प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

पोर्तुगीज भाषा.- स्पेनच्या लॅटिनची दुसरी शाखा म्हणजे पोर्तुगीज गॅलिशिअन. या शाखेमध्यें पोर्तुगाल व आफ्रिका, अमेरिका, आशिया येथील पोर्तुगीज वसाहती या ठिकाणीं बोलली जाणारी पोर्तुगीज भाषा व जुन्या गॅलिशियाच्या राज्याची (सध्यांचे पॉनेव्हेला, लाकोसना, ओरेन्स व लुगो हे प्रांत) व जुन्या लिआ राज्याचा कांहीं भाग, (विएर्झो प्रदेश) या ठिकाणची भाषा या येतात. कॅस्टिलिअनप्रमाणें पोर्तुगीज ही वाङ्मयाची भाषा आहे. १२ व्या शतकांत पोर्तुगीज राष्ट्र निर्माण झालें तेव्हांपासून त्यांचें वाङ्मय या भाषेंत रचिलें जात आहे. गॅलिशिअन अथवा गजगो ही कॅटालनपेक्षांहि की महत्त्वाची आहे. गॅलिशिअन बोलणारे स्पॅनिअर्ड लोक १८,००,००० व कॅटालन बोलणारे ३५,००,००० आहेत. गॅलिशिअनच्या ऐवजीं कॅस्टिलिअन भाषेचा उपयोग ग्रंथरचनेच्या कामीं होऊं लागल्यानें गॅलिशिअन ही एक स्थानिक बोली होऊन बसली आहे. पोर्तुगीज ही लॅटिनपासून कॅस्टिलिअनपेक्षांहि दूर गेलेली आहे. तरी पण तिच्यांत लॅटिन शब्द पुष्कळच राखलेले आहेत, व तिचे क्रियापद- प्रयोगहि बहुतांशीं लॅटिनच ठेविले आहेत. ती ब-याच बाबतींत फ्रेंच भाषेसारखी आहे. तिच्यांतील लँटिन शब्दामुळें व प्रयोगांमुळें कॅस्टिलिअनपेक्षां पोर्तुगीज भाषा अधिक जुन्या स्वरूपाची वाटते.