प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
भारतीय संस्कृतीचें वर्चस्व :— त्यानंतर या बेटांत जाऊन राहिलेल्या लोकांबद्दल महाकाव्य जे रामायण त्यांत माहिती मिळते, ती अशी कीं, रावण नांवाच्या तेथील राजाची राजधानी राम नांवाच्या वीरानें आपल्या अनुयायांच्या मदतीनें जिंकून घेतली. ही माहिती कमी महत्त्वाची समजून सिलोनच्या अर्वाचीन इतिहातसील आरंभ इ. स. पू. ५४३ पासून होतो, असें पाश्चात्य शोधक समजतात. त्या सालीं विजय नांवाचा सिंहली राजघराण्याचा मूळपुरुष आपल्या आर्यन् भाषा बोलणार्या अनुयायांसह हिंदुस्थानांतून निघून सिलोनांत जाऊन उतरला. तेथें विजयानें एका तद्देशीय पुढार्याच्या मुलीबरोबर विवाह करून त्याच्या मदतीनें त्यानें सर्व बेट जिंकून घेतलें व तेथें आपल्या अनुयायांत वांटून तेथें लहान लहान राज्यें बनविलीं. यानंतर हिंदुस्थानांतील शेतकी वगैरे बरीच सुधारणा सिंहली लोकांनीं आपल्या बेटांत आणली. विजयाच्या नंतरच्या राजानें इ. स. पू. ५०४ चे सुमारास अनुराधापुरानजीक एक मोठा तलाव बांधून कालवे काढले; व त्याच सुमारास हल्लीं बर्याच भागांत प्रचलित असलेली ग्रामसंस्थापद्धति सुरू केली.
पाश्चात्य पंडितांचें मत असें आहे कीं, ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या पूर्वीं येथें फारशी लोकवस्ती नसून विजयाबरोबर आलेल्या लोकवस्तीनें या द्वीपाच्या वसाहतीस खरी सुरुवात झाली असावी. रामायणकालींच येथें बरीचशी लोकवस्ती असावी हें आम्हांस अधिक संभवनीय वाटतें. या विधानास साधक अशीं कारणें आम्ही पुढें देणार आहों.
इ. पू. ३ र्या शतकाच्या आरंभीं बौद्ध सार्वभौम अशोक राजा याचा मुलगा महिंद याच्या उपदेशानें सिलोनमधील लोक बौद्धधर्मी बनले; व त्यानंतर तेथें दाघोबा नांवाच्या चमत्कारिक घंटेच्या आकाराच्या कठिण दगडाच्या अस्थिपेटीका व बौद्ध मठ असंख्य निर्माण झाले. बाकी राहिलेला सिलोनच्या प्राचीन इतिहासाचा भाग मलबारी अथवा तामिळ लोकांच्या स्वार्या, त्यांनीं जिंकलेले प्रांत व अन्यायानें बळकावलेलीं राज्यें यांच्या कंटाळवाण्या हकिकतीनीं भरलेला आहे. असल्या राज्यापहाराचें पहिलें उदाहरण इ. पू. २३७ मध्यें घडलें. या वेळीं सैन्याच्या व आरमाराच्या अशा दोन मुख्य आधिकार्यांनीं तक्ताधीश सिंहली राजाला त्याच्याच तामिळ पगारी सैनिकांच्या मदतीनें पदच्युत करून दोघांनीं मिळून इ. पू. २१५ पर्यंत पहिला सेन व गुप्तिक या नांवांनीं समाइक राज्य केलें. त्यानंतर इ. पू. २०५ पर्यंत सिंहली असेल राजानें राज्य केलें; त्या सालीं तंजावर येथील इलाल नांवाच्या तामिळ वीरानें त्याला पदच्युत करून स्वतः ४४ वर्षें राज्य केलें. इ. पू. १६१ मध्यें इलालचा दुतेगेमुनूनें पराभव करून त्याला ठार मारलें. दुतेगेमुनूची अद्यापहि मोठा सिंहली वीर म्हणून प्रसिद्धि आहे. अनुराधपुरांतील पितळी राजवाडा नांवाच्या मठाचे अवशेष त्याच्या ऐश्वर्याचें व धार्मिक वृत्तीचें स्मरण करून देण्यास अद्याप उभे आहेत. त्याच्यानंतर इ. पू. १३७ पासूनचा इतिहास तामिळ लोकांच्या स्वार्या, कालव्यांचीं कामें व बौद्ध मठसंस्थेचा प्रसार यांनीं भरलेला आहे. या इतिहासांत विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सिगिरी येथील सुप्रसिद्ध अवशेषभूत खडक व तलाव यांच्या संबंधाची इ. स. ५ व्या शतकांतील राजघराण्यांतील एक शोकजनक कथा होय. ही कथा अशी आहे. इ. स. ४७७ मध्यें दतुसेनराजाचा मुलगा आपल्या बापाला ठार मारून १ ला काश्यप या नांवांनें राजा झाला, पण खुनामुळें चवताळलेल्या लोकांनीं त्याला हांकून दिलें; तेव्हां त्यानें या सिगिरीच्या खडकावर किल्ला बांधून ४९५ पर्यंत राज्य केलें; या सालीं बापाच्या खुनामुळें हिंदुस्थानांत पळून गेलेल्या त्याच्या मुगल्लन नांवाच्या भावानें त्याचा पराभव करून त्याला ठार मारलें.
१० व्या शतकाच्या अखेरीस चोळ राजा राजराज यानें सिलोनवर स्वारी केली, आणि बर्याच लढायांनंतर सिलोन बेट १००५ मध्यें आपल्या साम्राज्यास जोडून टाकलें. तथापि या तामिळ सत्तेखालीं सिलोन फार वर्षें टिकलें नाहीं. १०७१ मध्येंच विजयबाहूनें सिंहली घराण्याचें राज्य पुन्हां प्रस्थापित केलें. यानंतर कांहीं काळ सिलोनला परकीयांपासून त्रास झाला नाहीं. विजयबाहूच्या वंशजांपैकीं व एकंदर सिंहली राजांमध्येंहि अत्यंत श्रेष्ठ असा पहिला पराक्रमबाहु नांवाचा राजा (११५५-११८०) होऊन गेला; त्याचा एक भव्य पुतळा पोलोन्नरुव येथें आहे. सिलोनमध्यें अपूर्व शांतता नांदत होती तिचा फायदा घेऊन त्यानें कालवे, तलाव व मठ वगैरे बांधले, इतकेंच नव्हे तर, त्यावेळीं मदुरा येथील पांड्य घराण्यामध्यें गादीबद्दल चाललेल्या एका तंट्याची संधि साधून आपल्या तामिळ शत्रूचें मागील उट्टें काढ्याकरितां त्यानें हिंदुस्थानांत स्वारी केली. महावंशांतील वर्णनावरून पाहतां त्याच्या सेनापतींनां ताबडतोब व पूर्ण जय मिळाला असें दिसतें; परंतु कांचीजवळच्या अर्पक्कम येथील एका चोळांच्या मोठ्या शिलालेखावरून असें दिसतें कीं, जरी त्याच्या सैन्याला प्रथम जय मिळाला होता तरी शेवटीं दक्षिणहिंदुस्थानांतील सर्व राजांनीं एक होऊन त्याच्या सैन्याला हांकून लाविलें. कांहीं असलें तरी इतकें खरें कीं, पराक्रमबाहूच्या मरणोत्तर तीस वर्षांतच त्यानें बसविलेली घडी सर्व विसकटली, आणि मलबारी लोकांनीं पुन्हां सिलोनांत पाय रोंवला व त्यामुळें राजधानी दक्षिणेकडे जातां जातां शेवटीं १४१० मध्यें कोलंबोच्या कोट्टो नावांच्या उपांतभागांत ती स्थापन झाली. १४०८ मध्यें सिंहली घरण्यावर आणखी एक संकट ओढवलें; एका चिनी वकिलाचा तेथें अपमान झाल्याच्या निमित्तानें चिनी सैन्यानें बेटावर स्वारी करून ४ थ्या पराक्रमबाहु राजाला कैद करुन नेलें. यानंतर तीस वर्षें सिंहली राजे चीनचे मांडलिक बनलेले होते.