प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास
नेदर्लंडमधील लोक :- नेदर्लंड म्हणजे हॉलंड व बेल्जम. जुलियस सीझरच्या स्वा-या सुरू झाल्या तेव्हां या स्वा-यांमुळें रोमन लोकांना नेदर्लंडचा प्रथम परिचय झाला. या प्रदेशांत गॅलोकेल्टिक व जर्मानिक लोक राहत होते. सामान्यतः -हाइैन नदी ही या दोन लोकांमधील सरहद्द होती. सरहद्दीजवळच्या मुलखांत मिश्र जातींचे लोक राहत होते. गॅलोकेल्टिक जातींना बेल्जी हें सामान्य नांव असे. यांपैकीं नर्व्हीं या जातीचे लो ख्रि. पू. ५७ सालीं सीझरची स्वारी इतके झाली तेव्हां सर्वात अधिक प्रबळ होते. म्यूस नदीच्या उत्तरेला, विशेषतः वाल व -हाइन या नद्यांच्या मधील सखल क्षेत्रांत चट्टी या सुविख्यात जर्मानिक जातीपैकीं बटावी ही जात राहत होती. यांच्या पलीकडे फ्रिशिअन ही जर्मन जात होती. आणखीहि जाती नेदर्लंडांत होत्या त्यांत कनिनफेटी, औसी, यूसिपेटीस, सिब्रिं, ब्यूरोनीज, मेनाप्ति, मोरिनी, अडुआट्यूकी या प्रमुख होत्या. (पृ. १८ पहा)
जुलियस सीझरनें नर्व्ही लोकांशीं व त्यांच्या मित्रजातीशीं निकरानें लढून बेल्जिक जातींवर रोमची सत्ता लादली. आगस्टसच्या कारकीर्दींत ख्रि. पू. १५ या सालीं जिंकलेल्या मुलखाचा गॅलिया बेल्जिका नांवाचा प्रांत बनविला गेला. बटेवियन व फ्रिशियन हेहि पुढें जिंकले गेले (इ. स. १३ व इ. स. ४७) बटेविअन लोकांनीं इ. स. ६९-७० सालीं बंड केलें. पण तें मोडून बटेविअन लोक पुन्हां रोमचे स्नेही झाले.
फ्रँक लोक तिस-या शतकाचे अखेरीस रोमन प्रांतांत स्वा-या करून धुडगुस घालूं लागले त्या वेळीं जुन्या जातींची नांवें क्वचितच आढळतात. या जाती पुष्कळशा फ्रिशिअन या एका नांवाखालीं मिसळून एक झाल्या होत्या. रोमन प्रांतांत राहणारे लोक रोमनसंस्कृतीचे झाले होते. सॅलियन फ्रँक हे रोमचे नामधारी मांडलिक म्हणून बेल्जिया गॅलिकांत सत्ता चालवीत होते. वस्तुतः तेच खरे सत्ताधारी होते. इ. स. ४८१-५११ या मुदतींत सगळा दक्षिण व मध्य नेदर्लंड यांच्या ताब्यांत होता. फ्रिशियन लोक मात्र स्केल्डच्या मुखापासून एम्सच्या मुखापर्यंतच्या किना-यावर राहत असून स्वतंत्र होते. गेल्डर्लंड, ओव्हरीसेल व ड्रेन्ट या ठिकाणीं सॅक्सन लोक होते. सॅक्सन व फ्रिशियन यांची जूट असून ते दोघेहि फ्रँक लोकांचें शत्रुत्व करीत होते. फ्रँक राजा क्लोव्हिस (४८१-५११) हा व याचे लोक ख्रिस्ती झाल्यानें गॅलोरोमन प्रजाजन व फ्रँक यांचा सलोखा लवकर झाला व त्यांच्यांतील जतिद्वेष मोडून दोघांची एक जात बनून गेली. पण हे फ्रँक लोक ख्रिस्ती झाल्यानें पुराणधर्मी सॅक्सन व फ्रिशिअन यांचे त्यांजशीं असलेलें वैर अधिक तीव्र झालें. दक्षिण नेदर्लंडांत ख्रिस्ती पंथाचा प्रसार लवकर झाला पण उत्तरेकडे त्याची गति फारच थोडी होती. फ्रिशिअन लोक पुष्कळ काळानंतर ख्रिस्त्यांच्या गोटांत आणतां आले (इ. स. ६५) यानंतरहि त्यांच्यांत बरेच जुन्या धर्माला चिकटून राहिले होते. ८ व्या शतकाच्या अखेरीला मात्र शार्लमान राजानें आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर फ्रिशियन व सॅक्सन यांस जिंकून ख्रिस्ती करून टाकलें.
९ व्या व १० व्या शतकांत नॉर्थमेन लोकांच्या स्वा-या नेदर्लंडावर झाल्या. ८३४ सालीं यूट्रेच व हॉरस्टेड हे भाग नॉर्थमेगच्या हातांत गेले व थोड्याच दिवसांत सर्व हॉलंड व फ्रीसलंड येथें त्यांची सत्ता झाली. याप्रमाणे नॉर्थमेन यांची सत्ता कधीं येथें तर कधीं तेथें अशी १००|२०० वर्षें होती.
११ व्या शतकाच्या अखेरीला नेदर्लंडामध्यें सरंजामी संस्थानांची व्यवस्था दृढ होऊन बसली होती व सुधारणा हळूहळू विकास पावत होती. या सुमारास पीटर हर्मिट यानें क्रूसेड म्हणजे इस्लामविरूद्ध युद्ध करण्याचा उपदेश करून सर्व पश्चिम यूरोप चेतवून दिलें. या धर्मविषयक युद्धांत नेदर्लंडच्या राजांनीं व अमीर उमरावांनींच सर्वांत अगोदर व सर्वांत अधिक भाग घेतला. या युद्धांमुळे नेदर्लंडांत पूर्वेकडील जिनसा, कला व कल्पना आल्या आणि या युद्धानें जी तेथील व्यापाराला चलती मिळाली तिजमुळें नेदर्लंडांत शहरें उत्पन्न होऊन त्यांची खूप भरभराट झाली. बेल्जममध्यें फ्रेंच, जर्मन व फ्लेमिश भाषा चालतात. त्यांची माहिती अन्यत्र दिलीच आहे. हॉलंडमध्यें डच भाषा चालते. तिच्याबद्दल माहिती येथें देतों.