प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.

भारतीयसंस्कृतिप्रसाराचें महत्त्व.- क्यांबोडिआ (कांबोज) आणि बलिद्वीप येथील लोक हिंदू आहेत, आणि पूर्वेकडील बर्‍याचशा भूभागावर भारतीय संस्कृतीचा एका काळीं परिणाम झाला होता या गोष्टीचें भावी इतिहासांत महत्त्व काय? आमच्या व्याख्यात्यांनां अभिमानपूर्ण आणि आवेशयुक्त वाक्यांनीं आपल्या पूर्वजांची ख्याती गावयास हा पुरावा उपयोगी पडेल यापलीकडे या स्थितीचें महत्त्व कांहींच नाहीं काय? या प्रश्नास जवळ जवळ कांहींच नाहीं असें उत्तर द्यावयास हरकत नाहीं. तथापि या अनुपयुक्ततेच्या विधानास अपवादादाखल ज्या गोष्टी पुढें मांडतां येतील त्या मांडल्याच पाहिजेत. संस्कृतीचा परिणाम भाषेवर व लोकांच्या मनोरंजनाच्या साधनांवर टिकतो. एकाच संस्कृतीचा दोन राष्ट्रांवर परिणाम झाला असल्यास त्या दोन्ही राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषांपैकीं दोहोंमध्यें जर कठिण अर्थ व्यक्त करणारे शब्द एकाच संस्कृत भाषेपासून आले असतील तर त्या दोघी एकमेकींवर परिणाम घडवितील. एका राष्ट्राच्या भाषेला अधिकाधिक प्रौढ स्वरूप येऊं लागलें म्हणजे तें दुसर्‍याच्या भाषेलाहि येईल. मराठींत आपण प्रौढ विचार व्यक्त करण्याकरितां संस्कृतभाषामूलक जे शब्द वापरूं तेच सर्व देशभाषांचा एकमेकांवर परिणाम होण्याचे दिवस आले म्हणजे ब्रह्मीभाषेंत देखील येणें अशक्य नाहीं, आणि ब्रह्मी आणि सयामी वाङ्मयांचा एकमेकांवर परिणाम होणेंहि अशक्य नाहीं. उन्नतिमार्गावर जाण्यास सर्व लोकांस स्वभाषेची कांस धरूनच गेलें पाहिजे. भाषेंत जर ग्रंथ किंवा शब्द यांची अल्पता असेल तर ती दूर करावी लागते, आणि भाषेच्या एकंदर नादकलापाशीं आणि श्रवण परिचयाशीं जुळतील असलेच शब्द परभाषेंतून घेतां येतात. यामुळें ज्या ज्या भाषांवर संस्कृत भाषेनें संस्कर केलेला आहे त्या त्या भाषांस अधिकाधिक शब्द पुरविण्याचा पूर्ण मक्ता जरी संस्कृत भाषेस मिळाला नाहीं तरी त्या व्यापारांतील एक मोठा हिस्सा संस्कृत भाषेस मिळेल यांत शंका नाहीं, आणि सर्वांत शब्द जर एकाच भाषेपासून घ्यावयाचे आहेत तर घेतलेल्या शब्दांमध्यें किंवा नवीन पाडलेल्या संज्ञांमध्यें एकरूपता रहावी ही भावना नंतर यावयाचीच. पूर्वेकडील पाश्चात्त्य भाषांचा आत्यंतिक संस्कार होण्यापूर्वीं जर उन्नतीची इच्छा व तिजबरोबरच वाङ्मयाद्धारेच्छा उत्पन्न झाली तर भारतसादृश्य जिंवत राहण्यास व वृद्धिमान होण्यास अवकाश आहे. तथापि जर उन्नतीच्या भावना लौकर उत्पन्न झाल्या नाहींत आणि पाश्चात्त्य भाषांस आपलें कार्य करण्यास अवसर सांपडला तर कोंकणी भाषेस गोवानिजांच्या मुलुखांत किंवा जातींत जे स्वरूप मिळालें आहे तें स्वरूप संस्कृत भाषेचा परिणाम झालेल्या तेथील भाषांस मिळेल. देश्यभाषेस अभियुक्त शब्दांचा पुरवठा करण्याच्या बाबतींत संस्कृत भाषेशीं स्पर्धा करणार्‍या भाषा म्हटल्या म्हणजे अरबी, चिनी व ज्या पाश्चात्त्य भाषेशीं अधिक संबंध येईल ती पाश्चात्त्य भाषा ह्या होत. एका भाषेवरच अभियुक्त शब्द देणार्‍या दोन भाषांचे संस्कार घडले म्हणजे दोन भाषाप्रकार निर्माण होतात त्यांचीं उदाहरणें येणेंप्रमाणेः- (१) हिंदी व उर्दू (२) मल्याळी व लखदिवी (३) सिंहली व मालदिवी (४) मलयु, प्राचीन व अर्वाचीन (५) हिंदु कोंकणी व ख्रिस्ती कोंकणी  (६) जुनी जावनीज व नवी जावानीज इत्यादि.

एकाच भाषेंतील शब्द जर दुसर्‍या निराळ्या परंतु मूलतः भिन्न भाषेनें घेतले तर त्याचा एक परिणाम असा होऊं लागतो कीं, त्या दोघांचेंहि संगीत एकच होऊं लागतें, उदाहरणार्थ, आंध्र व द्राविड या भाषा संस्कृत भाषेशीं मूलतः असंबद्ध अशा अगदीं निराळ्या भाषा होत. तथापि या दोहोंवरहि संस्कृत भाषेचा संस्कार झाला आहे आणि त्यामुळें दक्षिणात्यांचें संगीत जरी उत्तरेकडील संगीताहून थोडेंसें भिन्न राहिलें आहे, तरी दोन्हीं संगीतें दोन्हीं प्रदेशांतील लोकांचें मनोरंजन करूं शकतात. भारतीय संगीत या दृष्टीनें कोठवर पसरत जातें आणि जाणें शक्य आहे याचा विचार झाला पाहिजे. हा विषय येथील संगीतशास्त्राच्या परिषदांकडून जितक्या लौकर विचारांत घेतला जाईल तितकें चांगलें. आम्ही पूर्वेकडील देशांतील वाद्यांचीं चित्रें दिलीं आहेत त्यावरून संगीतशास्त्रांत देखील कांहीं नातीं निघतील अशी कोणासहि कल्पना येईल. मागें दिलेल्या मलयु व यावद्वीप भाषांतील ग्रंथांच्या यादीवरून आपणांस असें दिसून येईल कीं, त्या देशांतील बरेचसे कथाग्रंथ भारतीय कथाग्रंथांशीं संबद्ध आहेत. त्यामुळें सिनेमासारख्या मनोरंजनाच्या साधनांचा सार्वत्रिक प्रसार झाल्यनंतर भारतीय कथांचे चित्रपट भारतीय कारखानदारांनां तिकडे खपवितां येणें शक्य होईल.

याशिवाय हीहि गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, पूर्वेकडील बर्‍याचशा देशांत व दक्षिणेंत सिंहलद्वीपांत शालिवाहन शक चालतो, आणि आपले वैद्यक ग्रंथहि या देशांत परिचित आहेत. तेव्हां ज्योतिष्यांच्या व वैद्यांच्या संमेलनांमध्ये तिकडील लोक बोलवून त्यांच्याशीं संबंध जोडणें हें एक काम अजून आपल्याला करावयाचें आहे.

ब्रिटिश गियाना, त्रिनिदाद, जमेका, फिजी, नाताळ वगैरे सारख्या प्रदेशांशीं म्हणजे जेथें भारतीयांचा नुकताच प्रवेश झाला आहे अशा प्रदेशांशीं आपला संबंध अधिक निकट राहील. या प्रदेशांशीं लोक ब्रिटिश साम्राज्याच्या एकाच छत्राखालीं असल्यामुळें भारतांतील लोकांचा व तेथें गेलेल्या भारतीयांचा संबंध राहणें सुलभ झालें आहे, व तेथील लोकांनीं राजकीय चळवळींत भारतीयांकडून अपेक्षिलेलें साहाय्य भारतीयांकडून सहज पुरविण्यांत येत आहे. भरतखंडांतील छापलेल्या ग्रंथांचाहि या प्रदेशांत प्रसार होतो. ब्रिटिश गियानामधील अधिकार्‍यांनीं डॉ. कोमिन्स यांजकडे पाठविलेल्या रिपोर्टांत असें नमूद केलेलें आढळतें कीं गियानामध्यें रामायणाच्या प्रतींचा खप होतो व तेथें कांहीं भारतीय भाषांमध्यें वर्तमानपत्रें निघतात. वसाहतींमध्यें अलीकडेच गेलेल्या भारतीयांशीं संबंध कायम ठेवण्याच्या कामीं आपल्या भाषांचा कितपत उपयोग होईल हें आजच निश्चितपणें सांगतां येणार नाहीं. भारतीय राजकीय विचार म्हणजे दुःखाबद्दल ओरडणें हा होय. त्या विचाराचा अंशरूप भाग म्हटला म्हणजे परद्वीपस्थ भारतीयांचीं दुःखें होत. कांग्रेसशीं संबंध ठेवण्यासाठीं तेथेंहि संस्था तयार होत आहेत, आणि येणेंप्रमाणें शासनविषयक विचारसंबंधानें स्वदेशस्थ भारतीयांची आणि परदेशस्थ भारतीयांची दृष्टी एक होऊं लागली आहे.

या वरील माहितीवरून सामान्य सिद्धांत एवढाच काढावयाचा कीं नवीन वसाहतींमधील भारतीयांचा हिंदुस्थानाशीं संबंध राहत जाईल. कारण कीं, त्या प्रकारची आवश्यकता जीवनकलहामुळें उत्पन्न झाली आहे. तथापि हिंदूंचें विशिष्टत्व राहून त्या समुच्चयाचा विकास होणें शक्य आहे कीं नाहीं या संबंधानें निश्चयपूर्वक विधान करतां येत नाहीं.