प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
रशियन लोक.- स्लाव्ह लोकांचे पूर्वज हिरोडोटसनें उल्लेखिलेल्या सारमॅटिअन अथवा सौरोमॅटी वंशाचेच (मागील यादी पहा.) केवळ होते किंवा त्यांच्यात सिथिअन रक्त होतें हें अद्यापि पुराणवस्तुशास्त्रज्ञांस निश्चितपणें माहीत झालेलें नाहीं. या दोहोंच्याहि कवट्यांचे मंगोल वंशांतील कवट्यांशीं मुळींच साम्य नाहीं. येथील लोकांविषयीं सर्वांत प्राचीन माहिती ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकापासून मिळते. त्या वेळीं उत्तर वडीना नदीच्या प्रदेशांतून फिन लोक पश्चिमेकडे गेले. सारमॅटिअन लोकांस अओर्झी व सिरका लोकांनीं उपद्रव दिल्यामुळें त्यांस डॉन नदीचा प्रदेश सोडून रशियांतील पठारें पूर्वेच्या बाजूकडून ओलांडून पश्चिमेकडे यावें लागलें. अओर्झी व सिराक यांच्या मागोमाग हूण व उशगुरतुर्की अव्हार हे लोक होतेच.
ख्रिस्ती शकाच्या सातव्या शतकामध्यें दक्षिण रशियामध्यें खाझर लोकांचें साम्राज्य होतें. यांनीं हूण लोकांचे वंशज जे बल्गेरियन लोक त्यास डॉन नदीवरून हांकून दिलें. त्यांच्या पैकीं एक शाखा व्होल्गा नदीवर जाऊन तेथें तिनें बल्गेरियन साम्राज्य स्थापन केलें. दुसरी शाखा डॅन्यूबकडे वळली. या लोकांच्या आगमनामुळें उत्तरेकडील फिन लोकांस आणखी पश्चिमेकडे जावें लागलें आणि तावास्ट आणि कारेलियन लोकांच्या मिश्रणानें बनलेली एक टोळी फिनलंडच्या आखाताच्या दक्षिणमार्गी जाऊन राहिली.
आठव्या शतकाच्या आरंभीं किंवा त्यापूर्वींहि कांहीं वर्षें स्लाव्ह लोकांची एक टोळी पूर्वेकडून डॅन्यूब नदीच्या प्रदेशापासून निघून रशियाच्या नैर्ॠत्येकडील मैदानावर पसरली. याप्रमाणेच दुसरी एक टोळी उत्तरेकडून एल्ब नदीच्या बाजूनें आली असावी. नवव्या शतकामध्यें स्लाव्ह लोकांनीं विस्तुला नदीच्या वरील भाग, रशियांतील सरोवरांच्या दक्षिणेकडील भाग आणि मध्यभागांतील मैदानाचा पश्चिम भाग व्यापला होता. त्यांच्या पश्चिमेकडे लिथुआनियन लोक होते. कांहीं फिनिश जातींचें आग्नेयीकडील प्रदेशांत तुर्की जातींशीं मिश्रण होत होतें. सध्यांचे बष्किर हे त्यांचेच वंशज होत. व्होल्गा आणि कामा नदीवर बल्गर लोकांची वस्ती होती. यांच्या पूर्वजांविषयीं विशेषशी माहिती मिळत नाहीं. पेचेनेग, पोलोव्हस्ती उझेस वगैरे तुर्की मंगोल जाती आग्नेयबाजूच्या प्रदेशांत होत्या व काळ्या समुद्राच्या किना-यावर खाझर लोकांचें साम्राज्य होतें. त्याच्या अमलाखालीं कांहीं स्लाव्ह व फिनिश जातीचे लोकहि होते. नवव्या शतकामध्येंच उग्रियन लोकांनीं उरल पर्वतावरील आपलें स्थान सोडून आग्नेय व दक्षिण रशिया ओलांडून डॅन्यूब नदीवर वसाहती केल्या.
जर सर्व स्लाव्ह लोकांचे पश्चिमस्लाव्ह (पोल, झेक व बेण्ड,) दक्षिणस्लाव्ह, (सर्व्हिन, बल्गेरियन, क्रोअँशियन वगैरे) आणि पूर्वस्लाव्ह (महारशियन, लघुरशियन व श्वेतरशियन) यांप्रमाणें विभाग पाडले तर लघुरशियन लोकांची तीसलक्ष लोकसंख्या सोडून बाकीचे सर्व पूर्वस्लाव्ह एका शेजारीं एक असे पश्चिम, मध्य व दक्षिण रशियामध्यें वस्ती करून आहेत. लघुरशियन हे पूर्वगॅलिशिया, पोलंड व कांहीं कार्पेथिअन पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर राहिले आहेत.
रशियन लोकांमध्यें जरी फिनिश व तुर्को फिनिश रक्ताचें मिश्रण झालें आहे तरी त्यांच्या शारीरिक रचनेंत स्लाव्ह विशिष्ट गुणांचें आधिक्य आहे. तसेंच जातिसंस्थेमुळें व विवाहविषयक विशेषतः स्त्रियांच्या बाबतींत, निर्बंधामुळें त्यांच्या जाती ब-याच शुद्ध राहिल्या आहेत. सध्यां रशियामध्यें आपणांस ज्या अनेक लहान लहान जाती दृष्टीस पडतात त्यामध्यें आर्यन् सेमेटिक कॉकेशन वगैरे महावंशांपासून निघालेले पोटवंश तसेच मांगोलियनवंशाचे चिनी जपानी वगैरे पोटवंश उरल अल्ताइन वंशाचे पोटवंश हे प्रामुख्यानें दिसून येतात. जॉर्जिअन सरकॅशिअन हेहि अनुक्रमें १३ व १० लाखांवर आहेत. उरल आल्तांईक जातींत खिरगीज, बष्किर, तातार, फिन इस्थोनिअन व मोर्डेव्हिनिअन हे प्रमुख दिसतात. यांचे प्रमाण पुढील कोष्टकावरून स्पष्ट होतील.
रशियांतील जाती |