प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

नॉर्वे मधील लोक.- पुराणवस्तुशास्त्री व भूस्तरशास्त्रवेत्ते यांच्या संशोधनानें नॉर्वे मध्यें पूर्वीं मासे व मृगया यांवर राहणारा लोकसमाज ख्रि. पू. ६०० वर्षापासून होता असें सिद्ध झालें आहे. लॅप लोक या देशांत इ. स. ९००-१००० या कालांत आले. मूळ लोकवस्ती फिनीश जातीची होती. आज फिनलंडांत जे उग्रोफिन लोक आहेत त्यांचें व वरील फिनिश लोकांचें कांहीं फार दूरचे नाते असावें. ट्यूटॉनिक लोक नॉर्वेमध्यें केव्हां आले ते निश्चितपणें समजलेलें नाहीं दक्षिण नॉर्वेमध्यें ट्यूटॉनिक लोक सुमारे ख्रि. पू. १७०० या काळी गेले असावे असे पुराणवस्तुसंशोधनाच्या आधारावर अनुमान केलेलें आहे. तें कसेहि असो. जुन्या लोकांची भाषा जाऊन ट्यूटॉनिक भाषा तिच्या जागीं आली हें मात्र निश्चित आहे. मूळचे लोक कांहीं गुलाम या नात्यानें ट्यूटॉनिक लोकांनीं आपल्यांत एकरूप करून घेतले व बाकीचे लोक त्यांनीं डोंगरांत व किना-यालगतच्या बेटांत पळवून लावले. माळजमिनीवर फिनलोक ऐतिहासिक काळापावेतों स्वातंत्र्य राखून होते असें दिसते.

ट्यूटन लोक जे नॉर्वेंत आले ते कांहीं पश्चिमेकडील भागांतून जटलंडमधून व कांहीं पूर्वेकडील भागांतून म्हणजे स्वीडनच्या पश्चिम किना-याच्या प्रदेशांतून आले. पश्चिमेकडून आलेले लोक अगुर, रोगालंड व होडलिंड (आजचे ख्रिस्तीयनसँड व सँड बर्गन्हुस जिल्हे) येथवर पसरले व शेवटीं उत्तरेकडे सांडमूरपर्यंत पोहोंचले. पूर्वेंकडील प्रवाह तीन भागांत विभागला जाऊन एकानें पश्चिम किना-यावरील प्रदेश, दुस-यानें आजचे नॉडिलंड व हेर्डलंड हे प्रदेश व तिस-यानें स्वीडनमधील जामालंड व हेत्सिगलंड हे प्रदेश व्यापिले. व यांचेच वंशज आज त्या त्या भागांत वस्ती करून आहेत.