प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

धंद्यांतील वाकबगारी.- मोठमोठ्या कल्पना करून मोठें कार्य पार पाडण्यासाठीं आणि देशांतील व्यापार आपल्या हातीं घेण्यासाठीं आज प्रयत्‍न नाहीं तर नाहीं, आज निदान एवढें तरी झालें पाहिजे कीं, मुख्य कार्यसूत्रें परक्याच्या हातीं असोत, पण दुय्यम सूत्रे तरी आपल्या हातीं रहावीं असा प्रयत्‍न पाहिजे. मोठ्या प्रमाणावर जे धंदे अगर कार्यें होतात त्यांची मुख्य कार्यशक्ति त्या कार्यांस जो भांडवल पुरवतो त्याच्या ठायींच स्थित होते. भांडवलाच्या अल्पत्वानें अडचणींत पडलेल्या महाराष्ट्रीयांच्या हातांत हीं मुख्य कार्यसूत्रें येणें शक्य नाहीं. दुय्यम मुख्यपणाचीं सूत्रें विशिष्ट कामांत जो वाकब असेल त्याच्या हातीं असतात. भांडवलवाला त्याला जरी भाड्यानें घेतो तरी त्याच्या तंत्रानें बराचसा वागतो. महाराष्ट्रीयांच्या अंगीं हीं दुय्यम प्रकारचीं सूत्रें असल्याचेंहि दिसत नाहीं. तीं सूत्रें हातीं येण्यासाठीं कामांत वाकबगारी पाहिजे. ही वाकबगारी आज महाराष्ट्रीयांच्या अंगांत नाहीं; आणि असें असण्यास कारणेंहि आहेत. एकतर महाराष्ट्रामध्यें साक्षरवर्ग गुजराथ्यांपेक्षां फारच लहान आहे. गुजराथी हिंदूंमध्यें (१० वर्षांपेक्षां अधिक वयाच्या) साक्षरतेचें प्रमाण शेंकडा साडेबावीस आहे व तेंच महाराष्ट्रीयांच्या समजांत शेंकडा सहा आहे. {kosh मराराष्ट्रीय वाङ्मयसूचीची प्रस्तावना पहा.}*{/kosh}  यामुळें व्यापारधंद्यांमधील वरच्या जागा मिळविणें आजा महाराष्ट्रीयांस शक्य नाहीं. मुंबईच्या बहुतेक मोठमोठ्या व्यापारी संस्था गुजराथी, मारवाडी, पारशी यांसारख्या लोकांच्या आहेत, एवढेंच नव्हे तर त्या संस्थांतील मुख्य मदतनीस देखील त्यांच्यांतलेच आहेत. मराठी कुणबी ओझीं उचलण्याचें हमाली काम करण्यास उपयोगीं पडतो व कधीं कधीं महाराष्ट्रीय मनुष्य व्यापारी कारकुनी करतांना दिसतो, इतकेंच काय तें. व्यापारी कारकुनींत देखील महाराष्ट्रीय विरळाच.

या तर्‍हेची स्थिति असल्यामुळें जे प्रयत्‍न झाले पाहिजेत त्यांचें स्वरूप येणेंप्रमाणें सांगतां येईल.
(१) साक्षरता अधिकाधिक वाढविली पाहिजे.
(२) तरूण मंडळीपैकीं बरेच लोक अधिक विविध धंद्यांत शिरावे म्हणून संघटित प्रयत्‍न झाला पाहिजे.
(३) लोकांच्या भांडवलाचें एकीकरण होऊन मराठी बोलणार्‍या व्यापारी वर्गास प्रामुख्य मिळावें म्हणून प्रयत्‍न झाला पाहिजे.