प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

उसनें ज्योतिर्ज्ञान.- आपल्या ज्योतिःशास्त्रांतहि कांहीं भाग आपण यवनांपासून घेतला असावा असें सांगण्यांत येतें. उदाहरणार्थ, १२ राशींचें भारतीय ज्योतिषांत असेलेलें अस्तित्व ग्रीकांशीं झालेल्या परिचयाचें फल आहे असें म्हणतात. केंद्र हा शब्द ग्रीक केंटर (Center) शब्दापासून झाला [त्याचा उच्चार इंग्रज सेंटर असा करतात]; तसेंच आपल्या पंचांगांत येणारें “अवकहडा” चक्राचें नांव हें केवळ “ए बी सी डी” या अक्षरचतुष्ट्याचेंच रूपांतर होय; इत्यादि पुरावें पुढें येतात.

भारतीयांनीं ज्योतिःशास्त्र, मुख्यत्वें त्याच्या गणित आणि जातक या शाखा, खाल्डी लोक, इजिप्‍तचे लोक अथवा अलेक्झांड्रियाचे ग्रीक यांजपासून घेतल्या असें बहुतेक यूरोपीय विद्वानांचें मत आहे. याबद्दल रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनीं आपल्या ‘भारतीय ज्योतिःशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथांत प्रसंगोपात ठिकठिकाणीं व सविस्तर विचार केला आहे. त्याच्या आधारानेंच पुढील माहिती दिली आहे.

डॉ. थिबो यानें ‘नक्षत्रपद्धति मूळची बाबिलोनियन (खाल्डी) लोकांची कीं काय ?’ याविषयीं एक महत्त्वाचा लेख बंगाल रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकाच्या ६३ व्या ग्रंथांत इ. स. १८९४ मध्यें लिहिला आहे. त्यांत त्यानें (Astronomisches aus Babylon) ‘बाबिलोनचें ज्योतिष’ या पुस्तकाकडे  वाचकांचें लक्ष वेधिलें आहे. बाबिलोनियामध्यें जे अनेक अंकित लेख खणून काढले गेले आहेत त्यांपैकीं कांहींचा अर्थ फादर स्ट्रासमेअरच्या साहाय्यानें फादर एपिंग यानें लावण्याचा प्रयत्‍न करून त्यांतील ज्योतिषसंबंधीं गोष्टी इ. स. १८८९ मध्यें या पुस्तकांत छापल्या आहेत. या कोरींव लेखांत ग्रहांच्या वेधाबद्दल उल्लेख आहेत. त्यांवरून बाबिलोनचे ज्योतिषी ग्रहस्थिति राशिविभागांत सांगत, नक्षत्रविभागांत सांगत नसत व त्यांच्यांत नक्षत्रविभाग मुळींच नव्हते असें दिसतें. यावरून बाबिलोनिअन लोकांपासून हिंदूंनीं नक्षत्रें घेतलीं या म्हणण्यास अवकाशच राहत नाहीं. अर्थात् तें मत त्याज्य ठरतें.