प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

हिंदुस्थान व तिबेट - हिंदुस्थान व तिबेट यांजमध्यें व्यापारी दळणवळण विशेष आहे. तिबेटांत मोठ्या शहरांतून काश्मिरी व नेपाळी हिंदू लोक दिसतात. मुसुलमानांनीं तिबेटी लोकांनीं पवित्र मानलेल्या पर्वताच्या छायेंत मशीत बांधिली आहे. तिबेटांतील हिंदी रहिवाशांच्या द्वारा इंग्रज सरकार तेथील माहिती मिळवितें. पूरनगीर गोसावी हा गव्हर्नर जनरलचा ल्हासा येथील कायमचा प्रतिनिधी नेमला गेला होता. याची नेमणूक १७९० सालीं झाली होती. १८९३ सालीं तिबेट व हिंदुस्थानसरकार यांच्यामध्यें व्यापारी तह झाला पण त्याचा दळणवळण वाढविण्याच्या कामीं विशेषसा उपयोग झाला नाहीं. तिबेटचा कांहीं भाग नेपाळनें जिंकून घेतला असून तें तिबेटकडून कांहीं खंडणीहि दरसाल घेत असतें. {kosh The Land of Lamas-W.W. Rockhill }*{/kosh}