प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

इष्टवर्गाचे प्रकार.- (१) शासनतंत्राच्या म्हणजे राजकीय सत्तेच्या दृष्टीनें पृथक् असलेला वर्ग म्हणजे गांव, प्रांत, संस्थान, राष्ट्र, साम्राज्य इत्यादि. (२) जात किंवा महावंश या दृष्टीनें पृथक असलेला वर्ग. (३) पारमार्थिक मतांप्रमाणें पृथक झालेला वर्ग. ख्रिस्ती (कॅथोलिक, प्रॉटेस्टंट इ०), मुसुलमान, जैन इत्यादि. (४) धंद्यामुळें पृथक् झालेला वर्ग. (५) सामाजिक पदवी किंवा सांपत्तिक स्थिति यामुळें पृथक् झालेला वर्ग. उदा०, कामकरी मजुर, भांडवलवाले, घरवाले, भाडेकरी इत्यादि. (६) भाषेमुळें पृथक् असलेला वर्ग. उदा० महाराष्ट्रीय, बंगाली, फ्रेंच इत्यादि.

ज्या वर्गांत विवक्षित व्यक्तीचा समावेश होतो त्या वर्गाच्या सुखदुःखावर त्या व्यक्तीचें सुखदुःख अवलंबून असतें आणि त्यामुळें वर्गविषयक अभिमान, वर्गविषयक व्यवहारनीति, वर्गविषयक सुखःदुखाची भावना हीं उत्पन्न होतात. या वर्गविषयक भावनांमुळें ज्या चळवळी उत्पन्न होतात त्या सर्वांचें विवेचन अर्थशास्त्रांत पाहिजे. तथापि इतकी व्यापक दृष्टि अर्थशास्त्रावरील ग्रंथांत अजून आलेली नाहीं. बरेचसे अर्थशास्त्रकार जगांतील जेत्या आणि वजनदार लोकांशीं म्हणजे ज्यांचें कर्तव्यक्षेत्र विस्तृत राज्य चालविण्यांत असतें अशा लोकांशीं संबद्ध असतात.