प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
राजकीय चळवळी आणि तेथील पक्षभेद :— या देशांत राजकीच चळवळी होतात; आणि थोडाबहुत पक्षभेद देखील आहे. तथापि जो पक्षभेद आढळतो तो बहुतांशीं व्यक्तिविषयक आहे. येथें सिंहली, तामिळ आणि बर्घेर या तिन्ही जातींस सरकार अगदीं सारख्या तर्हेनें वागवितें; आणि त्यामुळें बर्घेर लोक तद्देशीय हे दोघेहि एकदिलानें कामें करितात. अलीकडे मात्र बर्घेर स्वजातीस सरकारनें अधिक पसंत करावें म्हणून खटपट करीत आहेत, असा कित्येकांचा आक्षेप आहे.
सिलोनमध्यें शिक्षण अधिक असल्यामुळें सार्वजनिक प्रश्नांसंबंधानें सिलोनमध्यें अधिक जागृति आहे. कोलंबोची लोकसंख्या थोडी आहे, तथापि तेथें पांच इंग्रजी भाषेंत चालविलेलीं दैनिकें आहेत. तीं येणेंप्रमाणे :—
(१) टाईम्स ऑफ सिलोन (आंग्लो सिलोनीज {kosh आंग्लो सिलोनीज म्हणजे सिलोनमधल्या इंग्रजांनीं चालविलेलें}*{/kosh} )
(२) ऑबझरव्हर (आंग्लो सिलोनीज)
(३) इंडिपेंडट (बर्घेर)
(४) मार्निंग लीडर (देशी, संपादक हिंदुस्थानीय ख्रिस्ती आहे. हा गृहस्थ सिलोनचा टिळक बनला आहे. याचें नांव "आरमंड डिसोझा" हें होय. सिलोनमध्यें जे कांहीं अन्यायी न्यायाधीश होते त्यांच्यावर तो कडक टीका करी, आणि यामुळें यास कोर्टाच्या बेअदबीबद्दल तुरुंगांत जावें लागलें. हा तरुंगांत गेल्यानंतर याला सोडून द्यावें अशा आशयाचा अर्ज गव्हर्नरकडे प्रमुख मंडळींकडून गेला आणि गव्हर्नरनें त्याची मुक्तता केली. डिसोझा यांनीं "माझें कुल ब्राह्मणाचें आहे" असें डॉ. केतकर यांस सांगितलें).
(५) सिलोनीज (हें पत्र सिंहली मनुष्यानें चालविलें आहे. 'लोकांच्या अंतःकरणाचें प्रतिबिंब आमच्या पत्रांत जितकें पडतें तितकें मार्निंग लीडरमध्यें पडत नाहीं,' असा अभिमान या पत्राच्या संपादकामध्ये आहे असें दिसून आलें).
सिलोनमध्यें कांहीं वर्तमानपत्रकारांचीं गांठ पडली, म्हणजे त्यांनां कांहीं तत्त्वें उपदेशिण्याचा डॉ. केतकर प्रयत्न करीत असत तीं तत्त्वें येणेंप्रमाणे :—
(१) सिलोनजे भाषेनुसार राजकीय भाग पाडावेत.
(२) त्या प्रत्येक भागांत स्वभाषेमार्फत सर्व व्यवहार चालावा. सर्व सरकारी खात्यांनीं देशी भाषाच वापरावी.
(३) सर्व प्रकारचें उच्चशिक्षण देशी भाषेंतूनच द्यावें.
(४) देशाच्या उन्नतीसाठीं आणि देश हा राष्ट्र बनण्यासाठी देशांत राज्यतंत्रावर परिणाम घडविणारा अभिजातवर्ग (Aristocracy) उत्पन्न होणें अवश्य आहे. तसा वर्ग उत्पन्न झाल्याशिवाय राष्ट्रीकरण होणें शक्य नाहीं. हा अभिजातवर्ग देशांतूनच उत्पन्न झाला पाहिजे. इंग्रज हा सिंहलामध्यें अभिजात बनतां कामा नये; आणि देशी अभिजातवर्ग उत्पन्न करावयाचा असल्यास, देशी भाषांस महत्त्वास आणलें पाहिजे.
या कल्पनांचें स्वागत निरनिराळ्या पत्रांकडून कसें काय झालें हें लिहितों. त्यावरून पत्रांची वृत्ति कळून येईल.
जाफना येथील तामिळांचें अत्यंत प्रमुख पत्र म्हटलें म्हणजे "सिलोन पेट्रिअट". या पत्राचे संपादक कनकरत्न यांस या कल्पना फारच पसंत पडल्या आणि त्यांच्या मनांत जाफना येथें एक चांगलें तामिळ दैनिक काढावें असें आहे असें ते म्हणाले.
कोलंबो येथील सिंहली भाषेंत पत्र चालविणार्या पत्रकारांपैकीं "सिंहलबौद्ध" आणि "संदरेस" या पत्रकारांमध्यें या कल्पनांसंबंधानें अनुकूलता दिसली.
"दि सिलोनीज" या पत्राचे संपादक ओ. ई. मार्टिनस यांस या सर्व कल्पना पसंत पडल्या आणि "या कल्पनांचा प्रसार करण्यास मी शक्य तेवढा प्रयत्न करीन" असें त्यांनीं कबूल केलें.
"मॉर्निंग लीडर" या पत्राचे संपादक मि. डिसोझा यांचें मत "सिंहली भाषेस उत्तेजन देऊं नये, तसें उत्तेजन दिल्यास प्रगति मात्र बंद होईल; पण काय करावें ? अलीकडे सरकार सिलोनी भाषेस उत्तेजन देऊन देशाची प्रगति बंद करण्याचा यत्न करीत आहे" अशा प्रकारचें आहे.
या पूर्वगत विवेचनावरून सिलोनांतील सध्यांच्या पक्षांसंबंधानें आणि देशी संस्कृतीचा पुनरुद्धार करणें हा जो पुढें मोठा राजकीय प्रश्न होणार, त्याविषयीं सिलोनमध्यें वृत्ति कशा प्रकारची राहील, यासंबंधानें कांही कल्पना वाचकांस येईल.
सिंहली समाजाचें अवलोकन केलें असतां आपणांपेक्षां तो कोणत्या बाबतींत अधिक प्रगत दिसतो याचें मापन करूं.
१. एक गोष्ट म्हटली म्हणजे तेथील सांपत्तिक स्थिति. मजुरीचे दर सिंहलद्वीपांत हिंदुस्थानापेक्षां अधिक आहेत; आणि तेथील मजुरांचें खाणें देखील आपल्याकडील मजुरांपेक्षां अधिक किंमतीचें असतें.
२. तेथें शिक्षण आणि यूरोपियन सुधारणा अधिक आहे, आणि सार्वजनिक चळवळींत लोक अधिक मन घालतात.
३. ज्या सामाजिक सुधारणा हिंदुस्थानांतील सुधारक घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या सुधारणा केव्हांच पार पाडल्या आहेत. प्रीतिविवाह तेथें अजून सुरू झाला नाहीं आणि त्याचें कारण राजकीय आहे. राजकीय प्रगति झाल्याशिवाय प्रीतिविवाह जोरानें सुरू होणार नाहीं, आणि झाल्यास त्याचे परिणाम योग्य होणार नाहींत.
४. तेथें शिक्षण अधिक झाल्यामुळें देशी भाषेंतील वाङ्मय आतां आपल्या देशापेक्षां अधिक जोरानें वाढूं लागलें आहे.
५. ख्रिस्ती आणि बौद्ध हा भेद फारच कमी आहे; आणि तेणेकरून देशांतील निरनिराळ्या वर्गांच्या ठायीं एकप्रकारचा सामान्य देशाभिमान, आणि सामान्य शासनविषयक वृत्ति उत्पन्न झाली आहे. सिंहली भाषेचे जे आग्रही प्रवर्तक आहेत त्यांत ख्रिस्ती लोकांची संख्या अधिक आहे. तामिळ हिंदू, आणि तामिळ ख्रिस्ती यासंबंधानें हेंच विधान लागू पडेल.
६. वर्तमानपत्रें वाचण्याची इच्छा लोकांत अधिक आहे. सत्तावीस लाख सिंहली लोकांचें नियतकालिक सारस्वत आणि आपल्या दोन कोटी महाराष्ट्रीयांचें नियतकालिक सारस्वत यांची तुलना केल्यास फरक सहजच दिसून येणार आहे.
७. ख्रिस्ती आणि इतर बाह्य लोकांस हिंदू बनविण्याची शक्ति हिंदू तामिळांत वाढली आहे.
खरोखर पहातां सिंहली लोकांची प्रगति आपणांपेक्षां अधिक झाली आहे. तथापि त्यांची प्रगति आपणांपेक्षां अधिक झाली असेल अशी आपणांस कल्पना नाहीं आणि त्यांसहि नाहीं. हिंदुस्थानाकडे पैतृकभूमि म्हणून, शिवाय आपल्या परंपरागत संस्कृतीचें आगर म्हणून आदरबुद्धीनें पहाण्याची त्यांस संवय झाली आहे. आपणांविषयीं आदरबुद्धि उत्पन्न करणारी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे आपल्याकडील लोकांचीं नावें त्यांच्या कानीं जातात आणि "डोंगर दुरुनी दिसे साजरा" या न्यायानें आपल्यांतील शिष्ट लोक त्यांस फारच थोर वाटतात. शिवाय सिलोनमध्यें युनव्हर्सिटी नाहीं आणि आपल्याकडे युनुव्हर्सिट्या असल्यामुळें बी. ए., एम्. ए., पुष्कळ आहेत; आणि त्यांच्याकडे पदवीधरांचा भरणा कमी आहे. जे आहेत ते एक तर पूर्वकालीं शिकून गेल्यांपैकीं आहेत, अगर इंग्लंडांत जाऊन आल्यांपैकीं आहेत. यामुळें हिंदुस्थान हा विद्वानांचा देश आहे असा त्यांचा वृथा समज झाला आहे. शिवाय आपल्याकडे विद्वान् जरी थोडे आहेत तरी प्रत्येक ठिकाणचे कांहीं मिळून पुष्कळ होतात आणि ह्याचा त्यांच्या मनावर संयुक्त संस्कार होतो. शिवाय स्वदेशी चळवळीच्या बातम्यांमुळें आमच्या देशांतील लोक विलक्षण तर्हेनें जागृत झाले आहेत, कदाचित् हिंदुस्थानांत राज्यक्रांति देखील होईल आणि हिंदुस्थानी रक्तास अधिक महत्त्व येईल, अशा कल्पना देखील त्यांच्या मनांत चोरून मारून उद्भवतात. असो.
सिंहलविषयक ज्ञानाचें मोठें वैगुण्य म्हटलें म्हणजे उदराटांविषयीं असलेलें अज्ञान होय. तामिळ आणि सिंहली पातराट यांच्यामध्यें स्पर्धावृत्ति आहे हें दिसून येतें. तथापि उदराट आणि पातराट यांची परस्परांसंबंधीं वृत्ति कशी काय आहे याची कल्पना नाहीं. तामिळ आणि सिंहली लोकांच्या स्पर्धेंत एक गोष्ट दिसून आली. ती ही कीं, सध्यां नोकरीकरितां जी धडपड आहे त्या बाबतींतच केवळ स्पर्धा आहे असें नाहीं, तर ही स्पर्धा फार पूर्वकालापासून चालत आहे आणि आजची स्पर्धा पूर्वस्पर्धेची केवळ पुनरावृत्ति आहे. या गोष्टीमुळें पुष्कळ लोकांची अशी इच्छा आहे कीं, सिलोनचा इतिहास शाळांतून शिकवूंच नये; कारण, त्याच्या योगानें व्दैत अधिक होईल. पाठीमागच्या इतिहासासंबंधानें वादविवाद करितांना देखील गरमपणा दिसून येतो. उदाहरणार्थ, एकच गोष्ट देतोः अनुराधपूर हें सिलोनमध्यें प्राचीन संस्कृतीचें शहर होतें. येथें प्रचंड अवशेष सांपडतात आणि या शहरांस एका काळीं दीडदोन लाख वस्ती असावी असा अजमास होतो. या शहराचें नांव "अनुराधपूर" आहे असें सिंहली म्हणतात. तामिळ म्हणतात, येथें एका काळीं पन्नास तामिळ राजपुत्र राज्य करीत होते आणि म्हणून अनुराजपूर हें नांव पडलें आहे. सिंहली म्हणतात, "अनुराधा" नांवाच्या सिंहली महाराज्ञीच्या नावांवरून हें नांव या गांवास मिळालें. बौद्ध अवशेषांकडे नजर फेंकली असतां आणि सध्यां सिंहली लोक बौद्ध संप्रदायाचे आहेत ही गोष्ट लक्षांत घेतली असतां हें शहर सिंहली लोकांनीं वसविलें असावें असें मत होतें. तामिळ उत्तर करितात कीं, "ब्राह्मण लोक इकडे येण्यापूर्वीं आम्ही देखील बौद्धच होतों; तथापि ब्राह्मणांनीं "आगम" आणून आम्हांस नास्तिक्यांतून सोडविलें."
या सर्व वादविवादांत ऐतिहासिक अंश काय असेल तो असो. एवढी गोष्ट मात्र खरी कीं, तामिळ आणि सिंहली या दोन्ही राष्ट्रांत परस्परांविषयीं स्पर्धा आणि क्रोध हीं बरींच आहेत. उदराट आणि पातराट यांच्यामध्यें परस्परांविषयीं कांहीं निश्चित वृत्ति आहे कीं काय समजलें नाहीं.