प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
मुंडा व मोनख्मेर :— मुंडा व मोनख्मेर कुळें यांच्यामधील संबंध 'इंडियन आर्किपेलेगो जर्नल' मध्यें प्रसिद्ध केलेल्या 'इंडो पासिफिक द्वीपांतील मानववंश' नांवाच्या लेखमालिकेत लोगन यानें प्रथम निदर्शनास आणला. प्रोफेसर ई. कुहन यांनीं मोन-ख्मेर व मुंडा शब्दांच्या सादृश्यासंबंधीं विचार करीत असतांना एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, एकाक्षरी खासी-मोन-ख्मेर भाषा व कोल यांच्या मधला संबंध दाखविणार्या कित्येक गोष्टी कोणाच्याहि अचूक ध्यानांत येण्यासारख्या आहेत. हिंदुस्थानांत काय किंवा ब्रह्मदेश, टाँगकिंग, सयाम, आनाम व कांबोज ह्या हिंदुस्थानच्या पूर्वेकडील भागांत काय, तेथील बर्याचशा जनतेच्या खालीं मूळ रहिवाशांचा एक सर्वसाधरण थर असून त्यावर मागून आलेल्या वसाहतवाल्यांचे थरावर थर बसले आहेत. या मूळ थराच्या खाणाखुणा अद्यापहि स्पष्ट दिसत आहेत. डॉ. स्टेन कोनाउ यांनीं देखील मुंडा व मोनख्मेर भाषांच्या परस्पर संबंधाविषयीं बरेंच सविस्तर विवेचन केलें आहे. (ग्रियर्सनचें 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ् इंडिआ' पुस्तक, खंड ४, पान ११ व पुढील पानें पहा).