प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली कायदा आणि सिंहली संस्कृति :— सिंहली लोकरिवाज आणि सिंहली कायदा यांच्या परस्परसंबंधाविषयीं असें म्हटलें पाहिजे कीं हिंदुस्थानापेक्षां सिहलद्वीपांत कायद्याची लोकरीतीपासून फारकत अधिक झाली आहे.
कोणत्याहि समाजाची विशिष्टता त्या समाजाचें शासन ज्या पद्धतीनें होत असेल त्या पद्धतीच्या चिरकालिकत्वामुळें रहातें. समाजाचें खाणेंपिणें, जेवणाच्या वेळा, कपड्यांची पद्धत, या गोष्टी कालानुसार बदलतात; तथापि समाजाची शासनपद्धति बदलण्यास अधिक अवकाश लागतो; आणि समाजाची घटना बदलणें तर त्याहूनही कठिण आहे. समाजाच्या घटनेंत फेरफार सहज होत नाहींत. ते फेरफार करण्यासाठीं फारच मोठा प्रयत्न लागतो. एक तर समाजांत फारच मोठ्या जोराची खळबळ होऊन फेरफार घडून येतात; अगर परसत्तेचा वरवंटा येऊन मूल संस्कृति चिरडून टाकतो. या विधानाची सत्यता दाखविण्यासाठीं एकच उदाहरण घेतों. आफ्रिकेतील निग्रोंमध्यें शेकडों अगर हजारों जाती आहेत असें म्हटलें तरी चालेल. सूदानमध्येंच एक हजारांवर जाती होतील. कित्येक ठिकाणीं प्रत्येक गांव म्हणजे निराळी जात असें झालें आहे. तथापि तेथूनच अमेरिकेंत नेलेल्या निग्रोंमध्यें जाती राहिल्या नाहींत; आणि त्या रहातील तरी कशा ? निग्रो बायका म्हणजे गोर्या लोकांच्या रखेल्या होत्या; आणि त्यांच्यावर आणि निग्रो पुरूषांवर वाटेल ती सत्ता त्यांचे मालक चालवीत असत. "वाटेल त्या गाईवर वाटेल तो पोळ लावावयाचा" असा प्रकार देखील गुलामांचे मालक करीत. कारण, जितका भक्कम मुलगा तयार होईल तितकी त्यास जास्त किंमत येत असे. त्यांच्यामध्यें लग्नव्यवहारच नाहींसा झाला होता. अशा प्रसंगीं मूळ संस्कृति आणि मूळच्या आठवणी काय टिकणार ? आजच्या वृद्ध निग्रोंपैकीं बहुतेकांस आपला आजा कोण हें ठाऊक नाहीं; आणि बर्याचशा लोकांस आपला बाप कोण हें ठाऊक नाहीं ! आपण निग्रो आहों, याशिवाय इतर सर्व गोष्टींची त्यांस विस्मृति झाली आहे; आणि ते सर्व आज एकजात झाले आहेत. आफ्रिकेंतील निग्रोंस नवीन सुधारणा घेण्यास जी हरकत वाटते, ती अमेरिकन निग्रोंस वाटणार नाहीं. कारण त्यांचे परंपरागत संस्कार नष्ट झाले आहेत.
केवळ राजकीय पारतंत्र्यामुळें परकीयांची सत्ता पूर्णपणें स्थापित होत नाहीं. खाजगी व्यवहारावर व्यक्तींची सत्ता असलेली नष्ट होत नाहीं, आणि त्यामुळें सर्व तर्हेचा कायदा नष्ट होत नाहीं. राजव्यवहाराचा कायदा मात्र बदलतोच. हिंदुस्थानांत त्याप्रमाणें बदललाहि आहे.
पोर्तुगीज आणि डच सत्तेखालीं सिंहलद्वीपाचा जो भाग आला त्या भागांत ख्रिस्ती संप्रदाय फारच जोरानें वाढला. आणि बहुतेक सिंहली लोकांची नांवें देखील पोर्तुगीज अगर डच बनलीं. शिवाय सिंहली संस्कृतीचें मुख्य स्थान समुद्रकिनारा नव्हता, तर अनुराधपूर आणि क्यांडी हीं आंतील शहरें होतीं. समद्रकिनार्यावरील भागांत आणि सखल प्रदेशांत संस्कृति फारच मागसलेली होती. सिंहली लोकांचा पोषाख अगदींच अल्प होता. यामुळें नवीन संस्कृतीचा स्वीकार करण्यास त्यांस फारसें जड गेलें नाहीं. परंपरागत संस्कृतीविषयींचा अभिमान देश परक्या सत्तेखालीं गेला म्हणजे अधिक वाढतो, हें खरें. तथापि ज्या लोकांची संस्कृतीच अल्प असते त्यांस परकी संस्कृति घ्यावयास कमी हरकत वाटते. बंगाली लोकांस साहेबी टोपी डोक्यावर घालावयास मनाचा फारसा निर्धार करावा लागत नाहीं. तथापि महाराष्ट्रीयांस साहेबी टोपी घालण्यास अधिक शंका वाटते. परंपरागत संस्कृतीचा थर बंगाल्यांत फारसा जाड नसल्याकारणानें त्यांस कांहीं बाबतींत पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणें फारसें जड गेलें नाहीं.
पोर्तुगीज लोकांनीं पोर्तुगीज कायदा सिलोनमध्यें सुरू केला; आणि डच लोक आल्यानंतर डच लोकांनीं रोमन-डच कायदा सुरू केला. जो भाग त्यांच्या अंमलाखालीं आला होता तेथें तो कायदा सुरू झाला; तथापि क्यांडी व आसपासचा भाग त्यांच्या अंमलाखालीं आला नसल्याकारणानें तेथें मूळ कायदा कायम राहिला.
आज पातराटांचे सर्व व्यवहार-म्हणजे देवघेव, दान, विक्री, वारशासंबंधाचा कायदा-हे सर्व रोमन-डच झाले आहेत. म्हणजे कायद्याच्या बाबतींत पातराटांची संस्कृति पाश्चात्य आहे. तथापि सिंहली जातिभेदास त्या कायद्याचा संपर्क फारसा झाला नाहीं. कारण, राष्ट्राच्या सर्वांगांचे नियमन करणारे धर्मशास्त्र तें नाहीं, आणि मूळ भाषा नष्ट झाली नाहीं. समाजघटनेच्या बाबतींत परकीय संस्कृतीचें देखील कांही चाललें नाहीं. रोमन-डच कायद्याप्रमाणें वाटेल त्याला वाटेल त्या जातीच्या बाईबरोबर लग्न करण्यास हरकत नाहीं. पण बाह्यांनीं परवानगी दिली म्हणजे अंतःस्थ फेरफार होतात अशांतला भाग मुळींच नाहीं. आज हिंदुस्थानांत इंग्रजांनीं कायदा करून वाटेल त्यास वाटेल त्याबरोबर लग्न करण्यास परवानगी दिली; आणि मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची वांटणी इंग्रजी कायद्यानें व्हावी असें जरी म्हटलें तरी समाजव्यवस्थेंत फेरफार होईल असें नाहीं.
आतां सिंहलदेशाच्या समाजशासनाकडे लक्ष देऊं. आपल्या देशाप्रमाणेंच तेथें देखील राष्ट्रीय जीवनाच्या केवळ अल्पांगाचें नियमन "कायद्या"नें होतें हें लक्षांत घेतलें पाहिजे. तथापि कायद्यांचा संग्रह तपासणें हें महत्त्वाचें नाहीं असें मात्र नव्हे. या द्वीपांत एकंदर पांच शासनसमूह चालू आहेत.
१. उदराटांचा कायदा- याला "क्यांडियन सिंहली कायदा" असें म्हणतात. हा कायदा लोकांच्या रीतीभाती पाहून मुख्यत्वेंकरून तयार केला आहे. "नीतिनिगंडुव" हा ग्रंथ या कायद्याचा आदर्श आहे. पुष्कळ लोक "नीतिनिगंडुवा"स लबाडीचें अर्वाचीन पुस्तक म्हणतात; तथापि तसें म्हणण्यास कोणीं यथासांग आधार दिला नाहीं. गोईगमांच्या जातींचें उच्चत्व आणि इतर जातींचें नीचत्व या ग्रंथांत सांगितलें असल्यामुळें या ग्रंथास उलथून पाडण्याची इच्छा इतर जातींस होणार यांत शंका नाहीं.
२. थेसावलामै- हा कायदा जाफना येथील तामिळ लोकांस मुख्यत्वेंकरून लागू आहे. हा कायदा केवळ रूढिमय होता. पुढें डच लोकांनीं हा लिहून काढला. या कायद्याच्या पूरणार्थ हिंदुस्थानांतील हिंदु कायद्याचें अवलंबन करितात.
३. मुसुलमानी कायदा- सिंहलद्वीपांतील मुसुलमानांचा जो कायदा आहे तो. त्याच्या पूरणार्थ हिंदुस्थानांतील मुसुलमानी कायद्याचा आश्रय केला जातो.
४. मुक्कुवा कायदा— बाटिकोला येथील तामिळ लोकांसंबंधाचा कायदा.
५. रोमन-डच कायदा- हा सर्व द्वीपाचा सामान्य कायदा होय.
एवंच, सिलोनचा कायदा जरी रोमन-डच आहे, आणि सिंहली लोकांस देखील जरी तो रोमन-डच कायदा अंगीकारावा लागतो, तरी देखील त्यांच्या समाजाची घटना पूर्वींचीच आहे, आणि ती फिरविणारा कायदा त्यांच्यावर दडपला गेला नाहीं.