पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण १० वें
भारतीय समाजशास्त्र

अर्वाचीन समाजशास्त्र - आज जें भारतीयांचें अर्वाचीन समाजशास्त्र तयार होत आहे तिकडे आतां लक्ष देऊं.

भारतीय समाजाचा शास्त्रीय अभ्यास आतां हळूहळू चांगला प्रस्थापित होऊं लागला आहे. या अभ्यासास चांगलें साहित्य पुरविण्यास प्रारंभ सरकारी एथ्नालाजीच्या खात्याकडून व सेन्सस म्हणजे शिरोगणतीच्या खात्याकडून झाला. सरकारी खात्याकडून जी भाषाविषयक पहाणी झाली तिनें देखील भारतीय समाजशास्त्राला उपयोगी असें बरेंच साहित्य बाहेर आणलें आहे. भारतीय समाजाच्या आधुनिक स्थितिविषयीं माहिती तर चांगलीच देतां येईल आणि एकंदर भारतीय जनतेच्या इतिहासाचे आतां बरेच महत्त्वाचे धागे सांगतां येतील.

आज जातींची मोजदाद आणि वर्णन यांचा कच्चा खर्डा तयार झाला आहे. लोकांमधील स्थलांतरें, वयें, स्त्रीपुरुषसंख्या हीं मोजलीं गेलीं आहेत, शिक्षणाच्या दृष्टीने पहाणी झाली आहे आणि समाजाच्या इतिहासाकडे देखील बरेंच लक्ष पोंचले आहे. आज सामाजिक इतिहासाचीं बरींच अंगें सांगतां येतील.

आजच्या अभ्यासाचे दोन विभाग करतां येतीलः एक भाग म्हटला म्हणजे सद्यःस्थितिवर्णनात्मक व दुसरा म्हटला म्हणजे ऐतिहासिक होय. सद्यःस्थितिवर्णनात्मक काम जितकें झालें आहे तितकें ऐतिहासिक काम झालें नाहीं. ऐतिहासिक काम करावयास जें भाषापांडित्य लागतें तें असलेला वर्ग भारतीय भाषाशास्त्राकडे किंवा उपासना व तत्त्वज्ञान, कला व वाङ्‌मय यांच्या अभ्यासाकडे जसा वळला आहे तसा समाजशास्त्राकडे वळलेला नाहीं व यामुळें ऐतिहासिक समाजशास्त्राचे अभ्यासक फार थोडे आहेत. किंबहुना प्रस्तुत लेखकास स्वतःच्या अभ्यासफलाशिवाय इतरांचीं अभ्यासफलें फारच थोड्या प्रमाणांत देतां येतील.

समाजाच्या ऐतिहासिक अभ्यासांत मात्र एक महत्त्वाचें वैगुण्य राहिलें आहे. आर्यन् भाषा बोलणार्‍या समाजाचा जितका अभ्यास झाला आहे त्याच्या मानानें द्राविडी समाजाचा अभ्यास फारच कमी झाला आहे. तथापि द्राविडी भाषाशास्त्राकडे लक्ष देऊन समाजाचा अभ्यास करण्याची जी प्रवृत्ति काल्डवेलनें घातलीं तिनें कांहीं तरी परंपरा स्थापन केली आहे असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. त्या परंपरेनें अभ्यास झाल्यास ऐतिहासिक सत्याची मोठीच फलनिष्पत्ति होईल अशी प्रस्तुत लेखकास अपेक्षा आहे. अभ्यासक्षेत्र मोठें आहे व त्यांत जितके लोक अधिक पडतील तितकें चांगलें.

द्राविड महावंशाचा अभ्यास, त्या अभ्यासांत अनेक पक्ष उत्पन्न होण्याइतका वाढला आहे. सध्यां द्राविडी समाजेतिहासाच्या संशोधक वर्गामध्यें पक्ष पडले आहेत आणि त्या पक्षांत जातिविषयक भावना जागृत झाल्या आहेत. ब्राह्मणेतर पक्ष प्रत्येक महत्त्वाचें संस्कृतीचें अंग ब्राह्मणी पगड्यापूर्वी स्थापन झालें आहे असें म्हणण्याकडें प्रवृत्त होतो तर ब्राह्मण पक्ष प्रत्येक प्रगतीचें श्रेय ब्राह्मणी संस्कारास देऊं लागतो. या प्रवृत्तीचे धागे इतके गुंतागुंतीचें होऊं लागले आहेत कीं, सामाजिक रिवाज, कायदा आणि भाषाशास्त्र यासर्वात दोन पक्षविशिष्ट प्रवृत्ती गडबड करीत आहेत. अत्यंत प्राचीन ग्रंथांतील बरेच महत्त्वाचे शब्द संस्कृत शब्दांवरून ब्राह्मण संशोधक व्युत्पादितो तर ब्राह्मणेतर संशोधक ती व्युत्पत्ति खोटी मानतो व तामिळ धातूपासूनच तो शब्द निघाला आहे असें दाखवूं लागतो. दोन्ही बाजूंचें म्हणणें ऐकून आमचें असें मत झालें आहे कीं, ब्राह्मणी संस्कृतीचा परिणाम इतक्या प्राचीन काळीं झाला आहे कीं, तामिळमधील अत्यंत प्राचीन ग्रंथ जरी घेतले तरी ते ब्राह्मण परिणामानें अस्पृष्ट नाहींत आणि द्राविडांची वाङ्‌मययुक्त राष्ट्र अशी ख्याति होण्यास त्यांच्या संस्कृतीवर ब्राह्मण किंवा आर्यन लोकांच्या आगमनामुळें झालेला परिणामच कारण होता असें वाटतें. हें मत बदलण्यास जर कांहीं निश्चित पुरावा पुढें येईल तर त्याचा आम्ही मोठ्या आनंदानें सत्कार करूं. असो, येथें या वादांत शिरण्यांत कांही अर्थ नाहीं. सामाजिक विकासाचा इतिहास लिहिण्यास आज आम्हांस संकल्प करावयाचा झाल्यास आज द्राविडी समाजाचा विकास चांगल्या तर्‍हेनें मांडतां येणार नाहीं हें आजच्या अभ्यासाचें वैगुण्य कबूल केलें पाहिजे. गस्टाव्ह आपर्ट (Original Inhabitants of Bharatvarsha or India) यासारख्या लेखकानें द्राविडमय हिंदुस्थान होतें असें दाखविणारा जो कल्पनाप्रचुर इतिहास लिहिला आहे त्याच्या योगानें प्रामाणिक इतिहासाचें काम यवमात्र पुढें सरकलें असें वाटत नाहीं.

वैदिक कालापासून प्रारंभ करून आर्यन् लोकांच्या इतिहासासच अग्रस्थान देऊन समाजशास्त्राच्या इतिहासास प्रारंभ केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. या तर्‍हेनें भारतीयांचें समाजशास्त्र सांगावायचें म्हणजे भारतीय समाजाचा इतिहास सांगावयाचा. या इतिहासांत निरनिराळ्या जातींचीं आणि मानववंशांचीं आगमनें, त्यांनीं आपले परस्परसंबंध कसे बसविले, त्यांच्यामध्यें अंतर्गत घटना कशी होती, ती घटना कशी बनली इत्यादि गोष्टीचें वर्णन आलें पाहिजे. तें वर्णन करतांना अनेक स्थित्यंतरें वर्णन करावीं लागतील. आणि समाजांतील अंतःस्थिति बदलण्यासाठीं समाजामध्यें जे कित्येक सहेतुक प्रयत्‍न व अहेतुक क्रिया झाल्या त्या सांगाव्या लागतील. एखाद्या लोकांचे समाजशास्त्र सांगावयाचें म्हणजे त्या लोकांनीं आपलें भवितव्य स्वायत्त करण्यासाठीं ज्या क्रिया केल्या असतील त्या सांगावयाच्या; त्याचप्रमाणें समाजांत बदल होण्याचे जे नियम भारतीय समाजांत दिसून येतात ते सांगावयाचे व त्या नियमांचे अस्तित्व भारतीयांनीं कितपत ओळखलें होतें हें सांगावयाचें. समाजाची स्थिति बदलण्यासाठीं किंवा समाज स्वायत्त करण्यासाठीं जे जे प्रयत्‍न झाले त्यांचा इतिहास देणें म्हणजे शासनसंस्थांचा किंवा धार्मिक संस्थांचा इतिहास देणें होय. याबरोबरच समाजामध्यें शासनाभाव असल्यामुळें जें संस्थांचें भ्रष्टीकरण होत जातें तें देणें यासहि समाजशास्त्राचा इतिहासाचाच भाग म्हणतां येईल. समाजामध्यें समाजशासनासाठीं जो प्रयत्‍न होतो तो केवळ सत्तेकडून होणारा निग्रहाननुग्रहात्मक प्रयत्‍न नव्हे, तर समाजामध्यें ज्या कल्पना राज्य करीत असतात आणि व्यक्तीचें आयुर्नियमन करीत असतात त्या कल्पनांचें विधान देखील समजशास्त्रीय इतिहासांत हवें.

समाजाचा इतिहास आणि ऐतिहासिक समाजशास्त्र हे जवळजवळ प्रतिशब्द आहेत असें म्हणण्यास आपणांस जे काय हवें तें हें कीं, समाजाचा इतिहास हवा आपण जेव्हां समाजाच्या स्थित्यंतरासंबंधानें नियम देतों तेव्हां अनेक गोष्टी थोडक्यांत सांगत असतों. सामाजिक मोठमोठी स्थित्यंतरें सांगणें हें जर आपण ऐतिहासिक समाजशास्त्राचें कार्य धरलें तर आपणांस एक मोठें इतिहासलेखन करावें लागेल व तें करतांना स्थित्यंतराचे चोंहोकडे लागू पडणारे अनेक नियम दिसूनहि येतील. केवळ स्थित्यंतराचे नियम सांगणें हें ऐतिहासिक समाजशास्त्राचें काम धरलें तर सामाजिक इतिहास आणि ऐतिहासिक समाजशास्त्र यांच्यांत शाब्दिक भेद करावा लागेल एवढेंच.