प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
हिंदुस्थानाच्या जवळील भागांचा म्हणजे ब्रह्मदेश, सिंहलद्वीप, मलायीद्वीपकल्प इत्यादि भागांचा विचार करतांना आपणांस दोन थर लक्षांत घ्यावे लागतात. एक सांस्कृतिक दृष्ट्या जे भारतीय आहेत अशा तद्देशीयांचा आणि दुसरा आजच्या मुसुलमानांनीं आणि ख्रिस्त्यांनीं युक्त अशा अर्वाचीन भारतीयांचा. या दोन्ही प्रकारच्या लोकांसंबंधानें आज येथें स्थानबद्ध झालेल्या हिंदु जनतेंत निश्चयात्मक भावना नाहींत. संस्कृतिविस्ताराचें काम बंद पडलें असल्यामुळें वरील देशांत नवीन जाणार्यांचा आणि तेथील देश्यांचा संबंध जोडणार्या चळवळी मुळींच नाहींत. यासाठीं या दोन प्रकारच्या लोकांचें ज्ञान आज आपणांस पृथकपणें मांडलें पाहिजे. जे आपले लोक तिकडे नवीन गेले आहेत त्यांच्याशीं आपलें अधिक जिव्हाळ्याचें नातें असेल आणि आहेहि; आणि यामुळें त्यांच्या हिताहिताविषयीं थोडीबहुत जागृति आपणांस दिसते; पण तिकडील देश्य लोकांसंबंधानें आपण आज उदासीन आहों. तथापि हरवलेल्या कोंकराच्या भेटीविषयीं अधिक आतुरता दाखविणार्या ख्रिस्ती कथेंतील मेंढपाळाची वृत्ति आपणांत केव्हां तरी जागृत होऊन भारतीय संस्कृतीच्या निरनिराळ्या देशांतील देश्य प्रतिनिधींविषयीं आपणांस सहानुभूति उत्पन्न होईल अशी आशा आहे. सद्यःकालीन चळवळीकडे व स्पर्धेकडे थोडेंफार दुर्लक्ष करून ऊर्ध्वदृष्टि राहणार्या संशोधकांस जी जिज्ञासा या लोकांसंबंधानें उत्पन्न होते तेवढीच काय ती जिज्ञासा आज आहे. या संशोधकांखेरीज इतरांस आज जिज्ञासाच नाहीं.
ज्याविषयीं आधुनिकांस कमी जिज्ञासा आहे तो भाग अगोदर घेण्याचें पाप आम्ही करतों.
एखाद्या लढाईंत पराभव झाल्यानंतर ज्याप्रमाणें सेनापतीस आपलें गेलें काय आणि राहिलें काय याचा हिशोब घ्यावा लागतो, त्याप्रमाणें गेल्या आठशें नऊशें वर्षें चालू असलेल्या भारतीय संस्कृतीच्या उच्छेदांतून आज शिल्लक काय राहिलें आहे याचा विचार केला पाहिजे.
वरील हिशोब काढून करावयाचें काय ? असा प्रश्न कित्येक तत्त्ववेत्ते करतील. त्याला उत्तर एवढेंच कीं, देशी संस्कृतीपासून हिंदू लोक कधीं मुक्त व्हावयाचे नाहींत आणि त्यांच्या संस्कृतीची जोपासना जितकी चांगली होईल तितकें हिंदूंस जगांत महत्त्व येईल. यासाठीं हिंदु संस्कृतीची जी वाताहात झाली आहे ती नाहींशी करून तिचें एकीकरण केलें पाहिजे.
हिंदु संस्कृति एकसूत्री कधीं होती काय ? हिंदू लोक कधीं एकसूत्री होते काय ? याला उत्तर एवढेंच कीं, हिंदु संस्कृतीच्या सार्वभौमत्वाखालीं असलेल्या लोकांस एकत्र होऊन स्वसंरक्षणाचें काम, मुसुलमानी व ख्रिस्ती लोकांची संप्रदायरूपी राष्ट्रें आमच्या संस्कृतीच्या उच्छेदार्थ प्रयत्न करीपर्यंत पडलें नव्हतें. ज्या निरनिराळ्या राष्ट्रांची संस्कृति अल्प होती तीं राष्ट्रें ब्राह्मणांनीं आपल्या संस्कृतीच्या बाहुल्यामुळें सहज आपल्या कबजांत आणलीं, त्यामुळें हिंदूंस एकसूत्री होण्यांचे प्रयोजन नव्हतें. मुसुलमानी स्वार्यांनंतर आम्ही जरा कोठें डोकें वर काढतों तों पाश्चात्य संस्कृति येऊन आम्हांस कबजांत आणूं पहात आहे यामुळें हिंदु संस्कृतीखालीं असलेल्या लोकांचें एकीकरण करून तिचा विस्तार करण्याचें आमचें कार्य अजून तसेंच राहिलें आहे. या कार्याकडे विशेष कळकळीनें लक्ष देण्याचें आतां आम्ही मनावर घेतलें पाहिजे. उच्छेदक शक्तींच्या धुमाकुळांतून आमच्या संस्कृतीचें जें कांहीं कोठें शिल्लक राहिलें आहे त्याचा हिशोब घेणें हें आमच्या एकीकरणकार्याला अवश्यक असें प्रस्तावनारूप कार्य आहे तेव्हां आतां तिकडे वळूं.
सिंहलद्वीप आणि ब्रह्मदेश या दोन प्रदेशांचें सांस्कृतिक भवितव्य हिंदुस्थानच्या भवितव्याशीं फार निकट तर्हेनें संबद्ध असल्यामुळें या दोन भूभागांविषयीं प्रथम विचार करणें योग्य होईल. यांत अगोदर सिंहलद्वीपस्थांकडें वळूं.
सिंहलद्वीपास भारतीय संस्कृतीचा अवशेष म्हणण्यापेक्षां विभाग म्हटलें तर अधिक शोभेल. तेथें बौद्ध संप्रदायाचें जगांतील एक अत्यंत महत्त्वाचें ठाणें आहे. हीनयान पंथाचें शुद्ध स्वरूप सिलोनमध्यें जसें सांपडतें तसें तें इतरत्र सांपडत नाहीं. पालीग्रंथांचें आगर आज सिंहलद्वीपच आहे आणि भारतीय संस्कृतीच्या इतिहासास थोडी बहुत मदत करणारे महावंसो, दीपवंसो यांसारखे इतिहासग्रंथ सिंहलद्वीपांतच सांपडतात. आज अनुराधपुर येथें गेलें असतां प्राचीन सुसंस्कृत हिंदुकलेचें स्वरूप अवशेषांच्या रूपांत पहावयास मिळतें. खुद्द सिंहली लोक बौद्ध आहेत पण वेदभाषाजन्य वाणी बोलत आहेत आणि तेणेंकरून ते आपली पितृपरंपरा व्यक्त करितात. सिंहलद्वीपांतील दुसरा मोठा वर्ग म्हणजे तामिळ लोकांचा. हे लोक वेदभाषाजन्य भाषा बोलत नसले तरी ते आपणांस ब्राह्मणानुयायी हिंदू म्हणवितात. याप्रमाणें एका लोकसमूहांचें आपणांशीं जवळचें नातें एका कारणामुळें आहे तर दुसर्याचें दुसर्या कारणामुळें आहे. यासाठींच वर म्हटलें आहे कीं, सिंहलद्वीपास हिंदु संस्कृतीचा अवशेष म्हणण्यापेक्षां विभाग म्हटलेलेंच अधिक शोभेल. असो.
आतां या द्वीपांतील आजच्या सामाजिक स्थितीचें सूक्ष्मावलोकन करूं. आपलें सिंहली लोकांशीं नातें दाखविणार्या अनेक गोष्टी डॉं. केतकर यांनीं पूर्वीं लोकशिक्षणांत प्रसिद्ध केल्या आहेत त्याच कांही फरकानें येथें दिल्या आहेत. त्यांचें वर्णन करितांना जातिभेद, परस्परजातिविवाह, प्रीतिविवाह,
देश्य आणि परकीय संस्कृतीची स्पर्धा इत्यादि गोष्टी विशेष विचारासाठीं घेतल्या आहेत, आणि तदनंतर तेथें आज जाणार्या भारतीयांच्या स्थितीसंबंधानें प्रत्यक्ष अवलोकनमूलक माहिती सादर केली आहे.
सिंहलद्वीप येथील लोक हिंदुस्थानांतून तिकडे गेलेले आहेत. तथापि तेथें बौद्ध संप्रदायाचा प्रसार झाल्यामुळें आणि यूरोपीय लोकांचे प्राबल्य तेथें अगोदर झाल्यामुळें त्यांच्या समाजांत आणि आपल्या समाजांत कांहीं फरक उत्पन्न झाले आहेत. तेथें कांही अंशीं यूरोपीय संस्कृतीची प्रगति अधिक झाली आहे. असें असल्यानें आपल्यापुढें असे प्रश्न उपस्थित होतात कीं, हे लोक हिंदुस्थानच्या संस्कृतीस अगदींच पारखे होणार काय ? ते अगदींच पारखे झाल्यास हिंदुस्थानाविषयीं त्यांच्या मनांत प्रेम राहील काय ? ते जर आपणांपेक्षां अधिक पाश्चात्य बनले असले तर त्यांस "आपणासारिखें" करण्यास काय परिश्रम केले पाहीजेत ? आणि त्या परिश्रमांस चांगले फल येण्यास किती "काळ वेळ" लागेल ? तसेंच आपल्यामध्यें राष्ट्रीय आकांक्षा उत्पन्न होत आहेत त्याप्रमाणें त्यांच्यामध्येहि होत आहेत काय ? होत असल्यास त्यांचे स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे ? आंग्लसंस्कृतीचा अधिकाधिक प्रसार करून म्हणजे आपण अधिकाधिक इंग्रज बनून आंग्लसंसर्गसंभव सादृश्यानें राष्ट्राचें एकीकरण करावें अशी जी आजच्या काँग्रेसमधील पुढर्यांची म्हणजे गेल्या पिढींतील्या शिष्टांची वृत्ति आहे त्याचप्रमाणें त्यांचीहि आहे काय ? असल्यास तिला अवरोधक कोणी पक्ष उत्पन्न झाला आहे काय ? झाला असल्यास त्या पक्षाचा जोर कितपत आहे ? राष्ट्रीय संस्कृतीच्या पायावर नवीन संस्कृति उत्पन्न करणें त्या लोकांस कितपत शक्य आहे ? इत्यादि प्रश्नांचें उत्तर देण्यासाठीं जें अवलोकन करावयाचें त्यास राष्ट्रीय दृष्टीचें अवलोकन असें डॉ. केतकर म्हणतात.
सिलोनची लोकसंख्या १९११ च्या खानेसुमारीप्रमाणें ४१ लक्ष आहे. या लोकसंख्येंपैकीं सातअष्टमांश स्थाईक आहे आणि एकअष्टमांश फिरती आहे. म्हणजे हिंदुस्थानांतील मजूर आणि त्यांच्या बरोबर आलेलीं आश्रित माणसें मिळून सुमारें पांच लक्ष तीस हजार लोक भरतील. या लोकांपैकीं बहुतेक लोक तामिळ असल्यामुळें यांची मोजणी हिंदी तामिळ या सदराखालीं करितात. सिंहली तामिळ लोकांची संख्या जवळजवळ इतकीच आहे. एकंदर तामिळ लोकांची संख्या येथें एकचतुर्थांशापेक्षां जराशी अधिक आहे.
सिंहली लोकांची संख्या सत्तावीस लक्षांहून अधिक आहे म्हणजे शंभर सिलोनी लोकांत पासंष्ट लोक सिंहली आहेत. या पांसष्टांत ४१ "पातराट" सिंहली आहेत आणि चोवीस "उदराट" सिंहली आहेत.
"उदराट" आणि "पातराट" हे सिंहली लोकांचे भेद आहेत. उदराट (उर्ध्वराष्ट्र ?) म्हणजे उच्च प्रदेशांत रहाणारे लोक आणि पातराट म्हणजे सखल प्रदेशांत म्हणजे समुद्रकिनार्याशीं रहाणारे लोक.
सध्यां आपण सिंहलद्वीपांत पाहूं लागलों तर जिकडे तिकडे पातराटच आपणांस दिसतात. पातराटांमध्यें जितकी पाश्चात्त्य संस्कृति शिरली आहे तितकी उदराटांत नाहीं. उदराट हा मागसलेला वर्ग आहे असें लोकांस वाटतें. क्यांडीशहर हें उदराटांचें केंद्र होय. पण तेथें देखील आज पातराटांचाच भरणा २७४५ या संख्येनें अधिक आहे.
उदराट जरी मागासलेले आहेत, तथापि स्वभावतः कर्तृत्वशक्तीनें ते कमी आहेत असें नाहीं. स्वातंत्र्याची-परंपरागत संस्कृतीची-जोपासना करण्याचा बोजा त्यांच्यावर पडला होता व परकीय संस्कृतीस विरोध करणें हेंच त्यांचें कांहीं काळपर्यंत कर्तव्यकर्म झालें होतें. यामुळें पुष्कळांस उदराट हे मागासलेले वाटतात. ज्या वेळेस सिलोन हें डच आणि पोर्तुगीज लोकांनीं काबीज केलें त्या वेळेस या उदराटांनीं आपलें स्वातंत्र्य कायम ठेवलें. परक्या सत्तेचा अनुभव इंग्रजांची सरशी होईपर्यंत यांस मिळाला नाहीं. सिंहली लोकांचें परंपरागत धर्मशास्त्र आणि कायदा हीं आज उदराटांस फक्त लागू पडतात. पातराटांस लागू पडत नाहींत. यूरोपीय सुधारणा ज्यांनीं अधिक स्वीकारली असेल त्यांसच आजकालच्या दिवसांत अधिक प्रामुख्य मिळतें. त्यामुळें उदराटांस आज प्रमुखता नाहीं.
आज लंकेंतील ज्या लोकांचीं नांवें आपणांस ऐकावयास मिळतात ते लोक एक तर सिलोनी तामिळ आहेत अगर पातराट आहेत. उदराटांचीं नांवें आपल्या कानीं क्वचितच येतात.
सिलोनमध्यें यूरोपियनांची लोकसंख्या साडेसात हजार आहे आणि बर्घेर आणि यूरेशिअन लोकांची संख्या साडेसव्वीस हजार आहे. तसेंच तेरा हजार मलायी लोक आहेत.
सिलोनमध्यें वेद्ध नांवाची एक जंगली जात आहे, तिचें नांव पुष्कळांनीं ऐकलें असेल. या जातीची लोकसंख्या गेल्या खानेसुमारीच्या वेळेस ५३३२ होती. या वेद्धांपैकीं तीन हजार म्हणजे शेंकडा सत्तावन लोक आपणांस हिंदू म्हणवितात. वेद्धांमध्यें एकोणनव्वद माणसें ख्रिस्ती झालीं आहेत.