प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.
मनुष्याच्या कार्यशक्तीचा विकास - हा अनेक कारणांनीं घडून येतो. त्यांतील मुख्य कारण म्हटलें म्हणजे विशिष्ट धंद्याचें शिक्षण होय. अधिक सुशिक्षित मनुष्य अधिक कार्यक्षम बनतो. समाजामध्यें अधिक उत्पादक धंदे कांहीं माणसें करूं लागलीं म्हणजे समाजाचें उत्पादकत्व वाढतें किंवा असलेला धंदा मनुष्य अधिक चांगल्या तर्हेनें करूं लागला म्हणजे उत्पादकत्व वाढतें. देशामध्यें एकंदर लोकसंख्येशीं व्यापार्यांचें प्रमाण अमुक असलें पाहिजे, शेतकरी इतके असले पाहिजेत, कच्चा मालाचा पक्का माल बनविणारांचें प्रमाण अमुक असलें पाहिजे असा कांहीं नियम नाहीं. देशांतील आणखी पुष्कळ लोक सुशिक्षित झाले म्हणजे सध्यांच्या कारकुनांनीं काय करावें आणि सुतार, चांभार वगैरे लोकांचे धंदे कोणी करावेत असा प्रश्न विचारण्यांत येतो. त्यास उत्तर एवढेंच कीं, अधिकाधिक सुशिक्षित धंद्यांस क्षेत्र आहे. सुशिक्षित लोकांस कार्यक्षेत्राची वाण कधींच पडणार नाहीं. जसजशी शिक्षणांत प्रगति होईल तसतशी निरनिराळ्या धंद्यांचीहि प्रगति होत जाईल. व अधिक लोकांस कार्य करण्यास क्षेत्र उत्पन्न होत जाईल. तसेंच निरनिराळ्या धंद्यांचें शिक्षण जसजसें वाढत जाईल तसतसा अधिक अधिक चांगल्या दर्जाचा माल बाहेर पडून जुने धंदेच सुधारून अधिक द्रव्योत्पादक होतील व त्यांनां अधिकाधिक योग्यतेचीं सुशिक्षित माणसें आपल्या कार्यासाठीं घेण्याची शक्ति येत जाईल.
शिक्षणानें मनुष्याच्या कार्यशक्तीचा अनेक बाबतींत विकास होतो. त्याचें सर्वसामान्य ज्ञान वाढल्यानें प्रथमतः त्याला योग्य धंद्याची निवड करणें सोपें होतें. त्याची ग्राहकशक्ति वाढल्यानें कोणत्याहि धंद्याचें ज्ञान करून घेणें त्याला अधिक सुलभ होतें. शिक्षणानें त्याच्या अंगीं नियमितपणा, निरलसता इत्यादि गोष्टी येतात. निरक्षर मनुष्यापेक्षां साक्षर मनुष्याला त्याचें काम समजावून देणें सोपें होतें व ज्यावेळीं प्रत्यक्ष सांगतां येण्यासारखें नसेल त्यावेळीं लिहून कळवितां येतें. साक्षर मनुष्याला कामासंबंधीं नियम लेखी घालून देतां येतात व ते त्याला वरचेवर पाहतां येण्यासारखे असल्यामुळें ध्यानांत ठेवण्याचे परिश्रम करावे लागत नाहींत. उलट निरक्षर मनुष्याला एकाच वेळीं अनेक गोष्टी अथवा गुंतागुंतीच्या कल्पना ध्यानांत ठेवणें फारच अवघड जातें. याप्रमाणें केवळ शिक्षणानें देखील मनुष्याच्या कार्यशक्तीवर बराच परिणाम घडवून आणतां येतो. असो. आतां आपण येथील काम करणारांची व इंग्लंडांतील काम करणारांची कांहीं बाबतींत तुलना करून पाहूं.
हिंदुस्थान व इंग्लंड यांची आपण तुलना केली असतां आपणांस बरेच महत्त्वाचे निर्णय काढतां येतील. {kosh आंकडे इंग्लंड व हिंदुस्थान या दोहोंचे १९११ चे आहेत.}*{/kosh} हिंदुस्थानांत एकंदर लोकांत प्रत्यक्ष काम करणारे किती आहेत याचे आंकडे घेऊन त्यांची इंग्रजांच्या आंकड्यांशीं तुलना केली असतां आपणांस असें दिसून येईल कीं, प्रत्यक्ष काम करणार्यांचें प्रमाण इंग्लंडांत शेंकडा ४५ असून हिंदुस्थानांत शेंकडा ४७ आहे. म्हणजे ५३ माणसांनां पोसण्यासाठीं हिंदुस्थानांत ४७ माणसांनां मेहनत करावी लागते तर इंग्लंडांत ५५ माणसांनां पोसण्यासाठीं ४५ माणसांस मेहनत करावी लागते. नुसत्या एवढ्या आंकड्यांवरून फारसें सिद्ध होत नाहीं. कां कीं, देशामध्यें अल्पायुषी लोक असले तर म्हातारे कमी असणार आणि त्यामुळें प्रत्यक्ष काम करणारांची संख्या वाढणार. शिवाय देशांतील विवाहित स्त्रियांस जितकें बाहेर काम करावें लागेल तितकी देशांत सुबत्ता कमी असें म्हटलें पाहिजे. यावरून काम करणारांची संख्या जास्त दिसली म्हणजे तें देशाच्या समृद्धीचें लक्षण समजावें किंवा नाहीं हें सांगतां येणार नाहीं. हिंदुस्थाना व इंग्लंड यांजमध्यें दुसरा मोठा फरक म्हटला म्हणजे कच्च्या मालाची पैदास करणारा वर्ग हिंदुस्थानांत लोकसंख्येच्या १/३ आहे व काम करणार्या लोकसंख्येच्या शेंकडा ७२ आहे; इंग्लंडांत शेतकीवर राहणार्या लोकांचें व कच्चा मालाची पैदास करणार्यांचें एकंदर लोकसंख्येशीं प्रमाण फारच अल्प आहे; हिंदुस्थानांतील कामगारांच्या संख्येपैकीं खनिज द्रव्यें उकरण्याकडे असलेली अत्यंत क्षुद्र लोकसंख्या सोडून दिली तर बहुतेक वर्ग शेतकीवर आहे. सरकारी नोकरी व डॉक्टरी, वकिली यांसारख्या शिष्ट धंद्यांमध्यें असलेल्या लोकांचें प्रमाण इंग्लंडमध्यें जर दर हजार लोकवस्तींत ३४ तर हिंदुस्थानांत १४ आहे. हिंदुस्थानामध्यें स्थानांतरास मदत करणार्या लोकांची संख्या दरहजारीं ७ १/२ आहे तर इंग्लंडांत ४० आहे. म्हणजे इंग्लंडांत अधिक वृद्धिंगत झालेल्या स्थानांतराच्या सोयींमुळें तिकडे जितके लोक सरकारी नोकरीसाठीं लागतात त्यांच्यापेक्षां जास्त स्थानांतरास लागतात. आणि त्यांच्या मानानें हिंदुस्थानांतील संख्या फारच कमी दिसते. व्यापारांत गुतलेल्या लोकांची संख्या दरहजारीं हिंदुस्थानांत २६ तर इंग्लंडमध्यें ४० आहे म्हणजे व्यापारांतील लोकांची संख्या इकडो फारशी कमी नाहीं. स्थानांतराच्या फार थोड्या सोयींवर देशांतील व्यापारीवर्गास अवलंबून रहावें लागत आहे. व्यापारीवर्गाचें सर्व जीवित कच्च्या मालाची पैदास आणि त्याचा पक्का माल बनविणें ही क्रिया आणि स्थानांतराच्या सोयी यांवरच अवलंबून आहे. उद्योगधंद्यांमध्यें हिंदुस्थानांत जर हजारीं ५६ माणसें आहेत तर व्यापारांत २६ आहेत. म्हणजे ५६ माणसांनीं उत्पन्न केलेला पक्का माल व ३४० लोकांनीं उत्पन्न केलेला कच्चा माल व बाहेरदेशींचा आलेला माल विकण्यास २६ माणसें लागतात; व या सर्व मालाची नेआण करण्यास ७ १/२ माणसें पुरतात. म्हणजे दर शंभर व्यापार्यांस कच्चा माल पैदा करणारे १३१६ लागतात, कच्च्याचा पक्का देशाच्या देशांत करणारे २१६ लागतात व २९ लोक त्या मालाचें स्थानांतर करण्यासाठीं लागतात. इंग्लंडांत व्यापारांतील दर शंभर माणसांमागें कच्चा माल पैदा करणारे ४८३ लागतात, कच्च्याचा पक्का करणारे १५८ लागतात व स्थानांतर करण्यासाठीं ९७ लागतात. असो.
जीं कामें यंत्रांनीं व्हावयाचीं तीं कामें करण्यास या देशांत माणसें लावलीं जातात एवढेंच नव्हे तर कठिण व कमी कुशलतेचें काम बायकांवरच पडतें. आपल्या देशांत साक्षरता वाढली तर बायकांची भवितव्यता बरीच सुधारेल. स्त्रियांच्या धंद्यांकडे आपणांस या दृष्टीनें नजर फेंकली पाहिजे.