अंतरंग परिचय


लेखांचे वर्गीकरण 
- शरीरखंडातील अनेक विषयांपैकीं सुमारें पांचशें विषय या विभागांत प्रसिद्ध होत आहेत. त्यांचें शास्त्रवार वर्गीकरण केल्यास असें दिसून येईल कीं, हा भाग बर्‍याच शास्त्रांचें व अनेक भागांचें आणि त्यांच्या सांस्कृतिक व राजकीय इतिहासाचें विवेचन करणारा आहे.

प्रथमत: हिंदुस्थानांचा इतिहास विचारांत घेतां असें दिसून येईल कीं त्याचा बराचसा भाग या विभागांत आला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाचे भाग म्हणजे वैदिक संस्कृति, सूतसंस्कृति, बौद्धजैनप्रामुख्य काल, प्राचीन ऐतिहासिक काल, म्हणजे. शैशुनागांपासून मुसुलमानी स्वारीपर्यंतचा काल, मुसुलमानी अमदानी, मराठ्यांचें वर्चस्व, असे अनेक काल पडतील. यापैकीं बहुतेक कालांवर या विभागांत लेख आहेत.

यांतील वैदिक संस्कृतिकालाविषयीं पाहातां, वैदिक वाङ्‌मयांपैकीं अथर्ववेदावरील लेख एकदम नजरेपुढें येईल. वैदिकधर्माविषयीचे म्हणजे, प्राचीन श्रौतस्मार्तधर्मावरील, लेख म्हणजे अग्निष्टोम, अघमर्षण अत्यग्निष्टोम हे होत. हे सर्व लेख “वेदविद्या” विभागाचे पूरक म्हणतां येतील.

सूतसंस्कृतिविषयक माहिती द्यावयाची म्हणजे पुराणें हें साहित्य समजून त्याचा अभ्यास द्यावयाचा. पौराणिक विषयाच्या अभ्यासासाठीं अग्निपुराण या संग्रहात्मक ग्रंथावरील मोठा व पृथक्करणात्मक लेख या भागांत आलाच आहे, आणि पौराणिक व्यक्तींपैकीं अनेक  व्यक्ती आल्या आहेत. यांपैकीं मंत्रसंस्कृतीच्या पूर्वींच्या कोणत्या व नंतरच्या कोणच्या हें विवेचन यांत प्रत्येक प्रसंगीं केलेलें नाहीं. कुरुयुद्धकालीन आणि त्यापूर्वींच्या व्यक्ति कोणत्या, आणि निव्वळ काल्पनिक कोणत्या, हें चरित्रस्वरुपावरुन उघड होत असल्यामुळें तद्विषयक विवेचनहि दिलेलें नाहीं.  अक्रूर, अघासुर, अनिरूद्ध या कृष्णचरित्राची आठवण देणार्‍या व्यक्ती, अत्रि, अनसूया, अगस्त्य, अरुंधती हे ऋषी व ऋषिपत्‍नी, देवजननी अदिति, व महाभारतांतील प्रसिद्ध वीर अर्जुन व त्याचा पुत्र अभिमन्यु यांची माहिती या विभागांत मिळेल. ज्या किरकोळ पौराणिक व्यक्तींनां यांत स्थान मिळालें आहे, त्या- अकंपन, अकृतव्रण, अग्निमित्र, अग्निवेश्य, अघमर्षण, अचल,  अज, अजामिळ, अजीगर्त, आणिमांडव्य, अतिकाय, अद्रिका, अधिरथ, अनरण्य, अनळ, अनु, अनुमति, अनुविंद, अनुशाल्व, अमर्षण, अमावसू, अरणीसुत व अरुण, या होत. आपल्याकडील “अप्सरां”  विषयी विवेचन करतांना इतरत्र आढळणार्‍या तत्सदृश कल्पनाहि मांडल्या आहेत.

बौद्धजैनप्रामुख्यकाल हा राजकीय इतिहासांतील नसून सांस्कृतीक इतिहासांतील काल आहे. यांचे विवेचन द्यावयाचें म्हणजे मुख्यत्वेंकरुन ग्रंथकार आणि विचारसंप्रदाय आणि त्यांच्या शाखा व उपशाखा हीं द्यावयाचीं असें असल्यामुळें या कालाविषयींचे लेख पुढें वाङ्‌मयात्मक लेखांचे वर्गिकरण करतांनां बौद्ध जैन ग्रंथकार देऊन व्यक्त केले आहेत.

बुद्धकालीन अजातशत्रु हा शैशुनाग घराण्यांतील मगधराजा यांत दिसेल. प्राचीन हिंदु घराण्यांपैकीं चालुक्य वंशातील अक्कादेवी व अजयपाल यांची चरित्रे, कलिंग देशाचा अनंगभीम, पंजाबांतील मुसुलमानांच्या स्वारीस प्रथमच तोंड देणारा प्रसिद्ध अनंगपाल, यांच्या आणि कोंकणच्या इतिहासांतील पहिला व दुसरा अपरादित्य यांच्या कारकीर्दीं यांत आलेल्या आहेत. राष्ट्रकूट घराण्याशीं परिचय राजा अमोघवर्ष याचें चरित्र करुन देईल. दक्षिणेकडील पांड्यचेरचोलांविषयी या विभागांत कांही स्थानविषयक लेखांतील तुरळक उल्लेखांशिवाय दुसरें कांहीं आलें नाहीं.

रजपूत राजांपैकीं कांही राजे या विभागांत चरित्राचे विषय झालेले आहेत ते अजयसिंग, अनंगपाल, अभयसिंह, अमरसिंह व अरसीसिंह हें होत. स्वातंत्र्यप्रिय रजपुतांचे मुसुलमानांशीं झालेले झगडे त्यांच्या चरित्रांवरुन ज्ञात होतात.

सूर्य, चंद्र, यदु, नाग व अग्नि या क्षत्रिय वंशांपैकी अग्निकुळाच्या उत्पत्तीसंबंधाचा वादविवाद अग्निकुल या लेखांत पहावयास मिळेल.

मुसुलमानी इतिहासाकडे दृष्टि फेंकल्यास, मोगल घराण्यांपूर्वीचा इतिहास यांत आलेला नाहीं असें दिसेल. मोगल घराण्यांतील महापराक्रमी बादशहा अकबर, व त्याचे सहकारी अबुल फजल व फैजी, त्याचा एक मुख्य प्रधान अबदुल रहिमखान, तसेंच जिचें अकबराशीं नाते काय होतें हें निश्चित झालें नाही पण जिवा शेवट वाईट झाला अशी सुंदरी अनार्कली, जहांगिराविरुद्ध खुश्रूला सहाय्य करणारा सरदार अबदुल रहिमखान या सर्वांस या विभागांत स्थान मिळालें आहे. या घराण्याच्या उत्तरकालीन इतिहासांत चमकलेल्या पुरुषांपैकी सय्यद बंधूंचा बाप अबदल्लाखान याचें चरित्र आलेलें आहे. या राज्याचीं जीं शकलें पुढे पडली त्यांच्या इतिहासापैकीं अयोध्येचा सरदार अबुतालिब खान, आणि कर्नाटकचा नबाब अनवरुद्दिनखान हे या विभागांत विषयीभूत झालेले दिसतील. बहामनी राज्याचा इतिहास यांत दृष्ट नाहीं. तथापि आदिलशाहीचा सरदार शिवशत्रु अफजलखान यांत आला आहे, व कुतुबशाहीचे म्हणजे गोंवळकोंडा राज्याचे अबदुल्ला कुतुबशहा, अबुहसन कुतुबशहा आणि शिवकालीन दिवाण अक्कण्णा यांची चरित्रें यांत आहेत. टोंक संस्थानाचा संस्थापक अमीरखान पठाण याचेंहि चरित्र यांत आहे.

मराठ्यांच्या इतिहासाची वांटणी - ज्ञानकोशांत मराठ्यांच्या इतिहासासंबंधी माहिती पहावयाची झाली तर महाराष्ट्र किंवा मराठेशाही असा एखादा लेख काढून पाहिला म्हणजे झालें असें नाहीं. ज्ञानकोशांत मराठ्यांचा इतिहास एका लेखांत एकत्र पहावयास मिळेल हें खरें; तथापि मराठ्यांच्या इतिहासासंबंधी  ज्ञानकोशांत भरपूर व सर्वांगी माहिती आली आहे व ती अनेक ठिकाणीं पहावी लागेल. एकंदर मराठ्यांच्या इतिहासाची वांटणी जवळ जवळ सर्व ज्ञानकोशभर सारखी झाली आहे. या विस्ताराची कांही अंशी कल्पना एका सहाव्या विभागांत विखुरलेल्या माहितीचें पर्यालोचन केलें तरी येण्यासारखी आहे.  

प्रथमतः हें उघड आहे कीं, शिदें, होळकर, गायकवाड वगैरे मराठे सरदारांची जीं लहानमोठी संस्थानें आज अस्तित्वांत आहेत त्यांच्या इतिहासाबद्दलची जिज्ञासा मराठ्यांच्या सामान्य इतिहासांत त्यांचे जे प्रसंगोपात्त उल्लेख येतील ते कितीहि विस्तृत असले तरी त्यांयोगे तृप्‍त होणें शक्य नाहीं म्हणून त्या संस्थानांवर लेख येतील. (गायकवाड, धार वगैरे पहा). अशा संस्थानांपैकी एका अक्कलकोट संस्थानचा इतिहास या विभागांत आला आहे.

याशिवाय मराठ्यांच्या इतिहासाला अंगभूत होऊन बसलेला जवळ जवळ तितक्याच महत्त्वाचा परंतु त्याहून कित्येक पटींने मोठा असा दुसरा वर्ग म्हटला म्हणजे महाराष्ट्रीय ऐतिहासीक पुरुषांचा होय. या वर्गापैकीं अण्णाजी दत्तो, अनूबाई घोरपडे, अमृतराव, अय्याशास्त्री, अक्कण्णा इतक्या व्यक्ती या विभागात आलेल्या आहेत. त्यांतील अनुबाई  सारख्या व्यक्तींनीं स्वत:स आपल्या संस्थानाशीं इतकें एकजीव करुन घेतलेलें दिसतें कीं, त्यांचे चरित्र म्हणजे कांही काळापुरता त्यांच्या संस्थानाच इतिहासच होतो. तथापि त्यांच्या संबंधी बरीच माहिती व त्यांचे बरेच व्यवहार असे असतात कीं, ते त्याच्या संस्थानाच्या इतिहासांत घातले असतां विषयांतरासारखे भासतात; परंतु त्यांच्या शिवाय त्या व्यक्तींच्या स्वभावाचा नीट परिचय वाचकांस होऊं शकत नाहीं, इतकेंच नाहीं तर ते त्यांच्या संस्थानांच्या इतिहासावरहि बोधप्रद प्रकाश पाडतात. यामुळें ते वैयक्तिक वृत्तांतहि महत्त्वाचे आहेत.

महाराष्ट्रीय पुरुषांइतकाच नसला तरी कित्येक वेळां बर्‍याच मोठ्या प्रमाणांत महाराष्ट्रीयेतर व्यक्तींचाहि मराठ्यांच्या इतिहासाशीं संबंध येतो. या सदरांत प्रस्तुत विभागांतील अफजलखान, अबूहसन, कुतुबशहा, अमीरखान या मुसुलमान, व अमरसिंह दुसरा व अरसीसिंह या रजपूत, व्यक्तींवरील लेख सांपडतील. या लेखांत त्या व्यक्तींचा जेथें जेंथें मराठ्यांच्या इतिहासाशीं संबंध येतो तेथील माहिती शक्य तितकी विस्तारपूर्वक दिलेली आढळेल.  अफजलखान लेखांतील त्याच्या वधासंबंधी माहिती शिवाजी या लेखांत, किंवा अरसीसिंह या लेखांतील उदेपूरच्या वेढ्यासंबंधी माहिती महादजी शिदें या लेखांत दिली असती तर सध्याच्यापेक्षां फारच थोड्या जागेंत घालावी लागली असती.

अजाहुत सर देशमुख, अमात्य व अमीन हे या विभागांतील लेख मराठ्यांच्या राज्ययंत्रांतील अधिकारीवर्गासंबंधाच्या माहितीच्या दृष्टीनें महत्त्वाचे आहेत. वर सांगितलेल्या तीन वर्गांतील लेखांत त्यांच्याविषयीं माहिती केवळ उल्लेखमात्रच आली तर येऊं शकेल. पण या विषयांतील स्वतंत्र लेख त्यांच्या अधिकारक्षेत्राची वास्तविक कल्पना करुन देऊन मराठ्यांच्या राज्ययंत्रांतील लहानमोठ्या चक्रांचें स्वरुप त्यांचा परस्परांशी संबंध व त्यांची बलाबलता स्पष्ट करण्यास उपयोगीं पडतील.

मराठ्यांच्या राजकीय इतिहासाइतकाच त्यांच्या संस्कृतीचा इतिहासहि महत्त्वाचा आहे व दुसर्‍याची माहिती झाल्याशिवाय पहिल्यांतील कित्येक गोष्टींचा नीट उलगडाहि होणार नाहीं. अठरा कारखाने, अठरा टोपकर, अबकारी व अबदागिरी हे मराठ्यांच्या संस्कृतीवर प्रकाश पाडणार्‍या लेखांपैकी आहेत. यांपैकी अबकारी लेखांतील माहिती संक्षिप्‍तरुपानें दुसरीकडे कोठें देता आली असती, परंतु बाकीच्या लेखांतील माहिती नुसत्या उल्लेखमात्रानेंहि इतर ठिकाणी घालणें जड गेंले असतें. उदाहरणार्थ अठरा टोपकरांसंबंधी माहिती इतरत्र कोठें व कशी घालणार ?  तथापि तिजवरुन तो शब्दसमुच्चय जेव्हां प्रचारांत होता तेव्हां मराठे लोकांस यूरोपांतील राष्ट्रांविषयी आपणांस वाटते त्याहुन किती तरी अधिक माहिती होती असें दिसून येतें.

उदयानंतर एक शतकाच्या आंतच मराठ्यांना साम्राज्यसत्तेची महत्वकांक्षा उत्पन्न झाल्यामुळें सत्ता नष्ट होण्यापूर्वीच्या शंभर वर्षांत त्यांचे महाराष्ट्रांत जितके झाले तितकेच महाराष्ट्राबाहेरहि व्यवहार झाले. या व्यवहारांच्या स्थानिक महत्त्वामुळें ते सविस्तर देण्याचें योग्य स्थान ज्या जिल्ह्यांत किंवा संस्थानांत ते घडून आले ते जिल्हे किंवा तीं संस्थानेंच होत. असे व्यवहार हिंदुस्थानच्या बर्‍याच विस्तृत भागांत झाले असल्यामुळें कित्येक जिल्ह्यांच्या इतिहासांत मराठ्यांचा संबंध आलेला आढळून येईल. केवळ याच विभागासंबंधी पाहिले तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रदेशांपैकी गुजराथेंतील अठ्ठाविशी, काठेवाडांतील अमरेळी, राजपुतान्यांतील अजमीर मेरवाड, बुंदेलखंडातील अजयगड संस्थान, संयुक्त प्रातांतील अकबराबाद व अयोध्या भाग आणि दक्षिणेकडील प्रदेशांपैकीं मद्रास इलाख्यांतील दक्षिण अर्काट व अनंतपूर जिल्हा; या लेखांत मराठ्यासंबंधी माहिती कमी अधिक प्रमाणांत अंतर्भूत झालेली आहे.

प्रदेशाप्रमाणेंच स्थूलविशेषांखालीं गेलेली मराठ्यांच्या इतिहासांसंबंधी माहितीहि हिंदुस्थानच्या विविध भागांत पसरलेली आहे. उदाहरणार्थ या विभागांतील खास महाराष्ट्रांतील अचला, अडावद, अनेवाडी व अकलुज आणि वर्‍हाडांतील अडगांव, अमडापूर, अमनेर, अकोला या गावांचा तर मराठ्यांच्या इतिहासाशीं संबंध आलेला आढळतोच पण उत्तरेकडील प्रदेशापैकीं गुजराथेंतील अर्जुनगड, माळव्यांतील अगर, राजपुन्यांतील अजमीर, बुदेलखंडांतील अजयगड आणि दक्षिणेकडील अनूप शहर व अकबरपूर, पूर्वेकडील प्रदेशापैकीं  निजामशाहींतील अमराबाद आणि दक्षिणेकडील प्रदेशापैकीं बेळगांव धारवड जिल्ह्यांतील अक्किवट, अथणी अण्णिगिरी, व मद्रास इलाख्यांतील अर्काट, अनंतपूर व अदवानी या सर्व गांवांच्या इतिहासांत मराठ्यांनी भाग घेतलेला आहे. या वर्गांतील माहिती दिसावयास पुष्कळ वेळां क्षुल्लक असली तरी इतिहासाच्या अभ्यासकास ती महत्त्वाची वाटल्याशिवाय राहणार नाहीं. उदाहरणार्थ अर्जुनगड या पहिल्याच गांवाखाली ‘१७२४ कार्तिक वद्य ८. अर्जुनगडवाल्यानीं खंडोमुकुंद कल्याणहून तेथें आल्यावर त्यास मांडवीस पोंचवावें, असा उल्लेख अवतरिला आहे. ही खंडोमुकुंद सरकारांतून बडोद्यास जात होते त्यांच्या मार्गाच्या विभागणीसंबंधी माहिती आहे हिच्यापैकीं कालविषयक भाग पेशवे व गायकवाड यांच्यामधील तत्कालीन संबंधाविषयीं इतर कागदपत्रावरुन  मिळणार्‍या माहितीस पुष्टि देणारा आहे: व दुसरा स्थलविषयक भाग पुण्याहून बडोद्यास जावयाचा तत्कालीन मार्ग व त्यावरील टप्पे दाखवितो म्हणून महत्त्वाचा आहे.

मराठ्यांच्या इतिहासासंबंधी माहिती किती विविध लेखांत गेली आहे या विभागांतील अरबस्तान व अटक नदी हीं कदा्चित सर्वांत चमत्कारिक उदाहरणें वाटतील. अरबस्तानाचा मराठ्यांच्या इतिहासाशी संबंध येतो तो मराठे अरबस्तानांत गेले म्हणून नव्हे तर अरब महाराष्ट्रीय संस्थानांत येऊन कित्येक वेळां राज्यक्रांत्या घडवून आणण्यास कारणीभूत झाले म्हणून.

एकच ऐतिहासीक प्रसंगाचा कधी कधी दोन लेखांशी निकट संबध येतो. तेथे कांही माहिती संक्षिप्‍तरुपानें पुनरुक्त होणें अपरिहार्य असलें तरी शक्य तोंपर्यत प्रत्येक लेखांत नवीन माहिती आढळल्याशिवाय राहणार नाही. या विविध पण विखुरलेल्या माहितीची संगति लावण्याचे काम सूचिविभागाचे आहे हे सांगावयास नकोच.

पारमार्थिक विषयांवरील मुख्य लेख वाङ्‌ममयविषयक लेखांचे कथन करतांना दिले आहेत, त्याशिवाय आणखी कांहीं लेख या भागांत आले आहेत. धर्मप्रचारक व साधुसंत या विभागांत कोणकोणते लेख आले आहेत हें पाहूं लागल्यास अतीश दीपंकर हा बौद्ध धर्मप्रचारक, अजित, अभयदेवसूरि, अमितगति व अमृतचंद्रसूरि यासारखे जैनर्षी, शीखांचा तिसरा गुरु अमरदास आणि एकदां जैनदीक्षा घेऊन पुन्हां शैवपंथात परत आलेला तामिळ   कवि अप्पर हे दिसतील. अकाली शीखांचा संप्रदाय, तसेंच  अघोरी बैराग्यांची माहिती यांत सांपडेल. गोसाव्यांचे अठरा अखाडे कोणते ते समजेल. धार्मिक विधींत अनंतव्रत व अनवलोभनसंस्कार केव्हां व कसा करितात तें यांत आहे. अन्नाचें धार्मिक स्वरुप यांत वर्णिलेलें आहे तें कित्येकांस मोठे महत्त्वाचें वाटेल, अमृताची कल्पना कशी आली हें त्या शब्दावरील लेखावरुन कळेल. पारमार्धिक विषयांचा संबंध वैचारिक इतिहासाशींहि येंतो. प्रस्तुत विभागांत आलेला वैचारिक इतिहास पुढें सविस्तर मांडला आहे.

यूरोपीयांचा हिंदुस्थानातील इतिहासांतील काहीं भाग आपणास अ‍ॅमहर्स्ट या गव्हर्नर जनरलच्या चरित्रांत आढळेल.

इंग्रजींतील अर्वाचीन थोर पुरुषांत सर शेषद्रिअय्यर, व सर तिरुवरुर मुथुस्वामी अय्यर या मुत्सद्दी पुरुषांचीं चरित्रें व नुकतेच दिवंगत झालेले वस्तुरीरंग अय्यंगार यांचे चरित्र पहावयास सांपडेल.  अगाखान उर्फ अगाखान या घराण्याचेंहि चरित्र यांत सांपडेल.

हिंदुस्थानीय भुगोल अभ्यासण्यासारखे या विभागांत बरेच लेख आहेत. हिंदुस्थानच्या प्रत्येक इलाख्यांतील कोणकोणती स्थळें समाविष्ट होतात हें पुढील मांडणीवरुन कळेल.

मुंबई इलाख्यांत चार विभाग आहेत ते महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ व सिंध हे होत. अकराणि- किल्ला व परगणा, अकलुज, अकोला (तालु.), अक्कलकोट (सं.) अखलकोप, अचला, अडावद, अतीत, अनेवाडी, अमळनेर व अर्जुनगड हीं महाराष्ट्रांतील स्थळें;  अकिवट, अगरखेड, अडूर, अण्णिगिरी, अथणी, अनवळ, अब्बिगेरा, अब्लूर, अमरगोल, अमीनगड व अमीनभावी हीं कर्नाटकातील; व अकलडिया, अगर, अजमेर, अठ्ठाविशीं, अडेसर, अढोई, अतरसुंबा, अथोर, अधेवाड, अनमदेश, अमरापुर, अमरेळी, आमाल, अमृतवेल, अरदोई, अरराई, अरसूर व अर्जुन सुख हीं गुजराथेंतील स्थळें या विभागांत आलेली आहेत. अरोरा हें सिंधमधील मोडकळीस आलेलें गांव यांत वर्णिले आहे.

मद्रास इलाख्यांतील पुढील स्थळें या विभागांत आलीं आहेत. अतूर, मराठ्यांचे राजकारण १८ वे शतकाच्या अखेरीस ज्यांत गुतूंन राहिलें होंते तो अदवानी तालुका व शहर, अदिचन्नलूर, अद्धनकी, अनकापल्ली, अनंतपूर (जि. विभा. तालु. व गांव), अनयमलय, अनयमुडी, विजयांनगरच्या साम्राज्याची आठवण देणारें अनागोंदी गांव अबिरामम्, अमरावती, अमलापूर, अम्मपत्तम, अय्याकोंडा अरंतांगी, अरवंत घांट, उत्तर-दक्षिण अकार्ट व अकार्ट शहर या इलाख्याच्या आसमंतांत असणारीं हैदराबाद म्हैसूर व त्रावणकोर हीं जी संस्थानें, आहेत त्यांतल्याहि काहीं स्थळांवर यांत लेख आहेत. अजंठा, आत्राफ-इ-बाल्डा अदिलाबाद (जिल्हा, तालु. व गांव) अमरचिंत व अमराबाद हीं हैद्राबाद संस्थानातील स्थळें येथें वर्णिली आहेत. अनंतपुर, अनेकुल, अरग, व अकीवती नदी याच्या वर्णनामुळें म्हैसुर संस्थानांसहि या भागाविरुद्ध तक्रारीस जागा नाहीं. गिरीशृंग अगस्त्यमले आणि अनंतशयन हें विष्णूचें स्थान हीं त्रावणकोर हद्दीतींल स्थळें वर्णिली आहेत.

वर्‍हाड मध्यप्रांत या इलाख्यात वर्‍हाड, मध्यप्रांत मराठी, व मध्यप्रांत-हिंदी, असे तीन भाग पडतात. खुद्द वर्‍हाडातलीं स्थळें म्हणजे अकोट, अकोला (जि. तालु. व गाव) अडंगांव, अडाण, अनसिंग, अमडापूर व अमनेर हीं होत. अडस, अड्याळ, अरपल्ली, अरहर-नवरगांव व अर्जुनी जमीनदारी हीं मराठी मध्यप्रातांतील व अन्दोनी अमदुल व अरंग ही हिंदी मध्यप्रातांतील स्थळें या विभागंत आलीं आहेत.

संयुक्त प्रातांतील पुरातनकालापासून आपल्या अतिपरिचयाचें यांत आलेलें स्थान म्हणजे अयोध्या होय. अकबरपुर दोन अकबराबाद, अछनेरा, अझमगड (जि, गांव) अत्रावळी, अनूपशहर (तह. गा.), अफजलगड, अमरोहा, अमवाखास व अमेयी हीं या इलाख्यांतील दुसरी स्थळें यात आढळतील.

अगर, अजमीर-मेरवाड, अजमीर अजयगड संस्थान व शहर, अनूपगड, अबूरोड, अमझेर, अमरकंटक, अमेट, अरवली, व अरा या मध्यहिंदुस्थानांतील स्थळांपैकी अजमीर अबु व अरवली पर्वत हींच कायतीं आपल्या विशेष परिचयाचीं वाटतात.

पंजाबांतील स्थळांत अकालगड, अक्रा, अग्रोर, अग्रोहा. राघोभरार्‍याने जेथपर्यंत आपले घोडे नेले तो अटक जिल्हा व नदी, अतारी, अनाहगड दोन, अ‍ॅबट या इंग्रज अधिकार्‍याच्या नांवावरुन ज्यांचे नांव पडलें तो अबट्टाबाद तहशील व शहर, अबाझई, अमरगड, अमलोह व पंजाबप्रकणापासून ज्यानें आजच्या हिंदस्थानाचें लक्ष ओढले आहे असें शीखाचें मुख्य स्थान अमृतसर हीं दिसून येतील.

बंगाल प्रातांतील ‘अने’ आरंभ होणारीं यांत आलेली गांवें म्हणजे अका, अगरतला, अझीमगंज, अथमालिक अफसर, अमानी गंज, अमृतबझारपत्रिकेवरुन प्रसिद्धीस आलेलें अमृत बाजार, अरराज, अरा किंवा आरा आणि अरारिया.

अथगड हें एकच बिहार मधील गांव यांत दिसेल.

आसाम व ब्रह्मदेश या हिदुस्थानच्या पूर्वकडील टोकांशी असणार्‍या प्रांतांतील, अइ नदी, अइजल, अकियाव, अजमीरीगंज, अन, अमरपूर व १८२६ त इंग्रज सरकारकडे आलेला अ‍ॅमहर्स्ट जिल्हा हीं स्थळें येथे वर्णिली आहेत.

हिंदुस्थानासमीप असलेल्या सिंहलद्वीपांतील अनुराधपूर प्राचीन बौद्धसंस्कृतीच्या अवशेषांसंबंधी प्रख्यात आहे, तें आणि दक्षिण कानडास जोडलेली अमिनदीविबेटें या विभागांत आढळतील.

आशियाखंडावरचे लेख पाहूं जाता आपला शेजारी देश जो अफगाणिस्तान त्यावर एक अत्यंत व्यापक आणि आजतागाईत लेख आपणास दिसेल. याशिवाय अफगाणिस्तान व तर्कस्तान या मोठाल्या देशाचा काहींसा इतिहास तेथील बादशहाच्या चरित्रातून आढळणार आहे. इंग्रजाचा दोस्त अफगाणचा अमीर अबदुल रहमानखान, व त्याचा चुलत भाऊ पण शत्रु अयुबखान याची चरित्रे या विभागात येऊन गेलीं आहेत.

तुर्कस्तानचे सुलतान अबदुल अझीझ, अबदुल मजिद, व अबदुल हमीद यानाहि स्थळ मिळाले आहे. अरबस्तानावरील लेख सविस्तर आहे आणि महायुद्धानंतरच्या घडामोडी त्यात वर्णिलेल्या आढळतील. प्राचीन अरबस्तानचा इतिहास आणि महंमद पैगंबराचा कौटुंबिक इतिहास त्याचे आईबाप अमीना अबदुल्ला, व सासरा अबूबकर सिद्दिक यांच्या या विभागांत आलेल्या चरित्रावरुन थोडाबहूत परिचित होईल. या खंडातील काहीं इराणी व अरबी ग्रंथकार वाङ्‌मयाच्या मोठ्या सदरात आढळतीलच.

अकिमिनियन हें प्राचीन इराणी राजघराणें व अनाहित आणि अमेशस्पेत या झरथुष्ट्री देवता याच्या माहितीवरुन प्राचीन इराणी संस्कृतीची काहीं कल्पना येईल.

इस्त्रायलाचा पूर्वज अब्राहाम यावर निराळा लेख सांपडेल.

आशियातील लहान राष्ट्रकावर, प्रांतावर आणि शहरांवर लेख बरेच आले आहेत. १९१७ मध्यें अस्तित्वात आलेलें अझरबैजनचे लोकराज्य यात समाविष्ट केलेलें दिसेल. अक्चा, अडोवा, अदाना, अदाबझार, अपामिया, अफगाणतुर्कस्तान, अब-इ-इस्ताद, अब्बासिबंदर, अमॉय, अमूदर्या नदी, अयुथिया. अरबीसमुद्र, अरबोला, अर्झरुम विलायत, व अर्झिजन या पश्चिम आशियामधील महत्वांच्या स्थानांवरहि लेख आहेत. अनाटोलियावर लेख आशिया मायनरवरील लेखांत अंतर्भूत केला आहे.

यूरोपखंड - आशिया व यूरोप यांचा संबंध जोडणारे स्पेन मधील उमईद घराण्याचे “ अबदुल रहमान” नांवाचे खलिफ यांची माहिती त्या लेखांत दिलेली आहे. यूरोपीय भौगोलिक लेखांत अटलांटिक महासागर अझोव्हचा समुद्र; स्कॉटलंडमधील प्रसिद्ध अबरडीन शहर व हॉलंडची राजधानी अ‍ॅम्स्टरडॅम;  यूरोपमधील तुर्कस्थानांतील प्रख्यात अ‍ॅड्रियानोपल व किरकोळ स्थळें म्हणजे अ‍ॅक्टन, अग्रिजेंटम, अझारा, अझोव्ह, अटीना, अड्रा, अड्रिया, अपेना, अबिंग्डन, अबेव्हील, अरेटियम व अर्डिया हीं सांपडतील.

यूरोपच्या प्राचीन संस्कृतीशीं परिचय करुन घेतांना पौराणिक ग्रीक व्यक्ती, वैचारिक पंथ आणि प्राचीन अवशेष ही माहिती पाहिजे. या विभागांतले अकिलिस व अडोनिस हे पुरुष, अमेझॉन हा वीरस्त्रियांचा वर्ग, अकाडमी पंथ व अकालारेन्शिया, अकियन, अक्टियम, अथेन्स, अपोलोनिया, आणि अर्गास हीं स्थळें त्या इतिहासाचा एक भाग डोळ्यांसमोर आणतील.

ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार यूरोपात होऊन त्यास तेथें निराळें वळण लागलें त्या वाढीचा इतिहास बराच मनोरंजक आहे. त्यापैकी फारच थोडा भाग येथे आला आहे.

अ‍ॅबट, अ‍ॅबेस, व अ‍ॅब्राहामाईट या ख्रिस्ती संप्रदायांतील धार्मिक संस्था यांत वर्णिलेल्या आहेत. 

आफ्रिका - आफ्रिकेची माहिती या भागांत थोडीच आहे. मुसलमानी, प्राचीन ख्रिस्ती आणि, अर्वाचीन युरोपियन या तीन संस्कृति आफ्रिकेंत आहेत. तिहींकडेहि लक्ष ओढणारे लेख या भागांत आहेत. अल्जीरियाचा अमीर अबदुल कादिर व प्रसिद्ध इजिप्शियन देशभक्त अरबीपाशा यांची त्रोटक चरित्रें दिलेलीं दिसतील. अबिसिनीया या प्रांतांचा इतिहास व भूगोल व आज तागाईत सर्व माहिती, तसेंच त्यांची राजधानी अडीस अबाबा, हीं येथें वर्णिली आहेत. अबिसीनिया हें प्राचीन ख्रिस्त संस्कृतीचा परिणाम झालेलें आफ्रिकन राष्ट्र होय. अक्रा, अझोर्स, अडोवा, अड्रार, अन्नोबान, अबूकीर, अबेअफूटा, अबोमे व अम्हास यांची वर्णनें या विभागांत आहेत.

अमेरिकेच्या म्हणजे खंडाच्या सर्वसामान्य स्वरुपावर एक लेख लिहिलेला आहे. संयुक्त संस्थानाचे दुसरे व सहावे अध्यक्ष अडाम्स आणि अडाम्स जॉन क्विनी यांची चरित्रे, अमेरिकेची व हिंदु रहिवाश्यांची सामान्य माहिती, संयुक्त संस्थानांतील अटलांटिक सिटी, अडीरानडॉक्स व अड्रियन हीं स्थळें वर्णिली आहेत. अर्जेंटिना या लोकसत्ताक राज्याचा सविस्तर इतिहास यांत येऊन गेला आहे. अमेरिकेंतील इतर भागांतील मजकूर फार थोडा आहे तो म्हटला म्हणजे चिली देशातील प्रांत अकाकांग्वा, कानडातील अकाडी, व मेक्सिकोंतील बंदर अकापुलको, या स्थळांची वर्णनें हा होय.

आस्ट्रेलेशियासंबंधीं बहुतेक माहिती आस्ट्रेलिया आणि आस्ट्रेलेशिया यांमध्ये येईल. या विभागांत फक्त दक्षिण आस्ट्रेलियाची राजधानी अडीलेड, अडेल्सबर्ग व  अ‍ॅडमिरॅलिटी बेटे यांवर लेख आलेले आहेत.

प्राचीन जग - प्राचीन स्थळांच्या आधुनिक अवशेषावरुन प्राचीन इतिहास व संस्कृति याचें चांगले साधार ज्ञान होतें.  म्हणून अशा स्थळांची माहिती या विभागांत परिश्रमपूर्वक गोविलेली आहे. प्राचीन ग्रीक स्थळांपैकीं कोणकोणतीं यांत आली आहेत हें यूरोपखंडाविषयी लिहितांना दिलेच आहे. अक्कड, अझोटस व अना हीं स्थळें असुरीबाबिलोनी संस्कृतिकाळांतील, तर अबिडॉस व अबूसेबेल हीं मिसरी देशातील, तसेच अटालिया, अनाझरबस अबिडॉस व अबिला हीं तुर्कस्थानांतील आणि अरेटियम हें इटलीमधील प्राचीन शहर आहे. ख्रिस्ती व यहुदी संप्रदायांचे उगमस्थान जें पॅलेस्टाईन, त्याचा अत्यंत प्राचीन इतिहास अ‍ॅडॅलम, अबाना-फारपर व, इश्तारच्या संप्रदायाचे मुख्य ठिकाण अरबेला, या लेखांवरुन कळेल.

भारतात प्राचीन काळी अग्निशिर, अनूपदेश, अपरांतक व अभिसार हे देश असल्याचा इतिहासपुराणांतरी ऊल्लेख आढळतो. अनुराधनुर, अभयगिरी व अमरावती या ठिकाणी बौद्धसंस्कृतीचे अवशेष आढळतात. या उपयुक्त सर्व स्थलांतर यांत लेख आहेत. प्राचीन गुजराथच्या इतिहासांत अनहिलवाड प्रामुख्यानें आलेलें आहे. तें स्थळ देखील या विभागांत वर्णिलें आहे.

आतां वाङ्‌मयक्षेत्राकडे अवलोकन करुं. संस्कृत वाङ्‌मयांतील वैदिक आणि पौराणिक वाङ्‌मयांपैकीं अथर्ववेद आणि अग्निपुराण हीं यांत वर्णिलेली आहेत हे मागेंच सांगितलें आहे. अत्यंत महत्त्वाचा कोश ग्रंथ जो अमरकोश त्याला या विभागांत स्थान मिळालें आहे, तसेंच अमरुशतक हें शृंगारिक काव्यहि लेखविषय झालें आहे. तसेंच अतिरात्रयज्विन्, अनंगहर्ष, अनंत, अनंतदेव, अनंतराम, प्रसिद्ध वैय्याकरण अप्पया दीक्षित, नाटककार अप्पाशास्त्री, अभिनंद, अभिनवकालिदास, अभिनवगुप्‍त. शंकराचार्यांचा प्रतिस्पर्धी अभिनवगुप्ताचार्य, अभिनवबाण, अमरसिंह, दोन अमलानंद, अम्माल आचार्य व अरुण गिरिनाथ डिंडिभ या संस्कृत ग्रंथकारांची चरित्रें या विभागांत आलीं आहेत.

संस्कृत शास्त्रीय वाङ्‌मयापैकीं अर्कप्रकाशाचा येथें फार थोडक्यांत उल्लेख केला आहे.

जैनग्रंथकारापैकीं अमरचंद्र, अमरकोशकार अमरसिंह, अमरप्रभसूरी, अमितगति अमृतचंद्रसूरी व अरिसिंह यांस या विभागांत स्थान मिळालें आहे.

बौद्धवाङ्‌मयापैकीं अपदान व अभिधम्म या वाङ्‌मयशाखा व अनागतवंश, अभिधम्मत्थसंग्रह व अभिधर्मकोश हे पाली ग्रंथ या विभागांत येऊन गेले आहेत.

मराठी वाङ्‌मयापैकीं अभंग या महत्त्वाच्या पद्यशाखेवर एक विस्तृत लेख या विभागांत आला आहे, व अनंतफंदी हा प्रसिद्ध लावण्या व फटके रचणारा पेशवाईंतील कवि व प्रसिद्ध कटावकार अमृतराय, तसेंच अच्युताश्रम, अच्युताश्रमशिष्य, अतीतानंद, अद्वैतानंद, पाच अनंत, तीन अनंतसुत व अनंत बडवे या संतकवींचीं चरित्रें तत्कालीन काव्यांची ओळख करुन देतील.

अनाथ व अमरसिंह या हिंदी, अप्पर या तामिळ व अथर्वणाचार्य व अय्यल राझूराम या तेंलगू कवींचीं चरित्रें वाचकांचा त्या वाङ्‌मयक्षेत्राशीं परिचय करुन देतील.

फारसी व अरबी कवींनांहि या विभागांत बरीच जागा मिळाली आहे, भारतीय फारसी कवीत आपणांस चार अबदुल अझीझ, दोन अबदुल करीम, तीन अबदुल गफूर, अबदुल जलिज, अबदुल हक्क, अबदि, आपल्या परिचयाचे अकबराचे मित्र अबुल फजल व फैझी, अयीन उद्दिन व अयीन उलमुल्क हे आढळतात. अबदुल लतीफ, अबदुल कादिर जिलानी, अबदुल्ला बिन अली, अबदुल आला, अबुल फराज व अबुलफिदा हे अरबीवाङ्‌मयाचे प्रतिनिधी यांत आले आहेत.

इराणांतील फारसी कवीपैकीं अत्तार, अनवरी व अबू तालिब कलिम या कवींस या विभागांत स्थान मिळालें आहे;

इंग्रजी ग्रंथकारांपैकी अ‍ॅडिसन व अमेरिकन ग्रंथकारापैकी अ‍ॅबट लायमन व अ‍ॅडलर या ग्रंथकारांचीं चरित्रें या विभागांत अंतर्भूत झाली आहेत.

शास्त्रीय - या दुसर्‍या मोठ्या वर्गात सर्व भौतिक शास्त्रें त्या शास्त्रांतील संशोधक व महत्त्वाच्या सिद्धान्तावरील लेख अन्तर्भूत होतात. त्यापैकी रसाय़नशास्त्रातील औपपत्तिक, विशिष्टपदार्थबोधक व व्यावहारिक या अंगापैकीं अणु, अम्लशास्त्र उर्फ आसिडाचें शास्त्र, हे औपपत्तिक लेख या विभागांत आले असून अजीवसंयुक्तपदार्थ, अमिनें, (अमाइन्स), व अमिदिनें (अमेडाइन्स) हे विशिष्ट शाखातील लेख आहेत, तसेच अचेष्ट, (अर्गान) अनूप (मार्श वायू) हे विशिष्ट वायू, व अमिल नत्रायत, अमिल अल्कहल, अरुंतूद (अक्रिडाइन) हे विशिष्ट पदार्थ लेखविषय झाले आहेत. अजमोदल (थायमॉल), अर्क, अभ्रक हे व्यावहारिक रसायनशास्त्राच्या क्षेत्रांतील लेखहि या भागांत आले आहेत.

पदार्थविज्ञानशास्त्रातील उष्णता, प्रकाश, ध्वनि विद्युत चुंबकत्व, इत्यादि सर्व विषयबोधक शब्द अच्या बाहेर पडत असल्यामुळें हें शास्त्र येथें फारसें आलें नाहीं. तथापि औपपत्तिक भागापैकी व अलीकडे प्रस्थापित झालेल्या इलेक्ट्रॉन अथवा अतिपरमाणुविद्युत्कण सिद्धान्तावरील लेख या भागांत आला आहे. याखेरीज अभिसरण या क्रियेवर व अग्निमापक या यंत्रावरहि लेख या विभागांत आले आहेत. त्याप्रमाणेंच अम्प्पियर व अरागो हे प्रसिद्ध पदार्थविज्ञानशास्त्री यांत चरित्रविषय झाले आहेत.

वैद्यकशास्त्रीय लेखासंबंधी मुख्य गोष्ट प्रथम ही सांगितली पाहिजे कीं या शास्त्राची या भागांत स्थिती पदार्थ विज्ञानासारखीच आहे. शारीरशास्त्र, इंद्रियविज्ञान यासारखीं सहायक शास्त्रें, किंवा तदंतर्गत कान, डोळा, हात, पाय, त्वचा, रक्त, जननपद्धति यांसारखे विषय हे सर्व या अक्षरांत येत नसल्यामुळें वैद्यक शास्त्रज्ञांस आपले लेख यांत नाहींत असे वाटेल.  तथापि त्यांसहि यांत कांही नवीनपणा दिसून आल्याखेरीज राहणार नाहीं. पाश्चात्त्य व आयुर्वेदीय या दोन्ही पद्धतीनींहि रोगांचें निदान व चिकित्सा कशी करतात त्याचे सानिध्यानें पण पृथक्पणें विवेचन केले आहे. वैद्यकशास्त्राच्या शाखेपैकी आहारशास्त्राचा ‘अन्न’ या लेखांत या भागांत अंतर्भाव झाला आहे. तसेंच अरुचि व अपचन हे लक्षणात्मक रोग व अग्निमाद्य, अतिसार, अम्लपित्त, अपस्मार, अपीनस हे दोन्हीहि वेद्यकपद्धतीस परिचित असे रोग व अ‍ॅडिसनचा हा पाश्चात्त्य पद्धतीस विशेष परिचित रोग, यांस स्थान मिळालें आहे. प्रसिद्ध वैद्यांपैकी अबदल लतीफ, अबदुल मलीक या अरब वैद्याची व अबानो पिट्रो या इटालियन तत्त्वज्ञानी वैद्याचें चरित्र आपणांस या विभागात आढळेल.

जीविशास्त्रापैकी महत्त्वाची शाखा जें वनस्पतिशास्त्र त्या पैकीं अपुष्पवनस्पति हा महत्त्वाचा शास्त्रीय लेख या भागांत आला असून लौकिक लेखामध्ये अक्कलकारा, अजमोदा, अजशृंगी, अडुळसा, अतिविष, अनंतमूळ, अपराजिता, अर्जुन सादडा, या विशेषत: औषधी वनस्पति व अक्रोड हा वृक्ष व अननस, हे फळांकरितां प्रसिद्ध असलेलें झाड व अगरु व अफू हे वनस्पतिज पदार्थ यावर लेख या विभागांत आले आहेत. यातील अफू हा व्यापाराचा व अंमली पदार्थ म्हणून विशेष महत्त्वाचा विषय आर्थिकदृष्टीनें व शासनद्रव्याच्या दृष्टीनें सविस्तर विवेचिला आहे.

त्याप्रमाणें जीविशास्त्राची महत्त्वाची शाखा असलेल्या प्राणिशास्त्रापैकी अनंतपद हा शास्त्रीय विषय व अजगर ह्या प्राण्यावरील लेख या विभागांत अन्तर्भूत झाले आहेत.

ज्योतिषशास्त्रापैकीं अयन, अयनाश, अधिकमास हे कालगणनेच्या दृष्टीनें महत्त्वाचे लेख, अभिजित हें महत्त्वाचे असें अठ्ठाविसावे नक्षत्र व अमृतसिद्धियोग हा फलज्योतिषातील एक योग हे या विभागांत लेखविषय झाले आहेत. तसेंच अनंत व अनंतदेव या भारतीय ज्योतिष्यांची चरित्रेंहि या भागांत आपणांस दिसतील.

उद्योगधंद्याकडे पहातां रासायनिक उद्योगधंद्यातील, अत्तरें व सुगंधीपदार्थ, अर्क, अग्निक्रीडा हे लेख या विभागांत आले आहेत. अभ्रक हा खनिजपदार्थ, अबीर हा सुगंधी पदार्थ व अफू हा अमली पदार्थ यांचे क्षेत्र, तयार करण्याची कृति व व्यापार हीं या विभागात विवेचिलीं आहेत. अबकारी हें अफू मद्य वगैरेच्या व्यापाराशीं संबद्ध खातें हें शासनशास्त्रीय दृष्टीनें विवेचिलें आहे व अडत्या हा देवघेवीतील महत्त्वाचा मध्यस्थ हे विषय या विभागांतच येऊन गेले आहेत.

समाजशास्त्र व मानववंशशास्त्र - या शास्त्राचें औपपत्तिक अगर शास्त्रीय विवेचन देणारा विशेष महत्त्वाचा लेख या विभागांत आलेला नाहीं. तसेंच या शास्त्राची एखादी शाखा बोधणाराहि लेख या विभागांत येऊ शकला नाहीं तथापि समाजशास्त्राच्या शासनशास्त्र भाषाशास्त्र समाजनियमनशास्त्र वैचारिक इतिहास, आणि तदंतर्गत दर्शनें, मतें, व संप्रदाय, इत्यादि अनेक अंगास या भागांत स्थान दिलेले आढळेल. समाजव्यंगनिवारणशास्त्र उर्फ दानमीमांसा हे अधर्मसंतति या लेखामुळे सूचित होईल.

या विभागांत ज्या अनेक जातीचीं माहिती आली आहे त्यांनी बरेच विस्तृत क्षेत्र व्यापिलें आहे. आणि विवेचन ऐतिहासिक, वर्णनात्मक, स्थलांतरेंतिहासात्मक असें केंले आहे. जातिविषयक लेख लिहितांना त्यांचे आंकडेशास्त्रहि विस्तृतपणें विवेचिलेलें सांपडेल. तसेंच जेव्हां जातिविशिष्ट भाषा असेल तेव्हां भाषाशास्त्रांतहि बुड्या मारलेल्या आढळतील. व्यापकपणें विवेचनास महाराष्ट्रीय जातीच घेतल्यामुळें, आणि महाराष्ट्रीय जातीचें विवेचन या भागांत फारसे नसल्यामुळें, या भागांतील जातिवर्णनात्मक लेख हा ज्ञानकोशांतील उत्तम जातिविषयक लेखांचा निदर्शक भाग नाहीं. भरतखंडातील महाराष्ट्रीय जातींपैकी फक्त अकरमासे या मिश्र जातीस किंवा वर्गास या विभागांत स्थान मिळालें आहे. पंजाबांतील अगीर, अरैन अरोरा व अर्घुन या हिंदू व अबदलही मुसलमानी जात यांस या विभागांत स्थान मिळालें आहे. संयुक्तप्रांतातील अग्रहारी, अघारिया व अरख या जाती व बंगालबिहार मधील अगार्या ही गोंड जात या प्रस्तुत विभागांत आढळतील. अग्रहारा व अरख या वर आलेल्या जाती आपणांस मध्यप्रांतांतहि आढळतात, व अरे या एका त्रावणकोरी व मध्यप्रांतांतील जातीची माहितीहि याच विभागांत येतें.  आसाम व ब्रह्मदेशांतील जातीपैकीहि अका, अखा, अग्रदानी व ब्रिटीशांच्या अलीकडील स्वारीमुळें ज्यांच्याकडे लक्ष ओढले गेलें असे अबोर लोक यांची माहिती याच भागांत आली आहे. तामिळ तेलगू वगैरे द्राविड जातीपैकीं अगमुदैय्यन, अदिकल, अरे, अगस, अरसुपल्ली या जातींस या विभागांत स्थान मिळालें आहे. गुजराथेंतील अनावळ या प्रसिद्ध ब्राह्मण जातीसहि या भागांत जागा मिळाली आहे.

शासनशास्त्रापैकी प्राचीन शासनशास्त्रांतर्गत होणारा अभिषेक यांत आला आहे. हा राजांना अवश्यक असलेला लौकिक व धार्मिक विधि किती पुरातन आहे, व वैदिक संस्कार कशा प्रकारचा होता, हे सविस्तर लिहिलेलें आढळेल.

अराजकता हा राजनीतिविषयक तत्त्वज्ञानशाखेंतील विषयहि याच विभागांत आपणांस पहावयास सांपडेल.

समाजशास्त्राचें दुसरें एक महत्त्वाचे अंग अर्थशास्त्र होय. त्या विषयाला या विभागांत आरंभ केला असून तो विषय पुढील विभागांत पुरा होईल. अर्थशास्त्रावर दुसरा लेख म्हटला म्हणजे हेनरी अडायाम्स अर्थशास्त्रज्ञाची मतें त्याच्या चरित्रांत आपणांस याच विभागांत पहावयास मिळतील.

मानवेतिहासांतर्गत दैवतशास्त्रांपैकीं फक्त या देवतेस या विभागांत स्थान मिळालें आहे.

मानवेतिहासाची एक महत्त्वाची शाखा जें भाषाशास्त्र त्या क्षेत्रांत अगस्त्य हा व्याकरणकार हा एकच लेख आला आहे.
 
अरुंधतीदर्शन्याय या लेखामुळें प्राचीन न्यायशास्त्राचा प्रवेश झाला आहे. अ या आद्याक्षरा मुळें लिपिशास्त्रहि वगळलें गेलें नाहीं.

दर्शनें मतें व संप्रदाय या मानवेतिहासाच्या अंगर्भूत विषयापैकी भारतीय शाखेंतील महत्त्वाचा अद्वैतवाद या विभागांत येऊन गेला आहे. व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानपंथांपैकी अकॅडमी, अनुभवजन्यज्ञानवाद या दोन पंथांस विभागात स्थान मिळालें आहे. अनंतत्त्व हा तत्त्वज्ञानात्मक सिद्धान्तही याच विभागांत लेखविषय झाला आहे. अनॅक्सॅगोरस अ‍ॅनक्सिमँडर यांची मतेंहि त्यांच्या चरित्रासह आपणांस येथें आढळतील.

समाजनियमन उर्फ कायदे या शास्त्रापैकी अपकृत्यशास्त्र हा औपपत्तिक लेख, व त्याचीच एक शाखा म्हणतां येईल असा अब्रूनुकसानी हा विषय, व अन्नवस्त्र हा एका दृष्टीनें कौटूंबिक मनुष्यास ज्यांचे ज्ञान असणें अवश्य आहे असा लेख, या सर्वांस यांत स्थान मिळालें आहे. बाबिलोनी, मिसरी, ग्रीक, रोमन, हिंदू या प्राचीन कायदेपद्धति आणि इंग्लिश व रोमोत्पन्न अर्वाचीन यूरोपीयन व अर्वाचीन हिंदु व मुसुलमानी यांपैकी फक्त अर्वाचीन आंग्लो इंडियन कायदेपद्धतीप्रमाणेंच काहीं विषयावर कायदा यांत आला आहे. तथापि इतर कायदेपद्धतीचा स्पर्श या भागास झाला नाहीं असे नाहीं. अबू हानिफ या अरबी कायदे पंडिताचें चरित्र आपणांस या भागांत आढळेल.

व्यावहारीक समाजशास्त्राचा एक भाग म्हटला म्हणजे संसारमंडनशास्त्र हा होय. गृहसंस्कार, चालीरीती, गृहव्यवस्था चित्रनृत्यादिकला हीं यांत येतात. भारतीयांचे संसारमंडनशास्त्र या भागांत थोडेंसे आले आहे. प्राचीन वैभवाचा अंश तत्कालीन कलेच्या अवशेषांनी परिचित होतो. प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राची कल्पना देण्यासारखे दोन तीन लेख आपणांस या विभागांत आढळतील. अजंठ अमरावती चित्रसंप्रदायाची ओळख अजंठा व अमरावती या लेखांवरुन होईल. तसेंच सीलोनच्या भारतीय कलेंचे ज्ञान अनुराधपुर हा लेख करुन देईल. जैन शिल्पाची कल्पना येण्यास अबूवरील लेख उपयुक्त होईल, तर अमृतसरचें सुवर्णमंदिर शीखांच्या स्वराज्यांतील वैभवाची कल्पना करुन देईल. अनुनयावरील लेख संसारमंडनशास्त्राचा एक निराळा विषय येथें आला आहे. या भारतीय संसारमंडनशास्त्राचा एक भाग अन्न या लेखांत व्यक्त होतो.

मानवेतिहास आणि वैचारिक इतिहास यांमध्ये अत्यंत निकट संबंध ज्या इतिहासांचा आहे अशांत पारमार्थिक इतिहास हें एक अंग आहे. या इतिहासाचा वाङ्‌मयेतिहासाशीं अत्यंत निकट संबंध आहे.  अत्यंत प्राचीन अशा वैदिक कालापासून आजपर्यंत पारमार्थिक विचारांत व उपासना संप्रदायात जी प्रगति होत गेली व अनेक चळवळी होऊन जे भिन्न भिन्न संप्रदाय स्थापन झाले त्या घडामोडीचा कोणता अंश या विभागांत वाचकांच्या पुढें मांडला गेला आहे याचें थोडक्यात पर्यालोचन करुं. संहिता वाङ्‌मयापैकी अथर्ववेदावरील सामान्य विवेचन वेदविद्या या विभागांत आलें आहे व या विभागांत जो लेख आला आहे त्यांत मुख्यत: कौशिक व वैतान या विधिविषयक सूत्राच्या अनुरोधांनें विवेचन केलें आहे. यामुळें अथर्ववेदाचा व्यवहारांत काय उपयोग होत असे व त्यास अनुसरुन सूत्र वाङ्‌मयाची रचना कसकशी होत गेली हें सांगितलें आहे. वेदविद्या आणि गृह्य यांचा संबंध जो वेदविद्या परिशिष्टांत दाखविला आहे, त्याला पुरावा या लेखांत पुष्कळ सांपडेल. प्राचीन श्रौतधर्माच्या आठवणी ब्राह्मणवाङ्‌मयांतहि आहेत. यांत आलेल्या अजीगर्ताच्या चरित्रावरुन ब्राह्मणकालीन हरिश्चंद्र राजाची कथा, व नरमेध याची आठवण होईल. अग्नि, अग्निष्ठोम, अत्यअग्निष्ठोम हे लेख आपणांस अग्निपूजेंचे व यज्ञसंस्थांचें स्वरुप समजून घेण्यास मदत करतील. स्मार्त धर्मांपैकीं अधमर्षण या लेखावरुन संध्या करणार्‍यांच्या रोजच्या परिचयाच्या एका कृतीचें स्वरुप लक्षांत येईल व अनवलोभन या सूत्रोक्त संस्काराचे ज्ञानहि या विभागांत होईल.

अदिती या श्रुत्युक्त व पौराणिक देवतेची, आप्सरा या देवयोनीची व अथर्वण या वेदशाखीय पुरोहित वर्गाची माहिती आपणांस उपयुक्त होईल. तसेंच अभिषेक या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अथर्व वेदांत दृष्ट झालेल्या व ब्राह्मणकालापासून चालत आलेल्या विधीचे ऐतिहासिक ज्ञानहि आपणांस या विभागांत होईल. षट्दर्शनांपैकी उत्तरमीमांसा अथवा वेदांत याचें बरेचसें ज्ञान आपणांस अद्वैत या लेखावरुन होईल.

स्मृति अथवा धर्मशास्त्र यांचा संबंध या विभागांतील अन्नवस्त्र, अब्रूनुकसानी अपकृत्य व अर्कविवाह या सारख्या लेखांत आला आहे. पौराणिक धर्म यांत आला आहेच. तथापि अग्निपुराणावरील लेख पुराणधर्माचे विषदीकरण करावें या हेतूनें मांडला नाहीं. पौराणिक धर्माची तळी उचलून धरणारे हें पुराण प्रामुख्यानें नव्हे. तथापि पौराणिक वाङ्‌मयाचा अगदी निराळ्या प्रकारचा मासला आपणांस अग्निपुराण या सविस्तर लेखांत पहावयास सांपडेल. व पुराण या नांवाखाली सर्व उपलब्ध ज्ञानाचा संग्रह करुन ठेवण्याची त्यावेळी भारतखंडात कशी पद्धति होती हें विशेषत: या लेखावरुन व्यक्त होईल. तसेंच तत्कालीन सामाजिक जीवनक्रमाचें चित्रहि आपणांस यामध्ये पहावयास सांपडेल. पद्मपुराणांतर्गत अधिकमास महात्म हा लेख व अनंतव्रत हे उत्तरकालीन पुराणोक्त धर्मांचा बोध करतील. अकृतव्रण, अजमीढ, अज, अनिरुद्ध, अभिमन्यु, अनु इत्यादी क्षत्रियांची, अगस्त्य, अत्रि, अणिमांडव्य इत्यादी ऋषींचीं व अघासुर, अतिकाय, अनुविंद इत्यादि दैत्यांची चरित्रें आपणांस कांही  पौराणिक कथांच्या स्वरुपाचा व व्यक्तींचा परिचय करुन देतील.

श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माशिवाय या पंरपरेच्या दृष्टीनें पाखंडी संप्रदाय म्हणजे जैन व बौद्ध त्यांनाहि या भार्गानें उपेक्षिलें नाहि.

अभयदेवसूरि, अमरप्रेमसूरि, अमितगति, अमोघवर्ष यांसारख्या चरित्रलेखांवरुन जैनसंप्रदायाकडे आपलें लक्ष वेधेल, तर अभिधम्मत्थसंग्रह इत्यादी ग्रंथांच्या माहितीवरुन व अनुराधपूर व अमरावती यांसारख्या स्थलांच्या वर्णानावरुन हीनयानी बौद्धग्रंथांची व अभिदान, अभिधर्मकोश, अमितायु यांसारख्या लेखांवरून महायानी बौद्ध पंथाची कांहींशी कल्पना येईल.  अतीश याच्या चरित्रावरून एका बौद्ध धर्मप्रसारकाचा परिचय होईल.

भारताबाहेरचे प्राचीन उपासना संप्रदाय म्हणजे असुरी-बाबीलोनी आणि इराणी होत.  असुर हा एक शब्द बाबीलोनी, इराणी आणि वैदिक या तीनहि संस्कृतींत पवित्र झाला होता.  तसेच नागभीति, नागपूजा आणि नागशत्रुत्व याचें क्षेत्र प्राचीन जगांत आयर्लंडपासून चीनपर्यंत म्हणजे बरेंच विस्तृत होतें.  वरील गोष्टीचीं जाणीव ही वाचतांना येईल.  अक्कड या गांवावरील लेख प्रसिद्ध असुर राजा शार्गन याची स्मृति जागृत करील.  व अ‍ॅना या गांवावरून आपणांस बाबिलोनी साम्राज्याची आठवण होईल तर अ‍ॅझोटस हें गांव आपला ड्रेगन पूजकांशी परिचय करून देईल.

अ‍ॅकिमिनियन घराणें, अनाहित देवता, व अमेशस्पेंत या लेखावरून अवेस्ता धर्माचेंहि आपणांस बरेंच ज्ञान होईल.  अ‍ॅकिलिस, अ‍ॅडोनीस, अ‍ॅमेझॉन वगैरे लेख ग्रीक पुराणकथांशीं व प्राचीन ग्रीक संप्रदायांशीं परिचय करून देतील; तर अ‍ॅकॅडमिक पंथ, अ‍ॅनॅक्सीगोरस, अ‍ॅनॅक्सीमँडर या लेखांवरून कांहीं ग्रीक तत्त्वज्ञान पंथांची आपणांस माहिती होईल.

असुरी बाबीलोनी संप्रदायांपासून सेमेटिक इतिहास कल्पना व विचारपद्धति विकसित झाली.  सेमेटिक पद्धतीस येथें स्थान मिळालेच आहे.  अब्राहाम व अब्राहामाईट, अ‍ॅबट व अ‍ॅबेस हे लेख यहुदी व ख्रिस्ती मतांची चुणुक दाखवितील.  अरबस्तान या लेखांत महंमदी संप्रदायाच्या स्थापनेसंबंधीं व प्राथमिक स्वरूपाविषयीं व अरबी तत्त्वज्ञानासंबंधीं माहिती पहावयास सांपडेल.  तसेंच अफगाणिस्तान या लेखांत कांहीं मुसुलमान जातींचें वर्णन आढळेल.  निराळ्या परिस्थितीचा परिणाम सुशिक्षित मुसुलमानावर कसा होतो यांवर विचार करणारांस अकबर व अबुल फजल यांच्या चरित्रांतील धर्मसुधारणेच्या चळवळीची हकीकत मनोरंजक वाटेल तर अगाखान या लेखांत महंमदाच्या अनुयायांत फूट पडून निरनिराळे पंथ कसे स्थापन झाले याचें एक उदाहरण दृष्टीस पडेल.  अकाली या लेखावरून हिंदु-मुसुलमानांचें ऐक्य करूं पाहणार्‍या नानकाच्या अनुयायांतील एका प्रगत पंथाची माहिती होईल.  अमृतसर या शहरा वरील आणि अमरदास या शीख गुरुच्या चरित्रावरील लेखांनीं आपल्या शीखाविषयीच्या ज्ञानांत बरीच भर पडेल.

महाराष्ट्राचें हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासामध्यें जसें महत्त्वाचें स्थान आहे तसेंच धार्मिक इतिहासांतहि आहे. शीख पंथाचा संस्थापक नानक आणि कबीर हे रामानंदाचे शिष्य होते आणि त्या रामानंदाचा संस्कार येथील भक्तिमार्गावर ही झाला होता.  शीखांच्या एका पंथाची माहिती आली आहे तशी महाराष्ट्रीयांच्या भक्तिसंप्रदायाचींहि आहे.  आणि मागें उल्लेखिलेले मराठी ग्रंथकार बरेचसे या संप्रदायांतील आहेत या भागत संप्रदायाबाहेरहि महाराष्ट्रांत कांही पुरुष दिसतात अशांपैकीं अक्कलकोटचे स्वामी होत त्यांचा अल्पचरित्रलेख येथें आला आहे.

येणेंप्रमाणे अनेक दृष्टींनीं पहातां अक्षरानुक्रमाच्या मांडणीचा हा पहिला विभाग बराच अनेकांगी आहे असें वाटल्याशिवाय रहात नाहीं.

हे पृथक्करण वाचतांनां अनेक ज्ञानक्षेत्रांचा अन्योन्याश्रय वाचकांच्या सहज लक्षांत येईल.  केवळ ज्ञानाची दृष्टी बाजूस ठेऊन मनोरंजकतेच्या दृष्टीनेंच या विभागाकडे लक्ष दिल्यास हा भाग उपेक्षणीय नाहीं हेहि वाचकांच्या लक्षांत आल्यावांचून रहाणार नाहीं.

रसायनशास्त्रीय संज्ञांचा परिचय - येथें रसायनशास्त्रीय लेखांत येणार्‍या सर्व संज्ञा दिल्या नाहींत. ज्या वस्तूंचा किंवा क्रियांचा वापरलेल्या शब्दांनी सहज बोध होतो त्या शब्दांचे स्पष्टीकरण येथें केलें नाहीं.  तसेच अन्य शास्त्रांत ज्या संज्ञांचा विषय प्राधान्यें करुन अंतर्भूत होतो त्या संज्ञांचेहि स्पष्टीकरण येथें केले नाहीं.

रासायनिक संज्ञांच्या पृथक्करणासाठीं त्यांचे एक सोपेसें वर्गीकरण करूं.  पहिला वर्ग रासायनिक मूलद्रव्यांच्या वाचक शब्दांचा.  दुसरा एक वर्ग रासायनिक आणि पादार्थिक क्रियांच्या बोधक शब्दांचा, तिसरा एक वर्ग महत्त्वाच्या रासायनिक द्रव्यांचा, चवथा एक महत्त्वांचा वर्ग म्हणजे प्रायोगिक यंत्रोपकरणांचा.  या निरनिराळ्या वर्गांतील संज्ञा स्पष्ट केल्या म्हणजे रासायनिक लेख समजण्यास अडचण मुळींच पडणार नाहीं.  रासायनिक मूलद्रव्यांसाठीं जीं निरनिराळीं नांवें निरनिराळ्या संज्ञाकारांनी वापरलीं आहेत, त्यांचे एक तौलनिक कोष्टक पुढें दिलें आहे आणि त्यांत आम्ही ठरविलेल्या संज्ञाहि दिल्या आहेत.  या संज्ञा करतांनां होतां होईतों नवी संज्ञा पाडावयाची नाहीं, तर जुन्या प्रयत्‍नांतूनच उचल करावयाची व एका वस्तूस एकच संज्ञा हे तत्त्व पाळावयाचें योजून संज्ञारचना केली आहे, हें त्या कोष्टकावरुन दिसून येईल.

रासायनिक लेखांतील दुसर्‍या महत्त्वाच्या संज्ञा म्हणजे क्रियासूचक व क्रियादर्शक होत.  त्या कोणत्या पाश्चात्य शब्दासाठीं वापरल्या आहेत तें शेजारीं पाश्चात्य शब्द कंसांत मांडून स्पष्ट केलें आहे.  अभिसरण (डिफ्यूजन) उत्पातन किंवा ऊर्ध्वपातन (डेस्टिलेशन); उज्जिदीकरण (रिडक्शन), उदकप्रक्रिया (हायड्रोलिटिक डिससोसिएशन); सोज्जीकारक (रिड्यूसिंग एजंट) केशाकर्षण (कॅपिलरी अ‍ॅक्शन); घनीकरण (कन्डेन्सेशन), ध्रुवीभवन ( पोलरायझेशन) प्रापण (कन्व्हेक्शन), वक्रीभवनत्व (रिफ्रॅक्टिव्हिटि), विद्रावण (सोल्यूशन), विपाकक्रिया (फर्मेंटेशन) विद्युत्विश्लेषण (इलेक्ट्रोलिसिस्), वैद्युदण्वीभवन (अयानिझेशन); शुष्क पातन (ड्राय डेस्टिलेशन); संसक्ति (कोहिजन); हे शब्द रसायनशास्त्र व पदार्थविज्ञानशास्त्र यांतील स्थित्यंतरसूचक होत.

तशाच प्रकारचे म्हणजे पदार्थांव्यतिरिक्त, पण स्थितीसूचक किंवा स्थित्यंतरसूचक शब्द पण चालू क्रिया न दर्शविणारे शब्द म्हटले म्हणजे उत्क्कथनांक (बॉयलिंग पॉईंट;) गुणक (इंडेक्स उदा. वक्रीभवनाचा); द्विपाशबद्ध (डब्ली लिंक्ड);  प्रमाण (नॉर्मल); बीजगर्भ (न्यूक्लिअस); रसांक (मेलटिंग पॉईंट); शेष (रिसिडयू);  संपृक्त (सॅच्युरेटेड); स्थित्यंतरक उष्णमान (क्रिटिकल टेंपरेचर); स्थित्यंतरक भार (क्रिटिकल प्रेशर); स्फटिक (क्रिस्टल); हे होत.

रासायनिक संज्ञापरिचयासाठीं उपसर्गप्रत्यपद्धति मांडणें अवश्य आहे.  पुष्कळदां प्रत्यय शब्दसंक्षेपमूलक असतात हें भाषाशास्त्रांतील तत्त्व रासायनिक परिभाषाघटनेंत वापरावें लागतें असें दिसेल.  जेव्हां इंग्रजींतील प्रत्ययसदृश संस्कृत प्रत्यय सांपडेल तेव्हां तो पसंत करुन त्याच अर्थाने वापरला आहे.  असिडांच्या दर्शक शब्दांत जे प्रत्यय व उपसर्ग इंग्रजींत येतात त्यांनां मराठींत सदृशप्रत्यय व उपसर्ग कोणते वापरले आहेत हें अम्लशास्त्र या लेखांत सकारण दिले आहे व येथेंहि शेवटी ते उध्दृत केलें आहेत.

मूलद्रव्यांच्या संज्ञा - स्पष्ट करण्यासाठीं जें पुढें कोष्टक दिलें आहे, त्यांत असे दिसून येईल कीं हिंदी वैज्ञानिक कोष, प्रो. साठे, व रानडे व सयाजी वैज्ञानिक कोश या चौघांच्या संज्ञा पद्धतींत बरेच सादश्य आहे.  यासाठीं होतां होईतों या चौघांच्या संज्ञापद्धतीशीं सदृश अशी संज्ञापद्धति निश्चित केली आहे.  संज्ञापद्धति ठरवितांनां पद्धतीच्या आंतील सुसंगति हे एकच ध्येय बाळगावयाचें नसतें.  तर पद्धतीच्या सार्वत्रिक होण्याच्या शक्यतेकडेहि पहावें लागतें.  शास्त्राच्या विकासासाठी आणि त्याचें ज्ञान सार्वत्रिक होण्यासाठी भारतीय निरनिराळ्या भाषांत जर एकच शास्त्रीय संज्ञापद्धति वापरली जाईल तर तें चांगले.  हें ध्येय नेहमींच साध्य होते असें नाहीं कारण वैयक्तिक शास्त्रलेखन प्रयत्नांत भारतांतीलं इतर भाषांच्या शब्दसंग्रहाशीं सुसंगति पहाण्यास अवकाश नसतो, पण यासाठीं प्रयत्‍न मात्र पाहिजे.

आजपर्यंत रासायनिक मूलद्रव्यांची जीं निरनिराळ्या ठिकाणी नांवें प्रसिद्ध झालीं आहेत तीं व त्या कोशांत येणारी नांवे या सर्वांचें आदर्शपत्रक
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रासायनिक द्रव्यपरिभाषेचा नमुना / यंत्रोपकरणपरिभाषा / वगळलेले लेख व त्यांचे स्थान
----------------------------------------------------------