प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

हंगेरीमधील लोक - हंगेरी देशांत इ. स. १९०० सालीं पुढें दिलेल्या निरनिराळ्या जातींची वस्ती होती. हंगेरियन (मग्यार) ८५,८८,८३४ जर्मन (नेमेतो) १९,८०,४२३; स्लोव्हाक (टोट) १९,९१,४०२; रुमानिअन (ओला) २७,८४,७२३; रूथेनिअन (रूथेन) ४,२३,१५९; क्रोएशिअन (होर्वत) १,८८,५५२; सर्व्हिअन (स्झर्ब) ४,३४,६४१; इतर ३,२९,८३७; मग्यार लोकांची वस्ती मध्यभागांतील मैदानांत डॅन्यूब व थेईस नद्यांच्या प्रदेशांत आहे. जर्मन लोक विशेषतः सखल (लोअर) प्रदेशांत व स्टिरिया प्रांतांत आढळतात. स्लाव्ह जातींपैकीं स्लोव्हाक लोक उत्तर हंगेरीतील डोंगराळ प्रदेशांत राहतात. रूथेनिअन लोक कार्पेथिअन पर्वताच्या उत्तरणीवर वस्ती करून आहेत. सर्व्हिअन लोक दक्षिण हंगेरींत दिसतात. क्रोएशिअन लोकांची संख्या विशेषतः क्रोआशिया स्लाव्होनिया प्रांतांत आढळते. स्लाव्ह लोकांपेक्षां रूमानिअन लोक संख्येनें बरेच कमी असून ते आग्नेय दिशेकडील दहा परगण्यांत पसरलें आहेत. यहुदी लोकांची वस्ती थोडी पण फार महत्त्वाची आहे. जिप्सींची संख्या १८९३ मध्यें २,७४,९४० होती पण त्यांपैकीं बरेच आपण मग्यार किंवा रूमानिअन आहोंत असें म्हणत व फक्त ८५,००० लोकांनीं आपली भाषा रोमी आहे असें सांगितलें.