प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
फ्रेंच भाषा.- फ्रेंच हें रोमानिक पोटभाषांपैकीं एका भाषासमूहाचें नांव आहे. उत्तर गॉलचें फ्रेंच हें आधुनिक लॅटिन होय. फ्रेंच हें नांव संकुचित अर्थानें पॅरिसच्या भाषेला लावतात. जी आजकाल सुशिक्षित लोक बोलतात ती व फ्रान्सच्या वाङ्मयाची जी पॅरिस शहरांत प्रचारांत असणारी भाषा ती फ्रेंच भाषा. परंतु विस्तृत अर्थानें लोरेन धरुन उत्तर फान्स देश व बेल्जम आणि स्वित्झरलंड यांचे कांहीं भाग येथें बोलली जाणारी जी देश्यभाषा तिला फ्रेंच म्हणतात.
या भाषेच्या प्रदेशाच्या सीमा येणेंप्रमाणें- पश्चिमेस अटलांटिक महासागर व ब्रिटनी (केल्टिक पोटीभाषा); उत्तर व वायव्य, इंग्लिश खाडी; ईशान्य व पूर्व बेल्जम, जर्मनी, स्वित्झर्लंड (ट्यूटॉनिक पोटभाषा); आग्नेय वं दक्षिण ही सीमा स्पष्ट नाहीं. दक्षिणेकडील फ्रेंच पोटभाषा व स्वित्झरलंडच्या नैर्ॠत्य भागांतील, इटलीच्या वायव्य भागांतील, दक्षिणफ्रान्समधील उत्तर प्राव्हेन्शल पोटभाषा या दोन वर्गांच्या भाषांचे प्रदेश पूर्वीं एकमेकांनां लागून होते. फ्रेंच भाषाप्रदेशाची सध्यांची आग्नेय दक्षिण सीमा म्हणजे कोठें फ्रेंच व प्राव्हेन्शल या दोहोंचे थोडथोडे अंश घेतलेल्या मध्यस्थ पोटभाषा कोठें उत्तरचे व दक्षिणचे लोक अधिकाधिक वस्तीला राहिल्यानें बनलेल्या मिश्र पोटभाषा, तर कोठें मध्यस्थ पोटभाषा दाबून टाकून वावरणा-या फ्रेंच व प्रॉव्हेन्शल पोटभाषा अशा प्रकारची आहे. ही सीमा म्हणजे पश्चिमेस जिरोंद नदीचें मुख तेथून बोर्डोवरून जवळ जवळ उत्तर दिशेकडे जाऊन अंगूलेमच्या किंचित् उत्तरेस पूर्वेकडे वळून स्वित्झरलंडमध्यें जिनीव्हाच्या उत्तर बाजूनें शिरते.
फ्रें च भा षो चा रा ज की य इ ति हा स.- रोमन लोकांच्या सत्ताविसतारामुळें रोमची भाषा म्हणजे लॅटिन भाषा दक्षिण व पश्चिम यूरोपच्या अर्ध्याअधिक भागावर पसरली व तिनें देश्य भाषांचें स्थान हळू हळू काबीज केलें प्रथमतः सर्व साम्राज्याभर एकाच प्रकारची भाषा प्रचलित झाली. लॅटिनचे जे अनेक स्थानिक प्रकार होते ते रोम या राजधानीच्या शहरीं सुशिक्षितांकडून बोलल्या जाणा-या भाषाप्रकाराच्या वर्चस्वामुळें पुष्कळसे कमी होऊन साम्राज्यांत पसरणारी भाषा जवळ जवळ एकरूप झाली होती. रोमन सैन्यविभाग जसे जागोजाग कायम वस्ती करून राहूं लागले, रोमन वसाहती जशा बनूं लागल्या. जेत्यांची भाषा देश्य लोक जसे वापरूं लागले, तसतशी ही जेत्यांची भाषा एक होती ती फुटून तिच्यांतून स्थानिक उपभाषा उत्पन्न होऊं लागल्या. या उपभाषा एकमेकांपासून वेगळ्या करून टाकणारे जे विशेष त्या त्या भाषांत आहेत त्यांचा उगम, विस्तृत प्रदेशांत एकाच जातीच्या लोकांकडून बोलल्या जाणा-या भाषेंत स्थापनपरत्वें जे रूपभेद, प्रयोगभेद वगैरे नेहमीं होत असतात ते केवळ प्रदेशविसतारामुळेंच भिन्न ठिकाणीं भिन्न स्वरूपाचे होत असतात या वस्तुस्थितींत आहे. भिन्न जातींचे व राष्ट्रांचे लोक एकच लॅटिन भाषा आपापल्या ठिकाणीं आपापल्या वेड्यावाकड्या त-हेनें बोलूं लागल्यामुळें एका लॅटिनमधून नाना प्रकारच्या उपभाषा निघाल्या अशी गोष्ट वरील उपभाषांसंबंधानें घडलेली नाहीं. ख्रि. पू. पहिल्या शतकाच्या मध्यापावेतों सीझरनें गॉल जिंकला नव्हता. तेव्हां तेथील लॅटिन रोमच्या लॅटिनपासून भिन्नता पावूं लागलें ते वरील मितीपावेतों लागलें नव्हतें. खास. यानंतर भिन्नता बरोबर केव्हां उत्पन्न झाली हें सांगणें, सरकारी दफ्तरांत व ग्रंथलेखनांत अभिजात लॅटिन पुढें स्थानिक लोकभाषा भिन्न झाल्यानंतरहि वापरण्याचा प्रघात ठेवल्यानें दुष्कर झालें आहे. तरी पण मध्यइटालीच्या लॅटिनपासून गॉलचें लॅटिन ट्यूटन लोकांच्या सत्तास्थापनेपूर्वीं भिन्न झालें होते, म्हणजे इ. स. च्या ५ व्या शतकाच्या मध्याचे सुमारास भिन्न झालें होतें एवढे खात्रीनें सांगतां येतें. हे ट्यूटन जेते लोक आपल्या सत्तेखालीं आलेल्या सुसंस्कृत लोकांची भाषा हळू हळू वापरूं लागले. या जेत्यांच्या आगमनानें लॅटिन लोकभाषेंत शब्दांचा कमीअधिक भरणा झाला इतकेंच काय तें. इतर कोणताहि फरक या भाषेंत झाला नाहीं.
ही लोकभाषा कृत्रिम त-हेनें संभाळलेली जी ग्रंथभाषा तिजहून या ट्यूटन सत्तास्थापनेच्या वेळीं अगदीं वेगळी झालेली असून तिला भ्रष्टोच्चार लॅटिन असें म्हणण्याची सोय राहिली नव्हती. पुढें कित्येक शतकेंपावेतों जे लॅटिन दस्तऐवज सांपडतात त्यांत ग्रंथभाषेला लॅटिना व लोक भाषेला रोमॅना अशीं भिन्नत्वदर्शक नांवें आढळतात.
गॉलच्या देश्य केल्टिक भाषेला गॅलिका हें नांव असे. तें ९ व्या शतकाचे अखेरीस या केल्टिक भाषेची जिनें जागा घेतली त्या भाषेला लावलेलें सांपडतें. ब्रेटन प्रदेशांत गॅलेक म्हणजे फ्रेंच असा शब्द अद्यापिहि व्यवहारांत आहे.
गॉलमधील फ्रँक लोकांनीं आपली मूळ ट्यूटॉनिक भाषा टाकल्यानंतर तिचें फ्रान्सिस्का हें नांव त्यांनीं स्वीकारलेल्या रोमॅनिक भाषेला देण्यांत आलें व फ्रान्से हें जे आजचें फ्रेंच भाषेचें नांव तें वरील फ्रान्सिस्का या नांवाचाच अपभ्रंश आहे. फ्रान्सिस्का हें नांव उत्तर गॉलच्या रोमॅनिक भाषेलाच लावीत. दक्षिण गॅलच्या भाषेला लावीत नसत. यावरून दक्षिणेतील भाषा व उत्तरेंतील भाषा यांत फ्रान्सिस्का हें नांव उत्तर भाषेला लावण्याच्या काळीं स्पष्ट मतभेद उत्पन्न झाला होता असें दिसतें. फ्रेंच हा शब्द ट्यूटॉनिक आहे व रोमॅनिक भाषा आणि गॉलचे लोक यांनां तो फार दिवसांपासून लावण्यांत आलेला आहे.
फ्रान्सच्या वायव्य किना-यावर स्कँडिनेव्हियन लोक दहाव्या शतकाच्या आरंभींच्या दिवसांत वस्तीस आले. त्यांची मूळ भाषा लवकरच नष्ट झाली. एवढेंच की त्यांच्या भाषेंतील कांहीं शब्द त्यांनीं स्वीकारलेल्या नव्या म्हणजे रोमॅनिक भाषेत आले.
फ्रेंच भाषेच्या इतिहासांत यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरिस शहराचें महत्त्व वाढल्यानें तेथील लोकभाषा ही फ्रान्समध्यें महत्त्वाची भाषा झाली. १५३९ सालीं फ्रान्सिस पहिला यानें पॅरिसच्या फ्रेंच भाषेंतच सर्व राज्याचे सरकारी कागदपत्र ठेवण्याबद्दलचा हुकुम सोडला या सालापासून पॅरिसची फ्रेंच हीं सर्व सरकारी भाषा झाली. पण अद्यापि या राज्यांतील जवळ जवळ निम्या लोकसंख्येला पॅरिसची भाषा अपरिचित आहे.
१०६६ सालीं वुइल्यमनें इंग्लंड जिंकल्यावर नार्मंडींतील भाषा इंग्लंडांत शिरल्या. या भाषा इंग्लंडांत एकमेकांत मिसळून गेल्या. नार्मंडीशीं इंग्लंडांतील नॉर्मन लोकांचे दळणवळण कायम राहिल्यानें यूरोपांत नॉर्मन भाषांत जे वेळोवेळीं फेरफार झाले तेहि इंग्लंडांत आले. जेते लोकांनीं इंग्लंडची भाषा शिकणें व इंग्लंडाच्या विद्वान् लोकांनीं जेत्यांची भाषा शिकणें या गोष्टींमुळें नॉर्मन भाषेंत इंग्रजीचा भाग बराच मिसळला गेला. इंग्लंडांतील नॉर्मन भाषा हळू हळू इंग्रजी भाषेंत बदल होत गेले तशी बदलूं लागली. नॉर्मंडी प्रांत १२०४ सालीं इंग्लंडच्या राजांच्या हाताखालून निघाला तेव्हां पासून पुढें पॅरिसच्या फ्रेंचचें वजन इंग्लंडांत वाढलें. या निरनिराळ्या काळच्या व प्रकारच्या फ्रेंच भाषांच्या इंग्लंडांतील भेसळीला 'अँग्लोनॉर्मन' पोटभाषा असें नांव दिलें जातें. परंतु पोटभाषा या स्थितींत ही फार दिवस राहिली नाहीं. १३६२ त न्यायविषयक कामांत इंग्रजीचा प्रचार सुरू झाला. १३८७ मध्यें शाळांतहि इंग्रजी शिरलें. कोर्टांच्या निवाड्यांचे अहवाल मात्र १६०० पावेतों अँग्लोफेंचमध्यें लिहिले जात होते. आज पार्लमेंटच्या कायद्यांना राजाची संमति दिली जाते तिची भाषा आजची ग्रांथक फ्रेंच असते एवढेंच काय तें वरील फ्रेंचचें स्मारक आतां राहिलें आहे.
रोमॅनिक प्रांतभाषांत फ्रेंच ही प्रथम वेगळी म्हणून अस्तित्वांत आली. आणि ग्रंथांत वापरलेली रोमॅनिक पहिली पोटभाषा हीच होय.
फ्रें च भा षे च्या अं त र्ग त वि का सा चा इ ति हा स.- हा इतिहास इंग्लंडमध्यें नार्मन लोकांनीं नेलेल्या भाषांचाच विशेषतः आहे. फ्रेंचमध्यें जो शब्दसंग्रह आहे त्यांतील मूळ भाग म्हणजे गॉलमध्यें प्रविष्ट झालेल्या लॅटिन शब्दांचा होय. हे लॅटिन शब्द बोलण्यांत असल्यानें स्वभावतः त्यांत कांहीं फेरफार होत गेले. हे फेरफार झालेले लॅटिन शब्द म्हणजेच फ्रेंच शब्द होत. यांत निरनिराळ्या काळीं साधित शब्दांची फार भर पडली. देश्यांच्या केल्टिक भाषेंतून कांहीं शब्द आले. पुष्कळसा भरणा गॉलच्या ट्यूटन जेत्यांच्या भाषेंतून आला. फ्रान्समध्यें स्कँडिनेव्हियनांची वसाहत झाली त्या वसाहतीमुळें व उत्तर समुद्रावरील लोजर्मन लोकांशीं व्यापारी दळणवळण होतें त्यामुळेहि कांहीं ट्यूटन शब्द आले. लोभाषा याप्रमाणें वाढ पावत असतां ग्रंथांत व सरकारी आणि धार्मिक कारभारांत लॅटिनचाच उपयोग करीत होते. त्याकारणानें या ग्रांथिक लॅटिनमधून लोकभाषेंत वेळोवेळीं बरेच अभियुक्त लॅटिन शब्द घेतले गेले पुढें लोकभाषेचा ग्रंथांत उपयोग होऊं लागला. तेव्हां अभियुक्त लॅटिन शब्द तिच्यामध्यें मोठ्या प्रमाणांत शिरूं लागले. विद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या (रिनेसन्स) वेळेला हा लॅटिन शब्दाचा भरणा अतिशयच झाला. हा भरणा तदनंतर कमी झाला नाहीं तर हळू हळू वाढतच गेला आहे व त्यायोगें फ्रेंच भाषेची स्वतंत्र विकसनाची शक्ति कांहीं अंशी मर्यादित झाली आहे. क्रूसेडर लोकांनीं पौरस्त्यांचे व इतर परकीयांचे कांहीं शब्द भाषेंत आणले. १६ व्या शतकांत युद्धें, राजघराण्यांतील विवाह व ग्रंथ यांच्या द्वारा पुष्कळसे इटालियन व स्पॅनिश शब्द आले. प्रॉव्हेन्शलमधून कित्येक शब्द आले असून पॅरिसच्या फ्रेंचमध्यें इतर पोटभाषांतूनहि बरेच शब्द घेतले गेले आहेत. जर्मन व इंग्रजी या भाषांतूनहि कांहीं शब्द आले आहेत.