प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
अब्रूला भिणारे सिशिक्षित पेढ्यांच्या धंद्यांत पाहिजेत.- जगांतील रोकड नेहमीं स्थलांतर करीत असते. जेथें पैशास चांगलें व्याज मिळतें तेथें सर्व दुनियेचे पैसे जमा होतात आणि या जमा होण्यानें तेथील व्याजाचा दर भयंकर असला तर तो बेतांत येतो. परंतु ही क्रिया होण्यास जीं साधनें लागतात तीं आपल्या देशांत नाहींत. आमच्या व्यापार्याची व शेतर्याची घेतले पैसे परत देण्याची शक्ति पेढ्यांच्या मार्फत जितकी दूरपर्यंत कळवितां येईल तितकी बाहेरचा पैसा आपल्याकडे ओढण्याची त्यांची लायकी वाढेल, आणि व्याजाचा दरहि उतरेल. ही क्रिया होण्यासाठीं निरनिराळ्या ठिकाणीं धनकोऋणकोस जोडणार्या पेढ्या झाल्या पाहिजेत. सावकारांच्या वर वर्णन केलेल्या पद्धतीमुळें आणि प्रत्येक क्षणीं पैसा बुडण्याची भीति असल्यामुळें सध्यांचे सावकार जनतेचा विश्वास कितपत राखूं शकतील हा प्रश्नच आहे आणि यामुळें या धंद्यामध्यें सुशिक्षित व अब्रुला भिणारे आणि चोरटेपणाच्या तालमींत तयार न झालेले लोक पडले पाहिजेत. सुरुवातीला बेताचें भांडवल असलें तरी हरकत नाहीं. दिलेल्या पैशाची सवाई दिढी करूं शकेल अशा अब्रुला भिणार्या हुषार मनुष्यांची जरूर पैसेवाल्यास पुषकळच आहे. पुष्कळ स्वस्थ पडलेली रोकड व्यवहारांत येण्यासाठीं ट्रस्ट कंपनीसारख्या कंपन्यांची जरूर आहे.