चितोडास वेढा दिला. स्वतः राणा फार शूर नव्हता पण किल्लेदार जयमल्ल यानें मोठ्या शोर्यानें चार महिने किल्ला लढविला. अखेर दैववशात अकबराच्या बंदुकीच्या गोळीनें जयमल्ल ठार झाल्यानें किल्ला अकबरच्या हातीं आला (फेब्रु. १५६८). तत्पूर्वी सर्व रजपुतांनीं बायकांचा जोहार करून स्वतः रणांत देह अर्पण केले. यामुळें अकबरानें चिडून तीस हजार हिंदूंची कत्तल केली. पुढें रणथंबोर, कालिंजर वगैरे प्रसिध्द किल्ले व राजपुताना, बुंदेलखंड इत्यादि प्रांत अकबरानें काबीज केले. अनेक रजपूत राजांनीं त्याची नोकरी पत्करली. फक्त एकट्या मेवाडच्या घराण्यानें त्याची पर्वा बाळगली नाहीं, त्यासाठीं अकबरानें त्या घराण्याशीं म्हणजे प्रख्यात महाराणा प्रतापसिंहाशी अनेकदां लढाया केल्या, त्याच्यावर पुष्कळधां संकटें आणलीं, परंतु तें घराणें व प्रतापसिंह त्याला हार गेला नाहीं. अकबराला कलाकौशल्याची आवड चांगली होती, त्यानें तत्कालीन हिंदुस्थानांतील प्रख्यात तानसेन नांवाच्या हिंदु गवयास आश्रय दिला, स्वतः गायन व चित्रकलेचा अभ्यास केला, जयमल्ल व पुत्त या दोघां(चित्तोडच्या वीर पुरुषां)चे पुतळे तयार करविले, आग्रयाच्या किल्ल्याचा तट बांधला, आग्रयात गुजराथी व बंगाली धाटणीच्या अनेक सुंदर इमारती बांधल्या व फत्तेपूर शिक्री येथें नवीन सुंदर राजधानी (७ वर्षात) बसविली आग्रयास अकबराचीं पहिलीं मुलें मेल्यामुळें त्यानें ती राजधानी सोडली; फत्तेपूरला १५ वर्षे राजधानी होती. तेथील सुंदर इमारती अद्यापि बर्याच शाबूत आहेत; त्यांत प्रमुख म्हणजे बुलंद दरवाजा होय. यापुढें अकबरानें गुजराथेवर स्वारी करून तो प्रांत खालसा केला. यावेळीं त्यानें स्वतः अकरा दिवसांत तीनशें कोसांचा प्रवास केला होता. गुजराथमुळें त्याचें राज्य वाढून अत्यंत सुपीक प्रांत त्याला मिळाला व सुरत, भडोच इत्यादि बंदरांमुळें दर्यावरील व्यापार त्याच्या हातीं आला व आणि पोर्तुगीजांशींहि संबंध येऊं लागला. यापुढें १७५८ पर्यंत (यावेळीं मराठ्यांनीं गुजराथ घेतला) गुजराथ हा मोंगली राज्याचा एक मोठा महत्त्वाचा सुभा होता. येथेंच राजा तोडरमल्लानें आपली जमाबंदी प्रथम सुरू केली. यावेळीं अकबरानें सरंजामी लष्करी पध्दत कमी करून सरकारचें पगारी सैन्य वाढविलें, जहागिरदारी पध्दतहि बंद करून सरकारी वसुली कामदार नेमले व मानसबंदरांत तेहतीस दर्जे पाडले (१५७३- ७८). बंगालचा मुसुलमान तरुण राजा दाऊद हा घमेंडखोर व दुर्बळ असल्यानें अकबरानें विनाकारण त्याच्येवर स्वारी करून व राजमहलाच्या लढाईत त्याला ठार करून बंगालप्रांत खालसा केला (१५७६) आणि त्यानंतर बारा वर्षांनीं ओरिसा प्रांत जिंकला. बंगालच्या जयाच्या सुमारास राजपुतान्यांतील विख्यात असें हळदीघाटचें युध्द झालें. त्यांत प्रतापसिंहाचा भाला सेलीमच्या अंबारीला अडकून पडल्यानें सेलीम वांचला व युद्धाचें पारडें पालटलें. हळदीघाट म्हणजे राजपुतान्यांतील धर्मापिली होय. यावेळीं प्रतापचीं सर्व ठाणीं व राज्य अकबरानें घेतलें तरी त्या थोर पुरुषानों धीर न सोडतां १५९७ च्या पूर्वी चितोड व अजमेर खेरीज आपलें सर्व राज्य व किल्ले परत घेतले आणि खुद्द अकबराच्या तोंडून प्रशंसेचे उद्गार काढविले. अकबराचें राज्य १५९६ चे सुमारास काबूल ते बंगाल (सिंधखेरीज) व हिमालय ते नर्मदा येथपर्यंत होतें, असंख्य लोकसंख्या, सुपीक जमीन, पुष्कळ प्रकारचे उद्योगधंदे, अंतर्गत व परदेशचा मिळून भरभराटलेला व्यापार यामुळें त्यावेळीं सर्व जगांत हें राज्य पहिल्या दर्जाचें झालें होतें. बंगालच्या जयानंतर अकबर स्वतः फारसा लढ्यांवर गेला नाहीं. त्यानें १५७८ चे सुमारास फत्तेपूर येथें सर्व धर्मावरील चर्चा करण्यासाठीं एक इबादतखाना नांवाची इमारत बांधली. खंबायत येथें १५७२ त अकबराची व यूरोपियन ख्रिस्त्यांची प्रथम गांठ पडून पुढील वर्षी त्यानें पोर्तुगीजांनां बर्याचशा सवलती दिल्या आणि त्यांचा धर्म समजून घेण्यासाठीं दोन जेसुईट पाद्य्रांनां बोलाविले (१५८०). तत्पूर्वीच अकबरानें मुसुलमानीं धर्मातील धर्मगुरूचें बहुतेक काम आपल्या हातीं घेतलें; धार्मिक विषयांचे निकाल तो स्वतः लांबू लागला, स्वतः उपदेश करूं लागला व त्यावेळीं जुन्या प्रार्थना न म्हणतां फैजीनें रचलेल्या प्रार्थना म्हणूं लागला. सारांश, त्याची इस्लामधर्मावरील श्रध्द बहुतेक उडाल्यासारखी होऊन त्यानें ख्रिस्ती, (जेसुईट), जैन, पारशी व हिंदु या धर्मांनां जरासें जवळ केलें, त्यामुळें बहुतेक मुसुलमानसमाज त्याचेवर नाखूष झाला आणि मुसुलमानांनीं बंडें उभारलीं. त्यांत जोनपूरचा काझी, बंगाल व बहार येथील अफगाण सरदार आणि काबूलचा मुहम्मद हकीम (अकबाराचा भाऊ) हे मुख्य होते. अकबरानें काझीला देहदंड केला व बातीची बंडें लष्करी सत्तेनें मोडून टाकलीं (१५८०- ८१). अकबरानें स्वतः एक नवीन धर्म काढून त्याचें नांव दीन इलाही असें ठेवलें व त्यांत एकेश्वरीमताला प्रमुख मान देऊन मुहम्मद पैगंबराला प्रेषित न म्हणतां, तो मान आपल्याकडे घेतला. या कृत्यास बहुधां लष्कराचा त्याला पाठिंबा असावा. अबुल फजल हा या धर्माचा प्रसारक अधिकारी बनला. परंतु धर्माचा फैलाव अकबराच्या काळींहि फारसा झाला नाहीं व पुढें तर तो धर्म नामशेषच झाला. त्याचा एक जेसूईच पाद्री शिक्षक म्हणतो कीं, अकबरानें मी मुसुलमान राहिलों नाहीं असें स्वतः आपल्याला सांगितलें. पण एकंदरींत त्याच्या मनावर कोणत्याच धर्माचा कायमचा ठसा उमटला नाहीं असें दिसतें. त्यामुळें त्यानें अनेक धर्मांनां उत्तेजन मिळेल असेहि कांही सरकारी नियम तयार केले होते. इ.स. १५९५ ते १५९८ पर्यंत (१५५५ प्रमाणें) भकंदर दुष्काळ पडून उत्तर हिंदुस्थानांत कहर उडाला. त्यानंतर अकबरानें अहमदनगरवर स्वारी केली, तींत प्रथम चांदबिबीनें त्याचा पराभव केला पण पुढें वर्हाड देऊन त्याच्याशीं तह केला. तरीहि पुन्हां लढाई सुरू झाली, तींत एका फितुर्यानें चांदबिबीचा खन केल्यानें अहमनगरचें राज्य अकबराचे हाताखालीं आलें (१६००). याच सुमारास अशीरगडचा किल्ला - जो त्यावेळीं सर्व जगांतील अजिंक्य किल्ल्यांपैकी एक होता तो- लढाईनें हस्तगत होत नाहीं असें पाहून; अकबरानें निर्लज्जपणें विशवासघात करून व पैसा चारून आणि खानदेशच्या राजास वचन मोडून कैद्येंत टाकून मिळविला असें स्मिथ म्हणतो (ऑ. हि. ३६३). यानंतर अकबराचें आयुष्य दुःखांत गेलें. त्याचीं दोन मोठीं मुलें मेलीं व सेलीमनें उघडपणें बंद केलें. अकबरानें मोठ्या कुशलतेनें हें बंड मोडलें (१६०४). त्यानंतर थोड्याच महिन्यांनीं अतिसार होऊन त्यांत अकबराचा अंत झाला (ऑक्टोबर १६०५). कांहींचें म्हणणें त्याला विषप्रयोग करण्यांत आला. त्याचें थडगें शिकंदरा येथें आहे. पुढें १६९१ त जाट लोकांनीं बंड करून त्याचें थडगें उकरून त्यांतील हाडें जाळलीं. अकबर हा सर्व तर्हेनें राजा बनला होता असें त्याच्या एक जेसुईट मित्रांनें म्हटलें आहे. अकबर उतावीळ परंतु आपल्या लहरींनां ताब्यांत ठेवणारा, गरिबांची सोय पहाणारा, पूर्ववयांत अत्यंत रागीट, दयाशील परंतु एखाद्यावेळीं अत्यंत रानटी शिक्षा करणारा, कारागिरीचा शोक असणारा, विशेषतः बंदुका व तोफा ओतविण्यांत दक्ष, राज्यकारभारांत बारकाईनें लक्ष घालणारा वगैरे गुणावगुणांचा होता. तो शेवटपर्यंत अक्षरशत्रु परंतु धडस्मरणाचा असल्यानें निरनिराळ्या शास्त्रांत विशेषतः धार्मिक वादविवादांत- विशेष लक्ष घाली (स्मिथ). तो स्वतः प्रथम सुन्नीपंथी होता व आपण आपल्या पूर्वतयांत नास्तिकांनां देहदंड केल्याचें त्यानें स्वतः कबूल केलें आहे. पुढें हिंदु तत्त्वज्ञानाचा व सत्सदृश सुफी तत्त्वत्रानाचा पगडा त्याचेवर बसला होता. धर्माच्या बाबतींत तो जरी उदार होता तरी मुसुलमानांनां जास्त सवलती देई. एकंदरींत तो पूर्ण बेलगामी राजा होता. हिंदु लोकांनां- विशेषतः आप्ता झालेल्या रजपूत राजांनां- त्यानें मोठमोठे अधिकार दिले; त्यामुळेंच त्याच्या राज्यास बळकटी आली. ही जहांगीर व शहाजहान यांच्या वेळेपर्यंत टिकली; औरंगझेबानें रजपुतांनां त्रास दिल्यानें ती मोडली व मोंगली राज्यहि नामशेष झालें. राज्यकारभाराच्या सर्व खात्यांत त्यानें पूर्वीची सरंजामी पध्दत काढून पगारी नोकरपध्दत सुरू केली, तोडरमल्लाच्या साह्यानें तरमबंदी करून शेतकर्यांनां सरकारी लुटीच्या जाचांतून सोडविलें. सारा प्रत्यक्ष शेतकर्यांकडून वसूल होई; मात्र पूर्वीच्या हिंदु राजांपेक्षां सारा दुप्पट व जब्बर होता. उत्पन्नाच्या एकतृतीयांश रक्कम नख्त घेई (धान्यरूपाची नसेः. स्वस्ताई असून व्यापार तेज होता. त्याचें खडें सैन्य थोडें असून मनसबदारी फौज मात्र पुष्कळ होती; तिचा पगार रोख असे. मनसबदारांनां जहागिरी दिल्या नव्हत्या. न्यायदानाची पध्दत सुधारलेली नव्हती. फैजी, अबुल फजल, तोडरमल्ल, तानसेन, बिरबल, मानसिंग इत्यादि पुरुष अकबराचे मित्र व अधिकारी होते. तुळशीदास कवि याच्याच वेळीं झाला. त्याचें रामचरित मानस (रामायण) सर्व उत्तरहिंदुस्थानांत प्रसिध्द आहे. अबुल फजलनें ऐने- ई- अकबरी ग्रंथ लिहिला. मोंगल चित्रकला याचवेळीं उदयास आली, तींत फारशी व हिंदी दोन्ही तऱ्हांचें मिश्रण आहे. तिची भरभराट शहाहजानचे वेळीं झाली. शिल्पकलेतहि यावेळी हिंदु व मुसलमानी मिश्रण झालेलें आढळतें.