प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
ब्रह्मी — ही भाषा प्रथम एकाक्षरी असावी. पुढें तींत पाली भाषेचें मिश्रण होऊन तिच्यांतील मूळ शब्द एकाला एक असे चिकटवून नवेच शब्द बनविलेले आढळतात. या भाषेंत शब्दांचीं स्वरूपें मुळींच बदलत नाहींत. त्यामुळें शब्दांचा अर्थ केवळ त्यांच्या वाक्यांतील स्थानांवरून अगर शेजारच्या शब्दांवरून निश्चित होतो. याप्रमाणें या भाषेची रचना अगदीं रुखेंगप्रमाणें साधी आहे. परंतु या भाषेंत निरनिराळ्या दर्जांच्या माणसांनीं निरनिराळे शब्द वापरावयाचे असतात. हें सर्व भाषावैशिष्टय ब्रह्मी लोकांचें भारतीयांपासून भिन्नत्व दाखवितें.
ब्रह्मी भाषेची लिपी मात्र भारतीय आहे. या लिपींतील वर्णांचा आकार कांहींसा कानडी, सिंहली अथवा तलैंग लिपीसारखा पण त्यांहून थोडासा साधा आहे. या लिपिचें भारतीयत्व नेहमींच मान्य
झाले होतें असें मात्र नाहीं. कदाचित् चुकून आपण सत्याजवळजवळ विधान करूं, ही जणूं काय भीति धरून मुद्दाम आडरानांत जाऊं पहाणार्या एका पाश्चात्यानें (कार्पानिअस यानें {kosh Alphabetum Barmanum sen Bomanum..}*{/kosh} ) ही मातृकामाला हिब्र्यूपासून फारसींत येऊन नंतर जावांतील बलिभाषेशीं योग होऊन बनली असावी असा मौजेचा तर्क व्यक्त केला होता. दुसर्या एका अमॅदुतिअस या यूरोपीयानें ही लिपी आणि मल्याळम् लिपी या आर्मेनिअन लिपीपासून निघाल्या आहेत असा तर्क केला होता; परंतु या मातृकांचें आर्मेनियनशीं मुळींच साम्य नाहीं असें लेडेन म्हणतो.
ब्रह्मी लिपीचा त्या भाषेंतील वाङ्मयावर बराच परिणाम झाला आहे. या भाषेंतील काव्यांत यमक व प्रास फार आढळतात असें जें कार्पानिअस यानें म्हटलें आहे त्याचें कारण या भाषेंतील शब्दच असे आहेत कीं, त्यामुळें आपोआप यमकें साधतात. बरेचसे ब्रह्मी भाषेंतील ग्रंथ गद्य आहेत; परंतु त्यांत कांहीं ठिकाणीं शब्दांवर जो जोर द्यावा लागतो तो सामान्यतः नियमित स्थळीं येत असल्यामुळें तें गद्य कानाला पद्याप्रमाणें वाटतें.
ब्रह्मी भाषेंत ग्रंथसंख्या बरीच आहे. विशेषतः सांप्रदायिक व शास्त्रीय विषयांवर ग्रंथ अनेक आहेत. त्यांत पौराणिक, फलज्योतिषविषयक, वैद्यकीय व धर्मशास्त्रीय ग्रंथ हे प्रमुख आहेत. धर्मशास्त्रांमध्यें 'दम्मसत्वयी' हा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा आहे. बुकॅनन म्हणतो कीं, ब्रह्मी वाङ्मयांत ऐतिहासिक ग्रंथ अनेक असून त्यांत 'महाराजा वयंगी' हा ग्रंथ मुख्य आहे. ब्रह्मी लोकांनीं चिनी व सयामी लोकांचे इतिहास व त्याप्रमाणेंच काथी, कोपनपयी, पगू, सायम्मय, आणि लयनझयन इत्यादि राष्ट्रांच्या इतिहासांचीं भाषांतरे केलीं आहेत असेंहि बुकॅनन यानें म्हटलें आहे. ब्रह्मी वाङ्मयांत बरींचशीं लहान लहान काव्यें, गाणीं व नाटकेंहि आहेत. त्यांपैकीं बरींचशीं संस्कृतवरून आलीं असावीं असें वाटतें. यांच्या नाटकांच्या विषयांत रामाची लंकेवरील स्वारी हा विषय प्रमुख आहे. पुढें दिलेले ग्रंथ ब्रह्मी लोकांचे विशेष आवडते असून त्यांपैकीं बरेचसें रुखेंग, सयामी व मलयु भाषेंतहि आहेत. यांपैकीं बरेचसे ग्रंथ पौराणिक आहेत तथापि यांत कांहीं चरित्रें व ऐतिहासिक ग्रंथहि आहेत.
ब्रह्मी लोकांचे विशेष आवडते ग्रंथ :—
(१) जिनमन (२) नन्दजिन (३) नन्दगम (४) चंडगम (५) नारद (६) तेमी (७) नेमी (८) धम्मपद-कायद्यावरील ग्रंथ (९) नमगर-विधि व प्रार्थना (१०) लोगसर-नैतिक ग्रंथ (११) लोगनिधि-नैतिक ग्रंथ (१२) महोसुथ (१३) वेसंदर अथवा वेसंदर कथा (१४) परमिखन (१५) चुडोंगखन (१६) बुंगखन (१७) कदोखन-प्रायश्चित्तविधि (१८) चतुदमसर (१९) संगवर (२०) भूरिदत (२१) किनरप्ये किन्नरचरित्र (२२) मलिन्मेंग वुथु-मलिन राजाचें चरित्र (२३) जिनक-जनक राजाचें चरित्र; सयामीमध्यें यास महाचिनोक म्हटलें आहे. (२४) युवजी (२५) स्विप्रिवेंगखन (२६) तो त्वेक्खन (२७) म्निंगुंग्सल (२८) अनुसासन (२९) सुअन्नशन (३०) विथोर (३१) कगिलेंग (३२) सदसिच्छौंग (३३) अनगत्वेंग (३४) न्गरेखन-नरकाचें वर्णन (३५) अत्तगत्तलेंग (३६) म्हत्त्वौबोंग (३७) जैन्दमन भिखुजैन्दमन भिक्षुणीची कथा (३८) नन्दजैन-आनन्ददेव याची कथा.
ब्रह्मी भाषेचा यूरोपीयांपैकी मिशनर्यांशिवाय कोणींहि विशेषसा अभ्यास केलेला आढळत नाहीं. कार्पानिअस याचा ग्रंथ {kosh Alphabetum Barmanum}*{/kosh} रोममध्यें १७७६ सालीं प्रसिद्ध झाला. यानंतर बुकॅनन वगैरेंचे ग्रंथ आढळतात. डॉ. बुकॅनन यानें तर आपल्या ग्रंथांत ख्रिस्ती वगैरै लोकांस बुद्धाचा खरा धर्म आचरण्याचा उपदेश केला आहे. {kosh A View of the Religion of Godama.}*{/kosh} हा ग्रंथ अतुलि झरदो यानें मुद्दाम ख्रिस्ती लोकांचें परावर्तन करण्याकरितां लिहिला होता. त्याचें व्हिन्सेंटिअस संगरमॅनो यानें भाषांतर केलें व तें बुकॅनन यानें छापून काढलें.