प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

तेलंग यांचा टीकात्मक लेख.- वर दिलेल्या वेबरच्या लेखास न्यायमूर्ति काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनीं सविस्तर उत्तर दिलें आहे. त्याचा सारांश पुढें दिला आहे.

भारतीयांचें राष्ट्रीय आर्षमहाकाव्य जें रामायण त्याकडे आतांपर्यंत निरनिराळ्या लोकांनीं निरनिराळ्या दृष्टींनीं पाहिलें आहे. कोणी त्यामध्यें आर्यसंस्कृतीचा दस्यूंवरील विजय चित्रित केला आहे असें म्हणतात, तर कोणी ब्राह्मण आणि बौद्ध यांच्या स्पर्धेचें चित्र त्यांत पाहतात, तर कोणाला तें एक कृषिकर्मावरील रूपक आहे असें भासतें. याप्रमाणें रामायणांतरी कथेवर निरनिराळ्या काळीं निरनिराळें उद्देश आरोपित झाले आहेत. तरी त्यांतील मुख्य कथा मूळचीच आहे किंवा  शुद्ध ब्राह्मणी आहे किंवा बौद्धांपासून घेतलेली आहे किंवा दुसर्‍या कोणापासून घेतली आहे हे प्रश्न व यांच्यासारखे इतर प्रश्न नुकतेच कोठें डोकावूं लागले आहेत. या गोष्टीकडे लक्ष वळविण्याचें श्रेय डॉ. वेबर यास आहे.

कोणत्याहि भारतीयास त्यानें आतांपर्यंत अत्यंत पूज्य मानिलेला राष्ट्रीय ग्रंथ, ज्या ग्रंथांतील नायकाकडे तो केवळ ईश्वरांशाप्रमाणें पाहतो तो ग्रंथ, त्यांतील मुख्य भाग एका बौद्ध जातकावरून घेऊन व त्यास एका पाश्चात्य कथेची पुस्ती जोडून तयार केला आहे असें सांगणें म्हणजे त्याच्या मनास बराच जोराचा धक्का देणें होय. परंतु जर शास्त्रीय पद्धतीनें तशी गोष्ट सिद्ध होत असेल तर ती मान्य करावयास आपल्या मनाची तयारी असली पाहीजे.

डॉ. वेबर यानें आपल्या एकंदर विवेचनावरून पुढील निष्कर्ष काढिले आहेत. (१) मुख्य वनवासाची कथा ही बरीचशी बौद्ध दंतकथांच्या कथासूत्रांचा विस्तार करून बनविली आहे. (२) रामायणांतील कथानकाचें जें सध्यांचें स्वरूप आहे त्यावरून ग्रीक लोकांचा सांस्कृतिक परिणाम भरतखंडावर कायम झाला होता अशीं चिन्हें स्पष्ट दिसत आहेत. (३) सीतेचें हरण आणि लंकेवरील स्वारी या दोन गोष्टी वरील बौद्धकथेस जोडल्या गेल्या, यावरून होमरच्या काव्यांशीं भारतीयांचा परिचय झाला होता हें स्पष्ट होतें. (४) वाल्मीकीच्या काव्याचा काल ख्रिस्ती शकाच्या आरंभापूर्वीं फारसा जात नाहीं. एवढे वेबरचे मुख्य मुद्दे आहेत. बाकीचे गौण असल्यामुळें त्यांचा येथें विचार करण्याची आवश्यकता नाहीं.

यांपैकीं पहिला मुद्दा रामवनवासाची कथा दशरथजातक या बौद्ध जातककथेवरून घेतली हा होय. वेबरचा लेख जर नीटपणें पाहिला तर हा मुद्दा बरोबर सिद्ध झाला आहे असें म्हणतां येणार नाहीं. वेबरचें म्हणणें कीं बौद्धकथेमध्यें प्राचीनतेची इतकी स्पष्ट झांक मारते कीं ती कथा बरीच प्राचीन असावी याबद्दल संशय राहत नाहीं. परंतु ज्या गोष्टी वेबरला ‘स्पष्ट’ दिसतात त्या आमच्या मतें मुळींच स्पष्ट नाहींत. त्यानें या दोन कथांमधील फरक दाखविले आहेत त्यांत राम आणि त्याचा बंधु लक्ष्मण यांस त्यांच्या पित्यानें केवळ त्यांच्या सावत्र आईच्य कारस्थानापासून बचाव करण्याकरितां वनवासास पाठविलें असें आहे. आतां या गोष्टीवरून अधिक प्राचीनता कशी स्पष्ट होतें हें मोठें कोडें आहे. दुसरा फरक म्हणजे बौद्ध कथेंतील सीता ‘स्वखुषीनें’ रामलक्ष्मण यांजबरोबर जाते. पण वाल्मीकीच्या कथेंतील सीताही स्वखुषीनेंच रामाबरोबर जातें हें रामायणाच्या मुंबई व गोरेसियो प्रतींवरून आणि रघुवंशावरून स्पष्ट आहे. (येथें वेबरच्या मनांतून फरक दाखवावयाचा तो सीता ‘स्वखुषीनें’ जाते यांत दाखवावयाचा नसून, ती बौद्ध-कथेंत रामाची बहिण म्हणून जाते व राम वनवासाहून परत आल्यावर त्याचें तिच्याशीं लग्न होतें आणि वाल्मीकीच्या कथेंत ती रामाची पत्‍नी असून वनवासापूर्वींच त्यांचें लग्न झालेलें होतें या गोष्टींत दाखवावयाचा असावा. वेबरचा हा मुद्दा नीटपणें मांडला गेला नाहीं). या दोन्ही कथांतील वनवासाच्या कालांत फरक आहे. सीतेचें रामाशीं लग्न वनवासाहून परत आल्यावर होतें. सीता ही रामाची लग्नापूर्वीं बहिण होती. या सर्वांत महत्त्वाचा फरक राम आणि सीता यांचें विवाहपूर्वी नातें बहिणभावांचें होतें या गोष्टींत आहे. तसाच बौद्ध कथेंत रावणानें सीतेचें हरण केलें इत्यादि पुढील कथाभाग नाहीं. आतां बहिणभावांच्या विवाहाची चाल ही जास्त प्राचीन असें जरी मानलें तरी तेवढ्यावरून त्या चालीचा उल्लेख असलेली कथा दुसर्‍या तर्‍हेची चाल दाखविण्यार्‍या कथेहून प्राचीन होती असें कसें म्हणतां येईल ? एवढ्याच मुद्द्यावरून पौर्वापौर्य ठरविणें निदान इतक्या महत्त्वाच्या बाबतींत तरी बरेंच धाडसाचें होईल. {kosh तेलंगांच्या मुद्य्यास आम्ही अशी पुस्ती जोडतों कीं ज्या अर्थीं शकजातीय गौतमबुद्धाची उत्पत्ति बंधुभगिनीविवाहमूलक होती आणि ज्याअर्थीं ही चाल ब्राह्मणानुयायी समाजांत कनिष्ठ समजली जात असली पाहिजे त्याअर्थीं सर्वजनसंमत असें जें रामचरित्र त्यास आपण आपल्या चालीचें गालबोट लावावें अशी इच्छा  गौतमास व त्याच्या अनुयायांस होणें शक्य आहे.- संपादक.}*{/kosh}

आतां सीतेचें हरण व लंकेवरील स्वारी यांचा उल्लेख बौद्ध कथेंत नाहीं एवढ्यावरून ज्या कथेंत जास्त मजकूर हे ती कथा कमी मजकूर असलेल्या कथेपेक्षां अर्वाचीन असें म्हणतां येणार नाहीं. एखाद्या इंग्रजी वाङ्‌मयाच्या इतिहासाच्या अभ्यासकानें शेक्सपियरच्या नाटकांची हेमिंगे आणि काँडेल यांची आवृत्ति बौडलरच्या कौटुंबिक आवृत्तीपेक्षां किंवा एखाद्या प्रयोगाच्या सोईकरितां छाटछूट करून फेरफार केलेल्या आवृत्तीपेक्षां अर्वाचीन आहे असें म्हणणें जितकें सयुक्तिक होईल तितकेंच वरील विधान सयुक्तिक होईल. {kosh तेलंगांचे  हें विधान सयुक्तिक दिसत नाहीं. बौद्ध कथा एखाद्या रानवटानें दुसर्‍या रानवटाला सांगितल्यासारखी दिसते, व रामायणांतील कथा संविधानकाची ठाकठिकी पाहणार्‍या कवीचा हात लागल्यावर होणारें स्वरुप पावलेली दिसते. तेलंगांच्या म्हणण्याप्रमाणें जातकांतील भिन्न नीरस मजकूर हा फेरफार आहे असें धरल्यास (उदाहरणार्थ, दशरथाचा ९ वर्षांनीं मृत्यू वगैरे प्रकारचा फेरफार) तो करण्यांत हेतु व्यक्त होत नाहीं.- संपादक}*{/kosh} या दोन कथानकांतील स्थलांचा फरकहि लक्षांत घेण्यासारखा आहे. वाल्मीकीनें अयोध्या नगर घेतलें आहे तर बौद्धांनीं बनारस शहर घेतलें आहे. या मुद्दयावर वेबरचें जें म्हणणें आहे त्यांत विशेषसें तथ्य नाहीं एवढेंच येथें नमूद केलें म्हणजे पुरें. ‘बौद्धांच्या अनेक जातककथांमध्यें बनारसचा उल्लेख येतो व बनारसचा राजा ब्रह्मदत्त हें जसें काहीं प्रत्येक जातकाचें पालुपद बनलें आहे’ असें शेरिंग यानें आपल्या ग्रंथांत† म्हटलें आहे. यावरून बौद्ध जातकांतील सर्व कथांचें स्थल सामान्यतः बनारस हें दाखविण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो व त्यामुळें दशरथाची कथा बनारसमध्यें घडली असें दाखविलें आहे. यासंबंधींच्या वेबरच्या मुद्दयांत कांहींच अर्थ दिसत नाहीं.

आतां या वरील वादविवादासंबंधानें मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो कीं बौद्ध जातककथांचा काल कोणता ? या प्रश्नाचा जरी वेबरनें विचार केलेला नाहीं तरी तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बौद्ध कथेवरून रामायण रचलें जाण्याच्या ऐवजीं रामायणावरूनच बौद्ध कथेचा उगम होणें व रामायण हें बौद्धकथेची सुधारून वाढविलेली आवृत्ती असण्याच्या ऐवजीं बौद्ध कथा हीच रामायणाची संक्षिप्‍त आवृत्ति असणें ही गोष्ट वेबरनें जें वर विरुद्ध विधान केलें आहे त्याच्या इतकीच निदान संभवनीय आहे. दोन्ही गोष्टी सारख्याच संभवनीय आहेत असें म्हणण्याचें कारण एवढेंच कीं ब्राह्मणांनीं एखाद्या बौद्ध कथानकांतील नायकास ब्राह्मणी स्वरूप देणें ही गोष्टच अतर्क्य दिसते. कारण त्यांनां जर बौद्ध संप्रदायाच्या विरुद्ध चळवळ करावयाची होती असें वेबर म्हणतो तर त्यांच्या कथानकांतील नायकांचें रूपांतर करणें ही गोष्ट अगदीं शेवटचा उपाय म्हणूनहि कोणी करणार नाहीं. उलटपक्षीं एखाद्या मुळापासून फुटून निघालेल्या पांखडी संप्रदायानें पूर्वींच्या एकत्र असतांना चालत आलेल्या परंपरागत कथा वगैरे आपल्या बरोबर नेण्याचा जास्त संभव आहे आणि अशा दृष्टीनें बौद्ध कथा ही मूळ ब्राह्मणी परंपरेंतील कथा असून तिला बौद्धांनीं आपल्या मतानुरूप वळण दिलें असावें असें समजणें जास्त सयुक्तिक आहे.



आतां आपण वेबर यास ग्रीक संस्कृतीचा व विशेषतः होमरच्या काव्यांचा रामायणावर जो स्पष्ट परिणाम झालेला दिसतो त्याकडे वळूं. या बाबतींत वेबरनें पुढें आणलेले मुद्दे फारसे महत्त्वाचे नाहींत. वेबरनें रामायण व होमर या काव्यांतील कांहीं पात्रांत जें ‘साम्य’ दाखविलें आहे तें बरोबर दिसत नाहीं. हेलेनला पळवून नेणारा स्त्रैण पारिस आणि जगज्जेता देवांसहि भयजनक असा सीतेचें हरण करणारा रावण यांच्यामध्यें काय साम्य असूं शकणा ? ग्रीक काव्यांतील नायिकेचा थिल्लरपणा आणि रामायणांतील जनककन्या सीता इची अलौलिक सात्त्विकता यांची तुलना कशी होणार ? अगॅमेम्नान हा मेलिलॉसचा भाऊ होता, सुग्रीव हा रामाचा भाऊ नव्हता. लक्ष्मण हा रामाचा भाऊ होता व त्याचा वध झालेला दाखविलेला नाहीं. परंतु पेट्रॉक्लस हा अचिलिस याचा भाऊ नसून त्याचा वध झालेला दाखविला आहे. रामाची तुलना जर अचिलिसबरोबर केली तर मेनिलॉसचा जोडीदार कोण ? आतां मेनिलॉस याची स्त्री पळवून नेलेली होती म्हणून त्याची जर रामाबरोबर तुलना केली तर ज्याच्या ‘रागामुळें ग्रीसवर दुःखांचा प्रवाह लोटला’ त्या अचिलिसशीं साम्य दाखवावयास कोण आणावयाचा ? तेव्हां मुख्य पात्रें स्वभावतःच भिन्न आहेत असें मानलें पाहिजे. आपणांला शेक्सपिअरचें ऑथेल्लो आणि स्कॉटचें केनिलवर्थ यांत पुष्कळ साम्य आढळतें म्हणून स्कॉटनें आपला व्हार्ने यागोवरून घेतला व डेस्डिमोनेवरून अ‍ॅमि घेतली असें कोणी म्हणत नाहीं. परंतु वेबरचा या मुद्दयावर कांहीं विशेषसा जोर नाहीं व तो अलेक्झांडरच्या स्वारीमुळें ग्रीक व भरतखंड यांचा जो संबंध आला होता त्यामुळें होमरच्या कथानकाच्या सारांशाशीं भारतीयांचा कांहीं तरी परिचय झाला असावा ही केवळ ‘गृहीत गोष्ट’ (assumption) म्हणून धरतो. यांतला ‘गृहीत गोष्ट’ हा शब्द महत्त्वाचा आहे व त्यापलीकडो त्या मुद्दयाची कांहीं किंमत नाहीं. आतां थोडें खोल जाऊन ही गृहीत गोष्ट कशावर आधारलेली आहे तें पाहूं.

 

आपणांला प्रथम डायो क्रिसोस्टोममध्यें आणि नंतर एलियनमध्यें होमरच्या ग्रंथाचें एक भारतीय भाषांतर असावें असा उल्लेख आढळतो. परंतु असें भाषांतर आजपर्यंत कांहीं कोठें जगाच्या पुढें आलेलें नाहीं. यामुळें वेबरला केवळ ‘ग्रीसप्रमाणें भरतखंडांतील लोकांसहि होमरच्या धर्तीवर असणार्‍या एका महाकाव्याची माहिती होती’ एवढें ‘मत’ प्रदर्शित करूनच थांबावें लागलें. नंतर वेबरनें महाभारतावर झालेला ग्रीक काव्याचा परिणाम याबद्दल ऊहापोह करून शेवटीं ‘रामोपाख्यान हा भाग रामायणाचें ज्ञान असल्यामुळेंच भारतांत आला ही गोष्ट शक्य आहे; रामायण हा ग्रंथ त्या कालीं होताच असें सिद्ध करणारा हा कांहीं पुरावा नव्हे’ असें म्हटलें आहे. यावर असें म्हणतां येईल कीं जर होमरचें भाषांतर भरतखंडांत नव्हतें ही गोष्ट वेबरला कबूल आहे तर त्या काव्याची संक्षिप्‍त आवृत्ति तरी होती हें कशावरून ? होमरचें भाषांतर किंवा संक्षिप्‍त आवृत्ति यांपैकीं कांहींहि येथें नसून केवळ या काव्यांचें ग्रीक काव्याशीं कांहीं वरवर साम्य आढळलें त्यावरूनच केवळ वर उल्लेखिलेल्या डायो क्रिसोस्टोम आणि एलियन या ग्रंथकारांचे भरतखंडांत होमरचें एखादें भाषांतर असावें असें मत झालें असावें. एकंदरींत या बाबतींत केवळ कल्पनांवर भिस्त ठेवलेली असून स्पष्ट मत कोणत्याच बाजूचें देतां येत नाहीं. वेबरच्या ‘गृहीत गोष्टी’स आधार काय तो या दोन काव्यांतील कांहीं कांहीं प्रसंगांमध्यें अर्धवट साम्य दिसतें हाच राहतो. आतां वेबरनें दाखविलेल्या साम्यापैकीं दोन गोष्टी तर महावंसो व बुद्धघोषाची धम्मपदावरील टीक यांसंबंधींच असल्यामुळें त्या सोडून दिल्या तर तिसरें साम्य केवळ ‘कादाचित्’ म्हणूनच दाखविलें आहे. हें साम्य रामायणामध्यें सीतेला रामानें धनुष्य वांकविण्याच्या पणांत जिंकलें यासारखीच गोष्ट जनकजातकांत व ओडेसीमध्यें आढळते हें होय. त्याप्रमाणेंच जनकजातकामध्यें दुसरी एक गोष्ट ओडेसीमधल्या एका गोष्टीसारखी असून ती या धनुष्याच्य गोष्टीला जोडून दिली आहे. यावरून वेबर असें म्हणतो कीं या गोष्टींचा संबंध जर होमरशीं जोडतां आला तर रामायणांतील हा प्रसंग होमरवरून घेतला असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु वरील साम्य एखाद्या विद्वानानें दोन ग्रंथांपैकीं एकावरून दुसरा रचला एवढें म्हणण्यास पुरेसें धरणें हें चिकित्सक बुद्धीला पटेसें नाहीं. डायो क्रिसोस्टोम याला जो होमरसारखा ग्रंथ वाटला तो कदाचित् प्रत्यक्ष रामायणच असून होमरचें कांहीं गोष्टींत त्याशीं साम्य त्यास दिसल्यावरून त्यानें तसें विधान केलें असावें. इतर जीं किरकोळ साम्यें, उदाहरणार्थ, हनुमानाची सूर्यास स्तब्ध राहण्याची आज्ञा, रामानें अश्वमेधाच्या वेळीं सीतेची सुवर्णप्रतिमा करून तिजबरोबर शयन करणें इत्यादि, तीं वेबरलाच कमी महत्त्वाचीं वाटून त्यानें त्यांवरून कांहींच अनुमानें काढलीं नाहींत. अश्वपति या नांवाबद्दल बोलावयाचें तर अश्वपति आणि केकय हीं दोन्हीं नांवें पाणिनीच्या सूत्रांत आढळतात; {kosh पाणिनी ४. १. ८४; ७.३.२.}*{/kosh}  व पाणिनी अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वीं होऊन गेला याबद्दल कोणचाच मतभेद नाहीं.

यावरून वेबरचें जें म्हणणें कीं रामायणाचें कथानक हें बौद्ध कथेची नक्कल, तें कितपत सयुक्तिक आहे हें दिसून येईल. वेबरच्या कल्पनेच्या उलट बौद्धांनींच रामायणांतील कथा घेऊन तिचें रूपांतर केलें असण्याचा संभव आहे. रामायण व होमरचीं काव्यें यांतील जीं साम्यें वेबरनें पुढें आणलीं आहेत तीं केवळ आकस्मिक आहेत. ब्राह्मण व बौद्ध हे पूर्वींच्या एकाच परंपरेंतून निघालेले असल्यामुळें त्या दोघांतहि या कथेचें कथासूत्र परंपरेनें चालत आलें असावें  व ब्राह्मणांमध्यें महाकवि वाल्मिकि उत्पन्न झाल्यामुळें त्यानें त्या सूत्रावरून रामायणासारखें काव्य निर्माण केलें तर बौद्धांनीं आपल्या समजुतींस अनुरूप अशी जातककथा तयार केली अशी खरी गोष्ट असावी. एकंदरींत वेबरचें म्हणणें फार तर ‘असिद्ध’ या सदराखालीं येईल, बर्नेलच्या म्हणण्याप्रमाणें ‘जवळजवळ संशयाच्या पलीकडे सिद्ध’ झालेलें धरतां येणार नाहीं.

आतां आपण वेबरनें ग्रंथांतर्गत पुराव म्हणून जो पुढें मांडला आहे त्याकडे वळूं. प्रथमतः या ग्रंथांचें संस्कृत वाङ्‌मयामध्यें कालानुक्रमानें स्थान ठरवितांना वेबर हा ग्रंथ फार मोठा असल्यानें तो एकानेंच लिहिलेला असणें शक्य नसून त्याला सध्यांचें स्वरूप प्राप्‍त होण्यापूर्वीं अनेक शतकें त्यामध्यें भर पडत असली पाहिजे असें म्हणतो. आतां कांहीं विशिष्ट श्लोक किंवा लहान लहान उतारे अथवा कांहीं कथानकें मूळच्या वाल्मीकीच्या ग्रंथाला मागाहून जोडण्यांत आलीं असलीं तरी तेवढ्यावरूनच केवळ हा ग्रंथ अनेक ग्रंथकारांनीं रचलेला आहे असें कांहीं म्हणतां येणार नाहीं. भवभूति आणि कालिदास यांसारखे ग्रंथकार जर उत्तरकांडांतील कथा रामायणांतील म्हणूनच धरून चालतात आणि उत्तरकांड तर वेबरच्या मतानेंहि मूळ रामायणाला मागाहून जोडलेलें आहे तर उत्तरकांड जोडलें जाण्याचा काल आणि भवभूति आणि कालिदास यांचा काल यांमध्यें किती अंतर असलें पाहिजे ? आणि त्या मानानें मूळ रामायणांत आणि कालिदासभवभूति यांच्या कालांत किती अंतर धरलें पाहिजे ? विश्वमित्र आणि परशुराम यांच्या कथानकांबद्दलहि हीच गोष्ट. दोहोंतहि क्षात्रवृत्तीचा ब्राह्मवृत्तीवर विजय दाखविलेला आहे. वसिष्ठ म्हणतो कीं माझें सामर्थ्य विश्वामित्राच्या सामर्थ्याबरोबर नाहीं. या ठिकाणीं रामायणांत विश्वामित्राची बरीच स्तुति केली आहे. आतां पंतजलीच्या महाभाष्यांत असें दाखविलें आहे कीं, विश्वमित्रानें पुन्हां पुन्हां तपश्चर्या करून स्वतःला, आपल्या पित्याला व आपल्या पितामहाला ऋषिपद प्राप्‍त करून घेतलें. अर्थात् जो स्वतःलाच केवळ नव्हे तर आपल्या पितरांसहि ऋषिपद प्राप्‍त करून देतो त्याचें सामर्थ्य बरेंच मोठें असलें पाहिजे व ही गोष्ट जर रामायणाच्या कालीं प्रसिद्ध असती तर ती वरील प्रसंगीं जेथें विश्वमित्राची एवढी स्तुति केली आहे त्या ठिकाणीं अवश्य नमूद केली गेली असती. ती तशी तेथें नमूद केलेली नाहीं यावरून ही गोष्ट रामायणकालीं माहीत नव्हती म्हणजे रामायणातील पंतजलीच्या पर्वीं रचलें गेलें होतें. परशुरामासंबंधींहि तसेंच म्हणतां येईल. एकंदरींत या दोन्ही गोष्टी रामायणाच्या रचनाकालीं लोकांच्या समजुतींच्या विरुद्ध नव्हत्या असें दिसतें.

आतां कांबोज, पल्हव, यवन, शक, बर्बर, म्लेच्छ, तुषार, हारित, किरात इत्यादि ज्या लोकांचा उल्लेख आला आहे त्यांतील यवनांचा उल्लेख बॅक्ट्रियन, ग्रीक किंवा त्यांचे वंशज यांच्याबद्दल असावा असें वेबरचें म्हणणें. परंतु याविरुद्ध लासेन यानें असें म्हटलें आहे कीं यवन या शब्दानें ग्रीक किंवा आयोनियन ध्वनित होत नसून तो शब्द सेमिटिक लोकांसहि लावला जात असे. मॅक्स मुल्लरचेंहि मत असेंच आहे व यवन हा शब्द पाणिनींत {kosh पाणिनी सूत्र ४.१.४९.}*{/kosh} आलेला आहे. कंबोज हा शब्द देखील पाणिनींत आहे. {kosh पाणिनी ४. १-१७५}*{/kosh} या निरनिराळ्या लोकांत काय फरक आहे हें भारतीयांस नक्की ठाऊक नसल्यामुळें हे शब्द अनिश्चितपणें लावले जात; व जेव्हां कवीच्या मनांत स्वकीय सैन्याचा पराजय करावयाचा होता तेव्हां त्यानें परकीयांची यादी घेतली ही गोष्ट वाल्मीकीसारख्या प्रतिभासंपन्न कवीमध्यें अगदीं स्वाभाविक आहे. अर्थात् ही यादी घेण्याची गोष्ट वाल्मीकीस बॅक्टियन, ग्रीक अथवा शक लोकांच्या स्वारीवरून सुचली असें सिद्ध होत नाहीं.

आतां सिंहलद्वीप हें ग्रीक लोकांस तपोवन, सिहंल अथवा पलिसिमुंदु एवढ्याच नांवांनीं ठाऊक होतें, परंतु रामायणांत त्याचा उल्लेख लंका म्हणून आलेला आहे. हें नांव आपणास प्रथम महावंशोमध्यें व अथर्ववेदाच्या परिशिष्टांत आढळतें व नंतर आर्यभट्ट आणि वराहमिहिर यांच्या ग्रंथांत आढळतें, तेव्हां लंका हें नांव सिहंलद्वीपास मागाहून मिळालेलें असावें, व तें नांव देणारा ग्रंथ ग्रीक लेखकांच्या नंतरचा असावा असें वेबर म्हणतो. पण लंका हें नांव सिंहल या नांवाच्या पूर्वीं प्रचारांत असून मध्यंतरी सिहंल नांव येऊन पुन्हां पुढें लंका हें नांव जर नंतरचें तर सध्यां आपण पूर्वींचे सिंहल पुन्हां कां वापरतों ? जर सिंहल पुन्हां रूढ होऊं शकतें तर लंका हें पूर्वीं रूढ असून पुन्हां रूढ झाल्याची गोष्टहि तितकीच संभवनीय आहे. {kosh लंका हा शब्द द्राविड भाषांत असून त्याचा अर्थ नुसता बेट असा आहे. विशिष्ट शब्दाला द्राविडांनीं केवळ बेट या अर्थी सामान्य नाम समजणें आणि त्याच शब्दाला उत्तरेकडील लोकांनीं विविक्षित बेटांचें नांव समजणें स्वाभाविक आहे- संपादक}*{/kosh}

आतां आपण वेबरच्या वाङ्‌मयविषयक आधारांकडे वळूं. हे सर्व आधार त्यास फक्त गौड प्रतींतच मिळाले. आतां असेंहि म्हणतां येईल कीं हे सर्व आधार फक्त गौड प्रतीलाच लागू आहेत; व ही गोष्ट वेबरलाहि मान्य आहे. वेबरचें म्हणणें कीं रामायणाच्या रचनेपूर्वीं संस्कृत वाङ्‌मयाची वाढ बरीच झाली होती व त्यामुळे सापेक्षत्वानें (Comparatively) रामायण हें अर्वाचीन आहे. पण येथें सापेक्षत्वानें म्हणजे काय हें वेबरनें स्पष्ट केलें नाहीं व तुलनेकरितां कोणतें वाङ्‌मय घ्यावायाचें तें नीटसें दिलें नाहीं. त्याप्रमाणेंच संस्कृत वाङ्‌मयाची वाढ रामायणापूर्वी झाली होती ती ख्रिस्ति शकाच्या पुष्कळच पूर्वी झाली असण्याचाहि संभव आहे व त्यामुळें नक्की कालनिर्णयास मदत होत नाहीं. आतां कोणत्या वाङ्‌मयाची वाढ झाली होती हें पहावयाचें म्हटल्यास वेदांबद्दल प्रश्नच नाहीं. वेदांगांचा उल्लेख पंतजलीनें उद्धृत केलेल्या एका वाक्यांत आहे. {kosh Introduction p. 4. (Benares Edition.)}*{/kosh}  वेदांगांपैकीं शिक्षा या ग्रंथावर वेबरचा बराच जोर दिसतो. या ग्रंथाचा कर्ता पाणिनी मानला जातो आणि सायणानें शिक्षेवरील कांहीं प्रकरणें ब्राह्मणांत होतीं असें म्हटलें आहे व मॅक्स मुल्लरला तें मान्य आहे. सूत्र आणि कल्प यांचा उल्लेख पाणिनींत आहे. {kosh पाणिनी ४.२.६५; ४.३. १०५.}*{/kosh}  कल्पसूत्राचा पतञ्जलींत आहे. धनुर्वेद इत्यादिकांचा उल्लेख छांदोग्यांत आहे. {kosh Bid. Ind. Edi. p. 475, 478, 493.}*{/kosh} नाटक, धर्मशास्त्र यांचा उल्लेख पतञ्जलींत आहे. {kosh पाणिनी सूत्र ३. १. २६; १. २. ६९}*{/kosh} न्याय आणि नैय्यायिक यांचा पाणिनी (४. २. ६०) शीं संबंध आहे. ‘न्याय’ शब्द गणपाठांत आहे. नास्तिकांचा उल्लेख पाणिनींत || {kosh पाणिनी ४. ४. ६०}*{/kosh} आहे आणि लोकायतिकांचा पतञ्जलींत आहे.  {kosh पाणिनी ७.३. ४४. वरील भाष्यांत.}*{/kosh}

त्याप्रमाणेंच वेबरनें जीं अवतरणें घेतलीं आहेत तीं त्याच्या मतास पोषक नसून कांहीं तर त्याच्या विरुद्ध आहेत. तीं आता अपरिचित असून त्यांच्या ग्रंथकारांची नांवेंहि नष्टस्मृति झालीं आहेत. त्याप्रमाणेंच त्यानें कात्यायन, जाबालि, धन्वंतरि यांचा उल्लेख केला आहे त्यावरून काय  अनुमान निघतें तेंहि नीट दिसत नाहीं. संस्कृत आणि शास्त्र या शब्दांबद्दलहि असेंच म्हणतां येईल. ‘शास्त्र’ शब्द पतंजलीनें एकटा व समासान्त असा दोन्ही तर्‍हेनें उपयोगिलेला आढळतो. {kosh पाणिनी १. १. ६ वरील भाष्य.}*{/kosh}

कृष्ण व राम यांच्या उपासनांबद्दल असें म्हणतां येईल कीं, रामोपासना ही वैष्णवोपासनासोपानांतील कृष्णोपासनेपूर्वींची पायरी व कृष्णोपासना रामायणामध्यें आढळत नाहीं या दोन गोष्टी जर वेबरला कबूल आहेत तर रामायण हें कृष्णोपासनेपूर्वींचे ही गोष्ट सिद्ध होते. कृष्णोपासना ही पंतजलि व पाणिनि यांच्या कालीं होती हें पाणिनीवरील भाष्यावरून आपणांस समजतें. {kosh पाणिनि ४. ३.  ९८ वरील भाष्य.}*{/kosh}

रामायण आणि महाभारतामध्यें जें व्याकरणनियमांपासून स्वातंत्र्य घेतलेले आढळतें त्या संबंधानें या ग्रंथांची परस्पर तुलना केली तरी ती या दोन ग्रंथांचाच केवळ सापेक्ष काल ठरविण्याच्या कामीं उपयोगास येईल. तसेंच रामायणाच्य बर्‍याच सर्गांच्या अखेरीस जे भिन्न वृत्तांतील श्लोक आहेत त्यांवरून कथानकाला कांहींच मदत होत नाहीं व ते प्रक्षिप्‍त असले पाहिजेत.

आतां ज्योतिषविषयक गोष्टींचा रामायणांत उल्लेख येतो हा जो वेबरचा मुद्दा त्यापैकीं नक्षत्रज्ञान तर भारतीयांस वेदकालापासून होतेंच व राशींचा उल्लेख काय तो एकदांच आला आहे. आतां मंगळाचा युद्धाशीं, बुधाचा व्यापाराशीं व गुरूचा यज्ञविधीशीं जो संबंध जोडण्यांत आला आहे, त्यांत मंगळाचा रंग लाल असल्यामुळे रक्ताशीं सादृश्य कल्पून त्याचा युद्धाशीं संबंध जोडणें सहाजिक आहे; व गुरु या अर्थ आचार्य असल्यामुळें त्याचा यज्ञविधीशीं संबंध जोडला जाणेंहि स्वाभाविकच आहे; तसेंच बुध हा बुद्धिवान् ग्रह असल्यामुळें त्याचा व्यापाराशी संबंध जोडला गेला असेल.

यांनतर वेबर रामायण ग्रंथाचा उल्लेख कोणकोणत्या प्राचीन ग्रंथांत आढळतो तें पाहतांना म्हणतो कीं ज्यांचें प्राचीनत्व निर्विवाद आहे अशा ग्रंथांत रामायणाचा उल्लेख आढळत नाहीं. परंतु यावरून तो बर्‍याच प्राचीन काळी उपलब्ध नव्हता असेंहि सिद्ध होत नाहीं. आतां महाभारतामध्यें रामायणाच्या कथेचा उल्लेख आहे. हा महाभारताचा भाग किती जुना आहे हें पाहूं गेल्यास गोल्डस्टकर याच्या मताप्रमाणें महाभारतांतील सर्वांत अर्वाचीन म्हणजे बुद्धानंतरचा भाग सुद्धां ख्रिस्ती शकाच्या उदयापर्वींचा आहे व त्याच्या मताप्रमाणें कांहीं भाग खात्रीनें बुद्धनिर्वाणाच्या पूर्वींचा असावा असें म्हणतां येईल. तेव्हा वेबरनें रामायणाचा उल्लेख असलेला महाभारताचा भाग ख्रिस्तपूर्वकालचा असणें शक्य नाहीं ही गोष्ट सिद्ध करावयास पाहिजे होती. शिवाय रामायणाचा उल्लेख महाभारतांत आढळतो पण महाभारताचा उल्लेख मात्र रामायणआंत कोठेंच आढळत नाहीं.त्याप्रमाणेंच कौरव, पांडव अथवा दुसरी एखादी महाभारतांतील व्यक्ति रामायणांत मुळींच आढळत नाहीं. वेबरनें रामकथेचा उल्लेख सामवेदाच्या कर्मप्रदीप नांवाच्या परिशिष्टांत आला आहे असें म्हटलेंच आहे. हा उल्लेखिलेला  कथाभाग उत्तरकांडांतील असून उत्तरकांड हें तर रामायणांतील सर्वांत अखेरचा व अर्वाचीन भाग आहे. हें परिशिष्ट कांहीं रामकथेचा उल्लेख आहे म्हणूनच केवळ अर्वाचीन मानलें जाणार नाहीं. त्याचा काल इतर साधनांनीं निश्चित केला पाहिजे व तसा वेबरनें केला नाहीं. वेबरच्या मतें हें परिशिष्ट कात्यायनाच्या नांवावर मोडतें पण सर्वसामान्य समजूत तर अशी आहे कीं श्रुति सर्व अपौरुषेय आहेत. आतां हा कात्यायन जर पाणिनीच्या सूत्रांवरील वार्तिक रचणारा असेल तर रामायणाचा काल पुष्कळच मागें जातो. परंतु हें सामवेदपरिशिष्ट उपलब्ध नसल्यामुळें तेथें त्याबद्दल फारसें विवेचन करतां येत नाहीं.

कालिदास हा रघुवंशामध्यें रामायणाचा आद्यकाव्य म्हणून व वाल्मीकीचा आद्यकवि म्हणून उल्लेख करितो. आतां कालिदासाच्या कुमारसंभावंतील एक श्लोक पंचतंत्रामध्यें दोन वेळां उद्धृत केलेला आढळतो. {kosh Kosegarton’s Edi. p. 59 p. १02  मुंबई प्रतींत एकदांच आढळतो. पृ. ६३.}*{/kosh}  नौशिर्वान या इराणच्या बादशहानें ख्रि. श. ५३१-५७९ यांच्या दरम्यान पंचतंत्राचें मूळ संस्कृतवरून भाषांतर केलें. यावरून पंचतंत्र अगदीं अलीकडे म्हटलें तरी फार तर पांचव्या शतकाच्या अखेरीस रचलें गेलें असें म्हणतां येईल. यावरून कालिदास फार तर ४ थ्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला असें म्हणतां येईल. परंतु आपणांजवळ असलेल्या प्रतींच्या प्रामाण्याबद्दल संशय असल्यास त्याचें निराकरण भाषांतरावरून होतें. फारसी ‘अनवारि सोहिली’ या पंचतंत्राच्या दुसर्‍या एका या भाषांतरांत वरील श्लोकाच्या उत्तरार्धाशीं समानार्थक शब्द त्याच गोष्टींत आढळतात. आतां हें भाषांतर केवळ शब्दास शब्द असें नाहीं; कारण तें मूळ संस्कृतवरून केलेलें भाषांतर नाहीं. एकंदरींत कालिदासाचा वरील श्लोक अगदीं पंचतंत्राच्या पहिल्या भाषांतरांत असला पाहिजे आणि कालिदास जर ४ थ्या शतकामध्यें होऊन गेला असला तर वेबरच्या मताप्रमाणें २ र्‍या शतकांत होऊन गेलेल्या वाल्मीकीला तो आद्यकवि व त्याच्या काव्यास आद्यकाव्य म्हणेल हें अशक्य आहे. वेबरनें आपल्या दुसर्‍या एका लेखाचा उल्लेख केला आहे त्यांत त्यानें कालिदास ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या किंवा सहाव्या शतकांत होऊन गेला असावा असें धरलें आहे. आतां यांपैकीं जर पहिला काल घेतला तर रामायणाच्या कालाबद्दलचें वेबरचें सर्वच बोलणें फोल ठरतें.

आतां योध्याकांडामध्यें बुद्धाचा उल्लेख ज्या श्लोकांत आला आहे तो श्लोक श्लेजेलच्या मताप्रमाणें प्रक्षिप्‍त आहे पण वेबर म्हणतो कीं या गोष्टीचा पुन्हा विचार केला पाहिजे. परंतु हा श्लोक गोरेसिओ याच्या प्रतींत मुळीच आढळत नाहीं व बुद्धाचा पुढें कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं. या ठिकाणींहि बुद्धाचा उल्लेख संदर्भात धरून नाहीं. या गोष्टी तो श्लोक प्रक्षिप्‍त आहे हेंच दाखवितात.

याप्रमाणें रा. तेलंग यांनीं वेबरच्या लेखाचा विचार करून नंतर आणखी कांहीं मुद्दे स्वतःचे मांडले आहेत ते पुढें देतों.

रामायणांतील व्यक्तींच्या नांवांबद्दल पाणिनींतील उल्लेख पाहतां ऐक्ष्वाक, कैकयी आणि कौसल्या इत्यादि शब्दांचीं रूपें नियमानुसार आहेत असें दाखविलें आहे. यावरून विशेष कांही बोध होत नाहीं पण एवढें खरें कीं, पाणिनींत जीं रूपें विशेष असतील तींच तेवढीं यावयाचीं. पतञ्जलीमध्यें पाणिनीच्या २. २.३४ सूत्रावरील भाष्यांत ‘प्रासादे धनपतिरामकेशवा नाम्’ असें वाक्य आढळतें. पण यांतील राम या शब्दानें निश्चयात्मक कोणती व्यक्ति दाखविली जाते हें सांगतां येत नाहीं.
गणपाठाकडे वळलें असतां बाह्यादि गणांत (पाणिनी ४.१. ९६) सुमित्रा शब्द आढळतो. व त्यावरून सौमित्रि हा शब्द तयार होतो म्हणजे आपणास लक्ष्मण व त्याची आई यांचीं नांवें मिळतात.

आतां गणपाठ हा कालानुक्रम ठरविण्याकरितां केवळ आधार घेऊन चालणार नाहीं हें खरें, तथापि याच गणांत पुढें रामशब्द आलेला आहे व मध्यंतरी पुष्करसद्  हा शब्द आलेला आहे. यावरून पौषकरसद असें तद्धित रूप होतें व पौष्करसद हें कात्यायनानें उल्लेखिलेल्या एका व्याकरणकाराचें नांव होतें. तेव्हां सुमित्रा हा शब्द कात्यायनापूर्वीं या बाह्यादि गणांत होता असें म्हणावयास हरकत नाहीं. आतां या गणांत कांहीं शब्द नंतर घातले असतील व ते अनुक्रमानें शेवटीं न घालतां मध्येंहि घातले असतील अशी शंका कोणी घेईल; पण निदान मध्येंच घालण्याचा संभव नसण्यास तीन कारणें आहेत. एकतर या आकृतिगणांत मध्येंच शब्द घालण्याचें कांहीं विशेष प्रयोजन नाहीं. दुसरें, असा शब्द घालणार्‍याच्या मनामध्यें कांहीं तरी अप्रमाणिक हेतु होता असें गृहीत धरावें लागतें; व तिसरें, याप्रमाणें आपण पुढील शब्द मागाहूनचे धरूं लागल्यास पहिल्या शब्दाशिवाय पुढच्या सर्वांचीच तीच अवस्था होईल. सुमित्रा शब्दाप्रमाणेंच रवण आणि ककुत्स्थ हें शब्द शिवादि गणांत (पाणिनि ४.१.११२) आलेले आहेत; व त्यांवरून रावण आणि काकुत्स्थ हे शब्द तयार होतात. या गणांत ऋष्टिषेण शब्द बराच नंतर आला असून त्याचा उल्लेख महाभाष्यांत याच गणांत आहे म्हणून आला आहे. त्याप्रमाणेंच सौमित्रि हा शब्द गहादि गणांत आढळतो  (पाणिनि ४.२. १३८) आणि रावणि, पौष्करसादि हे शब्द तौल्वल्यादि (पाणिनि २. ४. ६१) गणांत सांपडतात. तसाच केकय हा शब्द भर्गादि गणांत (४.१.१७८) तिसरा आहे व त्यापासून पुढें कैकयि शब्द होतो. याप्रमाणेंच राम, बिभिषण, पंपा, किष्किंधा, लंका इत्यादि शब्द गणपाठांत आढळतात.

रामायणामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव या तिहींचा उल्लेख असून तीं मुख्य दैवतें अशा समजुतीनें उल्लेखिलीं आहेत. पण शिव व विष्णु हीं परमेश्वराचीं रूपें असें त्यांचें रूप पतञ्जलींतहि आढळतें व ब्रह्म्याचाहि उल्लेख पतञ्जलींत आहे. रामायणांत त्यांचें त्रैमूर्तीमध्यें ऐक्य झाल्याचें दिसत नाहीं; परंतु कालिदासाच्या कुमारसंभव व रघुवंश यांमध्यें तसें दिसतें. रामायणांत इन्द्राचाहि सामर्थ्यवान् दैवत म्हणून उल्लेख आहे. {kosh Gorresio Balkanda XIV. 5}*{/kosh}  रामायणामध्यें रामाच्या विवाहाचें जें वर्णन आहे त्यावरू त्या वेळचा विधि बराच साध्या स्वरूपाचा दिसतो, पण कालिदासानें कुमारसंभवामध्यें शिवपार्वती यांच्या विवाहाचें वर्णन केलें आहे तें बरेंच थाटाचें आहे, या गोष्टींवरून रामायण  आणि कालिदास यांच्या कालांत किती अंतर असलें पाहिजे याची कल्पना येईल.

वरील निबंध रा. तेलंग यांनीं मुंबईस ‘स्टूडंट्स् लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटी’ पुढें २ सप्टेंबर १८७२ रोजीं वाचला. त्यानंतर प्रसिद्ध करतेवेळीं त्यास त्यांनीं कांहीं मजकूर टीपा व परिशिष्ट या रूपानें जोडला; तो पुढें दिला आहे.

दशरथजातकामध्यें शेवटीं बुद्ध स्वतः आपण राम होतों व त्याच्या सभोंवतींच्या निरनिराळ्या व्यक्ती वगैरे रामायणकालीं कोण होत्या हें सांगतो, यावरून बुद्ध हा एखाद्या जुन्या कथेचा आपल्या कार्याकरितां उपयोग करून घेत होता हें त्या ठिकाणीं स्पष्ट दिसतें. रामायणांतील कांही श्लोक दशरथजातकांतील कांहीं पाली श्लोकांशीं जुळतात यावरूनहि हीच गोष्ट सिद्ध होते. बौद्ध लोकांनी रामायण ही मूळची आपली कथ असून नंतर ती ब्राह्मणांनीं घेऊन तींत फिरवाफिरवी करून आपला मोठेपणआ वाढविण्यास तिचा उपयोग केलेला पाहिला असता तर त्यांनीं तशी त्याविरुद्ध लागलीच ओरड केली असती. पण तसें कोठें दिसत नाहीं. आतां बौद्धांच्या कथेला एवढें महत्त्व कधीं नसल्यामुळें ब्राह्मणांनीं त्या बाबतींत स्वस्थ बसणें सहजच संभवतें. {kosh या बाबतींत शेरिंग याचा बनारस (पृ. ७), राजेन्द्रलाल मित्र याचा ललितविस्तर (पृ. ११,१७), बर्नाफनें तथागत या शब्दाचें केलेलें विवेचन आणि टर्नरनें पाली बौद्ध ऐतिबासिक ग्रंथांचें केलेलें परीक्षण (नं. ३ पृ. १) हीं पाहण्यासारखीं आहेत.}*{/kosh}

महावंसोमध्यें एक लंकेवरील रावण राजाची कथा असून त्याच्या दुष्ट कृत्यांमुळें प्रलय झाल्याचें वर्णन आहे. {kosh Hardy’s Legends of Buddhism p. 8.}*{/kosh}

राजतरंगिणीमध्यें दामोदर राजाला शाप मिळाल्याची कथा आहे; व त्याला पुढील श्लोकांत उश्शाप मिळाला आहे.

अशेषमेकेनैवाह्ना श्रुत्वा रामायणं तव।
शापस्य शान्तिर्भवितेत्यूचिरे ते प्रसादिताः।। {kosh राजतरंगिणी कलकत्ता प्रत पृ. ६. १८३५.}*{/kosh}

दामोदर हा हुष्क, जुष्क व कनिष्क यांच्या पूर्वींच्या लगतचा राजा होता. तो अशोकाचा वंशज होता. वेबरनें लासेनच्या मताप्रमाणें याचा काल ख्रिस्तपूर्व पहिलें शतक दिला आहे. यावरून रामायण या कालीं अपूर्ण असावें व तें यवन आणि शक यांच्या राज्यांच्य दरम्यानच्या काळांत लिहिलें गेलें असावें असें वेबर म्हणतो. परंतु या वरील श्लोकांत रामायणाच्य रचनाकालासंबंधानें कांहीं उल्लेख नाहीं व त्याच्या अपूर्णतेबद्दलहि उल्लेख नाहीं. उलट या श्लोकावरून असें दिसतें कीं, रामायण या वेळीं पूर्ण असून तें इतकें पवित्र मानलें जात असावें कीं त्याच्या श्रवणापासून पातकाचें क्षालन होतें अशी समजू असावी.

आतां दामोदर राजाचा काल कोणता येतो तें पाहूं. प्रिन्सेप कनिष्काचा काल ख्रि. पू. ११८ देतो व  त्यावरून दामोदराचा काल सुमारें ख्रि. पू. १७५ येतो. {kosh Princep’s Essays by Thomas, Vol. I pp. 39,40, १0१.}*{/kosh} प्रोच विल्सनच्या मतें कनिषकाचा काल ख्रि. पू. ३८८ हा असावा. {kosh Cited by Princep p. 40 above}*{/kosh} यावरून दामोदराचा काल त्याच्याहि पूर्वीं जातो. रा. राजेन्द्रलाल मित्र आपल्या ललितविस्तराच्या भाषांतरांत कनिष्काचा काल ख्रि. पू. १४३ देतात. जी. टर्नर हाच काल ख्रि. पू. १०३ असावा असें म्हणतो. {kosh Examination of Pali Buddistic Annal.}*{/kosh} मॅक्स मुल्लर हा लासेनच्या मताप्रमाणें ख्रिस्तशकाच्या आरंभाच्या पूर्वीं कांही वर्षें अगर नंतर कांहीं वर्षें असा कनिष्काचा काल धरितो. परंतु त्याच्या कारकीर्दीचा आरंभ नक्की ठरविणें कठिण आहे असें म्हणतो. गोल्डस्टकर हा कनिष्कचा समकालीन नागार्जुन याचा काल ख्रि. पू. १४३ ठरवितो.{kosh पाणिनि. पृ. ३०}*{/kosh} आतां यावरून आपणास कनिष्काचा काल सुमारें ख्रि. पू.१४३ व दामोदराचा काल ख्रि. पू. १७५ धरावयास हरकत नाहीं. त्यावेळीं रामायणाचें वरील श्लोकांत दर्शविलें आहे इतके पावित्र्य मान्य झालें होतें, तेव्हां त्या मानानें त्याचा रचनाकाल बराच पूर्वींचा असला पाहिजे असें म्हणावें लागतें.

वेबरनें या राजतरंगिणींतली श्लोकाबद्दल अविश्वास दाखविला आहे, पण तो श्लोक तेथें घालण्यांत कर्त्याचा कांहीं विशिष्ट हेतु असावा असें दिसत नाहीं; तो तेथें स्वाभाविकच दिसतो. प्रिन्सेपच्या निबंधांत $ {kosh Princep’s Essays Vol.}*{/kosh} एका शिलालेखाचें भाषांतर दिलें आहे. तो लेख ख्रिस्ती शकाच्या दुसर्‍या शतकांतील असून प्रो. विल्सनच्या मतें त्यांत रामाच्या सेतूचा उल्लेख आहे. पण तो लेख नीट लागलेला नसल्यामुळें त्याबद्दल विशेष लिहितां येत नाहीं.

भर्तृहरीच्या नीतिशतकामध्यें दशावतारांचा उल्लेख आहे. {kosh II p. 68.}*{/kosh}  यावरून त्यास रामयाणाची सर्व कथा ठाऊक असावी. तसाच परशुरामाचा अवतारांमध्यें समावेश केला आहे. पण कालिदासाच्या रघुवंशामध्यें § {kosh सर्ग ११}*{/kosh} अथवा वाल्मीकीरामायणामध्यें परशुरामाचा अवतारांमध्यें समावेश केलेला आढळत नाहीं. मेघदूतांमध्यें परशुरामाचा फक्त भृगुपति असा उल्लेख केलेला आहे, पण वामनाचा विष्णु म्हणून उल्लेख केला आहे, यावरून कालिदास आणि भर्तृहरि यांच्यामध्यें बराच काळ लोटला असावा असें दिसतें. परंतु शाकुंतलांतील ** {kosh William’s Sakuntala pp. 194-5.}*{/kosh}  एक श्लोक जशाचा तसाच नीतिशतकामध्यें {kosh Bohlen’s Bhartrihari p. 46-7 हा श्लोक भर्तृहरीच्या निरनिराळ्या १२ प्रतींत आढळतो.}*{/kosh} आढळतो. आतां कालिदासानें हा श्लोक भर्तृहरीमधून घेऊन आपल्या पात्राच्या तोंडीं घातला असावा असें म्हटलें तर वरील गोष्टीस बाध येतो.

हा श्लोक सामान्य विद्वद्वर्गामध्यें प्रचिलत असें जें परंपरागत सुभाषितवाङ्‌मय असतें त्यामधून दोघांनींहि घेतला असण्याचा संभव आहे. पण असें असणें कांहीं अंशींच संभवनीय म्हणतां येईल. निश्चितपणें असें विधान करतां येणार नाहीं. कारण नाटकामध्यें व संभाषणामध्यें असलीं प्रचलित सुभाषितें कर्त्यानें घेऊन पात्रांच्या तोंडीं घालणें स्वाभाविक आहे पण नीतिशतकासारख्या ग्रंथांत आपण हें सुभाषित परक्याचें ठरविलें तर कदाचित् सर्व श्लोकांबद्दलहि तेंच म्हणतां येईल व भर्तृहरीला कांहींच शिल्लक राहणार नाहीं.

डॉ. भाऊ दाजी यांनीं भर्तृहारि हा राजतरंगिणींत उल्लेखिलेला भर्तृमेन्थ असावा व तो कालिदासाचा समकालीन असावा असें धरिलें आहे. पण ही केवळ गृहीत गोष्ट आहे. {kosh JBB RAS. १862. (Vol. VI. No. XXI) p. 2१8}*{/kosh}  उलटपक्षीं सरस्वतीकण्ठाभरणांत भर्तृहरि व भर्तृमेन्थ या दोहोंचाहि उल्लेख आहे. {kosh Aufrecht’s Catalogue 2090}*{/kosh} पैकीं दुसर्‍याचें नांव प्रख्यात नाहीं पण भर्तृहरीचें प्रसिद्ध आहे. वरतीं आपण कालिदास आणि पंचतंत्राचें अनवारी सोहिली या नांवाचें भाषांतर यांजबद्दल जो ऊहापोह केला तोच भर्तृहरीबद्दलहि करितां येतो. मात्र येथें पंचतंत्राचें तें भाषांतर न घेतां ‘कलिल उ दिम्नः’ यांचें इंग्रजी भाषांतर घ्यावें लागतें. यांत नीतिशतकामध्यें  {kosh श्लोक. ९१.}*{/kosh} असलेला एक श्लोक पंचतंत्रामध्यें (मुंबई प्रत) {kosh तंत्र दुसरें. पृ. ५.}*{/kosh} ज्या गोष्टींत आढळतो त्याच गोष्टींत त्याच संदर्भानें ‘कलिल उ दिम्नः’ याच्या भाषांतरांत आढळतो. आतां यांत थोडा शाब्दिक फरक आहे त्याचा उलगडा ‘कलिल उ दिम्नः’  हे पह्लवी भाषांतरावरून नंतर तयार केलेलें आहे या गोष्टीवरून होतो. यामुळें पंचतंत्राचें जेव्हां नौशिर्वानकरितां भाषांतर झालें तेव्हां पंचतंत्रांत हा नीतिशतकांत आढळणारा श्लोक होता असें निघतें, व मागें दाखविल्याप्रमाणें अनावारी सोहिलीच्या गोष्टीचा जसा कालिदसाचा काल ठरविण्याकडे उपयोग होतो तसा या कलिल उ दिम्नःच्या गोष्टीचा भर्तृहरीचा काल निश्चित करण्याकडे होतो. भर्तृहरीनें रामाचा अवातारांमध्यें उल्लेख केला आहे व कोणीहि दोन शतकांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तींनां अवतारांमध्यें घालणार नाहीं. कालिदास हा भर्तृहरीपूर्वीं फार तर कांहीं दशकें होऊन गेला असेल.

रामचरित्राशीं संबंध आलेल्या ग्रंथांमध्यें वेबरनें मृच्छकटिकाचा उल्लेख केला आहे पण त्यापासून त्यानें फारशीं अनुमानें काढलीं नाहींत; कारण मृच्छकटिकाचा काल निश्चित नाहीं. व दण्डीच्या काव्यदर्शामध्यें मृच्छकटिकांतील उतारा आला आहे व दण्डीचा काल ख्रिस्तीशकाचें सहावें शतक हा निश्चित झाला आहे. हा उतारा ‘लिंपतीव तमोंगानि वर्षतीवांजनं नभः’ हा आहे. यावर दणडीनें बराच वादविवाद केला आहे व हा श्लोक विशेष प्रसिद्ध असल्याशिवाय त्यावर एवढा वादविवाद करणें संभवत नाहीं. तेव्हां मृच्छकटिक आणि दण्डी यांमध्यें बराच काल लोटला असण्याचा संभव आहे. मृच्छकटिक या नाटकाचा कर्ता शूद्रक प्रसिद्ध आहे. या नांवाच्या राजाचा उल्लेख प्रिन्सेपनें आपल्या कोष्कांत ख्रि. पू. २१ यावर्षीं होऊन गेला असा केला आहे.

असा केला आहे. रामायणाच्या कथेचा शकाराच्या तोंडीं मृच्छकटिकामध्यें रावण व कुंती, हनुमान आणि सुभद्रा, इत्यादि मूर्खपणाच्या जोड्या घालण्यांत केला आहे. आतां या जोड्यांतील मूर्खपणा लोकांस त्या वेळी स्पष्ट दिसत असला पाहिजे. म्हणजे त्या वेळीं रामायण व महाभारत यांतील कथा सर्व लोकांच्या तोंडीं असल्या पाहिजेत. यावरून रामायणाचा काल ख्रि. पूं. २१ या वर्षांच्या पुष्कळच मागें नेला पाहिजे.

रामकथेचा संबंध असलेला दुसरा ग्रंथ कर्मप्रदीप याचा वेबरनें टीपेंत उल्लेख केला आहे. मॅक्स मुल्लरनें या कर्मप्रदीपाचा कर्ता कात्यायन हा पाणिनीवर वार्तिकें लिहिणारा कात्यायनच होय असें म्हटलें आहे. {kosh History of Ancient Sanskrit  Literature pp. 54, 235}*{/kosh}  गोल्टस्टकर म्हणतो कीं मॅक्समुल्लरनें या दोन्ही ग्रंथांचा कर्ता कात्यायन एकच हें षड्गुरुभाष्याच्या आधारें म्हटलें आहे. {kosh Panini p. 80.}*{/kosh}  परंतु मूळ षड्गुरुभाष्याचा जो उतारा प्रो. मुल्लरनें घेतला आहे त्यांत कर्मप्रदीपाचा उल्लेख नाहीं. तेव्हां कर्मप्रदीप म्हणजे कात्यायनाचा स्मृतिग्रंथ घ्यावयाचा किंवा ‘भ्राज’ श्लोक घ्यावयाचे हा प्रश्न आहे. या कर्मप्रदीपाचा नीटसा उलगडा होत नाहीं.

वेबरनें इतर ग्रंथकारांच्या सारखेंच असें दाखविलें आहे कीं, वाल्मीकीला दक्षिणेकडील प्रदेशांचें भौगोलिक ज्ञान फारसें नव्हतें. भांडारकरांच्या मतें त्यानें तिकडील लोकांस वानर वगैरे म्हणणें हें त्याच्या त्यांच्याविषयींच्या अज्ञानाचें द्योतक आहे. उलटपक्षीं आपणांस पतञ्जलीच्या महाभाष्यावरून व अशोकाच्या शिलालेखांवरून तत्कालीन लोकांस दक्षिणेविषयींचें ज्ञान असावें असें दिसतें.

पतञ्जलीनें चोल {kosh पाणिनि ४. १. १७५ वरील भाष्य.}*{/kosh} आणि केरला  यांचा उल्लेख केला आहे. चोल हा शब्द वार्तिकांतहि आढळतो. पतञ्जलीला सुह्य {kosh पाणिनि ४.२. ५२ वरील भाष्य व रघुवंश ४. ३५. पहा.}*{/kosh} (सयाम) व कांचीपुर  {kosh पाणिनि ४. १. ११२ वरील भाष्य.}*{/kosh} माहीत असल्याचें दिसतें. आतां हीं नावें उत्तरेकडील देशांची अगर गांवांचीं असूं शकतील असें म्हणणाराहि एक पक्ष आहे; पण रघुवंशांत आपणआंस चवथ्या सर्गामध्यें कांबोज, यवन, मुरल, केरल, ताम्रपर्णी इत्यादी नावें आढळतात व त्यांतील पहिलीं दोन उत्तरेकडील व पुढील दक्षिणेकडील असा तेथें स्पष्ट उल्लेख आहे यावरून वरील संशय राहत नाहीं.

बाबु राजेन्द्रलाल मित्र यांनीं आपल्या ‘सांची येथील दस्यु’ या लेखांत ‘जनकजातक’ नांवाची बौद्ध जातककथा दिली आहे तिचें रामायणांतील श्रावणाख्यानाशीं साम्य आहे. कांहीं किरकोळ फरक आहेत ते वजा करून जें दशरथजातकाबद्दल म्हणतां येईल तेंच या जातकाबद्दलहि म्हणतां येण्यासारखें आहे. तर वेबर असें म्हणण्यास तयार आहे काय हा मोठा प्रश्न आहे. उलटपक्षीं जर जनकजातक हें श्रावणाख्यानावरून तयार केलें आहे असें म्हटलें तर अशी स्थिति येते कीं, दशरथजातक व होमर यांवरून रामायण घेतलें व रामायणावरून बौद्धांनीं पुन्हां जनकजातक तयार केलें. ही गोष्ट बौद्धकथांच्या कालानुक्रमाशीं कितपत जुळेल हा प्रश्न आहे.

आतां होमरची ‘इंग्रजी वाचकांकरितां प्राचीन अभिजात काव्यें’* या नांवाच्या मालेंत जी दोन ग्रंथांत इलियडची आवृत्ति निघाली आहे तींत संपादक प्रथम असें म्हणतो कीं, होमरच्या मूळ ग्रंथांत मागाहून वरचेवर भर पडली आहे ही गोष्ट मान्य आहे. ग्रीक वंशाची उत्पत्ति प्राच्य आहे असा बळकट संशय आहे. होमरच्या कथानकाचा उगम पौरस्त्य देशांत झाला ही गोष्ट दाखविणार्‍या अनेक गोष्टी त्या काव्यांत आहेत.† होमरनें एखाद्या पूर्वेकडील शहारास भेट दिलेली असावी ही गोष्टहि सुचविली गेली आहे. या सर्व गोष्टीवरून होमरचा ग्रंथ केवळ ग्रीक असून  बाकीचे त्याच्यासारखे ग्रंथ सर्व त्याच्या नकला आहेत असें म्हणण्याचें कोणास कारण नाहीं हें उघड आहे. विशेषतः वाल्मीकीच्या विरुद्ध असें विधान करतां येणार नाहीं.

रा. बं चिं. वि वैद्य यांचें रामायणाबद्दल म्हणणें असें आहे कीं यथाहि चोरः स तथाहि बुद्धः। हा श्लोक आला आहे त्यावरून रामायण हें पूर्वींचें सर्व लोकांचें सामान्य व सर्वमान्य असें काव्य होतें पण त्यास विशिष्ट पारमारर्थिक स्वरूप मागाहून देण्यांत आलें असावें.

आर्थर लिलि नांवाच्या एका इंग्रज गृहस्थानें ‘राम आणि होमर’ नांवाच्य ग्रंथांत रामायणाबद्दल येथें ऊहापोह केला असता.