प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
स्वीडनमधील लोक.- स्वीडिश लोक हे स्कँडिनेव्हियन शाखेपैकीं आहेत. स्वीडनमध्यें लॅप व फिन लोकहि आहेत.
पाषाण व कांस्य युगांत स्वीडनमध्यें जी वस्ती असल्याचें सिद्ध होत आहे ती वस्ती आजच्या लोकांच्या सारखीच होती असें दिसतें. त्या जुन्या नमुन्याच्या जातीनंतर एखादी अगदीं नवी जात स्वीडनमध्यें आल्याचें दिसत नाही.
ऐतिहासिक उल्लेखांत स्वीडनसंबंधाचा पहिला उल्लेख टॅसिटसच्या जर्मानिया या ग्रंथांत सापडतो. (हें पुस्तक इ. स. ९८-९९ या वर्षीं प्रसिद्ध झाले) स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पांतील मुख्य लोक स्वीओनीज असा उल्लेख तेथें आहे. या लोकांपासूनच स्वीडन हें नांव तयार झालें. सिटोनीज नांवाची दुसरी एक जात तेथें असल्याचा उल्लेख टॅसिटसमध्यें आहे. या जातींवर एक स्त्री राज्य करीत होती असें वर्णन आहे. टॉलेमीनें गूटाई अ. गोटार व इतर कांहीं नांवें स्वीडनमध्यें राहणा-या जातींचीं म्हणून दिलीं आहेत. टॉलेमीनंतर ६ व्या शतकापावेतों स्वीडनसंबंधानें कांहींच माहिती उपलब्ध होत नाही. पुढें जोर्डेनीज हा गॉथिक इतिहासकार स्वीडनची बरीच माहिती देतो. स्वेअर, गोटार इत्यादि अनेक जातींचा तो उल्लेख करतो. या जातींवरून पडलेलीं नांवे अद्यापिहि निरनिराळ्या जिल्ह्यांनां आहेत. बिजि गौटी, फिज व्हिनोव्ही, रेरेफेनी या जातींचा उल्लेख जोर्डेनीजमध्यें येतो. प्रोफोविअस हा जोर्डेनीजचा समकालीन इतिहासकार स्क्रिथेकिनोई व गोटार (गूटाई) या दोनच जातींचा उल्लेख करतो. याप्रमाणें स्वीडनमधील लोकांचे पूर्वज निरनिराळ्या जातींचे होते. ११ व्या शतकांत ख्रिस्ती पंथाचा स्वीडनमध्यें प्रसार झाला. या प्रदेशांत स्कँडिनोव्हिअन भाषा चालते.