प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
स्त्री व पुरुष कामागाराचें प्रमाण.- पुरुषांशीं तुलना केली असतां स्त्रियांचें प्रमाण काम करणारांमध्यें कमी आहे. इंग्लंडांत जर पुरुषांपैकीं २/३ काम करणारे आढळतात तर स्त्रीजातीपैकीं १/३ काम करणार्या आढळतात. हिंदुस्थानामध्यें काम करणारे जर १००० पुरुष असले तर बायका ४६७ असतात. स्त्रिया कांहीं विशिष्टच धंदे करतात. उदाहरणार्थ, वकिली, छापखाना, दर्यावर्द्याचें काम, पालखी वाहणें, आरमार, लष्कर, पोलीस, आणि सरकारी नोकरी यांमध्यें बहुतेक पुरुषच आहेत. कांहीं धंद्यांमध्यें स्त्रिया पुरुषांपेक्षां सहज जास्त शिरतात. हे धंदे म्हटले म्हणजे तांदूळ सडणें व पीठ दळणें हे होत. या धंद्यांत पुरुष जर दोन गुंतले असले तर स्त्रिया पंधरा गुंतलेल्या असतात. तसेंच सुइणीचें किंवा नर्सचें काम, औषधें करणें, देवी काढणें इत्यादि धंद्यांत ३ स्त्रियांशीं १ पुरुष असें प्रमाण आहे. सुतळी किंवा दोर्या तयार करणें, भडभुंजाचें काम, मोळी विकणें, इत्यादि धंद्यांत असलेल्या तीन माणसांपैकीं दोन स्त्रिया असतात. शेतावरील मजुरी, चहाच्या मळ्यावरील मजुरी, मधमाशा किंवा रेशमी किडे यांची जोपासना, टोपल्या विणणें, मासे, दूध, भाजी किंवा गवत विकणें इत्यादि धंद्यांत स्त्रियांचें पुरुषांपेक्षां आधिक्य आहे.
काम करणार्यांपैकीं सुमारें ३/४ स्त्रिया शेतकामाकडेच गुंतल्या आहेत. शेतकामामध्यें नांगर धरणें, आणि मळणी करणें हीं कामें बहुधा पुरुषांकडे असतात; व स्त्रियांकडे पेरणें, तण काढणें, कापणी करणें हीं कामें असतात. चहाच्या मळ्यामध्यें बायका पानें तोडतात आणि पुरुष कुळपणी करतात आणि पानांचा चहा तयार करतात. कोळशाच्या खाणींमध्यें पुरुष कोळसा कापतात व बायका वहातात. अभ्रकाच्या खाणींत बायका पत्रे अलग करतात. सोन्याच्या खाणींत कच्च्या मालाचा पक्का माल तयार करण्यांत जे लोक असतात त्यांत बायका अधिक असतात. कारागीर लोकांच्या बायका आपल्या नवर्यास त्याच्या कामांतील हलका भाग करण्यास मदत करतात. पुष्कळ वेळां माल तयार करण्याचें काम पुरुषांकडे असतें व विक्रीचें काम बायकांकडे असतें आणि कधीं कधीं पुरुषांच्या धंद्यापेक्षां बायकांचा धंदा अगदीं निराळा असतो. जंगली जातींमध्यें पुरुषांपेक्षां स्त्रियाच अधिक काम करणार्या असतात. कोल आणि घासिया या जातींमध्यें काम करणार्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षां अधिक आहे. आंधसारख्या जवळ जवळ कुणब्याइतक्या संस्कृत जातींत काम करणार्या बायका पुरुषांइतक्याच आहेत. गोंड, कोरकू, भारिया आणि पंका या जातींत काम करणारे पुरुष १०० असले तर कामकरी स्त्रिया ९६ पासून ९८ पर्यंत असतील. मध्यप्रांतांत भोयारसारख्या उत्तर हिंदुस्थानीय जातींमध्यें काम करणार्या स्त्रियांचें प्रमाण काम करणार्या १०० पुरुषांशीं ९६ आहे. आणि मेहेरा, बसोर, चमार, निमार, आणि तेली या जातींतल्या शंभर पुरुषांशीं स्त्रियांचें प्रमाण अनुक्रमें ९५,९४,९३ आणि ९१ असें आहे.
आतांपर्यंत स्त्री व पुरुष कामगारांत कोणत्या धंद्यांत काय प्रमाण पडतें हें पाहिलें. आतां मुंबई इलाख्यांतील निरनिराळ्या जातींत कसें काय प्रमाण पडतें हें पाहूं.
आगरी, भंडारी, भिल्ल, भोई, न्हावी, कातकरी, कुणबी, लिंगायत, माळी, मराठे, मांग, महार, धेड, रामोशी, तेली, ठाकूर, वडर वगैरे जातींत स्त्रियांचें प्रमाण पुरुषांइतकेंच आहे व तें प्रसंगीं पुरुषांपेक्षां अधिक असून शंभर पुरुषांस १४० स्त्रिया पर्यंत जातें.
कोणत्या धंद्यांत दर शंभर पुरुषांमागें स्त्रिया किती आहेत या कोष्टकाकडे पाहिलें असतां समाजाची विलक्षण स्थिति नजरेस येते. भिकारी, वेश्या, गुन्हेगार आणि कारागृहवासी या वृतींनीं पोट भरणारांमध्यें पुरुषांशीं स्त्रियांचें प्रमाण ज्या जातींत अधिक सांपडतें अशा जाती म्हटल्या म्हणजे मांग, भंगी, मुसुलमान व औदीच्या ब्राह्मण या होत. मांगांमध्यें असल्या हीन स्थितींत असलेले पुरुष जर शंभर असतील तर स्त्रिया ६०५ आहेत; भंग्यांमध्यें ६० आहेत; औदीच्य ब्राह्मणांचें जरा आश्चर्य वाटतें. हें प्रमाण पुरुषांशीं आहे. म्हणजे असें असूं शकेल कीं, एकंदर जातींमध्यें याप्रकारचा वर्गच कमी असेल आणि दुर्गतीस पोंचलेल्या स्त्रियांची संख्या जरी कमी असली तरी ती फुगीर दिसत असेल. पण तसेंहि असल्याचें दिसत नाहीं. कारण या जातींत पुरुष व स्त्रिया मिळून या धंद्यांत असलेलीं माणसें दर हजारीं १४८ आहेत. पण भंग्यांत अशीं फक्त ८५ आहेत. मांगांत दर हजारीं ५६ आहेत व इतर मुसुलमानांत दर हजारीं २७ आहेत. भिक्षेकरी व वेश्या यांचा वर्ग एकत्र केला आहे त्यामुळें ही संख्या फुगीर दिसतें असें म्हणावें तर परमार्थसाधनविषयक धंद्यामध्यें दर हजारांत १८४ माणसें औदीच्या ब्राह्मणांत आहेत आणि स्त्रिया धार्मिक धंद्यांत शंभर पुरुषांत पंचवीस म्हणून दिल्या आहेत. स्त्रिया भिक्षुकी करीत नाहींत किंवा कथाकीर्तनें करीत नाहींत त्यामुळें या शंभर पुरुषांत २५ स्त्रिया धार्मिक धंद्यांत दिल्या आहेत त्या बहुतेक भिक्षेकरणीच असाव्यात. यावरून दुर्दैवी तर्हेनें पोट भरण्याच्या धंद्यामध्यें दर शंभर पुरुषांमागें २७ स्त्रिया म्हणून दिल्या आहेत त्या असमाधानकारक वृत्तीनें राहणार्याच स्त्रिया असाव्यात असा निष्कर्ष निघतो.