प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
ब्रह्मदेशांतील सात वर्ग :— ब्रह्मी राज्यपद्धति पूर्णपणें एकतंत्री आहे. तथापि ब्रह्मदेशांतील कित्येक वर्ग अगदीं भिन्न असल्यामुळें थईंच्या राज्यपद्धतीहून ही राज्यपद्धति थोडी निराळी आहे. राजघराणें, अधिकारीमंडळ, पुरोहितवर्ग, व्यापारी किंवा धनिक लोक, शेतकरी, गुलाम व बहिष्कृत लोक, असे सात वर्ग किंवा जाती या देशांत आहेत. पेगू येथील लोकांमध्येंहि फक्त लहान लहान मांडलिक राजांनांच वंशपरंपरेनें पदव्या असतात. त्यांनां थुभव किंवा सुव्हव (सुभव) असें उपपद असतें. त्याचा अर्थ 'कुलीन घराण्यांतील' असा दिसतो. वरिष्ठ अधिकार देणें किंवा काढून घेणें हें राजाच्या इच्छेवर अवलंबून असतें. वडिलोपार्जित जिंदगी हिरावून घेतल्याचीं अनेक उदाहरणें आढळतात. ब्रह्मी राज्यव्यवस्थेच्या या संक्षिप्त इतिहासांत, प्रथम तेथील कित्येक जातींची माहिती देऊन नंतर राज्यव्यवस्था, कर, जमाबंदी, सैन्य, कायदे, व न्यायखातें या निरनिराळ्या खात्यांची क्रमवार माहिती दिली आहे.
या ठिकाणीं पुरोहित वर्गाबद्दल फारसें वर्णन देत नाहीं. ब्रह्मदेशांत त्यांची संख्या बरीच असून त्यांची राहणी सामान्यतः त्यांच्या धर्मशास्त्रांतील नियमाप्रमाणें असते. इतर ठिकाणांप्रमाणेंच येथेंहि अधिकाराप्रमाणें ब्रह्मी भिक्षूंच्या पायर्या आहेत; इतर बौद्धदेशांप्रमाणेंच येथेंहि मठ असून ब्रह्मी देशांत भिक्षू व भिक्षुणी आहेत. गौतमाच्या अनेक देवळांपैकीं, प्रत्यक्ष ब्रह्मदेशांतील अमरपूर, सगेंग, रंगून व पेगू येथील देवळें, पावित्र्यानें भव्यतेनें विशेष प्रसिद्ध आहेत. येथील भिक्षूंनां राजसंरक्षण असते, परंतु राजकीय बाबतींत पडण्याची त्यांनां मनाई असते.
एखाद्या व्यापार्यानें मोठा धनसंचय केल्यास त्याला राजाज्ञेनें 'थु-थे' (धनवान्) अशी पदवी देण्यांत येते; अशा व्यापार्यांनां राजसंरक्षणाचा फायदा मिळतो; तथापि, ही पदवी आनुवंशिक नसून वाटेल तेव्हां काढून घेतां येत असल्यामुळें, वेळोवेळीं नजराणें देऊन राजाची मर्जी या व्यापार्यांनां संपादावी लागते. राजाची धनतृष्णा शांत करण्यासाठीं या थु-थेनीं त्याला हजारों टिकेल (एक प्रकारचें नाणें) दिल्याची उदाहरणें आहेत. ब्रह्मी मजूरवर्गापैकीं फार थोड्या लोकांच्या मालकीच्या जमिनी असून ज्यांच्या स्वतःच्या जमिनी नाहींत अशा मजुरांची संख्या फार मोठी आहे. धर्माधिकारी लोकांशिवाय बाकीची सर्व प्रजा ही आपली एक प्रकारची मालमत्ता असून, तिची आपल्याला वाटेल तशी विल्हेवाट लावण्याचा आपणांस अधिकार आहे अशी ब्रह्मी राजांची समजूत
आहे, यामुळें सरकारच्या विशिष्ट परवानगीशिवाय या प्रजाजनांनां आपलें वसतिस्थान सोडतां येत नाहीं, आणि कांही काळपर्यंत व विशिष्ट कारणासाठींच अशी परवानगी देण्यांत येते. परंतु स्त्रियांनां बहुधा अशा प्रकारचा प्रतिबंध नसतो. लोकवस्ती अगदीं कमी असल्यामुळें येथें मजुरीचे दर फार भारी आहेत. खासगी लोकांस मजूर कामावर लावण्याची परवानगी त्यांच्या जवळून पैसे घेऊन देण्यांत येते व अशा तर्हेनें मजुरांच्या अल्पतेचा दरबार गैरवाजवी फायदा घेतो.
कांही विशिष्ट कर्जाबद्दल कुळानें सावकाराची नोकरी केलीच पाहीजे, असा सयामप्रमाणें येथें कायदा नाहीं. ज्या ज्या वेळीं सरकारला मजुरांची गरज लागेल त्या त्या वेळीं अमुक मजूर पाहिजेत असा प्रांतिक अधिकार्यांनां राजाचा हुकुम सुटतो.
सावकारापासून काढलेल्या कर्जाच्या मानानें त्याची नोकरी करण्याचा जे ठराव करितात ते व वंशपरंपरेचे असे दोन प्रकारचे गुलाम असतात. पहिल्या प्रकारच्या गुलामांची संख्या मोठी आहे; परंतु सावकाराचें काम करून कर्ज फिटल्यावर ते पुनः स्वतंत्र होतात. या गुलामांपासून काम करून घेण्यासाठीं त्यांनां शारीरिक शिक्षा करण्याची धन्यांनां मोकळीक असते; परंतु शरिरांतून रक्त निघेपर्यंत त्यांनीं त्यांनां शिक्षा करतां कामा नये. तशी गोष्ट झाल्यास कर्जाची फेड झाली असें समजण्यांत येतें. पंचवीस टिकेलपेक्षां अधिक कर्जाबद्दल ज्या स्त्रिया गहाण ठेविलेल्या असतात, त्यांचा सावकाराला उपस्त्रियांसारखा उपयोग करतां येतो; परंतु ते असले हक्क कधींहि बजावीत नाहींत. या रकमेपेक्षां कमी कर्ज असल्यास स्त्रियांनां त्यांचें स्वातंत्र्य परत मिळतें. सावकारापासून या स्त्रियांनां पुत्र झाले तरीहि त्यांनां स्वातंत्र्य मिळतें. ऋणको आईबाप आपल्या मुलांनांहि गहाण टाकतात. अशा प्रकारच्या गुलामांची विक्री करतां येते. दुसर्या प्रकारच्या गुलामांत बहुतेक लढाईंत धरून आणिलेल्या कैद्यांचाच समावेश होतो. आसाम, काचार व शेजारचे देश यांबरोबर झालेल्या युद्धांत अशा प्रकारचे अनेक गुलाम ब्रह्मी लोकांनीं आणिलेले होते. सयामी लोकांपेक्षां ब्रह्मी लोक गुलामांनां चांगल्या तर्हेनें वागवितात. गुलामांचा आपल्या धन्यांशीं कोणत्या प्रकारचा संबंध असावा याविषयीं ब्रह्नी धर्मशास्त्रांत नक्की नियम दिलेले आहेत. देवळांच्या कामावर लाविलेले गुलाम, प्रेतदहन करणारे लोक, कैद्यांवर देखरेख करणारे लोक, मांग, महारोगी व त्यांसारखे इतर असाध्य रोगी, लुळेपांगळे व वारांगना या सर्व लोकांनां बहिष्कृत समजण्याची ब्रह्मदेशांत चाल आहे. या लोकांनां नागरिकत्वाचे हक्क नसून धार्मिक विधींत त्यांनां भाग घेतां येत नाहीं. त्यांनां शहरांत राहतां येत नाहीं; आसपासच्या खेड्यांत व दूर ठिकाणीं त्यांनां रहावें लागतें. वेश्यावृत्तीच्या दुराचारी स्त्रियांचाच या निंद्य वर्गांत समावेश होतो. त्यांनीं तो धंदा सोडून दिल्यास त्यांनां पुनः गरती समजण्यांत येतें, कारण ब्राह्मी लोक पातिव्रत्यास फारसें महत्त्व देत नाहींत. याप्रमाणें माहिती देऊन लासेन असें म्हणतो कीं, या बाबतींतील ब्रह्मी कायदे हिंदी कायद्यांसारखे आहेत असें या आचारभ्रष्ट वर्गाच्या माहितीवरून दिसून येतें. आचारभ्रष्ट लोकांमध्यें अतिशय नीच असे जे चाणडाल त्यांनीं गांवाबाहेर रहावें असा हिंदू लोकांचा कायदा आहे. लासेन पुढें म्हणतोः ब्रह्मी राज्यपद्धतीवरून तेथें अगदीं बेबंदशाही होती असें दिसून येतें; व अशा प्रकारच्या राज्यपद्धतीपासून होणारे सर्व अनर्थ तेथें झालेले आहेत. सरकारी जाहीरनाम्यांत "सर्व प्रजेच्या मालमत्तेचा व जीविताचा मालक" असें राजाला म्हटलें आहे. त्याच्या इच्छेप्रमाणें सर्व लोकांची व जमिनीची त्याला विल्हेवाट लावतां येते. स्वतःचा व आपल्या प्रधानमंडळाचा जीव धोक्यांत न घालतां तो आपल्या या हक्काची शक्य तेवढी अंमलबजावणी करतो; फक्त बंड होण्याची भीति हीच कांहीं अंशी त्याच्या जुलमी वर्तनास आळा घालिते.