प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
स्पेनमधील भाषा - आयबेरिअन द्वीपकल्पांत अनेक भाषा चालतात. वास्क लोक वायव्येच्या भागांत आहेत त्यांची स्वतंत्र भाषा आहे. याखेरीज तीन रोमान्स भाषा या द्वीपकल्पांत चालतात.
रोमान्सभाषा.- १ पोर्तुगीज गॅलिशिअन ही लिआँचा कांहीं भाग, पोर्तुगाल व गॅलिशिया येथें चालते. (२) कॅस्टिलिअन उत्तर, दक्षिण व मध्य प्रदेश येथें म्हणजे द्वीपकल्पाच्या एकंदर दोनतृतीयांश भागांत चालते (३) कॅटालन पूर्व व आग्नेय दिशेच्या ब-याच मोठ्या पट्टींत चालते.
इटालींतील रोमान्स भाषा परस्परांपासून जितक्या वेगळ्या आहेत त्यापेक्षां या तीन भाषा परस्परांपासून फारच अधिक प्रमाणांत भिन्न आहेत. त्यांचा एकत्र प्रचार असा कोणत्याहि प्रांतांत नाहीं. एका विभागांत एक तर दुस-यांत दुसरी अशा रीतीनें यांचा प्रसार आहे. या भाषा म्हणजे अनागर अथवा सामान्य (व्हलगर) लॅटिनचे प्रकार होत. सामान्य लॅटिनचेच प्रकार स्पेनमध्यें विशिष्ट प्रचारांत आले व हे प्रकार वरील प्रमाणें झाले याचें कारण स्पेन मधील राजकीय घडामोडी होत. ९ व्या शतकापासून पुढें मुसुलमानापासून स्पेन देश हळूहळू जिंकला गेला पिरिनीजमध्यें ख्रिस्ती लोक अरब लोकांच्या स्वा-यांस भिऊन पळाले होते ते हळूहळू स्पेनच्या मध्यप्रदेशांत व दक्षिणप्रदेशांत परत आले व त्यांजबरोबर त्यांची लॅटिन भाषा आली.