प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

अठरावें व एकोणिसावें शतक :— लंकेंत वाङ्‌मयासंबंधीं अद्यापि उत्साह दिसून येतो, व पूर्वींप्रमाणेंच हल्लींहि सर्व काव्यांत एळु भाषाच वापरली जाते. गेल्या दोन शतकांतील ग्रंथांची सविस्तर माहिती दिल्यास हें प्रकरण फार वाढेल, यामुळें फक्त महत्त्वाच्या ग्रंथांच्या व ग्रंथकारांच्या नांवांचा येथें आपण उल्लेख करूं. या कामीं एल्. डी. झोयझा यांची यादी उपयुक्त आहे.

सिंहली वाङ्‌मयाच्या या लहानशा कालावधीत भाषाशास्त्रज्ञ व इतिहासकार यांनां महत्त्वाचे असे फारसे ग्रंथ सांपडणार नाहींत.

तोटगमुव, वात्ताव व मोहोट्टाल यांच्या धर्तीवर जातकांचे पद्यात्मक तरजुमे करण्याचा या वेळीं फार प्रचार पडला होता. पंडित कुलतुंगानें इ. स. १८१४ त एक मुनिचार-जातकय व राजाधिराजसीह राजानें (१७८०-१७९८) एक असदिस-जातक लिहिलें. समरजीव पत्तायमे लियन आरच्ची (१७७१) याचा कवमिणिकोंडल हा ग्रंथ अलिनचित्त-जातकाचा पद्यात्मक तरजुमा असून, समरसेकर दिसानायकाचा (१७७३) कवमिणि मलदम हा ग्रंथहि सोनक-जातकाचा अशाच प्रकारचा तरजुमा आहे. सालिआल्लेमणिरतन तेरुन्नान्से (१७८४) याचा कवमुतुहर हा ग्रंथहि दसरथ-जातकाचा तरजुमा आहे. तररंबे धम्माक्खंध तेरून्नान्से (१८२६) याचा कवसिळुमिण हा अंधभूत-जातकाचा पद्यात्मक तरजुमा व मडिहे-श्री-सुमित्त-धम्मक्खंध तेरून्नान्से (१८३२) याचा कवमिणिरंदम हे दोन्ही ग्रंथ एकोणिसाव्या शतकांत झालेले आहेत. इ. स. १८५६ त सिंहबा नांवाच्या कवीनें तरपत्तजातकय नावांचा एक ग्रंथ लिहिला.

संदेशकाव्यांमध्येंहि या काळांत चांगली भर पडलेली आहे. कित्ति-सिरि-राजसीह या राजाच्या कारकीर्दींत होऊन गेलेला बरम गणितया या कवीनें नीलकोबो-संदेशय हें काव्य केलें आहे. यांत कवीनें निळ्या कबुतराला दूत बनविलें आहे, व या दूताला कतरगम नांवाच्या देवतेची आपणावर कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याकरतां तिच्याकडे पाठविलें आहे. शेवटचें संदेशकाव्य म्हणजे १८०६ सालांतील अत्थदस्सि तेरून्नान्से याचें सुव-संदेशय हें काव्य होय. यांत दूत बनवलेल्या पोपटाला कवीचें राहण्याचें ठिकाण जें बेदिगम विहार तेथून मुलगिरिगल विहार येथें पाठविलें आहे.

या काळांतीलं कांहीं श्रृंगारिक काव्यें ज्या नमुन्याचीं आहेत तसल्या नमुन्याचीं काव्यें जुन्या सिंहली वाङ्‌मयांत आढळत नाहींत. पूर्वीं उल्लेख केलेल्या पत्तायमे लियन आरच्ची याचें वियोवगरत्‍नमालय आणि दुनुविल गजनायक निलमे (१८११) याचें रतिरत्‍नालंकारय हीं अलीकडील दोन रतिकाव्यें प्रसिद्ध आहेत. जुन्या काव्यग्रंथांत श्रृंगारिक काव्यें फारशीं नाहींतच; आणि संस्कृत वाङ्‌मयामधील अनेक ग्रंथांमध्यें जी कामासक्ति दिसून येते तसली कामासक्ती या काव्यांतून कधींच आढळत नाहीं.

बौद्धधर्मांतील विचारांची परंपरा दाखविणार्‍या ग्रंथांत गेल्या शतकाच्या शेवटीं निर्माण झालेल्या सुमन थेराच्या तिरतनमालाव या काव्याचा, आणि बौद्धधर्मांतील "तीन रत्नें" (बुद्ध, धम्म व संघ) या स्तुतिपर ग्रंथाचा व बुद्धाच्या अवशेषांसंबंधींच्या वालिगल दाठागोत् पदिपय या काव्याचा समावेश केला पाहिजे. मातराचा किरम-तेरून्नान्से (१८२०) हा ग्रंथ व विजयाचा पिता सीहबाहु याची गोष्ट ज्यांत सांगितली आहे असा त्याचाच सियबसमलदम हा ग्रंथ यांचा समावेश जुन्या सिंहली राष्ट्रीय-आख्यायिका-वाङ्‌मयांत होतो.

सिंहली वाङ्‌मयाचें अवलोकन येथपर्यंत झाल्यानंतर थोडेंसें सिंहली कोरींव लिखाणांचें वगैरे अवलोकन करूं. कारण हीं लिखाणें हें एक प्रकारचें वाङ्‌मयच आहे.