प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

आंग्ल लोक.- इंग्लंडांतील ठिकाणांच्या नांवांवरून ज्या तेथें रहात असलेल्या जातींची आठवण होईल त्यांचीं नांवे केल्टिक, रोमन, सॅक्सन, स्कँडिनेव्हियन, नॉर्मन हीं होत. स्मारकरूपी स्थलनामांची ओळीनें उदाहरणें ब्रूघॅम, वूर्सेस्टर, बॅम्बरो, व्हिटवि, बोल्यू अशी देतां येतील. ब्रिटनमध्यें प्रथम कोणाची वस्ती होती याजबद्दल भूस्तरशास्त्रज्ञांचे ऐकमत्य नाहीं. ब-याच निरनिराळ्या जातीनीं ब्रिटनमध्यें स्वा-या केल्या असाव्या. पूर्वींच्या स्वा-याबद्दल संदेह पुष्कळ आहे. अगदीं प्राचीन काळीं कृष्णवामनांची म्हणजे निग्रिटोची वस्ती इंग्लंड, व स्काटलंड यांचा पश्चिम भाग व आयर्लंडचा पूर्व भाग येथें होती असें अनेक संशोधक म्हणतात; पण ब्रॉन्झ युगांत गोइडेल लोक व लोहयुगांत ब्रिथॉन व बेल्गाइ लोक येऊन त्यांनीं आपणांबरोबर केल्टिक संस्कृति व भाषा आणल्या, याबद्दल संदेह नाहीं. ब्रिटनमध्यें त्यांच्या पूर्वी रहात असलेल्या जातींचा या लोकांच्या येण्याच्या योगानें कितपत नायनाट झाला व हे लोक स्वतः कितपत केल्टिक रक्ताचे होते याजबद्दल वाद आहे. पश्चिम यूरोपखंडाच्या केल्टिक बोलणा-या लोकांची जात तीच यांची जात असावी असे म्हणण्यास जागा आहे. जूलियस सीझर याच्या वेळेपावेतो ब्रिटनचे लोक अगदी उत्तरेकडील जाती वगळून भाषेनें व राहणीनें केल्ट झाले होते. ते ड्रइड धर्मी होते. उत्तर गॉल रोमन लोकांनी जिंकला त्या वेळपासून (ख्रि. पू. ५७-५०) भूमध्यसमुद्र व ब्रिटन यांचा साक्षात् संबंध आला. क्लॉडिअसनें ब्रिटनचा मुलुख जिंकला [इ. स. ४३]

चवथ्या शतकांत सॅक्सन आयरिश (स्कॉटी) व पिक्ट यांच्या स्वा-या ब्रिटनवर होऊं लागल्या.

पांचव्या शतकाच्या पहिल्या चरणांत ट्यूटॉनिक लोकांनीं गॉल जिंकला. तेव्हां रोमन व ब्रिटन यांचा संबंध तुटला. रोमानोब्रिटिशांना रोमहून कुमक येण्याचें बंद झालें. सॅक्सन लोकांना पिक्ट व स्कॉट लोकांशीं लढण्यासाठीं बोलाविण्यांत आलें. त्यांनीं कुमक केली व शेवटीं ते ठाणें देऊन बसले.

बीड या इतिहासकाराच्या मतें केंट व हँपशायर येथे जूट लोक एसेक्स, ससेक्स वसेक्स येथे सॅक्सन लोक व बाकीच्या ठिकाणीं अँग्ली लोक वस्ती करून राहिले.

सातव्या शतकाच्या मध्यापावेतों बाह्य लोक ब्रिटनच्या निरनिराळ्या भागांचें आक्रमण करीत होते. या जिंकलेल्या भागांत निरनिराळीं राज्यें व राजघराणीं स्थापन झालीं.

 नवव्या शतकांत डेन लोकांच्या ब्रिटनवर स्वा-या सुरू झाल्या.

या शतकाच्या अखेरीस डेन राजा गुथ्रम व आलफ्रेड यांजमध्यें तहनामा होऊन ईस्ट अँग्लियांत गुथ्रम स्वस्थतेनें राज्य करूं लागला.

दहाव्या शतकाच्या अखेरीला डेन स्वा-या पुनः सुरू झाल्या. कॅन्यूट हा डेन राजा फार प्रसिद्ध होऊन गेला (१०१६-१०३५). २६ सप्टेंबर १०१६ रोजीं नॉर्मन लोक वुइल्यम दि काँकरर याच्या नेतृत्वाखालीं इंग्लंडच्या किना-यावर उतरले. वुइल्यमला नाताळाच्या दिवशीं राज्याभिषेक झाला व नॉर्मन लोकांचें लवकरच जिकडेतिकडे प्रस्थ माजले. त्यांच्या वसाहती चोहोंकडे झाल्या. पुढें यांचे राज्य एकसारखे स्थिर व संवर्धित होत गेलें आणि त्या राज्याची स्थिरता स्थानिक भाषेच्या विकासास व राष्ट्रीकरणास उपयोगी पडली.