प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.
सामुच्चयिक प्रयत्नाचें क्षेत्र.- सोळा आणे हित साध्य होण्यासाठीं काय आवश्यक गोष्टी आहेत त्यांची कल्पना मागें दिली आहे. स्वराज्य नसतां प्रयत्नास कांहीं एक क्षेत्र नाहीं असें मात्र नाहीं. सामुच्चयिक प्रयत्नास सध्यां जें क्षेत्र आहे त्याची स्थूल कल्पना येणेंप्रमाणें देतां येईल.
(१) भांडवलाच्या एकीकरणानें होणारे मोठे प्रयत्न.
(२) म्युनिसिपालिट्यांसारख्या संस्थांकडून होणारे प्रयत्न.
या दोन तर्हेच्या प्रयत्नांनीं कांहीं तरी सामुच्चयिक हित साध्य होईल.
सामुच्चयिक हिताची कल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावयासाठीं सामुच्चयिक स्पर्धेची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे. सर्व हिंदुस्थानामध्यें द्रव्यानें दुर्बल असा जर वर्ग असेल तर तो महाराष्ट्रीयांचा होय आणि तो वर्ग सबल करणें हें प्रत्येक महाराष्ट्रीय संस्थेचें कर्तव्यर्कम आहे. ही कल्पना महाराष्ट्रीयांस जितकी अधिकाधिक पटेल तितका स्वकीय जनांच्या सामुच्चयिक हिताच्या वृद्धीसाठीं त्यांजकडून अधिकाधिक प्रयत्न होईल.
महाराष्ट्रीय लोकांनां जगांतील स्पर्धेंत ज्या अडचणी आहेत त्या भासावयास नुकताच प्रारंभ झाला आहे. आज समाजाचें धंद्यांच्या दृष्टीनें पृथक्करण केलें तर असें दिसतें कीं, महाराष्ट्रीय वर्ग दोन कार्यांत गुंतला आहे. एक कार्य शेतकी करणें व दुसरें व्यापारी सरकारी नोकरी करणें हें होय. महाराष्ट्रांतील राजकीय किंवा सार्वजनिक चळवळी करणार वर्ग एकंदर हिंदुस्थानाच्या सांपत्तिक स्थितीविषयीं आपल्या बुद्धयनुसार चळवळी करतो. पण महाराष्ट्रांतील कसाबसा जीव धरून काम करणारा जो व्यापारी वर्ग आहे त्याच्या हिताकडे लक्ष देऊन त्याविषयीं चळवळ काय करावी याविषयीं महाराष्ट्रांतील विचार करणार्या वर्गांत फारशी फिकीर असल्याचें दिसत नाहीं. महाराष्ट्रांत सामान्यपणें व्यापार करणार वर्ग जर अत्यंत लहान थोड्या भांडवलाचा आणि दुर्बल आहे तर तो भांडवलाचें एकीकरण करून मोठमोठीं कार्यें घडविण्यासाठीं कसा प्रवृत्त होणार? त्याची सामुच्चयिक महत्वाकांक्षाच लहान आहे. सर्व जगाच्या चळवळींत आपणांस कांहींतरी स्थान मिळावें या बुद्धीनें तो प्रेरित झालेला दिसत नाहीं.