प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

बौद्ध संप्रदायाचा चीन देशांत प्रसार.- बौद्ध संप्रदायाचा विस्तार चीनमध्यें कसा झाला हा एक मोठा विचाराचा प्रश्न आहे. या प्रश्नाचें परीक्षण करतांना अनेक महत्त्वाचीं तत्त्वें निघतील आणि कोडीं उलगडतील. जाव्हा, सयाम यांसारख्या कमी संस्कृतीच्या देशांत भारतीय विचार आणि उपासनासंप्रदाय प्रसृत झाले तर त्याचें फारसें नवल नाहीं. जपानांत भारतीय संप्रदाय पसरला त्यांचेंहि मोठेंसे नवल नाहीं. कारण या सर्व प्रदेशांस जंगलीपणांतून सुसंस्कृतींत आणण्यास हे संप्रदायच कारण झाले. ख्रिस्ती शकापूर्वील वाङ्‌मयाचा अभाव, आजपर्यंत स्त्रियांच्या ब्रह्मचर्याविषयीं असलेली अनास्था, स्त्रीपुरुषांचें परवांपर्यंत टिकलेलें आणि आजहि खेड्यापाड्यांत दिसून येणारें एकत्र नग्नस्नान व घटस्फोटाचें अतिसौकर्य या सर्व गोष्टी बौद्ध संप्रदायाच्या आगमनापूर्वी जपानची बौध्दीक व नैतिक स्थिति किती मुग्धपणाची होती हें दाखवितात.

चीनची गोष्ट अशी नाहीं. कनफ्यूशिअस, मेनशिअस, लाउत्से यांच्यासारखे थोर नीतिवेत्ते व ब्रह्मवादी फार प्राचीन काळापासून चीनमध्यें आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पाडतांना दिसतात. शिवाय कलाकौशल्य, यांत्रिक सुधारणा, तवारिखांच्या स्वरूपांचीं वर्तनापत्रें, इतिहास इत्यादि बाबतींत सर्व जगास अपूर्व वाटणारे संस्कृतीचे अंश ज्या चिनी लोकांत दृग्गोचर होतात त्या चिनी लोकांवर बौद्धांच्या संप्रदायानें छाप कशी पाडली आणि या संप्रदायाचा प्रसार सर्व साम्राज्यभर कसा झाला याचा साद्यंत इतिहास तयार झाल्यास समाजशास्त्राचें विचार प्रसारविषयक ज्ञान जगास लाधेल. या प्रसाराच्या बाबतींत कांहीं स्थूल गोष्टी आपणांस दिसतात. कोणाची जर अशी कल्पना असेल कीं, केवळ राजानें बौद्ध संप्रदायाचा स्वीकार केला म्हणून शिष्टाचाराप्रमाणें किंवा एखाद्या रोगाच्या साथींप्रमाणें बौद्धमतें आणि धर्म हीं चीनच्या साम्राज्यभर पसरलीं तर ती चुकीची आहे. कारण विचारप्रसाराचा इतिहास तेवढ्यानेंच स्पष्ट होत नाहीं. शिष्टाचार (फॅशन) म्हणून किंवा सांसर्गिक असुकरणानें परकीय संस्कृतीचें केवळ पातळसें आवरण लोकांवर बसूं शकेल, तथापि तसलें तें पटल चिरकाल टिकणार नाहीं. दोन हजार वर्षें जो परिणाम टिकला तो परिणाम उत्पन्न करण्यास कांहीं कर्तव्यनिष्ठ, निग्रही मनुष्यांची परंपरा कारण झाली असली पाहीजे. त्या परंपरेचा आपणांस साद्यंत इतिहास देतां येत नाहीं. परंतु या क्षेत्रांत परिश्रम करणार्‍या कांहीं व्यक्तींचीं नांवें देतां येतील. यास साधन म्हटलें म्हणजे ब्यूनिओ नँजिओ (Bunio Nanjio) यांची ग्रंथसूची होय. ही ग्रंथसूची या कर्त्यानें (१) चिनांतील निरनिराळ्या राजघराण्यांच्या वेळीं प्रसिद्ध झालेलीं धर्मोपदेशकांचीं चरित्रें व बौद्ध पुस्तकांच्या सूची, (२) बील (Beal. 1876.) यानें तयार केलेली चीनमधील बौद्ध तिपिटकाची ग्रंथसूची (३) मायर्स याचें “Chinese Reader’s Manual” (चरित्रात्मक, ऐतिहासिक, पौराणित, व सामान्य वाङ्‌मयात्मक संदर्भग्रंथ),  (४) एडकिन्स याचें “चीनमधील बौद्धधर्म” (ऐतिहासिक, वर्णानात्मक व टीकात्मक लेखसंग्रह), वगैरे पुस्तकांच्या आधारें तयार केली आहे. चिनी बौद्ध तिपिटकाच्या प्रथम व द्वितीय परिशिष्टांत अनुक्रमें ज्या भारतीय ग्रंथकारांच्या ग्रंथाची चिनींत भाषांतरें झालीं आहेत, व ज्या भारतीय ग्रंथकारांनीं चिनी भाषेंत भाषांतरे केलीं आहेत अशा दोन्ही प्रकारच्या ग्रंथकारांची व भाषांतरकारांची यादी दिली आहे. ज्या भारतीय ग्रंथकारांच्या ग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरे झालीं त्यांपैकीं फक्त मुख्य मुख्य व प्रसिद्ध ग्रंथकारांचाच या यादीमध्यें समावेश केला आहे. याखेरीज दुय्यम प्रतीच्या कित्येक ग्रंथकारांची नांवें आपणांस विस्मृतीमुळें अगर संशोधनाच्या अभावीं अज्ञात असण्याचा संभव आहे. या यादीवरून आपणास मुख्य १३ भारतीय ग्रंथकारांची नांवें उपलब्ध होतात व त्यांच्या एकंदर १०४ ग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरें झालीं होतीं एवढीं माहिती मिळते. त्याप्रमाणें दुसर्‍या यादीवरून बौद्धसंप्रदायाचा मुख्य ग्रंथ जो तिपिटक त्याचीं भाषांतरें भारतीय ग्रंथकारांनीं चिनी भाषेंत केल्याबद्दलची माहिती मिळते. ज्या देशांत आपल्या संप्रदायाचा प्रसार करावयाचा त्या देशांतील लोकांस आपली सांप्रदायिक तत्त्वें कळण्यासाठीं व आपला संप्रदाय तेथें दृढमूल होण्यासाठीं त्या देशच्या भाषेंत आपलें सांप्रदायिक मुख्य ग्रंथ असणें अत्यावश्यक असतें. कोणताहि संप्रदाय एखाद्या देशांत चिरकालीन टिकण्यास त्या देशांतील देश्यभाषेंत त्या संप्रदायाचें वाङ्‌मय तयार होणें फार जरूर असतें. या दृष्टीनें अनेक ग्रंथकारांनीं तिपिटकाचीं चिनी भाषेंत भाषांतरें केलीं व तन्मूलक वाङ्‌मयाचा पाया घालून दिला. अशा ग्रंथकारांपैकीं प्रमुख भारतीय ग्रंथकारांची संख्या ७५ असून त्यांनी ६७५ हून अधिक ग्रंथरचना केली असें आपणांस आढळून येतें.

 ज्यांच्या ग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरें झाली आहेत अशा मुख्य भारतीय ग्रंथकारांची यादीः-
 ग्रंथकाराचें नांव.    भाषांतर झालेल्या
ग्रंथाची संख्या.
 १ मैत्रेय.  १०
 २ अश्वघोष.  ७
 ३ नागार्जुन.  २४
 ४ देव. हा दक्षिण हिंदुस्थानचा रहिवासी, व नागार्जुनाचा शिष्य; याला
  नीलनेत्र असेंहि म्हणत; परंतु याचें मूळ नांव चंद्रकीर्ति असे होतें.
 ९
 ५ वसुबंधु.  ३६
 ६ स्थिरमति. नालंद येथील एक विद्वान उपाध्याय.    ३
 ७ स्थितमति. जयसेनाचा ( ?) गुरु.    ३
 ८ देवशर्मा. बुद्ध निर्वाणापदाप्रत गेल्यानंतर १०० वर्षेंपर्यंत हा जिवंत
  होता असें म्हणतात.  
 १
 ९ वसुमित्र. कनिष्कराजानें बोलविलेल्या ५०० अर्हतांत हा प्रमुख होता.  ७
 १० समंतभद्र. हा योगाचार्य होता. (बोधिहृदय शिलादनकल्प ग्रंथाचा कर्ता.)  १
 ११ शिलादित्यराजा  १
 १२ कपिल ऋषि. सांख्यवादाचा जनक. (सांख्यकारिकेचा कर्ता.)  १
 १३ ज्ञानचंद्र. वैशेषिक तत्त्वज्ञानाचा गुरु.  १

चिनी भाषेंत बौद्ध तिपिटकाचें भाषांतर करणारे भारतीय भाषांतरकार.

१. का श्य प मा तं ग.  मध्यहिंदुस्थानांतील ब्राह्मण श्रमण. चिनी वकील त्साई यिन (Tsai yin) (इ. स. ६५) याच्या निमंत्रणावरून हा इ.स. ६७ सालीं चीनमध्यें गेला. त्याचवर्षीं त्यानें लोयान (Lo-yan) येथील मठांत एका सूत्राचें भाषांतर केलें; व थोड्यांच दिवसांनीं तेथें मरण पावला.

२ कू फा ला न. फालनाचा अर्थ धर्मरक्ष असा असावा.  परंतू कू-फा-लान ह्याला  तिबेटी लोक गोवर्धन किंवा भारण असें म्हणत असावेत. हा काश्यापाच्या मागून गुप्‍तपणें चीनमध्यें गेला; व दोघांनीं मिळून ४२ परिच्छेदांच्या सूत्राचें भाषांतर केलें.

३ लो क र क्ष.  श्रमण. हा इ. स. १४७ त चीनमध्यें गेला; व इ. स. १८६ पर्यंत लोयान येथें भाषांतर करण्यांत गुंतला होता.

४ शा क्य.  श्रमण. इ. स. २०७.

५ ध र्म का ल. श्रमण. इ. स. २२२. चीनमध्यें आल्यानंतर त्याला असें आढळून आलें कीं चिनी उपाध्यांनां विनयाचे नियम अगदींच माहीत नाहींत. म्हणून त्यानें इ. स. २५० सालीं, महासंघिकांच्या प्रतिमोक्षाचें भाषांतर केलें. चिनी भाषेंत विनयपिटकाचें हेंच पहिलें पुस्तक होय.

६ खा न सा न - ह व ई.  कंबू येथील मुख्यप्रधानाचा सर्वांत वडील मुलगा. वू राज्याच्या राजधानीस तो इ. स. २४७ या वर्षीं आला. त्यानें इ. स. २५१ ते इ. स. २८० पर्यंत भाषांतराचें काम केलें.

७ का ल रु चि.  श्रमण. इ. स. २८१. त्यानें एका सूत्राचें भाषांतर केलें.


८ श्री मि त्र. राज्यावरील वारसा सोडून देऊन हा श्रमण झाला होता. त्यानें इ. स. ३०७-३१२ या वर्षीं नानकिंग येथें ३ ग्रंथांची भाषांतरें केलीं.

९ ध र्म र क्ष.  श्रमण. यानें इ. स. ३८१ - ३९५ या वर्षी कित्येक ग्रंथांचीं भाषांतरें केली.

१० गौ त म सं घ दे व.  कुभा (अर्वाचीन काबूल) येथील एक श्रमण. यानें एकंदर ७ ग्रंथांचीं भाषांतरें केलीं.

११ बु द्ध भ द्र.  हा अमृतोदनाच्या कुलांतील असून शाक्य मुनीचा चुलता होता. यानें एंकदर १३ किंवा १५ ग्रंथांचें भाषांतर केलें. चिनांत त्याला कुमारजीव हा भेटला. कुमारजीवाला  न समजाणारा भाग तो बुद्धभद्रला विचारीत असे. बुद्धभद्र इ. स. ४२९ त मरण पावला.

१२ ध र्म प्रि य.  श्रमण. हा विनयांत फार निपुण असून, त्यानें इ. स. ४०० मध्यें “विनयासंबंधीं मिश्र प्रश्न” या ग्रंथाचें भाषांतर केलें.

१३ वि म ला क्ष.  कुभा (काबूल) येथील श्रमण. हा विनय शास्त्राचा मोठा गुरू असून कर्मजीव हा त्याचा शिष्य होय. विमलाक्ष चिनांत असतां, कर्मजीव त्याला पुष्कळ मान देत असे. त्यांने दोन ग्रंथांचें भाषांतर केलें. (४०५-४१८).

१४ गी त मि त्र. श्रमण.

१५ नं दी.  पश्चिमभागांत हा एक गृहपति होता. ह्यानें ३ ग्रंथांचें भाषांतर केलें.

१६ ध र्म ब ल. श्रमण. यानें “अमितायुरर्हत् सम्यक्संबुद्धसूत्रा”चे भाषांतर केलें (इ.स.४१९).

१७ कु मा र बु द्धि. श्रमण. (इ. स. ३६९-३७१).

१८ ध र्म प्रि य. श्रमण. यानें एका सूत्रांचें भाषांतर केलें.  (इ. स. ३८२).

१९ ध र्म दि न. तुखारा येथील  एक श्रमण. खानान येथें त्यानें पांच ग्रंथांचें भाषांतर केलें.

२० कु मा र जी व. याचे वाडवडील आपल्या देशांत राज्यकर्ते होते. ह्याचा बाप कुमारायण आपलें राज्य सोडून खरचर येथें गेला. तेथें तेथील राजाची धाकटी बहीण जीवा हिजबरोबर त्याचा विवाह झाला. कुमारजीव हें नांव त्याच्या आईबापांच्या नांवावरून पडलें असें म्हणतात.

कुमारजीव हा सातव्या वर्षीं भिक्षु होऊन, प्रसिद्ध धर्मोपदेशक बंधुदत्त ( कुभा-काबूल-येथील राजाचा चुलत भाऊ) याचा शिष्य बनला. तो बारा वर्षांचा असतां त्याच्या आईला एक अर्हत् भेटला. कुमारजीवाला वाईट मार्गाकडे जाऊं न देण्याची चांगली खबरदारी घेण्यास त्यानें तिला सांगितलें; पापाचरण न करितां ३५ व्या वर्षापर्यंत तो राहिल्यास त्याच्या हातून बौद्धधर्माचा पुष्कळ प्रसार होऊन उपगुप्ताप्रमाणें तो असंख्य लोक तारील; परंतु त्याचें शील बिघडल्यास तो फक्त हुषार व चतुर उपाध्याय होईल असेंहि त्यानें बजाविलें. पुढें कुमारजीवानें विमलाक्षाजवळ सर्वास्तिवाद विनयाचें अध्ययन केलें.

इ. स. ३८३ मध्यें, चीनच्या त्सिन घराण्यांतील राजानें पाठविलेल्या सेनापतीनें खरचरचा नाश करून त्या देशाच्या राजाला ठार मारलें व कुमारजीवाला पकडून नेलें. वाटेंत, सेनापति लु क्वान यानें कुमारजीवाला (त्याच्या ३५ व्या वर्षापूर्वींच) राजाच्या एका मुलीशीं संभोग करावयास भाग पाडलें. इ.स. ४०१ पर्यंत, कुमारजीव लु क्वानबरोबर चीनमध्यें लियानक्यू येथें होता; व नंतर वर उल्लेखिलेल्या त्सिन घराण्यांतील दुसरा पुरुष याओहिन याजकडे खानान येथें गेला. तेथें त्याचें चांगले स्वागत झालें. इ. स. ४०२ ते ४१२ पर्यंत त्यानें पुष्कळ ग्रंथांचें भाषांतर केलें, व चिनी भाषेंत कांहीं पुस्तकें व कविता लिहिल्या. हजारों चिनी धर्मोपदेशक त्याचे शिष्य बनले व त्या शिष्यानींहि पुष्कळ पुस्तकें लिहिलीं. कुमारजीव इ. स. ३९९ ते ४१५ या हुंश (Hunsh) कालांत मरण पावला.

२१ पु ण्य त र. कुभा (काबूल) येथील श्रमण. यानें कुमार जीवाबरोबर एका ग्रंथाचें भाषांतर केलें.

२२ ध र्म य श. काबूल (कुभा)चा श्रमण. {kosh भा. कें ग्रं. सं. = भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या.}*{/kosh}  भा. के. ग्रं. सं. १.

२३ ध र्म र क्ष. मध्यहिंदुस्थानांतील श्रमण. हा चीनमध्यें इ. स. ४१४ त गेला. यानें कित्येक ग्रंथांचें भाषांतर केलें. उत्तर वेइ घराण्यांतील थाईवू-ति याच्या बोलावण्यावरून त्याजकडे जात असतां वाटेंत मारेकर्‍याकडून तो मारला गेला.

२४ बु द्ध व र्म न. श्रमण भा. के. ग्रं. सं. १.
{kosh भारतीयेतर ग्रंथकारांच्या नांवामागें क्रमांक घातला नाहीं.}*{/kosh}  शि ह क म न. चिनी श्रमण. यानें पाटलिपुत्रास येऊन निर्वाणसूत्र, महासंघिक विनय, व दुसरे कांहीं ग्रंथ चीनमध्यें नेलें; व इ. स. ४३३-४३९ त निर्वाणसूत्राचें भाषांतर केलें.
 
२५ बु द्ध जी व. काबूल (कुभा) येथील श्रमण. भा. के. ग्रं. सं. ३.
 
२६ का ल य शः श्रमण. भा. के. ग्रं. सं. २.

२७ ध र्म मि त्र. श्रमण (काबूल.).
(चिनी श्रमण शिह कयेन- (Shih k’yen) यानें काबूलहून संस्कृत ग्रंथ आणून १० किंवा १४ ग्रंथांचें भाषांतर केलें.)

२८ ई श्व र. श्रमण. यानें संयुक्त अभिधर्महृदयशास्त्र या ग्रंथाचें भाषांतर केलें. (इ.स.४२६).

२९ गु ण व र्मा. श्रमण (कुभा=काबूल). भा. के. ग्रं. सं. १०.

३० सं घ व र्मा. श्रमण. यानें क्येन ये (नानकिंग) (Kienyeh) येथें इ. स. ४३३ त ५ ग्रंथाचें भाषांतर केलें.

३१ गु ण भ द्र. मध्यहिंदुस्थानांतील ब्राह्मण श्रमण. याला महायान असें टोपणनांव होतें. यानें चिनी भाषेमध्यें सुमारें ७८ ग्रंथांचें भाषांतर केलें.

(धर्म विक्रम (शूर) चिनी श्रमण.)

३२ सं घ व र्मा. सिलोन येथील श्रमण. यानें महीशासक विनयाच्या कांहीं भागाचें चिनींत भाषांतर केलें.

३३ ध र्म जा त य शः. भा. के. ग्रं. सं. १.

३४ म हा या न. पश्चिमभागांतील श्रमण. यानें ५०० जातकांचें सूत्र स्थविरपंथाचा विनय या दोन ग्रंथांचें भाषांतर केलें.

३५ सं घ भ द्र.                     भा. के. ग्रं. सं. १.
३६ ध र्म म ति.      श्रमण-                ˝      ˝
३७ गु ण वृ द्धि.                    मध्यहिंदुस्थान.   ˝      ˝

(मंद्र. श्रमण. (सयाम ?))
संघपाल (वर्मा)-सयाम ?)

३८ उ प शू न्य. मध्यहिंदुस्थानचा राजा उद्यान, याचा हा मुलगा. हा प्रथम पूर्व वेइ घराण्याच्या राजधानींत रहात असे. नंतर दक्षिणेकडे लिआन घराण्याच्या राजधानींत (नानकिंग) रहावयास गेला. यानें एकंदर ५ ग्रंथांचें भाषांतर केलें.

३९ प र मा र्थ. याला गुणरत असेंहि नांव होते. तो उज्जयिनीचा राहणारा. ५४८ त तो नानकिंग येथें गेला. त्यानें सुमारें १० ग्रंथांचें भाषांतर केलें.

४० किं क र. श्रमण. भा. के. ग्रं. सं. ५.

४१  ध र्म रु चि. श्रमण. भा.के.ग्रं.सं. ३.
४२ रत्नमति. मध्यहिंदुस्थानांतील श्रमण.भा.के.ग्रं.सं.३.
४३ बोधिरूचि. उत्तरहिंदुस्थानांतील एक श्रमण. भा. के. ग्रं. संय ३० हा लोयान येथें इ. स. ५०८ त आला.

४४ बु द्ध शां त. श्रमण. के. ग्रं. सं. १०.

४५ गौ त म प्र ज्ञा रु चि.  वाराणसीचा ब्राह्मण. भा. के. ग्रं. सं. १४ ते १८.

४६ वि मो क्ष प्र ज्ञा अथवा वि मो क्ष से न. हा कपिलवस्तूच्या शाक्य घराण्यांतील होता. श्रमण. (इ. स. ५४१) भा. के. ग्रं. सं. ५.

४७ ध र्म बो धि. भा. के. ग्रं. सं. १.

४८ न रें द्र य शः. उद्यान (उत्तरहिंदुस्थान) येथील श्रमण. भा. के. ग्रं. सं. ७.

४९ ज्ञा न भ द्र. हा पद्मदेशचा ( ?) श्रमण. यानें पंचविद्येंतील एका सूत्राचें भाषांतर केलें.

५० ज्ञा न य शः. मगधदेशाचा श्रमण. हा व याचे दोन शिष्य यथोगुप्‍त व ज्ञानगुप्‍त, यांनीं ६ ग्रंथांचें भाषांतर केलें.

५१ गौ त म ध र्म ज्ञा न. वाराणसी येथील उपासक. हा प्रज्ञारुचीचा (वर ४५ पहा.) वडील मुलगा. उत्तर त्शि घराण्याचा मोड झाल्यानंतर (इ. स. ५७७.) उत्तर क्यू घराण्यानें त्याला यानसेन जिल्ह्याचा सुभेदार नेमिलें; परंतु त्या घराण्यामागून आलेल्या सुइ घराण्यांतील पहिला बादशहा वन-ति यानें त्याला राजधानीस बोलाविलें. तेथें त्यानें एका ग्रंथाचें भाषांतर केले.

५२ वि नी त रु चि. उद्यान (उत्तरहिंदुस्थान)चा श्रमण. भा. के. ग्रं. सं. २.

५३ न रें द्र य श. भा. के. ग्रं. सं. ८.

५४ ध र्म गु प्‍त. यानें इ. स. ५९० ते ६१६ पर्यंत कित्येक ग्रंथांचें भाषांतर केलें.

५५ प्र भा क र मि त्र. क्षत्रिय श्रमण. (इ. स. ६२७) भा. के. ग्रं. सं. ३.

(ह्यून क्वान. लोयान येथील एक चिनी श्रमण. इ. स. ६२९ त हा हिंदुस्थानांत आला होता. चिनांत परत गेल्यावर यानें निरनिराळ्या ७५ ग्रंथांचें भाषांतर केलें.)

५६ भ ग व द्ध र्म. श्रमण. (पश्चिमहिंदुस्थान). भा. के. ग्रं. सं. १.

५७ अ ति गु प्‍त. श्रमण. (मध्यहिंदुस्थान). भा. के. ग्रं. सं. १.
५८ पु ण्यो पा य. मध्यहिंदुस्थानांतील एक श्रमण. हा इ. स. ६५५ त चीनमध्यें गेला. यानें आपल्या बरोबर महायान व हीनयान ह्या दोन्ही पंथांच्या तिपिटकाच्या निरनिराळ्या १५० प्रती नेल्या होत्या. इ. स. ६५६ त, चिनी बादशहानें त्याला प्यूलोकंडोर बेटांत चमत्कारिक नवीं औषधें आणण्याकरितां पाठविलें होतें. तेथून इ. स. ६६३ त परत आल्यानंतर त्यानें तीन ग्रंथांचें भाषांतर केले.

५९ दि वा क र. भा. के. ग्रं. सं. १८.

६० बु द्ध पा ल. काबूलचा श्रमण. इ. स. ६७६. भा. के. ग्रं. सं. १.

६२ दे व प्र ज्ञा. कुस्तान (खोतान) येथील श्रमण. भा. के. ग्रं. सं. ६.

६३ शि खा नं द. कुस्तान येथील श्रमण. भा. के. ग्रं. सं. १९ (इ. स. ६९५ ते ७००) {kosh भाषांतर केव्हां केलें ते सन.}*{/kosh}

६४ र त्‍न चिं त. काश्मीरचा श्रमण. (इ. स. ६९३-७०६) * भा. के. ग्रं. सं. ७.

६५ बो धि रु चि. याचें मूळ नांव धर्मरुचि असें होतें. हा काश्यपगोत्री ब्राह्मण श्रमण. इ. स. ६९३ ते ७१३ पर्यंत यानें ५३ ग्रंथांचें भाषांतर केलें.

६६ प्र मि ति. मध्यहिंदुस्थानांतला एक श्रमण. भा. के. ग्रं. सं. १.

६७ शि ह क्ये न. (Shih k’yen) कुस्तानच्या राजाचा मुलगा. याला चिनांत ओलिस म्हणून पाठविलें होते. भा. के. ग्रं. सं. ४.

६८ व ज्र बो धि. दक्षिणहिंदुस्थानांतील मलयदेशचा श्रमण. हा चिनांत इ.स.७१९ त गेला. भा. के. ग्रं. सं. ४.

६९ शु भ क र सिं ह. शाक्यमुनीचा चुलता अमृतोदन याच्या कुलांत त्याचा जन्म झाला असून नालंदच्या मठांत तो रहात असे. हा इ. स. ७१६ त चीनच्या राजधानीस गेला. तेथें त्यानें ४ ग्रंथांचें भाषांतर केलें.

७० अ मो घ व ज्र. ब्राह्मण श्रमण. हा पहिल्यानें इ. स. ७१९ त आपला गुरू वज्रबोधि (नं. ६८) याजबरोबर चिनांत गेला. इ. स. ७६५ त, त्याला त्रिपिटक भदंत ही पदवी मिळाली. इ. स. ७७१ त, चीनच्या बादशहाच्या वाढदिवशीं त्यानें भाषांतर केलेले ग्रंथ बादशहास नजर केले; व त्या बरोबर एक विनंतीअर्जहि सादर केला. त्यांत त्यानें स्वतः- संबंधानें पुढीलप्रमाणें उल्लेख केला आहे. “लहानपणापासून (इ. स. ७१९ ते ७३२) मी आपल्या गुरूची (वज्रबोधी) सेवा करून त्याजपासून योगाचें ज्ञान संपादन केले. पुढें हिंदुस्थानच्या पांच भागांत जाऊन, चीनमध्यें पूर्वीं न आलेल्या अशा सूत्रांच्या व शास्त्रांच्या निरनिराळ्या ५०० प्रती आणल्या. इ. स. ७४६ त, मी राजधानीस परत आलों; व त्या वर्षापासून आतांपर्यंत (इ.स. ७७१) ७७ ग्रंथांचें भाषांतर केलें.” थानघराण्यांतील बादशहांच्या दरबारीं अमोघवज्रासा फार मान असे. त्याच्या वजनामुळें चिनांत तंत्रमत प्रथम प्रचलित झालें. तो इ. स. ७७४ त मरण पावला.

७१ प्र ज्ञा. काबूलचा श्रमण. भा. के. ग्रं. सं. ४.

७२ थि ए न-सि-त्साई. जलंदरचा श्रमण. हा चिनांत इ. स. ९८० सालीं गेला;  यानें १८ ग्रंथांचें भाषांतर केलें.

७३ (Sh-hu) दानपाल ( ?) उद्यानचा श्रमण. यानें १११ ग्रंथांचें भाषांतर केलें.

७४ ध र्म र क्ष. मगधदेशचा श्रमण. (इ. स. १००४ ते १०५८) भा. के. ग्रं. सं. १२.

७५ Tshz’hhien मैत्रेयभद्र ( ?) मगधदेशचा श्रमण. भा. के. ग्रं. सं. ५.

चीनमध्यें गेलेल्या आणि तेथें जाऊन ग्रंथकर्तृत्व अंगीकारलेल्या भिक्षूंची एक लांबलचक यादी देऊन वाचकांस त्रास देण्याचा आमचा हेतु नव्हता, तथापि स्वमतप्रसारार्थ किती ग्रंथलेखन करावें लागलें, काय खटाटोप करावे लागले याची सामान्य कल्पना येण्यासाठीं एक कंटाळवाणी यादी वाचकांच्या पुढें आपटण्याखेरीज इलाज नव्हता. संप्रदायाचा प्रसार झाला तो चिनी लोकांच्या भोळसरपणानें एखाद्या सांथीसारखा झाला नसून मोठ्या मेहनतीनें झाला आणि ती मेहनत घेणारे लोक आपल्याच राष्ट्रांतील होते ही गोष्ट मेहनतीस कंटाळणार्‍या जनतेपुढें अत्यंत मोकळेपणानें मांडणें अवश्य आहे.

चिनी लोकांमध्यें हा संप्रदाय अनेक शतकें विचारक्षेत्रांत संग्राम केल्याशिवाय टिकला नाहीं. देशांत सर्व तर्‍हेनें वृद्धि व्हावी, लोकांनीं प्रजोत्पत्ति करावी, मेहनत करावी आणि साम्राज्याच्या संपत्तीची वृद्धि करावी अशीं तत्त्वें शिकविणारें कनफ्यूशिअसचें तत्त्वज्ञान लोकांत विशेषेंकरून मांदारिनवर्गांत जिवंत होते. त्याची यथार्थ कल्पना येण्यासाठीं डॉ. ग्रूटचे ग्रंथ वाचावेत. {kosh Religious systems of China by Dr. J. J. M. de Grobt 6 Vols. 1910.  † Three years in Tibet. Madras 1909.}*{/kosh}  या तत्त्वज्ञानाच्या अभिमान्यांनीं निवृत्तिमार्ग उपदेशिणार्‍या बौद्ध भिक्षूंचे हाल थोडेथोडके केले नाहींत.