प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
लामा.- तिबेटांत धार्मिक बाबतींत एक श्रेष्ठ अधिकारी असतो. लोकांच्या जीवितावर सुद्धां त्याची सत्ता चालते. प्रत्येक जिल्ह्यावर एक अधिकारी असतो व प्रत्येक मठावर हा अधिकारी, वरील श्रेष्ठ अधिकार्याच्या संमतीनें एक कँपो (मठाधिपती) नेमतो. पारलौकिक खात्याकडे कँपोच्या हाताखालीं लॉबपॉन (शिक्षकविषयक अधिकारी), बंड्झड (धर्माध्यक्ष) व चोचिम्पा (व्यवस्थापक) असे तीन नोकर असतात. या तिघांची निवडणूक देवाच्या मूर्तीपुढें तीन लामांकडून होते. मठाच्या मालमत्तेची व्यवस्था शंडौ (खजिनदार), त्याच्यानंतर बंड्झड व त्याच्या हाताखालीं नेर्पा (दुय्यम खजिनदार) व नंतर नर्चांग यांकडे असते. नर्चांगकडे बाहेरच्या गोष्टी सोंपविल्या असतात.
मठवाशांचे वर्ग खालील प्रमाणें असतातः (१) गेलांग, यांनीं संबध आयुष्य येथें वाहिलेलें असतें; (२) गेतसुल, यांनीं बारावर्षें निरनिराळ्या दर्जाचें काम केलेलें असतें, (३) दप हे नवशिके असतात, (४) उमेदवार. तिबेटांत ३००० मठ असून ते चांगले बळकट व समृद्ध स्थितींत आहेत. मठवासी चांगले गलेलठ्ठ असून हुषारहि असतात. मठांत चांगले चांगले लोक तेवढे घेतात. प्रसंग पडल्यास हे लढाईवर देखील जातात. मठांच्या भोंवतालची जमीन यांच्या मालकीची असून शेतकर्यांकडे ती मेहनतीबद्दल उत्पन्नाचा कांहीं हिस्सा कबूल करून लागवडीस देतात. या शेतांवरील लोक गंवडीकाम, सुतारकाम, लोहारकाम, वगैरे सर्व कारागिरीचीं कामें करितात. ल्हासा सरकारला कांहीं सारा द्यावा लागतो. मठांतून सोनें चांदी, मौल्यवान् जिनसा, नजराणे वगैरे संपत्ति सांठविली असते. शिवाय मरतांना लोक मठांना कांहीं देणग्या देतात त्या निराळ्याच. प्रत्येक लामा मठाला कांहींतरी देतोच. लामाचे उद्योग अनेक असतात. तो ग्रामपुरोहित, चित्रकार, ज्योतिषी, मांत्रिक, वैद्य, औषधविक्या, व्यापारी, शिल्पकार, मुद्रक, लेखक, वाचक वगैरे असतो.
मठवाशांनां लोकांकडून घरदार, धान्य, चहा, कपडालत्ता वगैरे मिळतो. वरिष्ठ लामांचा सर्व खर्च मठाकडून चालतो.
लामा ३० टक्के व्याजानें लोकांनां पैसे उसने देतात. कधींकधीं यापेक्षांहि जास्त व्याज लावतात. या प्रमाणें व्याज डाळून डाळून रकम फुगली म्हणजे त्यांच्या जमिनी विकतात. कोणी लामाची चोरी केल्यास त्यास एरवींच्या दसपट शिक्षा सांगितली आहे.
दलाइ लामा हा ऐहिक गोष्टींत वरिष्ठ असतो, धार्मिक बाबींत नसतो. १५ व्या शतकांत सांगकपानें दलाइ लामाची स्थापना केली. हा पहिला दलाइ लामा गेलुगपंथाचा असून कोकोनार जिल्ह्यांतील एक मठवासी होता. दलाइ लामाच्या हातीं सर्व राजकीय सत्ता असते व त्याला ग्यालपो रिंपोशो (वैभवशाली राजा) अशी पदवी असते.
अतीश या हिंदु साधूनें १३०८ सालीं तिबेटांत कादम पंथ स्थापला, त्यांत सांगकपानें सुधारणा करून गेलुग (पीत शिरस्त्राण) पंथ स्थापला. या पंथांतील मठवासी जर दारू प्याला किंवा त्यानें कोणत्याहि स्त्रीशीं संबंध ठेवला तर त्याला हांकून देण्यांत येतें. तिबेटांतील बौद्धधर्मांत सुधारणा करणारा मोठा पुरुष एकच व तो अतीश हा होय. त्याच्या नंतर सुधारणा करणारे त्याचे शिष्य होते व अतीशनें काढलेल्या पंथाच्या जोडीचे दुसरे जे प्राचीन सुधारलेले पंथ दिसतात ते त्याच्या शिष्यांचे होत. अशा पंथांपैकीं कर्ग्यु व सस्क्य हे पंथ प्रमुख आहेत.
गेलुग पंथाच्या खालोखाल महत्त्वाचा हा कर्ग्यु पंथ आहे. हा अकराव्या शतकाच्या उत्तरार्धांत स्थापन झाला. याचें विशिष्ट लक्षण म्हणजे यति-धर्म. हे यतिधर्म लोकांनां नावडते होऊन या पंथापासून अनेक पोटपंथ निघाले. यांपैकीं कर्मपा व दुग्पा हे होत. दुग्पापंथ भूतानमध्यें फार प्रचलित आहे.
तिसरा मोठा सुधारलेला पंथ सस्क्य किंवा सक्य हा होय. मंगोल बादशहा कुब्लइखान याच्या कारकीर्दीपासून या पंथाची सत्ता वाढली. सस्क्य मठाच्या पुरोहितानें या बादशहाला बौद्धधर्माची दीक्षा दिली होती म्हणून बादशहानें त्याला तिबेटांतील बौद्धधर्माचें आधिपत्य दिलें. सस्क्य पंथाचें वर्चस्व बरेच दिवस-अनेक पिढ्या-होतें. या काळांत यानें इतर पंथांवर बराच जुलून केला. मिंग घराणें अस्तित्वांत आल्यापासून याला उतरती कळा लागली. या पंथांतील मठवाशांवर ब्रह्मचर्याची सक्ती नाहीं.
नाइंगमा हा जुना व मागसलेला पंथ होय. चांगले हुषार व श्रेष्ठ सदस्य दुसर्या पंथांत गेल्यावर राहिलेला दुर्बळ अवशेष तो हा पंथ होय. तिबेटांत बौद्धधर्म येण्यापूर्वीं तेथें जो बॉन पंथ होता त्यांतील बरेचसे संस्कार व देवता या नाइंगमांत आहेत. या पंथांत ब्रह्मचर्य पाळीत नाहींत.
राज्यव्यवस्था.- १७५७ सालीं चीनच्या बादशहानें दलाइ लामाचा तिबेटवरील अधिकार मान्य केला. ग्यत्सब लामा हा दुय्यम अधिकारी असून इतर मंत्र्यांच्या मदतीनें राज्यकारभार पाहतो. या राज्यांत १६।१७ विद्यापीठें आहेत. याचे ८० जिल्हे-जांग-असून प्रत्येक जिल्ह्यावर दोन (जांग-पान) अधिकारी असतात. ल्हासा सरकारला द्यावायाचे कर पैशाच्या रूपांत फारसे नसून मेंढ्या, तट्टें, लोणी, लोंकर, कापड इ. जिनसांच्या रूपांत असतात. नोकरांनां पगार नसून त्यांनां जमिनी दिलेल्या असतात. येथें बिगारीची पद्धति सर्वत्र प्रचलित आहे. सैन्यांतील घोडेस्वारांस पगार नसतो, तर त्यांनां कर माफ असतात. हा दर्जा मानाचा समजला जातो. या राज्यांत लहानसें सैन्य ठेवलें आहे. त्यांत ६ ड्यापॉन (वरिष्ठ अधिकारी) व १५६ सामान्य अधिकारी आहेत. राज्यांतील सर्व लोक शिबंदीचे घटक समजले जातात. लष्करी पोषाख घेण्यास समर्थ असून लष्करांत जाण्यास लायक असणार्या प्रत्येक मनुष्यानें लष्करी नोकरी केली पाहिजे व स्वतःचा खर्च स्वतःच चालविला पाहिजे असा नियम आहे.
राज्यकारभार धाकदपटशानें चालतो. राजकीय हक्क भिक्षुकांकडेच बहुतेक आहेत; व लोकांची या लामांवर फार भक्ति आहे. ल्हासा येथील राजप्रतिनिधि दिपंग, सेरा, किंवा गल्दन या मठांकडून निवडला जातो. १३ मठांस विशेष हक्क आहेत. ते आपला एक एक प्रतिनिधी सांग-दु किंवा राष्ट्रीय सभेकरितां निवडतात. चिनी बादशहाचा एक मुख्य रेसिडेंट असून त्याच्या शिवाय दुसरे पुष्कळ मोठेमोठे चिनी अधिकारी राज्यांत देखरेखीला ठेविलेले असतात. चिनी अधिकार्यांनां आपल्या बायका तिबेटमध्यें आणण्याचा अधिकार नाहीं. हळू हळू लामांची सत्ता कमीकमी होत जाऊन चिनी रेसिडेंटाची सत्ता वाढत चालली आहे.