प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

पाश्चात्यांचा स्पर्श व कबजा :— १५०५ मध्यें फ्रांसिस्को डी आल्मीडा हा पोर्तुगीज इसम सिलोनांत उतरला, तेव्हां त्याला त्या बेटांत सात निरनिराळीं राज्यें असल्याचें आढळलें. नंतर बारा वर्षांनीं गोव्याच्या व्हाइसरायानें कोलंबो येथें एक किल्ला बांधण्याचा हुकुम दिला व त्याकरितां कोहोच्या राजाकडून परवानगी मिळविण्यांत आली. या काळापासून पुढें १७ व्या शतकांत डच लोक तेथें पाय ठेवीपर्यंत पोर्तुगीज लोकांनीं तद्देशीय राजे व यूरोपियन व्यापार्‍यांच्या चढाओढीमुळें चिडून जाऊन त्या राजांनां मदत करणारे अरब लोक यांच्याबरोबर लढाया चालू ठेवून आपली सत्ता त्या बेटांत प्रस्थापित करण्याचा दिर्घ प्रयत्‍न चालविला होता. या प्रयत्‍नानें शेवटीं किनार्‍यावर त्यांची सत्ता स्थापित झाली, परंतु बेटाच्या अन्तर्भागांत त्यांचा अम्मल बसला नाहीं. या खटपटीचा प्रत्यक्ष फायदा असा त्यांनां अगदींच अल्प झाला, कारण बेटांतील व्यापार मुळांतच किरकोळ होता. पण सत्तेमुळें सेंट फ्रँसिस झेवियर या प्रसिद्ध मिशनर्‍याचें व इतरांचें कॅथॉलिकधर्मप्रसाराचें काम मोठ्या जोरांत चाललें; आणि त्याबद्दलची धार्मिक दृष्टीनें कृत्यकृत्यता पोर्तुगीजांनां वांटू लागली.

पोर्तुगीज लोकांच्या या धर्मप्रसाराच्या वेडामुळें व तद्देशीय राजांबरोबर वागण्याच्या त्यांच्या मोठ्या अरेरावीच्या धोरणामुळें तेथील राजांशीं त्यांचें नेहमीं वांकडें असें; आणि यामुळें पुढें १६०२ मध्यें जेव्हां अ‍ॅडमिरल स्पिलबर्गच्या नेतृत्वाखालीं डच लोक त्या बेटांत येऊन उतरले आणि तेथील अन्तर्भागांतल्या कँडी येथील राजाबरोबर स्नेह करण्याचा त्यांनीं प्रयत्‍न चालविला, तेव्हां त्यांनीं पोर्तुगीज लोकांनां पार हांकलून लावण्याच्या कामीं मदत करावी म्हणून सर्व प्रकारचें आमिष कँडीच्या राजानें व इतरांनीं त्यांस दाखविलें. परंतु अशा खटपटींचा १६३८-१६३९ पर्यंत कांहीं एक परिणाम झाल्याचें दिसून येत नाहीं. त्या सालीं दुसर्‍या एका डच तुकडीनें हल्ला करून किनर्‍यावरील पोर्तुगीज लोकांचे किल्ले सर्व जमीनदोस्त करून टाकले. पुढल्या वर्षीं डच लोक नेगोंबो येथें उतरले, परंतु तेथें त्यांनां कायमचें बळकट ठाणें स्थापन करतां आलें नाहीं. १६४४ मध्यें त्यांनीं नेगोंबो काबीज केलें, व तेथें चांगली मजबूत तटबंदी केली; नंतर १६५६ मध्यें त्यांनी कोलंबो हस्तगत केलें; आणि शेवटी १६५८ मध्यें सिलोनमधील पोर्तुगीज लोकांचें शेवटचें ठाणें जें जाफना तें घेऊन त्यांनां समूळ हांकून दिलें.

डच लोकांनीं आपल्यापूर्वींच्या पोर्तुगीज लोकांपेक्षां अधिक शहाणपणाचें धोरण स्वीकारुन आपल्या वर्चस्वाखालच्या मुलखांत सुधारणा करण्याची व अंतर्भागाबरोबर व्यापार सुरू करण्याची संधि बिलकुल दवडली नाहीं. पोर्तुगीज लोकांपेक्षां अधिक सहिष्णुता दाखवून व आपल्या मोठेपणाचें स्तोम फारसें न माजवितां डच लोकांनीं तद्देशीय राजांनां आदर दाखवून त्यांनां खूप चढविलें व राजकीय गोष्टींपेक्षां व्यापारी गोंष्टीनां अधिक महत्त्व दिलें, त्यामुळें त्यांचा उद्देश सफल होऊन त्या बेटाबरोबरच्या व्यापारांत हालंडला चांगलाच फायदा होऊं लागला. पुष्कळ नवे नवे धंदे निघाले. शिवाय त्यांनीं सार्वजनिक उपयोगाचीं कामें  केलीं, व समुद्रालगतच्या प्रांतांत शिक्षणहि सार्वत्रिक नाहीं तरी सरकारी देखरेखीखालीं बरेंच काळजीपूर्वक चालू केलें. तथापि चाणाक्ष धोरणानें इतकी सुधारणा केलेल्या या मुलुखाचें, ब्रिटीश लोकांनी त्यांच्यावर शस्त्र उगारलें तेव्हां संरक्षण करण्याचें सेनासामर्थ्य त्यांच्याजवळ नव्हतें. एकदीड शतकामध्यें या डच वसाहतवाल्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीमध्यें मोठाले फरक झालेले होते. १६५८ मध्यें एवढ्या अप्रतिहत शौर्यानें व चिकाटीनें जो मुलुख त्यांनीं जिंकला होता तोच मुलुख १७९६ मध्यें त्यांच्यांतील कमकुवतपणामुळें व भ्याडपणामुळें त्यांच्या हातून भराभर नाहींसा झाला. इंग्लिशांचा सिलोनशीं संबंध १७६३ मध्यें प्रथम आला; त्यासालीं मद्रासेहून क्यांडीच्या राजाकडे एक वकीलमंडळ पाठविण्यांत आलें होतें; पण त्यावेळीं त्याचा कांहींच परिणाम झाला नाहीं. पुढें १७९५ मध्यें ग्रेटब्रिटन व हालंड यांच्यामध्यें खटका उडाला तेव्हां सिलोनांतील डच मुलखावर सैन्य पाठविण्यांत आलें. त्यावेळीं डच लोकांनीं इतका क्षुल्लक प्रतिकार केला कीं, एका वर्षांतच डचांचे सर्व किल्ले इंग्लिश सेनापतीच्या हातीं पडले.

सिलोनमध्यें पोर्तुगीज व डच यांच्या अंमलापासून जे टिकाऊ परिणाम झाले त्यांचें सर इमर्सन टेनेटनें वर्णन केलेलें आहे तें असे :—

सिलोनमध्यें नेदर्लंडचें वर्चस्व व पोर्तुगालचें वर्चस्व बहुतेक सारखाच काळ म्हणजे १४० वर्षें होते. परंतु या दोन देशांच्या धोरणांचे सिंहली लोकांच्या स्वभावावर व संस्थांवर जे परिणाम झालेले आहेत ते मात्र फार भिन्न आहेत. उपयुक्ततेच्या बुद्धीनें हॉलंडनें तेथें जो रोमन-डच कायदा सुरू केला तो अद्यापहि वरिष्ठ न्यायकोर्टांतून चालू आहे;  आणि पोर्तुगीज लोकांच्या धर्मप्रसाराच्या वेडामुळें तेथें जो रोमन कॅथॉलिक धर्म सुरू झाला त्याचा कायमचा व वाढता परिणाम अद्याप दिसून येत आहे. हा कॅथॉलिक धर्म फ्रॅन्सिस्कन धर्मोपदेशकांनीं ज्या खेड्यांतून व प्रांतांतून सुरू केला तेथें तो अद्याप चांगल्या स्थितींत आहे; उलट हॉलंडनें आपलीं प्रॉटेस्टंट धर्ममतें आपल्या तटबंदी ठाण्यांच्या बाहेर पसरविलीं नाहींत, यामुळें आज तो धर्मपंथ बहुतेक लुप्‍त होऊन गेला आहे. फक्त कोलंबोमध्यें तत्पंथी थोडासा समाज असून तोहि दरदिवशीं कमी कमी होत आहे. डच भाषेचा कायद्याच्या जोरावर प्रसार करण्यांत आला होता, पण ती डच लोकांचे वंशजहि आज तेथें बोलत नाहींत; उलट प्रत्येक महत्त्वाच्या गांवांत खालच्या वर्गाच्या लोकांत अपभ्रष्ट पोर्तुगीज भाषा अद्यापहि चालू आहे. नेदर्लंडच्या व्यवहारदक्ष व लोभी सरकारनें फक्त आपल्या व्यापारी हिताच्या दृष्टीनें जरूर इतकेंच लक्ष तद्देशींयांच्या हिताकडे दिलें असल्यामुळें त्यांच्या अंमलाची आठवण सुखासमाधानें कोणीच आज काढीत नाहींत; उलट पोर्तुगीज लोक समानधर्मत्वानें तद्देशीयांशीं अगदीं एकजीव झाल्यामुळें त्यांच्या क्रूर कृत्यांपेक्षां, कांडियन लोकांबरोबरच्या झगड्यांमध्यें त्यांनीं प्रकट केलेल्या शौर्याबद्दल आणि वेढा पडलेल्या किल्ल्यांचें संरक्षण करण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनीं दाखविलेल्या साहसाबद्दल ते प्रयत्‍न निष्फळ झाले तरीहि तद्देशींयांनां अद्यापहि एक प्रकारचें कौतुक वाटत आहे. सखल प्रदेशांतील सिंहली लोक डच व त्यांचा कारभार यांची आठवणहि बहुतेक विसरून गेलेले आहेत. उलट दक्षिणेकडील व पश्चिमेकडील मुलुखांतल्या सरदारांनीं मोठ्या अभिमानानें त्यांच्या पहिल्या यूरोपीय नेत्यांनीं त्यांनां दिलेली डॉन ही बहुमानास्पद पदवी अद्यापि चालू ठेविलेली आहे व आपल्या प्राचीन नांवांपूर्वीं पोर्तुगीज लोकांतील कर्णमधुर ख्रिस्ती नांवेंहि ते जोडीत असतात.

ज्या ब्रिटीश फौजेनें सिलोन बेट प्रथम जिंकून घेतलें ती फौज ईस्टइंडिया कंपनीची होती व म्हणूनच सिलोनचा कारभार प्रथम कंपनीकडे असून तो मद्रासहून चालत असे. परंतु मद्रासकडील जमीनमहसूलपद्धत तिकडे सुरू केल्यामुळें व बरेच मलबारी कलेक्टर तिकडे नेमल्यामुळें तेथें असंतोष माजला व शेवटीं बंड झालें; त्यामुळें १७९८ मध्यें तें बेट खुद्द ब्रिटिश बादशाही अंमलाखालीं घेण्यांत आलें. १८०३ मध्यें आमीन्सच्या तहानें या बेटांतील डच मुलुखाचा कायदेशीर ताबा ग्रेटब्रिटनला देऊन अंतर्राष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीनें ग्रेटब्रिटनच्या सिलोनमधील अधिकारांत जे वैगुण्य होतें तें दूर केलें. कांहीं काळपावेतों ब्रिटिश सत्ता फक्त किनार्‍याच्या प्रदेशांतच चालत होती. मध्यभागांतला डोंगराळ प्रदेश दुर्गम अरण्यांनीं व उभ्या पर्वताच्या रांगांनीं व्याप्‍त होता व तो सिंहली घराण्यांतला शेवटचा राजा श्रीविक्रमराजसिंह याच्या ताब्यांत होता. हा आपल्या प्रजेला यूरोपीय शेजार्‍यांशीं दळणवळण ठेवण्याला मुळींच उत्तेजन देत नसे. १८०३ मध्यें कांहीं किरकोळ कारणावरून कँडियन मुलखावर ब्रिटिशांनीं स्वारी केली, पण त्यांचा पराजय झाला. पुढें त्या राजाच्या क्रूरपणामुळें व छळामुळें लोकांत राजद्रोह माजला; राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल भयंकर शिक्षा देण्यांत आल्यामुळें लोकांचा क्रोध अनावर झाला, आणि या क्रोधामुळें १८१५ मध्यें आदिगार व इतर तद्देशीय सरदारानीं ब्रिटिशांनां बोलाविलें. या बोलावण्यावरून ब्रिटिश फौजेनें या राजावर चालून जाऊन कँडीनजीक त्याला कैद केलें. पुढें  हा राजा हद्दपार होऊन तो हद्दपारींतच मरण पावला. याप्रमाणें सिंहली राजघराण्यांतल्या शेवटल्या राजाचा अंत झाला. हें घराणे दोन हजार वर्षांवर सिलोनमध्यें राज्य करीत होतें.

१८१५ मार्च २ रोजीं कँडियन सरदारांशीं एक तह करण्यांत आला. त्याअन्वयें त्या बेटाची संपूर्ण सत्ता ब्रिटिशांच्या हांतात आली; व ब्रिटिशांकडून लोकांनां धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य कायम राखण्याबद्दलची हमी देण्यांत आली. बौद्ध संप्रदायाच्या बाबतींत बिलकुल हात घालणार नाहीं; त्यांतील धार्मिक हक्क, उपदेशक वर्ग व देवालयें यांचें संरक्षण करूं; देशांत पूर्वींचे कायदेकानू चालू ठेवून त्यांची पूर्वापार पद्धतीनेंच अम्मलबजावणी करूं; तसेंच राज्यकारभार चालविण्याकरतां पूर्वींप्रमाणेंच जमीनमहसूल व इतर कर वसूल करूं, असें याच वेळीं जाहीर करण्यांत आलें. पुढें १८१७ मध्यें अन्तर्भागांत एक मोठें बंड झालें, हें एक वर्षानें मोडण्यांत आलें. १८४३ मध्यें एक व १८४८ मध्यें एक अशीं दोन किरकोळ बंडें झालीं, तीं दोन्हीं सहज मोडून टाकण्यांत आलीं. हे अपवाद वगळतां सिंहली राजाला काढून लावल्यापासून सिलोन येथील राजकीय वातावरण अगदीं प्रशांत राहिलेलें आहे. असो.

येथें सिंहलाच्या इतिहासाची रजा घेऊन त्याच्या वाङ्‌मयाकडे नजर फेंकूं आणि सिंहलीं वाङ्‌मयाचें अवलोकन झाल्यावर सिंहली भाषेचा व तिच्या विकासाचा परिचय करून घेऊं.