प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
ब्रह्मीलोकांची संस्कृति :— एकंदरींत ब्रह्मी लोकांतील संस्कृति थई किंवा सयामी लोकांतील संस्कृतीच्या दर्जाचीच आहे; मात्र ब्रह्मी लोकांच्या राज्यपद्धतींत असे कांहीं दोष आहेत कीं ते सयामी राज्यपद्धतींत आढळत नाहींत. ब्रह्मी लोकांत स्वाभिमानाची कल्पना फार कमी असून ते लोक वरिष्ठांच्या तंत्रानें चालणारे फार आहेत. युद्धापेक्षां त्यांनां शेतकीच फार आवडते. त्यांच्यामध्यें गोंदण्याची रानटी चाल कायम आहे. ब्रह्मी राज्यांतले सर्व स्त्रीपुरुष रहिवाशी कानांनां भोकें पाडून त्यांत सोन्यारुप्याचे दागिने घालतात. गरीब लोक त्यांच्या ऐवजीं लाकूड किंवा कागद यांचे तुकडे वापरतात. त्यांच्यांत सुपारी खाण्याचा फार शोक आहे. तंबाखूचें व्यसनहि सर्व दर्जांच्या लहानमोठ्या वयाच्या स्त्रीपुरुषांत आढळतें. इतर बाबतींत मात्र ते लोक बहुतेक नेमस्तपणानें वागतात. उपयुक्त कलांत व ललितकलांत ब्रह्मीलोकांची प्रगति बेताबाताचीच झालेली आहे. शास्त्रीय विषयांत त्यांची बुद्धि अगदींच कमी चालते. धर्मोपदेशक खगोलशास्त्राचा अभ्यास करतात पण तो फलज्योतिषाला मदत व्हावी म्हणून आणि वार्षिक पंचांगें वगैरे करण्याकरितां तात्पुरता करतात. त्या देशांत मठ इतके पुष्कळ आणि जिकडेतिकडे पसरलेले आहेत कीं त्यामुळें सर्व लोकांच्या मुलांनां वाचन, लेखन व बेरीज वजाबाकी इत्यादि गणित इतक्या विषयांचें शिक्षण सहज मिळतें. बौद्ध भिक्षू या विषयांचें शिक्षण व धार्मिक शिक्षण देण्याचें काम करतात; व या विद्यादानाबद्दल दक्षिणा म्हणून त्या मुलांनां मठांतील व देवालयांतील कामें करावीं लागतात. त्यांचे एकंदर वाङ्मय पालीभाषेंतील ग्रंथ वगळले तर फारसें महत्त्वाचें नाहीं. यांचे पाली ग्रंथ व दक्षिणेकडील जे बौद्ध लोक पाली भाषेला पवित्र मानतात त्यांचे ग्रंथ एकच आहेत. ब्रह्मी लोकांचें विशिष्ट वाङ्मय म्हणजे गाणीं, धार्मिक कथा व बखरी एवढेंच आहे. यांपैकीं दुसर्या प्रकारच्या ग्रंथांची काव्यग्रंथ या दृष्टीनें बरीच योग्यता आहे. पहिल्या प्रकारांत मात्र ह्या काव्यमयत्त्वाच्या गुणाची उणीव दिसते. बखरींकडे अर्थातच त्यांतील हकिकतीपुरतेंच लक्ष द्यावयाचे असतें. ब्रह्मी वाङ्मयांतील एका नाटकाचें भाषांतर इंग्लिशमध्यें झालेलें आहे. ह्या एका नाटकावरून पाहतां ब्रह्मी लोकांत नाट्यकला मोठ्या उच्च दर्जाला पोंचल्याचें दिसत नाहीं. त्यांत नाटककारांनीं पात्रानें स्वगत बोलण्याचीं भाषणें, कांहीं संभाषणें व कांहीं पदें इतकें लिहिलेलें असतें व बाकीचीं भाषणें पात्रांनीं आपआपलीं तयार करून घ्यावयाची असतात; या ब्रह्मी लोकांच्या नाटकांतील कथानकें बहुतकरून रामायण व महाभारत या हिंदू लोकांच्या महाकाव्यांतून घेतलेलीं असतात. तथापि त्यांत दोष असा असतो कीं प्रयोगस्थळें खरीं अस्तित्वांत घेतलेलीं नसून ती कल्पित अद्भुत देशांतील असतात व नाटकाच्या गोष्टींतील परस्परसंबंध व शेवट योग्य प्रकारें दाखविलेला नसतो.
सरतेशेवटीं हें लक्षांत घ्यावयाचें कीं, मुग किंवा आराकानी या निकटसंबंधी लोकांप्रमाणेंच ब्रह्मी लोक गौतमबुद्धाच्या धर्माचे मोठे उत्साही व श्रद्धावन्त अनुयायी आहेत; आणि त्यांच्यांतील धार्मिक चालीरीती लंकेमधून या धर्माची प्राप्ति ज्यांनां झाली त्या भारतसंलग्न पूर्वदेशांतल्या इतर लोकांच्या चालीरीतींहून महत्त्वाच्या मुख्य बाबतींत निराळ्या नाहींत.
आतां ब्रह्मदेशांतील निरनिराळ्या भाषा व वाङ्मयें यांचें स्थूल अवलोकन करूं. त्यांच्या संबंधानें माहिती देतांना कांहीं जातिरूपी राष्ट्रांच्या इतिहासासंबंधानें माहिती येईलच.