प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ८ वें
पर्शुभारतीय संस्कृति.

अवेस्ता उर्फ पारशांचा धर्मग्रंथः- अवेस्ता किंवा झेंद अवेस्ता हा ग्रंथ म्हणजे झरथुश्त्रानें प्रवर्तित केलेल्या धर्माचे बायबल व प्रार्थनापुस्तक होय. आज ह्यालाच पारशी उर्फ अग्निपूजक पवित्र ग्रंथ म्हणून मानतात. अवेस्ता हा शब्द 'अविस्ताक-ज्ञान, ज्ञान देणारें पुस्तक' या पहुलवी भाषेतल्या शब्दावरून बनलेला आहे. पवित्रग्रंथ, धर्म कायदा) ग्रंथ असा त्याचा खरा अर्थ असावा. झेंद-अवेस्ता हें नांव मात्र बरोबर नाहीं. पहूलवी भाषेंत 'अविस्ताक वा झेंद, 'अवेस्ता व झेंद' म्हणजे धर्मग्रंथ व टीका असा मूळ शब्दप्रयोग आहे.

अवेस्ताला धर्मग्रंथ मानणारे म्हणजे झरथुस्त्री धर्माचे पारशी लोक हल्ली हिंदुस्थानांत सुमारें ८००० व इराणांत १०,००० पर्यंत आहेत. परंतु अवेस्ता ग्रंथांचे ऐतिहासिक महत्व फार आहे. कारण त्यांत इराणांतील फार प्राचीन काळच्या लोकांच्या धार्मिक समजुती व चालीरीती संगृहीत केलेल्या आहेत. भारतीयांना जे वेदांचे महत्त्व तेंच पारशांनां अवेस्ताचे आहे. कारण त्यांच्या साहाय्यानें पारशांचे प्राचीनत्व व त्यांच्या संस्कृतीचे उन्नतत्व सिद्ध होणारें आहे. मानव जातीच्या प्राचीन इतिहासांतील त्याचें फार महत्व आहे. कारण बुद्धपूर्व इतिहासांतील पर्शु-भारतीय काळावर म्हणजे वैदिक आर्याच्या भारत-प्रवेशापूर्वीच्या काळावर प्रकाश पाडण्यास त्याची मदत होणार आहे. म्हणून त्याची माहिती थोडक्यांत येथे देतों.