प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
जातिभेद आणि चातुर्वर्ण्य.- हिंदुसमाजांतील जातिभेद आहे हा कोणाहि विचारवान किंवा धर्मशास्त्र उत्पन्न करणार्या ऋषींच्या योजनेनें उत्पन्न झाला नसून तो केवळ समाजामध्यें असलेला नियंत्रणभाव आणि ऋषींनीं सुरु केलेलें कार्य अपूर्ण राहिलें त्यामुळें उत्पन्न झाला आहे. आजच्या चार हजार विविध जाती एका पूर्णाचे तुकडे तुकडे पडून निघाल्या नाहींत. अनेक राष्ट्रें, निरनिराळ्या ठिकाणाहून आलेले लोक आणि संस्कृतीच्या अनेक पायर्या दर्शविणारे मनुष्यसमूह यांचें एकीकरण करण्यासाठीं प्राचीन ब्राह्मणांनीं जो प्रयत्न सुरु केला त्यास मुसुलमान व यूरोपीय यांच्या स्वार्यांमुळें अडथळा उत्पन्न झाल्यामुळें तें कार्य अर्धेंच पडलें आहे. ऋषींचें, ब्राह्मणांचें आणि धर्मशास्त्रवेत्त्यांचें जें सामाजिक ध्येय होतें तें ध्येय चातुर्वर्ण्य होय. चातुर्वर्ण्यसंस्थापना म्हणजे जातिभेदाचा नाश होय. चातुर्वर्ण्याची कल्पना, जर आजच्या चातुर्वर्ण्य किंवा जातिभेद या दोहोंपैकीं कांहीं एक न समजतां खंडन मंडन करूं पाहणार्या लोकांची बाजूस ठेवून, वेदांची किंवा स्मृतींची घेतली तर चातुर्वर्ण्य हें तत्त्व समाजांत टिकण्याजोगें आहे, आणि हें तत्त्व विश्वव्यापी होऊन सर्व जगाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा अंश होऊं शकेल. तथापि येत्या शंभर वर्षांपुरताच विचार केला तर जातिभेदनाशक म्हणजे चातुर्वर्ण्यसंस्थापक कार्य फारसें व्हावयाचें नाहीं. अज्ञ व निरक्षर समाज आणि जगाशीं अपरिचय असेलला आणि शिस्तवार विचार न करणारा मध्यमवर्ग यांनीं युक्त असा जो आजचा हिंदुसमाज त्या हिंदुसमाजात अत्यन्त सामान्य सुधारणा करण्यास देखील फारच अडचणी आहेत. तर सर्व जगांत अत्यन्त कठिण असें कार्य जें चातुर्वर्ण्यसंस्थापन तें पार पडण्याची नव्हे तर पार पाडण्याच्या रस्त्यास लागण्याची तयारी होण्यास येतीं शंभर वर्षें पुरतील किंवा नाहीं हा मोठाच प्रश्न आहे.
समाजांत चारच वर्ण आहेत ही कल्पना टिकेल असें खात्रीनें म्हणतां येत नाहीं. तरी ज्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितींत ही कल्पना जोपासली गेली ती आज नाहीं असें म्हणतां येईल. समाजाचें वर्गीकरण करितांना पूर्वीं आपण फारच लहान समुच्चय लक्षांत घेत होतों, आणि उत्पादन व व्यापार यांच्याहि कल्पना अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आज पाश्चात्त्य देशांत आणि विशेषेंकरून अमेरिकेंत जी समाजघटना दिसत आहे ती समाजघटना पुढें मागें सर्व जगभर पसरण्याचा संभव आहे. कां कीं, बाजारांत आलेल्या वस्तू विकण्यामध्यें ची स्पर्धा उत्पन्न होते त्या स्पर्धेमुळें वस्तूंच्या उत्पादनाची घटना बदलावी लागते. लहान प्रमाणावर कारखाने असावे, किंवा उत्पादन कारखान्यांत न होतां उपदेशकानें आपल्या मनांत उभारलेल्या गोजिरवाण्या झोंपड्यांतून व्हावें, असलीं तत्त्वें देशाभिमान ओतप्रोत भरलेल्या किंवा आचरणानें अत्यंत पवित्र अशा पुढार्यांनीं कितीहि अट्टाहासानें जरी सांगितलीं तरी त्यांचें अवलंबन सर्वथैव अशक्य आहे. एका देशांत जर भांडवलाचें एकीकरण झालें, मजुरांचीं सैन्यें कामास लावलीं गेलीं आणि एकाच संस्थेकडून लखों किंवा कोट्यावधि रुपायांचा माल विकला जाईल अशा विक्रीच्या संस्था उभारल्या गेल्या आणि अनेक क्रियापरंपरा होत असतां प्रत्येक क्रियेनंतर होणारी नासधूस पोटधंद्यांचें उत्पादन करून टाळली, शिस्तवार आणि पुष्कळ काम करून घेण्यासाठीं मजुरांस तालीम दिली तर जी मोठी काटकसर उत्पन्न होते ती उत्पादित वस्तु फार थोडक्या किंमतीस विकतां येणें शक्य करील. एका देशांत हा प्रकार झाला तर दुसर्या देशास तेंच करणें आणि जिवंत राहणें किंवा उत्पादनपद्धति प्राथमिक ठेवून मनोहर वाक्यें उच्चारणार्या पुढार्यांचे गुण गात मरून जाणें याखेरीज तिसरा उपाय नाहीं. परदेशांत जी स्थिति आली तीच हिंदुस्थानांत पुढें येणार आणि ती आपली सर्व समाजघटना फिरविणार हें भवितव्य टाळणें शक्यच नाहीं.