प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
स्थावर मालमत्तेवर सावकारी.- स्थावर मालमत्ता ही रक्कम गुंतविणाराच्या पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनें कोठेंहि मोठ्या महत्त्वाची समजली जाते. महाराष्ट्रांत तर सध्यांची मुख्य सावकारी शेतकर्यांनां पिकाकरितां किंवा इतर व्यवहाराकरितां पैसे लागतात ते पैसे जमिनीच्या किंवा जेव्हा जमीन विकणें शक्य नसेल तेव्हां पिकाच्या जामिनकीवर देण्यापुरतीच आहे. या प्रकारच्या सावकारीचे दोन हेतु असतात; एक हेतु म्हटला म्हणजे शेतकर्यांचें शेत किंवा घरवाल्याचें घर घशांत टाकणें. या हेतूनें केलेली सावकारी ही खरी सावकारी नव्हे. सावकारीचा दुसरा हेतु म्हटला म्हणजे निव्वळ व्याज खाणें. निव्वळ व्याजाच्याच दृष्टीनें चालविलेली सावकारी उच्च प्रकारची समजली जावी हें स्वाभाविक आहे. सध्यांची प्रवृत्ति या प्रकारच्या सावकारीकडे कितपत आहे आणि आपली स्थावर इस्टेट वाढवावी या हेतूच्या सावकारीकडे कितपत आहे याचें पृथक्करणात्मक ज्ञान आज मिळवितां येईल किंवा नाहीं हा प्रश्नच आहे. उदाहरणार्थ, आज नागपूरचे घटाटे, बुटी, टालाटुले, चिटणवीस यांच्याकडून होत असलेल्या व्यवहारांत आणि त्यांच्या दौलतीच्या इतिहासांत भूमिभक्षक सावकारी कितपत आहे आमि कुळांस जिवंत राखून त्यांस परिश्रम करण्यास उत्तेजन देणारी आणि केवळ पैशास योग्य व्याज नियमानें मिळावें एवढीच अपेक्षा करणारी सावकारी कितपत आहे हें ज्याचा तोच सांगूं शकेल.
पहिल्या सावकारीस आपण भूमिभक्षक सावकारी हेंच नांव ठेवूं आणि दुसर्या प्रकारच्या सावकारीस व्याजापेक्षी किंवा खरी सावकारी असें म्हणूं. या दोन्ही प्रकारच्या सावकार्या एकमेकांहून अगदीं भिन्न, म्हणजे जो मनुष्य एक प्रकारच्या धंद्यांत आहे तो दुसर्या प्रकारच्या सावकारीमध्यें व्यवहाराचीं कांहीं तत्त्वें सामान्य असून कांहीं मात्र भिन्न आहेत. या तत्त्वांचें पृथक्करण केलें असतां. प्रथमतः एक स्थूल नियम असा दिसतो कीं, यूरोपियन तर्हेनें समाईक भांडवलाच्या ज्या बँका आहेत त्यांची प्रवृत्ति व्याजापेक्षी सावकारीकडे असते आणि खासगी सावकार आणि पैसे बाळगणारे इतर लोक यांची प्रवृत्ति भूमिभक्षक सावकारीकडे असते. धंद्यासाठीं ज्यांनां लोकांच्या कडून पैसा बेतानेंच घ्यावयाचा असतो आणि ज्यांचें ध्येय आपली कर्ज काढण्याची किंवा जनतेंतील पैसा ओढण्याची शक्ति विशेषशी न वाढवितां आपली स्थावर इस्टेट वाढविण्याचेंच असतें ते भूमिभक्षक सावकारीचा अवलंब करतात.
सामान्य व्यक्तीचीं रक्कम गुंतविण्याचीं तत्त्वें हीं दिसतातः
(१) मूळ रकमेची सुरक्षितता असली पाहिजे, मग व्याज कमी किंवा मुळींच न आलें तरी पुरवलें. पैसे पुरून ठेवण्याची पद्धत कमी कमी होत चालली आहे, तिचा अंतर्भाव या तत्त्वांत होईल.
(२) रक्षण, उपभोग व संचय या गोष्टींचें एकीकरण ज्या खर्चांत होईल असा खर्च करणें. बर्याच कालापर्यंत उपभोग घेतां येईल, आणि तेणेंकरून ज्यांची किंमत फारशी कमी होणार नाहीं अशा वस्तूंचा म्हणजे जमीन, दागिने (म्हणजे सोनें व जडजवाहीर), यांचा संग्रह करणें.
(३) पुढील काळाकरितां म्हणजे वृद्धपकाळाकरितां किंवा मुलाबाळांकरितां तजवीज करणें. विम्याची पॉलिसी घेणें वगैरे.
(४) मुलाच्या उधळपट्टी वगैरे दुर्गुणांनीं त्यास एकदम दारिद्र्य येऊं नये म्हणून एकदम खर्च करून टाकण्यास व्यत्यय येईल अशा व्यवस्थेनें रक्कम गुंतविणें.
पैशाच्या म्हणजे देण्याघेण्याच्या व्यापारावर उपजीविका करणार्याचीं रक्कम गुंतविण्याचीं तत्त्वें कांहीं अंशीं सामान्य व्यक्तीच्या तत्त्वांशीं सदृश आणि कांहीं अंशीं भिन्न आहेत. खासगी सावकाराच्या धंद्यांत वरील सर्व प्रकारचे हेतू दृग्गोचर होतात. कां कीं, सावकरा जरी झाला तरी त्याला व्यक्ति या नात्यानें काळजी असतेच. शिवाय सामान्य व्यक्तीस ज्या काळज्या आहेत त्यांची जाणीव ज्या सावकारास आहे त्या जवळच लोकांचे पैसे येतील. ज्या सावकाराची गहाण वगैरे येणार्या वस्तूंचा स्वतः उपभोग घेण्याची दृष्टी कमी असते आणि उत्पादक रीतीनें रक्कम गुंतविण्याची इच्छा असते, तो जास्त जोखीम घ्यावयास तयार असतो. तो इस्टेट विकत न घेतां तिजवर कर्जाऊ रक्कम देऊन ती ताब्यांत घेण्याच्या विचारांत असतो. या प्रकारची वृत्ति सावकारिच्या धंद्याबाहेरील लोकांसहि असते.
दुसर्याचे पैसे फारसे न घेणारा सावकार व दुसर्याचे पैसे घेऊन त्यांवर सावकारी करणारा सावकार यांच्या व्यवहारपद्धतींत स्वाभाविकपणेंच तफावत उत्पन्न होते.
खासगी सावकारांस पैसे परत करण्याची निकड नसल्यामुळें आणि बँकांस अशी निकड असल्यामुळें ज्या रोख्यांचा विक्रय ताबडतोब करून आपली रक्कम वसूल करून घेतां येणार नाहीं अशा प्रकारचे रोखे घेण्याच्या व्यवहारांत पडणें पहिल्यास शक्य होईल व दुसर्यास (बँकेस) शक्य होणार नाहीं. यामुळें एकाचा डोळा जमिनीवर व दुसर्याचा (बँकेचा) व्याजावर आणि मुद्दल ताबडतोड परत मिळविण्यावर असणार. ज्यांस ताबडतोब रकमेची जरूर नाहीं आणि स्वतःची रकम गुंतवावयाची आहे असले मुख्य सावकार म्हटले म्हणजे विमाकंपन्या आणि अमेरिकेंत प्रचलित असलेल्या ट्रस्टकंपन्या होत. यांनां दिलेले पैसे कोणी ताबडतोब मागेल अशी भीति नसते आणि त्यामुळें त्यांनां आपले पैसे कायमच्या ठेवींनीं अगर अधिक व्याजाच्या इतर प्रकारांनीं गुंतवितां येतात. हिंदुस्थानांतील विमा कंपन्या जमिनीवर फारसा पैसा गुंतवीत नाहींत, याचें कारण त्यांस येथील सामान्यतः अडाणी अशा शेतकर्यांबरोबर व्यवहार करणें रुचत नसावें. येथील विमा कंपन्यांपैकीं पुष्कळशा परक्या आहेत. ज्या परक्या नाहींत त्या परक्या कंपन्यांच्या हिंदुस्थानांतील व्यवहारापद्धतीची नक्कल करणार्या आहेत. परक्या कंपन्या आपली रक्कम कोठें गुंतवितात हें पूर्णपणें समजणें शक्य नाहीं. अमेरिकेंत जमिनींत रक्कम गुंतविण्याची विमा कंपनीची वहिवाट आहे.
आजचा शेतकर्यास पडणारा व्याजाचा दर दरमहा दरशेंकडा एक रुपया आहे. “कोऑपरेटिव्ह सोसायटी” च्या सेंट्रल बँका स्थापन झाल्या आहेत त्या शेंकडा ६ दरानें पैसा घेतात व रकमा व्यक्तीस न देतां पैसे मागणार्या स्थानिक ऋणकोच्या संघांस देतात. या संघास ते शाखा म्हणतात. त्यांस सर्व सभासदांच्या सामान्य जोखमीवर पैसा दरसाल दरशेंकडा ९ दरानें मिळतो आणि या शाखा व्यक्तींस दरसाल दरशेंकडा १२ याप्रमाणें पैसा देतात. सरकारनें धडपड करून मोठाले अधिकारी नेमून शेतकर्यांस अत्यन्त अल्प दरानें पैसे देण्याकरितां जी खटपट केली तिचें शेवटचें फल म्हटलें म्हणजे शेतकर्यांस १२ रु. शेंकडा व्याज पडतें, आणि एखाद्या खाजगी मनुष्यास आपल्या पैशावर त्रासाशिवाय व्याज मिळवावयचें झाल्यास शेंकडा ६ रुपये व्याज मिळवितां येतें. हें मात्र खरें कीं खाजगी मनुष्यास शेंकडा ६ रुपये व्याज देखील सर्व ठिकाणीं मिळत नाहीं. कांहीं ठिकाणीं ४॥ व्याजानें सुद्धां अनेक लोक रक्कम ठेवतात.
जमीन पळून जात नाहीं असें असतां तिच्या जोखमीवर धंदा करणार्या शेतकर्यास इतकें व्याज पडतें याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे शेतकर्याकडून वेळेवर रक्कम येईल किंवा नाहीं याची शाश्वती नसतें हें होय. शेतकर्याकडून पैसे येण्याची शाश्वती असली तर बर्याच थोड्या व्याजानें पैसे शेतकर्यास मिळणें शक्य होईल. कां कीं आज बरेंच मोठें व्याज घेऊन शेतकर्यांमध्यें सावकारी करणार्या सावकारास शें. ५ व्याज तरी सुटत असेल किंवा नाहीं याची वानवाच आहे. हें म्हणणें सिद्ध करण्याकरितां कांहीं गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत. ज्या सावकाराचीं दुकानें गांवोगांव आहेत अशा सावकाराचें एखादें दुकान उदाहरणार्थ घेऊं. समजा कीं, सावनेर येथील एका सावकाराच्या दुकानांत २०००० रक्कम आहे. पैकीं त्यानें १७०००, दरमहा १॥ रु. व्याजाच्या दरानें कर्जाऊ दिली तर त्याला सालीना ३००० रु. व्याज येईल. पण मुनीम, कारकून, रोकडीया व उग्राणी करणारे चारपांच ‘वारकरी’ यांचा जो एकंदर व्यवस्थाखर्च असेल तो त्यांतून वजा करावा लागेल. हा खर्च वर्षाचा अंदाजानें जर २००० धरला व तो ३००० मधून वजा केला तर साधारण शें. ६ व्याज येतें. हें शें. ६ व्याज सर्व रकमेवरील व्याज वसूल झालें असें गृहीत धरल्यासच येतें. पण सावकारास आणखी कांहीं खर्चाच्या बाबी असतात, व यामुळें शें. ६ व्याज देखील त्यास सुटत नाहीं. या बाबींपैकीं एक बाब म्हणजे पैसे वसूल करण्याकरितां त्यास कुळांवर खटले करावे लागले तर खर्चासाठीं जितके पैसे कोर्ट मंजूर करतें त्यापेक्षां अधिक खर्च लागतो. कोर्ट शें. ५ मंजूर करील पण ५० रुपयांच्या वसुलीकरितां २॥ रूपयावर कोणता वकील खटला घेईल?
आतां कुळाविषयीं विचार करतां असें दिसतें कीं त्याला बुडविण्यास केवळ व्याजच कारण होतें अशी स्थिति नाहीं. तर त्याच्या नुकसानीच्या अनेक बाजू असतात. एक तर सावकाराच्या दुकानावरून आपणास पैसे मिळावे म्हणून सावकाराच्या दुकानीं ज्यांचा वशिला असेल अशा कित्येक लोकांस मधल्यामध्येंच कर्जाची दलाली द्यावी लागते. ही दलाली कधीं कधीं शें. ५ रुपयांहूनहि अधिक असते. दुसरी गोष्ट गणेशपट्टी, धर्मादाय इत्यादि बाबींच्या नांवानें ऋणकोकडून धनकोसावकार अगोदरच पैसे कापून घेतात. शिवाय बहुधा पहिल्या वर्षाचें व्याजहि अगोदर कापून घेतात. एवढेंच नव्हे तर स्वतःच्या पैशांतून स्वतःच खाणारे सावकारहि आहेत. म्हणजे क्षला जर यनें १०० रु. कर्जाऊ दिले तर य सावकार कर्ज देण्याबद्दल क्षपाशीं बक्षिसी मागतो. अशा तर्हेनें १०० च्या जागीं कधीं कधीं ८५ रुपयेच कुळाच्या हातीं पडतात. यांशिवाय दुसर्या भंयकर लटपटी चालतात. उदाहरणार्थ, दिलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा रोखा लिहून घेतात; आणि सावकार तोंडानें कुळास असें सांगतो कीं, तूं जर व्याज (अर्थात् दुप्पट रकमेचें) वेळच्या वेळेवर आणून दिलेंस तर रोख्यांत लिहिलेलें दुप्पट मुद्दल आम्ही वसूल करणार नाहीं आणि आम्ही आकारलेलें व्याज (द. म. २ रु. शें.) पांच सहा वर्षांत दामदुपटीच्या कायद्याखालीं येऊं नये म्हणूनच केवळ दुपटीचा रोखा लिहून घेत आहो. साधारण सुशिक्षित मनुष्य जर कर्ज मागावयास गेला तर तो जितकी रक्कम मागेल तितक्याचा रोखा लिहून घ्यावयाचा आणि शें. १ हेंच व्याज लिहावयाचें, निम्मे रक्कम ताबडतोब द्यावयाची आणि उरलेली दोनचार दिवसांत पाठवून देतों म्हणून सांगावयाचें आणि ती कधींच द्यावयाची नाहीं, आणि सर्व रक्कम भरून पावलों अशी पावती अगोदरच लिहून घ्यावयाची. असाहि प्रकार चालतो.
प्रामाणिकपणानें दुकान चाललें तर दीड रुपया व्याज आकारूनहि सावकारास शें. ६ व्याज सुटत नाहीं, यामुळें सावकारांची वर सांगितल्याप्रमाणें लबाड्या करण्याकडे प्रवृत्ति होते आणि दिड रूपया किंवा याहून जास्त व्याज देऊन कुळाला डोकें वर काढण्याची शक्ती उरण्याचा संभव कमी यामुळें सावकाराची इच्छा नसली तरी त्याची सावकारी व्याजापेक्षी न होतां भूमिभक्षक होते; व सावकारी करावयाची ती भूमिभक्षक करावयाची हें तत्त्व एकदां मंजूर झालें म्हणजे अर्थात् जमीन जितकी लवकर घशांत पडेल तितकी चांगली असें वाटूं लागून त्याप्रमाणें कृति होते.