प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

होमरच्या काव्याची छाया.- आतां सीतेच्या हरणाची मूळ कल्पना बौद्ध काव्यामध्यें नसल्यामुळें ही कल्पना वाल्मीकीनें प्रथम कोठून घेतली हें आपण पाहूं. व्हीलर याच्या मताप्रमाणें अनार्य अथवा बौद्ध लोकांवर झालेली खरोखरीच एखादी स्वारी वर्णन करावयाचें कवीच्या मनांत होतें काय ? वेबर याच्या मताप्रमाणें ही कल्पना वाल्मीकीनें हेलेनचें हरण व ट्रायशहराचा वेढा या गोष्टींवरून घेतली असावी. यावरून वाल्मीकीस होमरचीं काव्यें अवगत असावीं अथवा त्यांचें अस्तित्व त्यास ठाऊक असावें असें अनुमान निघत नाहीं. किंवा मोनिअर वुइल्यम्सप्रमाणें अगमेम्रॉन आणि सुग्रीव, पेट्रोक्लस आणि लक्ष्मण, नेस्टर आणि जांबवंत, ओडेशियस आणि हनुमन्त, हेक्टर आणि इंद्रजित यांच्या स्वाभावसाम्यांसहि विशेष महत्त्व देतां येत नाहीं. (या स्वभावसाम्यावरून रामायणाचा  फ्रेंच भाषांतरकार हिप्पोलिते फोशे यानें वाल्मीकीपासून होमर यानें ही कल्पना उचलली असें अनुमान काढलें आहे.)

मोनिअर वुइल्यम्स यानें दाखविलेलीं कल्पनासादृश्याचीं स्थळें, उदाहरणार्थ, सीतेचें स्वप्नदर्शनानें शांतवन, लंकेच्या तटावरून रामसेनेचें निरीक्षण, सीतेचें सैन्यास दर्शन इ. जरी सोडून दिलीं आणि ग्रीक काव्याचा ठसा या आर्य काव्यावर कितपत उठला आहे हें पाहण्याचें जरी बाजूस ठेवलें तरी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे हिंदुस्थान आणि ग्रीस या देशांतील लोकांचा जो संबंध जडला त्याचा विचार केला असता असें दिसून येईल कीं, होमरच्या काव्यांतील गोष्टी भारतीय लोकांस थोड्याबहुत अवगत झाल्या होत्या. त्यांपैकीं कांहींचा उल्लेख ‘मिलिंदपन्ह’ {kosh Ind. Stud. III. 369.}*{/kosh} सारख्या बौद्धकाव्यांतून आढळून येतो. याखेरीज होमरच्या काव्यांतील दोन गोष्टी सिहंलद्वीपांतील कांहीं पाली ग्रंथांतून आढळून येतात. ओडेशियस याचेवरील किरके बेटांतील प्रसंगाचें वर्णन महावंसोमध्यें आढळतें. {kosh महावंसो. Ch. VII. Turner. p. 48.}*{/kosh} त्याप्रमाणेंच ट्रायमधील घोड्याची गोष्ट घोड्याच्या ऐवजीं हत्ती करून दिलेली बुद्धघोषाच्या धम्मपद ग्रंथावरील टीकेंत आढळते. {kosh Vide Fausboll. p. 158. Roger’s Buddhahosa’s  Parables p. 39.}*{/kosh} त्याप्रमाणेंच या ग्रीक लोकांशीं आलेल्या संबंधामुळें इसापनीतींतील गोष्टींसारख्या इतर पुष्कळ गोष्टी आर्यवर्तांत आल्या. ऋग्वेदाच्या एका उपनिषदामध्यें गनीमीडच्या हरणाबद्दलच्या गोष्टीसारखी गोष्ट आढळून येते. {kosh Ind. Stud. IX.41.}*{/kosh}

याप्रमाणेंच रामायणांतहि कांहीं गोष्टी आढळून येतील उदाहरणार्थ, धनुर्भंगाची कथा वाचून ओडेशियसच्या धनुष्याची आठवण होते. जनकजातकामध्यें गलबत फुटल्यामुळें वसाहत असलेल्या मनुष्यास एका जलदेवतेनें वांचवून किनार्‍यावर आणिलें, तेथें तो राजा झाला आणि एक धनुष्य वांकवून त्यानें आपलें सामर्थ्य दाखविल्यावर तेथील राणीशीं त्याचें लग्न झालें अशी गोष्ट आहे. {kosh Life & Legend of Gaudama १866 ed. p. 415.}*{/kosh} या गोष्टींत ओडेशियस यास ल्युकोथिया इनें वांचविल्याची व त्यानें धनुष्य वांकविल्याची गोष्ट एकत्र केली आहे. आतां या वरील गोष्टी जर होमरपासून घेतलेल्या असतील तर रामायणाचें मूळहि होमरमध्येंच सांपडेल. वरील जनकजातकामधील गोष्टी जरी ब्रह्मी भाषांतरावरून घेतल्या आहेत तरी त्यांच्या खरेपणाबद्दल संशय नसल्यामुळें त्यांचा या बाबतींत आधार घेण्यास हरकत नाहीं. याशिवाय रामायणामध्यें आढळून येतात अशा दोन पाश्चात्त्य कल्पनांपैकीं जोशआप्रमाणें दिसते. {kosh ही गोष्ट सर्व प्रतींत आढळून येत नाहीं. वरील विधान व्हीलर याच्या भाषांतरावरून केलेलें आहे आणि तें वायव्येकडील प्रतीवरून केलें असावें. मुंबई प्रतींत याबद्दल उल्लेख नाहीं}*{/kosh}

दुसरी रामानें सीतेला वनांत सोडल्यानंतर अश्वमेधाच्या वेळीं सीतेची केलेली सोन्याची प्रतिमा ही होय. {kosh परंतु ही गोष्ट उत्तरकांडांत असून ती वास्तविक रामायणामध्यें मागहून घातलेली आहे.}*{/kosh} ही गोष्ट विल्सन यानें युरिपीडिसच्या अलकेटिसमधील {kosh V. 341. 345.}*{/kosh} गोष्टीसारखी दिसते असें दाखविलें आहे. {kosh Hindu Theatre. I. 337.}*{/kosh}

तसेंच डॉ. लासेन याच्या म्हणण्याप्रमाणें अलेक्झँडरबरोबर मैत्री करणारा ‘किकेओइ’ देशाचा राजा सोपेइथिस हाच दशरथाचा शालक केकय देशाचा राजा अश्वपति असावा ही समजूत कांहीं अगदींच टाकाऊ दिसत नाहीं. तथापि असें असण्याचा जास्त संभव आहे कीं वाल्मीकीनें अश्वघोष या नांवाचा उपयोग केवळ तें नांव यजुर्वेदामध्यें आलेलें आहे म्हणून केला असावा.

यावरून आपणांस स्थूलमानानें रामायणरचनेचा काल काढतां येईल काय तें पाहूं.