प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
हिंदु संस्कृतीचें भवितव्य.- हिंदूंच्या भवितव्याविषयीं विचार करतांनां आणि हिंदु संस्कृतीचा किवां हिंदूंच्या आधुनिक वैयक्तिक किंवा सांधिक जीवितक्रमाचा अंश असलेल्या कांहीं गोष्टींचा जो लोप होत आहे त्याविषयी आनंद किंवा दुःख मानावयाचें हें ठरवितांना जगाच्या क्रमासंबंधीं आणि आपल्या हिताहितासंबंधीं आपल्या कल्पना व्यवस्थित असल्या पाहिजेत. देशाच्या व धर्माच्या म्हणजे आचारांच्या एकत्वामुळें ज्या समुच्चयाविषयीं एकत्वाची भावना व्यक्त होते त्या समुच्चयाचें हित व्हावें या प्रकारच्या भावना मनुष्यास क्षुधातृषेसारख्या नैसर्गिक नाहींत. त्या सर्व शिक्षणमूलक आणि विचारमूलक आहेत. व्यक्तींचें हित साधण्यासाठीं समुच्चयाची आवश्यकता असते आणि त्या समुच्चयाचें संरक्षण व्हावें म्हणून त्या समुच्चयाच्या ठायीं भक्ति उत्पन्न करण्यांत येते. समुच्चयभक्ति ही संयुक्तस्वार्थज्ञानमूलक असते. समुच्चयभावना जागृत रहाण्यासाठीं जे अनेक उपाय योजिले जातात त्यांत विसदृश समाजविषयीं मत्सर व तिरस्कारबुद्धि स्वसमुच्चयांतर्गत व्यक्तींत उत्पन्न करणें, वैसादृश्याचा तिरस्कार किंवा विटाळ मानणें, आपल्या परंपरेंत किंवा तत्कालीन समाजांत उत्पन्न झालेल्या नियमांनीं व्यक्तींस जखडणें यांचा समावेश होतो. या प्रसंगीं काळजी बाळगावयाची ती एवढीच कीं, ज्या समाजवैशिष्ट्याविषयीं भावना हृदयांत उत्पन्न होते तें वैशिष्ट्य कोणतें हित साधण्यासाठीं उपायरूप आहे याची चिकित्सा व्हावी. म्हणजे या उपायांनीं जें साध्य इष्ट आहे तें प्राप्त होतें काय, इष्ट साध्य साधण्यासाठीं साधन म्हणून जे उपाय प्रचलित होत असतात ते साध्यरूपी होऊन त्याची साधना होण्यासाठीं म्हणून समाजवैशिष्ट्याचीं अंगें संरक्षिलीं जात आहेत काय, या प्रश्नांची छाननी व्हावी.
हिंदुत्व जर केवळ उपासनामूलक नाहीं, आणि विशिष्ट मतांचा संप्रदाय होऊन उत्पन्न झालेलें नाहीं, तर त्याची पुढें काय गति होईल याचा विचार करणें अप्रासंगिक होणार नाहीं. पुढें दाखविण्यांतच येईल कीं, श्रौतधर्म म्हणजे त्रेताग्नीवर होणारीं कर्में हीं प्राचीन कालांतच घरोघर नव्हतीं, आणि अग्निहोत्र प्रत्येकानें घेण्याचा परिपाठ वेदकालींच संपुष्टांत येत चालला होता, आणि ज्या कारणामुळें हा अजीबात बंद पडत चालला तींच मनुष्यस्वभावमूलक कारणें त्या श्रौतधर्मांचा पुनरुद्धार शक्य होण्यास विघातक होतील. सध्यां श्रौतकर्मांचें ज्ञान असलेले पुरुष महाराष्ट्रांत १५।२० असतील किंवा नाहीं याची शंका आहे. शिवाय अग्नींत कांहीं टाकलें तर अग्नि तें देवांपर्यंत नेऊन पोंचवितो ही भावना, आणि आठ वसू, बारा आदित्य इत्यादि दैवतें यांवर विश्वास हीं पुन्हां प्रस्थापित करतां येतील, असें वाटत नाहीं. पुराणांमध्यें ज्या दैवतांचें महत्त्व वर्णिलेलें आहे तीं दैवतें देखील देशांतील विद्वान् लोकांस आकर्षीत नाहींत. देवळांमध्यें शिष्ट लोक क्वचितच जातात आणि घरोघरची देवपूजा संपुष्टांत येत चालली आहे. स्मार्तधर्महि श्रौतधर्माप्रमाणें नाहींसाच झाला आहे. पाकयज्ञ तरी आज कोण करतो? संध्या देखील घरोघर आतां बंद पडत चालली आहे. संस्कारांचें महत्त्व पहावें तर तेंहि आज राहिलेलें दिसत नाहीं. लग्न करणें मनुष्यास अवश्य आहे, तें कोणत्या तरी संस्कारानें झालेंच पाहिजे; तथापि तें करतांना जे मंत्र म्हणावयाचे ते वेदमूलक आहेत कीं नाहींत याची चौकशी तरी कोण करतो आहे. लग्न कोणत्या तरी संस्कारानें कसें तरी लागलें म्हणजे झालें इतकीच लोकांची वृत्ति आहे.