प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
प्राचीन इतिहास.- खिव येथील नेस्टर नांवाच्या एका भिक्षुबखरकारानें असे लिहून ठेविलें आहे कीं, ख्रिस्ती शतकाच्या नवव्या शतकांत लाडोगा सरोवर आणि नीपर नदीचा उत्तरभाग यांच्या दरम्यान वसती करून राहिलेले लोक रूसमधील कांहीं साहसी शिलेदारांस खंडणी देत असत. रूस हा स्वीडनमध्यें होता असें म्हणतात. इ. स. ८५९ मध्यें त्यांनीं या रूसमधील लोकांस हांकून दिलें परंतु ते निघून गेल्यावर जिकडे तिकडे बखेडे माजून अस्वस्थता उत्पन्न झाली. तेव्हां त्यांनीं रूस प्रांतांत कांहीं मंडळी पाठवून तेथील लोकांस पुन्हां राज्य करण्यास बोलावलें. रूस प्रांतांतून रूरिक, सिन्यूस आणि त्रुन्व्होर या नांवांचे तीन राजे आले. यांनीं या घराण्याची स्थापना केली त्यांतील वंशज आतांपर्यंत राज्य करीत होते.
हे रुसमधील लोक कोण होते याबद्दल आजपर्यंत बराच वादविवद झाला आहे व या बाबतींत अजून एकमत झालेलें नाहीं. तथापि त्या वेळीं यूरोपच्या निरनिराळ्या भागांत आपल्या बाहुबलानें लुटालूट करीत फिरणा-या ज्या नॉर्समेन अथवा नॉर्मन लोकांच्या टोळ्या असत त्यांपैकीच हे असावेत असें वाटतें. यांनीं निरनिराळ्या प्रदेशांत स्वा-या केल्या व ठिकठिकाणीं आपल्या क्षत्रियवर्गाची स्थापना केली व पुढें स्थानिक लोकांत हे मिसळून गेले. रूरिक याची राजधानी नोव्हेगोरॉड हें शहर होतें व तें बाल्टिक समुद्राकडून काळ्या समुद्राकडे जाणा-या हमरस्त्यावर होतें.
पोलंडमध्यें पुढें लिहिलेल्या जाती त्या त्या प्रदेशांत वसाहती करून आहेत. विएलकोपोलेनी-मध्य पोलंड प्रांतांत; मॅलोपोलेनी, वार्ता नदीवर; लेक्झिकॅनी- नेर नदीच्या पाणथळ भागात; कुर्षी -पोडलॅसी नदीच्या पाणथळ भागांत; कुजविआसी-सायलेशिया प्रांतांत; स्झ्लॅसी-सायलेशिया प्रांतांत; गोरेल-कार्पेथिअन पर्वतप्रदेशांत.