प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

शांततेच्या काळांत जो जीवनकलह चालतो त्याचें स्वरूप जितकें स्पष्ट होत जाईल तितकी कर्तव्यदिशा स्पष्टपणें समजेल. जर आपणांस कांहीं हवें असेल तर ती स्वहितसाधनार्थ जोराची धडपड हवी आहे. देशांतील माणसांकडून द्रव्योत्पादन जोरानें व्हावें यांत मोठें राष्ट्रहित आहे.

आपल्या देशांत प्रत्येक गोष्ट अप्रगत आहे. आपल्यापेक्षां अधिक प्रगत अशा परिस्थितीची जशी आपणांस अधिकाधिक कल्पना येईल तसें भावी कर्तव्याचें स्वरूप आपल्या लक्षांत येईल. अधिक प्रगत स्थिति कशी असते याची अंशतः कल्पना कांहीं मुद्दयांसंबंधानें देतों. भावी पिढीचा कर्तव्यात्मक भाग म्हटला म्हणजे आज जें कमी व्यवस्थित आहे तें अधिक व्यवस्थित करणें, जें लहान प्रमाणावर असेल तें मोठ्या प्रमाणावर करणें आणि जें कमी सुरक्षित असेल तें अधिक सुरक्षित करणें. प्रगतिक्षेत्राचे खालील भाग विशेष लक्षांत घेण्यासारखे आहेत.
१. भांडवलाचें एकीकरण.
२. भांडवलाचें विस्तरण.
३. मनुष्याच्या कार्यशक्तिचा विकास.
४. श्रमविभागाचें विविधत्व.
५. भौतिक द्रव्यांचा उपयोग.
६. मनुष्यबलाऐवजीं यांत्रिक बलाचा उपयोग.
७. जमिनीची उत्पादनशक्ति.
८. मनुष्याचें आयुष्यवर्धन आणि त्याचे आर्थिक परिणाम.
९. वस्तूंच्या उपयोगांसंबंधानें वाढलेलें ज्ञान.
१०. स्पर्धासंयमन व एकीकरण यानें होणारी काटकसर.