प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
भांडवलाचें एकीकरण व विस्तरण.- वरील मुद्दयांपैकीं भांडवलाचें एकीकरण व भांडवलाचें विस्तरण हे मुद्दे रोकडीच्या व्यवहारांतले आहेत. या मुद्दयांसंबंधानें जी माहिती द्यावयाची ती सावकारीच्या धंद्याच्या अनुषंगानें दिली पाहिजे. पाश्चात्त्य सावकारी आणि देश्य सावकारी यांची थोडीशी तुलना केल्यावर मग आपणांस भांडवलाचें एकीकरण आणि विस्तरण या दृष्टीनीं काय करावयाचें आहे हें सांगतां येईल.
सावकारी.- देशांतील सावकारी अधिक सुव्यवस्थित करण्यासाठीं आणि सावकाराचा पैसा जास्त सुरक्षित करण्यासाठीं जीं यंत्रें पाश्चात्त्य देशांत उत्पन्न झालीं आहेत त्या यंत्रांचा उपयोग आणि घटना हीं समजलीं पाहिजेत. पैसे देणारे लोक आणि पैसे वापरणारे लोक यांचा संबंध जोडणार्या ज्या संस्था आहेत त्यांत बँका, ट्रस्टकंपन्या, शेअरबाजार व रोकडदलाल हे प्रमुख होत. या संस्थांचें सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें. लोकांच्या लहान लहान रकमा बँकांच्या सेव्हिंग बँकेमार्फत जमा होतात. बँकांमध्ये थोडे दिवसांकरितां व्यापार्यांस रक्कम देण्याची पद्धत आहे. बँका पैसे देतात ते एक तर ओव्हर ड्राफ्ट-खात्यावर येणें-या स्वरूपानें देतात अगर दुसर्या कांही तारणावर देतात. लोकांच्याकडून पैसा गोळा करण्याचें काम बँकेसारख्या मध्यस्थाशिवाय ज्या प्रकारांनीं होतें ते प्रकार येणेंप्रमाणें. एक, कंपन्यांची स्थापना होऊन त्यांचे शेअर लोकांनीं घेणें; शेअरवरील रक्कम हप्त्याहप्त्यांनीं भरण्याची सोय असल्यामुळें सामान्य व्यक्तींस काटकसर करून रक्कम गुंतविणें शक्य होतें. शेअरसारखाच दुसरा मार्ग म्हटला म्हणजे बाँड्स उर्फ डिबेंचर्स होत. बाँड्स म्हणजे एकंदर मालमतेवरील कर्जाच्या बोजाचा हिस्सा. बाँड म्हणजे एक तर्हेचा गहाणाचा रोखा होय. या गहाणरोख्यावर अर्थात् व्याज बेताचें असतें आणि कंपनीच्या व्यवहारांत मुनाफा होवो अगर न होवो, प्रथम या रोख्यावरील व्याज कापून द्यावें लागतें. शेअरमध्यें सुद्धा पुष्कळदां दोन प्रकार असतात. एक, साधा हिस्सा (ऑर्डिनरी शेअर) आणि दुसरा, अगाऊ मुनाफ्याचा हिस्सा (प्रेफरन्स शेअर). अगाऊ मुनाफ्याच्या हिश्श्यावरील फायद्याची रक्कम ठराविक असते आणि ती रक्कम दिल्यानंतर जो फायदा होईल तो फायदा कंपनीच्या साध्या हिस्सेदारांस मिळतो. शेअर किंवा गहाणरोखे विकण्यास मध्यस्थी दलाल असतात; आणि त्या दलालांमार्फत पैसेवाल्यांचा आणि रक्कम वापरूं इच्छिणारांचा म्हणजे रोकडीच्या गिर्हाइकांचा संबंध जडतो. असल्या हिस्सेदलालांच्या मुंबईस दोन संस्था आहेत. प्रत्येक देशांत या प्रकारच्या संस्था असतात.
हिंदुस्थानामध्यें रोख्यांचा क्रयविक्रय करावयाच्या ज्या संस्था आहेत त्यांत गिरण्याचें शेअर व सरकारी प्रॉमिसरी नोटा यांचा विक्रय होत असतो. सध्यां सरकारनें ट्रेझरी बिलें काढलीं आहेत त्यांचाहि विक्रय तेथें होत असतो. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे ज्या वस्तूंची मालकी कागद घेतल्यानें देतां घेतां येते अशा सर्व प्रकारच्या गोष्टी शेअरबाजारामध्यें येतात.
मालकीचीं साक्षीपत्रकें म्हणून कांहीं कागदपत्र असतात; त्यांचा क्रयविक्रय होतो पण तो शेअरबाजारांत होत नाहीं. असे कागद म्हटले म्हणजे खात्यावरील घेण्याचें साक्षीपत्रक, गलबतावरून येणार्या मालाचें साक्षीपत्रक (Bill of Lading), विम्याचें साक्षीपत्रक, हुंड्या, साधे कर्जरोखे, गहाणरोखे वगैरे होत. पुष्कळदां यांचा क्रयविक्रय बँकांमार्फत होतो.
जमिनीवरील गहाणाचे रोखे इकडे अजून शेअर बाजारांत येत नाहींत, कां कीं या गहाणाची जितकी सुव्यवस्थित घटना व्हावयास पाहिजे तितकी झालेली नाहीं. जमनीगहाणाचे दलाल अमेरिकेंत अलीकडे बर्याच मोठ्या प्रमाणावर धंदा करूं लागले आहेत आणि कित्येक ट्रस्टकंपन्याहि हा धंदा करतात. त्यांच्या धंद्याचें सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें; प्रत्येक मनुष्यास जमिनीवरील गहाण हें सर्वांत सुरक्षित वाटतें, परंतु त्या गहाणामध्यें दोन तीन प्रकारच्या अडचणी असतात. एकतर पैशाच्या वसुलीचा त्रास. पैसेवाला मनुष्य एखाद्या खेड्यांत बसलेल्या शेतकर्यापासून व्याजाची वसुली करण्याच्या भागनडींत कशाला पडतो? शिवाय शेताच्या गहाणावरून रोखा करून घेऊन पैसे देण्यापूर्वीं पैसे मागणाराचा हक्क त्या जमिनीवर कितपत आहे हें काळजीपूर्वक पहावें लागतें. हिंदुस्थानांत तर यासंबंधानें मुसुलमानांच्या अस्तित्वामुळें एक बिकट प्रश्न उपस्थित झाला आहे. मुसुलमान आपल्या इस्टेटीचा वकफ (स्वतःकडे व्यवस्थापकाचे अधिकार ठेवून इस्टेट धर्मार्थ देऊन टाकणें) केव्हां करून टाकील याचा नेम नाहीं. शेताच्या गहाणरोख्याच्या बाबतींत दुसरी काळजीची गोष्ट म्हणजे कोणीहि आपली इस्टेट आपल्या बायकोस (तिच्या उपभोगाच्या हक्कासाठीं) देऊन टाकण्याचा संभव असतो आणि तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे एका इस्टेटीचे मालक अनेक असतात आणि त्यामुळें एकानें सावकाराच्या पैशासाठीं केलेलें गहाणखत दुसरा ठिकाणावर नसलेला हक्कदार दहापांच वर्षांनीं उभा राहून रद्द होऊन जाण्याचा संभव असतो. येणेंप्रमाणें जमिनीच्या व्यवहारांत शेंकडों भानगडी असल्यामुळें सामान्य मनुष्यांस गहाणाचे रोखे करणें मोठें जोखमाचें असतें. महाराष्ट्रामध्यें नवर्याच्या परोक्ष पुष्कळ बायका कुणगा करून जमविलेल्या पैशाचे गहाणरोखे करून घेतात आणि त्यांस अनेकदां थप्पड खावी लागते.