प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
तेलंग यांचा टीकात्मक लेख.- वर दिलेल्या वेबरच्या लेखास न्यायमूर्ति काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनीं सविस्तर उत्तर दिलें आहे. त्याचा सारांश पुढें दिला आहे.
भारतीयांचें राष्ट्रीय आर्षमहाकाव्य जें रामायण त्याकडे आतांपर्यंत निरनिराळ्या लोकांनीं निरनिराळ्या दृष्टींनीं पाहिलें आहे. कोणी त्यामध्यें आर्यसंस्कृतीचा दस्यूंवरील विजय चित्रित केला आहे असें म्हणतात, तर कोणी ब्राह्मण आणि बौद्ध यांच्या स्पर्धेचें चित्र त्यांत पाहतात, तर कोणाला तें एक कृषिकर्मावरील रूपक आहे असें भासतें. याप्रमाणें रामायणांतरी कथेवर निरनिराळ्या काळीं निरनिराळें उद्देश आरोपित झाले आहेत. तरी त्यांतील मुख्य कथा मूळचीच आहे किंवा शुद्ध ब्राह्मणी आहे किंवा बौद्धांपासून घेतलेली आहे किंवा दुसर्या कोणापासून घेतली आहे हे प्रश्न व यांच्यासारखे इतर प्रश्न नुकतेच कोठें डोकावूं लागले आहेत. या गोष्टीकडे लक्ष वळविण्याचें श्रेय डॉ. वेबर यास आहे.
कोणत्याहि भारतीयास त्यानें आतांपर्यंत अत्यंत पूज्य मानिलेला राष्ट्रीय ग्रंथ, ज्या ग्रंथांतील नायकाकडे तो केवळ ईश्वरांशाप्रमाणें पाहतो तो ग्रंथ, त्यांतील मुख्य भाग एका बौद्ध जातकावरून घेऊन व त्यास एका पाश्चात्य कथेची पुस्ती जोडून तयार केला आहे असें सांगणें म्हणजे त्याच्या मनास बराच जोराचा धक्का देणें होय. परंतु जर शास्त्रीय पद्धतीनें तशी गोष्ट सिद्ध होत असेल तर ती मान्य करावयास आपल्या मनाची तयारी असली पाहीजे.
डॉ. वेबर यानें आपल्या एकंदर विवेचनावरून पुढील निष्कर्ष काढिले आहेत. (१) मुख्य वनवासाची कथा ही बरीचशी बौद्ध दंतकथांच्या कथासूत्रांचा विस्तार करून बनविली आहे. (२) रामायणांतील कथानकाचें जें सध्यांचें स्वरूप आहे त्यावरून ग्रीक लोकांचा सांस्कृतिक परिणाम भरतखंडावर कायम झाला होता अशीं चिन्हें स्पष्ट दिसत आहेत. (३) सीतेचें हरण आणि लंकेवरील स्वारी या दोन गोष्टी वरील बौद्धकथेस जोडल्या गेल्या, यावरून होमरच्या काव्यांशीं भारतीयांचा परिचय झाला होता हें स्पष्ट होतें. (४) वाल्मीकीच्या काव्याचा काल ख्रिस्ती शकाच्या आरंभापूर्वीं फारसा जात नाहीं. एवढे वेबरचे मुख्य मुद्दे आहेत. बाकीचे गौण असल्यामुळें त्यांचा येथें विचार करण्याची आवश्यकता नाहीं.
यांपैकीं पहिला मुद्दा रामवनवासाची कथा दशरथजातक या बौद्ध जातककथेवरून घेतली हा होय. वेबरचा लेख जर नीटपणें पाहिला तर हा मुद्दा बरोबर सिद्ध झाला आहे असें म्हणतां येणार नाहीं. वेबरचें म्हणणें कीं बौद्धकथेमध्यें प्राचीनतेची इतकी स्पष्ट झांक मारते कीं ती कथा बरीच प्राचीन असावी याबद्दल संशय राहत नाहीं. परंतु ज्या गोष्टी वेबरला ‘स्पष्ट’ दिसतात त्या आमच्या मतें मुळींच स्पष्ट नाहींत. त्यानें या दोन कथांमधील फरक दाखविले आहेत त्यांत राम आणि त्याचा बंधु लक्ष्मण यांस त्यांच्या पित्यानें केवळ त्यांच्या सावत्र आईच्य कारस्थानापासून बचाव करण्याकरितां वनवासास पाठविलें असें आहे. आतां या गोष्टीवरून अधिक प्राचीनता कशी स्पष्ट होतें हें मोठें कोडें आहे. दुसरा फरक म्हणजे बौद्ध कथेंतील सीता ‘स्वखुषीनें’ रामलक्ष्मण यांजबरोबर जाते. पण वाल्मीकीच्या कथेंतील सीताही स्वखुषीनेंच रामाबरोबर जातें हें रामायणाच्या मुंबई व गोरेसियो प्रतींवरून आणि रघुवंशावरून स्पष्ट आहे. (येथें वेबरच्या मनांतून फरक दाखवावयाचा तो सीता ‘स्वखुषीनें’ जाते यांत दाखवावयाचा नसून, ती बौद्ध-कथेंत रामाची बहिण म्हणून जाते व राम वनवासाहून परत आल्यावर त्याचें तिच्याशीं लग्न होतें आणि वाल्मीकीच्या कथेंत ती रामाची पत्नी असून वनवासापूर्वींच त्यांचें लग्न झालेलें होतें या गोष्टींत दाखवावयाचा असावा. वेबरचा हा मुद्दा नीटपणें मांडला गेला नाहीं). या दोन्ही कथांतील वनवासाच्या कालांत फरक आहे. सीतेचें रामाशीं लग्न वनवासाहून परत आल्यावर होतें. सीता ही रामाची लग्नापूर्वीं बहिण होती. या सर्वांत महत्त्वाचा फरक राम आणि सीता यांचें विवाहपूर्वी नातें बहिणभावांचें होतें या गोष्टींत आहे. तसाच बौद्ध कथेंत रावणानें सीतेचें हरण केलें इत्यादि पुढील कथाभाग नाहीं. आतां बहिणभावांच्या विवाहाची चाल ही जास्त प्राचीन असें जरी मानलें तरी तेवढ्यावरून त्या चालीचा उल्लेख असलेली कथा दुसर्या तर्हेची चाल दाखविण्यार्या कथेहून प्राचीन होती असें कसें म्हणतां येईल ? एवढ्याच मुद्द्यावरून पौर्वापौर्य ठरविणें निदान इतक्या महत्त्वाच्या बाबतींत तरी बरेंच धाडसाचें होईल. {kosh तेलंगांच्या मुद्य्यास आम्ही अशी पुस्ती जोडतों कीं ज्या अर्थीं शकजातीय गौतमबुद्धाची उत्पत्ति बंधुभगिनीविवाहमूलक होती आणि ज्याअर्थीं ही चाल ब्राह्मणानुयायी समाजांत कनिष्ठ समजली जात असली पाहिजे त्याअर्थीं सर्वजनसंमत असें जें रामचरित्र त्यास आपण आपल्या चालीचें गालबोट लावावें अशी इच्छा गौतमास व त्याच्या अनुयायांस होणें शक्य आहे.- संपादक.}*{/kosh}
आतां सीतेचें हरण व लंकेवरील स्वारी यांचा उल्लेख बौद्ध कथेंत नाहीं एवढ्यावरून ज्या कथेंत जास्त मजकूर हे ती कथा कमी मजकूर असलेल्या कथेपेक्षां अर्वाचीन असें म्हणतां येणार नाहीं. एखाद्या इंग्रजी वाङ्मयाच्या इतिहासाच्या अभ्यासकानें शेक्सपियरच्या नाटकांची हेमिंगे आणि काँडेल यांची आवृत्ति बौडलरच्या कौटुंबिक आवृत्तीपेक्षां किंवा एखाद्या प्रयोगाच्या सोईकरितां छाटछूट करून फेरफार केलेल्या आवृत्तीपेक्षां अर्वाचीन आहे असें म्हणणें जितकें सयुक्तिक होईल तितकेंच वरील विधान सयुक्तिक होईल. {kosh तेलंगांचे हें विधान सयुक्तिक दिसत नाहीं. बौद्ध कथा एखाद्या रानवटानें दुसर्या रानवटाला सांगितल्यासारखी दिसते, व रामायणांतील कथा संविधानकाची ठाकठिकी पाहणार्या कवीचा हात लागल्यावर होणारें स्वरुप पावलेली दिसते. तेलंगांच्या म्हणण्याप्रमाणें जातकांतील भिन्न नीरस मजकूर हा फेरफार आहे असें धरल्यास (उदाहरणार्थ, दशरथाचा ९ वर्षांनीं मृत्यू वगैरे प्रकारचा फेरफार) तो करण्यांत हेतु व्यक्त होत नाहीं.- संपादक}*{/kosh} या दोन कथानकांतील स्थलांचा फरकहि लक्षांत घेण्यासारखा आहे. वाल्मीकीनें अयोध्या नगर घेतलें आहे तर बौद्धांनीं बनारस शहर घेतलें आहे. या मुद्दयावर वेबरचें जें म्हणणें आहे त्यांत विशेषसें तथ्य नाहीं एवढेंच येथें नमूद केलें म्हणजे पुरें. ‘बौद्धांच्या अनेक जातककथांमध्यें बनारसचा उल्लेख येतो व बनारसचा राजा ब्रह्मदत्त हें जसें काहीं प्रत्येक जातकाचें पालुपद बनलें आहे’ असें शेरिंग यानें आपल्या ग्रंथांत† म्हटलें आहे. यावरून बौद्ध जातकांतील सर्व कथांचें स्थल सामान्यतः बनारस हें दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो व त्यामुळें दशरथाची कथा बनारसमध्यें घडली असें दाखविलें आहे. यासंबंधींच्या वेबरच्या मुद्दयांत कांहींच अर्थ दिसत नाहीं.
आतां या वरील वादविवादासंबंधानें मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो कीं बौद्ध जातककथांचा काल कोणता ? या प्रश्नाचा जरी वेबरनें विचार केलेला नाहीं तरी तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बौद्ध कथेवरून रामायण रचलें जाण्याच्या ऐवजीं रामायणावरूनच बौद्ध कथेचा उगम होणें व रामायण हें बौद्धकथेची सुधारून वाढविलेली आवृत्ती असण्याच्या ऐवजीं बौद्ध कथा हीच रामायणाची संक्षिप्त आवृत्ति असणें ही गोष्ट वेबरनें जें वर विरुद्ध विधान केलें आहे त्याच्या इतकीच निदान संभवनीय आहे. दोन्ही गोष्टी सारख्याच संभवनीय आहेत असें म्हणण्याचें कारण एवढेंच कीं ब्राह्मणांनीं एखाद्या बौद्ध कथानकांतील नायकास ब्राह्मणी स्वरूप देणें ही गोष्टच अतर्क्य दिसते. कारण त्यांनां जर बौद्ध संप्रदायाच्या विरुद्ध चळवळ करावयाची होती असें वेबर म्हणतो तर त्यांच्या कथानकांतील नायकांचें रूपांतर करणें ही गोष्ट अगदीं शेवटचा उपाय म्हणूनहि कोणी करणार नाहीं. उलटपक्षीं एखाद्या मुळापासून फुटून निघालेल्या पांखडी संप्रदायानें पूर्वींच्या एकत्र असतांना चालत आलेल्या परंपरागत कथा वगैरे आपल्या बरोबर नेण्याचा जास्त संभव आहे आणि अशा दृष्टीनें बौद्ध कथा ही मूळ ब्राह्मणी परंपरेंतील कथा असून तिला बौद्धांनीं आपल्या मतानुरूप वळण दिलें असावें असें समजणें जास्त सयुक्तिक आहे.