प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली भाषेंतील विदेशीय शब्द — या शब्दांपैकीं कांहीची व्युत्पत्ति पुढें मागें आर्यन् भाषांतूनच लागूं शकेल व दुसरे कांहीं शब्द द्रविड भाषांतून आले असल्याचें आढळून येईल. सर्वच गोष्टींचा पहिल्या तडाख्यांत उलगडा होत नसतो. तथापि कांहीहि झालें तरी ज्यांची व्युत्पत्ति कोणत्याच भाषेंतील शब्दांपासून लावतां येत नाहीं असे कांहीं तरी शब्द शेवटी शिल्लक राहतीलच. हे शब्द भारतीयांची सिंहलद्वीपांत वसाहत होण्यापूर्वीं तेथें जे इतर लोक राहत होते त्यांच्या मूळ भाषेंतील असले पाहिजेत असें अनुमान करणें युक्त होईल. असो. ज्यांची व्युत्पत्ति आर्यन् भाषांपासून लागूं शकत नाहीं असे कांहीं शब्द पुढें दिले आहेत :—
अंड=गलबला, ओरडणें (धातु-अंडणु=ओरडणें); इदिबु, इदुब, इब्ब=कासव; इंग (ला. इम्)=जघन; इळु=जंगल, अरण्य; कस=नारळ; कोंड=फळ; किदु, किंदि=मिरें; कोल=पान; दोडनु=बोलणें (क्रि.); देल=एक भाकरीचें जंगली फळ; बेली=शुक्ति, मोत्याचे शिंपले; बेलि=मान; महनु=शिवणें (क्रि.);
मोल=मेंदु; मुहुसु=विंचू; रिका, रिळव्=वानर; लिंद (ला. लिन्) =झरा, कारंजें; रल्=कठिण, मजबूत बळकट; रावुल्=दाढी; लोकु=मोठा; वरल=डोक्याचे केस; सवस=संध्याकाळ; हलल्, हल्ला=काजवा; हिबिलि=टोपली (मासे धरण्याकरीतां); हिसा=मोत्याचे शिंपले; हुलंगि (ला. हुलं) =वारा, हवा; हुसु=मासा, शिजवून तयार केलेला मासा.
कांहीं शब्द तामिळ भाषेंतून घेतले आहेत. उदाहरणार्थ, अडि=पाय, पाया; अलि=हत्ती; काडि=सिरका; तक्कडि=लबाड; टेक्क=सागवानाचें झाड; पंगु=भाग घेणें (नाम); पुंचि=लहान; मल्=धाकटा भाऊ; वेल=भाताचें शेत.
पोर्तुगीज भाषेंतील शब्दांपासून तयार झालेले शब्द :—
इस्ताल=तबेला (पो. एस्तल्ल); कडदासि किंवा करदासि=कागद (पो. कार्टझ); लन्स=भाला (पो.लान्सो).
डच शब्दापासून झालेले शब्द :— तरप्पु=जिना (ड=ट्रॅप); ते=चहा (ड थी.); बक्किया=दोण, टांकी (ड. बक्जे); अक्कर=परिमाण (इं. एरप), पोनि=घोड्याचें शिंगरू; वगैरे.
व्यापारी व सरकारी कामकाजांत वापरले जाणारे शेंकडों शब्द इंग्रजी भाषेंतून घेतले आहेत.
येणेंप्रमाणें सिंहलींतील विदेशीय शब्दांचा थोडासा परिचय केल्यानंतर आतां सिंहली संलग्न पोटभाषा जी मालदिवी तिजसंबंधी कांहीं ज्ञान करून घेऊं.
मालदिव बेटांतल्या भाषेसंबंधाचीं साधनें डॉ. गैजरनें पुष्कळशीं स्वतःच सिलोनांत मिळविलीं. नंतर ए. गुणशेखर यांच्या साहाय्यानें त्यांस आणखी साधनें मिळालीं. या साधनसंग्रहांत सिंहली वाक्यांचीं व लहान कथानकांचीं मालदिवी भाषेंतील भाषांतरें आहेत. मालदिवीच्या वर्णशास्त्रावरून असें दिसून येतें कीं, सिंहलीचा विकास होऊन तिच्यांतील विशेष बनल्यानंतर तिच्यापासून मालदिवी भाषा विभक्त झाली. याचा अर्थ भारतीय रक्ताचें मालदीव बेटांत प्रयाण बरेंच अलीकडे झालें असा होतो. असो.