प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

डेन्मार्कमधील लोक.- डेन्मार्कसंबंधींचें ज्ञान प्रथम फ्लिनी याच्या ग्रंथांत मिळतें. स्कंदिआई या नांवाच्या तीन बेटांना तो उल्लेख करतो. स्वीडनलाहि हेंच नांव लाविलेलें आढळतें. या बेटांतील लोकांविषयीं फ्लिनी कांहीं लिहीत नाहीं. जूटिश द्वीपकल्पाविषयीं तो अधिक माहिती देतो. व याला सिंब्रिक शेर्सोनीज असें म्हणतो. सॅक्सन, सिगूलोकन, सबालिगोई, कोबंदोई, शालोई, पुंदूसी, शारोंद, कब्रोई हे लोक जूटिश द्वीपकल्पांत असल्याचें तो लिहितो फ्लिनीमध्यें आणखीहि याच प्रकारची कांहीं माहिती आहे. पाँपोनिअस मेला हा ग्रंथकार म्हणतो; सिनस कोडानस (हे नांव फ्लिनींत आहे. बाल्टिक समुद्राच्या नैर्ॠत्य भागाला हे नांव असावें) येथें किम्ब्री आणि टयुटन लोक राहत होते.

गॉल व इटाली यांवर ख्रिस्तपूर्व २ -या शतकाचे अखेरीस स्वारी करणारे ते हेच किंब्री व ट्यूटन लोक होत अशी रोमन लोकांची समजूत होती.

लांगोबडी यांनी ६ व्या शतकांत एल्ब खो-यात राहणा-या हेसली लोकांचा पराजय केला व ते पुढें वार्नी आणि डेन यांच्या मुलखांतून थूलला म्हणजे स्वीडनला गेले असें प्राकोपिअस म्हणतो. हाच डेनचा प्रथम उल्लेख होय.

डॅनिश परंपरागत कथांप्रमाणें या काळीं डेन्माचे राज्यांत विथेरलाएथ (झीलंड, मोएन, फालटन आणि लालंड) व जटलंड आणि स्काआन हे प्रदेश होते.

६ व्या शतकाच्या मध्यापासून ८ शतकाच्या आरंभापावेतों डॅनिश इतिहासाची काहीच माहिती उपलब्ध होत नाहीं. ८ व्या शतकाच्या आरंभाला ऑन्गेंडस नांवाचा डॅनिश राजा झाला.

८ वे शतकाचे अखेरीपासून यूरोपच्या इतिहासांत डॅनिश लोकांचे नांव पुनःपुन्हां आलेलें सांपडतें.

साधार असा डॅनिश इतिहास ९ व्या शतकाच्या आरंभापासून उपलब्ध होतो. 'व्हिकिंग पीरिअड' म्हणजे डेन लोकांच्या स्वा-यांच्या काळ याला ७९३ पासून आरंभ होतो, व ९११ सालीं रोलो याची नॉर्मडींत सत्ता स्थापन झाली तेव्हां तो संपतो.

याप्रमाणें डेन्मार्कच्या मूळच्या लोकांविषयीं माहिती आहे. आतां त्यांच्या भाषेकडे वळूं.